delivery books and stories free download online pdf in Marathi

डिलिव्हरी

#डाक्टरकी -©डॉ क्षमा शेलार.

डिलीवरी

   विद्यार्थी दशेत असतांना पहिल्यांदा डिलीवरीचं पेशंट बघितलं तेव्हाचा मनावर कोरला गेलेला हा अनुभव!!
    डिलीवरी...
एखाद्या स्त्रीसाठी आई होणं ही किती अनमोल गोष्ट असते.बाईचा पुनर्जन्म होतो अगदी.आणि हा असा क्षण मला फार आतुरतेनं बघायचा होता.जो की,वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी असल्यानं फार लवकर बघायला मिळणार होता.मनात शिगोशीग उत्सुकता भरली होती.तो एवढूसा लोण्याचा गोळा कसा बरं जन्मत असावा? हिंदी सिनेमांमध्ये दाखवल्याप्रमाणे मूल जन्माला येतांना आईला त्रास होतो हे माहिती होतंच पण त्या त्रासाची मिती मला त्यादिवशी उमजली.त्यादिवशी मोठ्या तयारीनं मी हॉस्पिटलमध्ये गेले.
    पहिल्यांदाच डिलीवरी बघणार त्यामुळे उत्सुकता, भीती आणि डॉक्टर व माणूस म्हणून असणाऱ्या सर्व भावनांची डोक्यात गिचमिड झालेली...
     प्रत्यक्ष लेबर रूम मध्ये पाऊल ठेवलं आणि समोरचं दृश्य पाहून डिलीवरी ला चिकटून असणाऱ्या माझ्या सर्व पारंपारिक आणि उदात्त संदर्भांची वाफ होऊन गेली.
       समोर प्राणांतिक विव्हळत पडलेल्या पेशंट्स साठी डिलीवरी म्हणजे सृजनाचा आनंद, पुनर्जन्म वगैरे काही नव्हतं. त्याक्षणी त्या सगळ्यांसाठी फक्त एकमेव भावना खरी होती ती म्हणजे वेदना.. फक्त वेदना....
          त्या तिन्ही पेशंटचं ते विव्हळणं ऐकून पहिल्या ४-५ सेकंदांसाठी मेंदूतल्या सगळ्या पेशी अक्षरशः संपावर गेल्या. साधारण एक ते दीड तासात पहिली पेशंट डिलीवर झाली आणि सामोरं आलं काळीज चिरत जाणारं एक कटू सत्य.....!
     तिचं बच्चू पोटातच गेलेलं होतं...
     stillbirth ...
      खरं सांगायचं झालं तर ती इतकी अशक्त होती; गरोदरपणाची रीस्क तिनं घ्यायलाच नको होती कारण ते तिच्या ही जिवावरही बेतू शकत होतं पण आयाबायांमध्ये असणारं आईपणाचं बिरूद तिला मिरवायचं होतं ना..
          अखेर एवढी मोठी रिस्क घेऊनही बच्चू गेलेलंच होतं.ही 
वाईट बातमी समजल्यावर तिच्या नातेवाईकांचा बिभत्स आक्रोश सुरू झाला;
   "आरं द्येवा!!!
    या सटवीनी घास घेतला गं लेकराचा!!! 
     माझ्या लेकाचा वंस बुडीवला"
दुसरी एक बाई म्हणाली; 
   "लेकराला गिळायच्या आगुदर ही छिनालच का नाई मेली???"
        
     गेलेल्या बच्चुची आई मात्र थिजून गेल्यासारखी पडून होती जणू काही तिनेच खूप मोठा गुन्हा केलाय.
            दुसर्या दोघींना अजूनही त्रास होतच होता.त्यांच्या किंकाळ्या, पहिल्या पेशंट च्या नातेवाईकांचा तो आक्रस्ताळी शोक, लेबर रुम मधला तो टिपीकल वास आणि अजूनही लिहीता न येण्याजोग्या खूप काही गोष्टी; या सगळ्याने डिलीवरी बद्दलच्या माझ्या सर्व कविकल्पना हवेतच विरून गेल्या.
          डोक्यात विचारांच काहुर;
"शी !! याला लोक संसार म्हणतात?? 
यासाठी जीवाचं रान करतात??
 बायका तर प्रसंगी स्वतः च्या जीवाचाही विचार करीत नाहीत.
मूल असणं इतकं महत्वाचं आहे? 
आणि समजा नाहीच झालं तर??
सुन्न...
सुन्न....
    शेवटी डोक्याला आलेल्या मुंग्या झटकण्यासाठी मी NICU (लहान मुलांचा अतिदक्षता विभाग) मध्ये गेले...
       तिथे अगदी लहान अशी १०-१२ बाळं ठेवलेली होती. मी हळूहळू एकेका बाळाचे निरीक्षण करत होते.
       सगळ्या बाळांशेजारी छोटे छोटे मऊ कापसाचे २-२ लोड ठेवलेले.शेषशय्येवर श्रीविष्णु देखील इतक्या ऐटीत झोपले नसतील तितक्या ऐटीत हे छोटे राजकुमार झोपलेले.शेवरीच्या कापसाचे पुंजकेच जणू..
         काहींची पोझिशन अशी की; त्यांना वाटत असावं अजून आपण आईच्या पोटातच आहोत तर काहींच्या देवबाप्पाशी गप्पा सुरू त्यामुळे उगीचच बोळक्या तोंडाने हसायचं काम सुरू होतं. काहीजणांचं चिरक्या आवाजात टँहँटँहँ सुरू तर काहीजण यापैकी काहीच नाही तर तोंडावर अगदी'हे जग मिथ्या आहे' वगैरे भाव घेऊन झोपलेले.
          रडण्याची स्टाइल ही प्रत्येकाची अलग... कुणी तार सप्तकात रडतय तर कुणी खर्जात सूर लावलेला आणि काहीजण नक्की काय करू ?रडू की हसू ??अशा confusionमधले.
            फुलपाखराने पंख हलवावे इतकी नाजूक..अलवार..त्यांची प्रत्येक हालचाल.
पारलौकिक अनुभव होता तो.
            त्या सगळ्या बच्चे कंपनीला डोळ्यात साठवताना वेळ कसा गेला समजलच नाही. पण तिथून निघतांना एक मात्र पक्कं जाणवलं की; माझ्या डोक्यातल्या सगळ्या उद्वेगजन्य प्रश्नांची उत्तरं आता मिळाली होती. 
त्यांच्यापैकी 
कुणीच....
काहीच..... 
बोललं नव्हतं.....
 तरिही....
                    

©डॉ. क्षमा शेलार
बेल्हा

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED