ती एक तारीख... Kshama Govardhaneshelar द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती एक तारीख...

झिपरू पाटील

     नेहमीप्रमाणे सकाळची आवराआवर सुरू होती. मी कुठल्याशा कामासाठी ह्यांना विचारलं,

"अहो आज किती तारीख आहे?

"एक" 

हे उत्तरले.

आम्ही दोघांनी एकमेकांकडे चटका लागल्यासारखं बघितलं.
काही क्षण उदास शांतता...
एक सुस्कारा टाकून मी माझ्या डेली कामांना लागले.. हे ह्यांच्या..

असं काय होतं एक तारखेत?
मनातल्या मनात कालचक्र उलटं फिरत होतं.

एक तारीख आणि झिपरू पाटील हे एक समीकरणच बनलेलं होतं.मला आठवतेय माझी आणि पाटलांची पहिली भेट...

   मी क्लिनिकमध्ये बसलेले होते.हे व्हिजीटला गेलेले होते.मी कंपाउंडरला सांगितलं नेक्स्ट पेशंट पाठव म्हणून.

      झिपरू पाटील धीमेधीमे चालत आत आले.ठेंगणी ठुसकी आणि अतिबारीक अंगकाठी. पांढरेस्वच्छ कपडे.दुटांगी धोतर.त्यांची आन, बान, शान असलेली टोकदार नाकाची टोपी. हातात आधारासाठी असणारी ,पण सदा दोलायमान भासणारी काठी.काचांना वायपर लावण्याची तीव्र इच्छा व्हावी अशा धुरकट काचांचा चष्मा.ज्याच्या जाड काचांतून त्यांचा एक डोळा किंचित मोठा दिसत असे.

"तुम्ही कोन?"

"मी...?"

नवीन लग्न झालेलं होतं .
पटकन त्यांना काय उत्तर द्यावं मला सुचेना.

"डाक्टरची मंडळी काय?"
"हं"
"अरं वा.लक्ष्मीनारायनाचा जोडाच दिसतोय..वा..वा..."

थोडावेळ थांबून त्यांनी विचारलं,

"म्याडम!! डाक्टर कवाशीक कदी येतील?"

ह्यांना यायला वेळ होता.तोपर्यंत मी पाटलांशी गप्पा मारत बसले.म्हणजे पाटीलच बोलत होते.मी उत्सुकतेनं ऐकत होते.

   "म्याडम!! तुमाला सांगतो..लय कामं केली आम्ही.. देवरसपना केला...इहीरी फोडल्या...खड्डे खांडले..शेती केली... बैलं घेतली..मोकार नाद केले."

  गवयानं तान घ्यावी अशी आपसूकच त्यांनी मान हलवली.

"अरे बापरे! खूपच काम केलं तुम्ही आयुष्यभर"

  माहेर शहरातलं असल्यानं ग्रामीण लोकांच्या जिण्याविषयी मला मोठंच कुतूहल होतं तेव्हा.

  "अवो म्याडम येवढं काम करूनबी पोटाला पोटभर मिळत नवतं.पाच हात रूंद,ईस हात लांब आन् येक हात ख्वोल खड्डा खनल्यावर येक रूपाया मिळायचा.
काय सांगायची ती तऱ्हा?"

"बापरे! इतके कष्ट करून फक्त एक रूपया?"

" अवो ह्ये तं काईच नाई.बात्तरच्या दुष्काळात तं निसत्या घुगऱ्या खाल्या.मिळतंच नवतं काई तं करता काय? आमचा जमानाच लय नादान".

"घुगऱ्या??"

"अवो म्हंजे निस्तीच बाजरी, जवारी,मका,लाल बाजरी,पिवळी जवारी यातलं जे भेटल ते उकडायचं आन् खायचं.त्येला ना मसाला ना फिसाला.निस्तं पोट भरायचं बघायचं ब्वॉ. पुढं मंबईला गेलो तवा बख्खळ पैसं कमावलं आन् येकाच दिवशी पाच मसाला ढोसा खाल्ले."

  मला हसायला आलं.आता त्यांच्या कहाणीत मी चांगलीच रंगून गेले होते.

"अच्छा!! मग मुंबईला कसे काय गेलात अचानक?"

"अवो म्याडम ती येक अजून यगळी ष्टोरीए."

"सांगा की..."

"त्येचं काय झालं. माझी बायको लय गोरीपान व्हती.पार गोरीभुसूक.माझ्या बापाला सून लयच पसंत पडली. म्हन्ला, पोर लय लख्ख हाए.काई झालं तरी हीच  पोर करायची झिपऱ्याला."

"मग? तुम्ही काय म्हणालात तुमच्या पप्पांना?"

"आरं द्येवा! आमचं पप्पा काय??
हा हा!! त्ये आजच्या काळातल्यासारखं व्हतं का? पोरापोरीच्या पसंतीला कोन नवतं इचारीतं? माझी काय टप्पर बापासामनी बोलायची.नवराबायको कहाला म्हन्त्यात त्ये बी कळत नव्हतं .आम्ही दोगं येकाच गावचे .दोगं बी येकाच डोंगरावर जायचो गुरं वळायला."

"हो??गंमतच आहे."

"अवो लय गंमत.
तर काय झालं.बापानी परस्पऱ्याच आमची सुपारी फोडली.तारीख धरली.द्याज म्हनून सहा मन गहू द्यायचं कबूल केलं.रोख शंभर रूपै देवून पाच दिवस वाजंत्री वाजवले."

''द्याज?"

"पोरीच्या बापाला द्येवा लागायचं ते.येकप्रकारचा हुंडाच.''

"अच्छा"

"बापानी शेरडं इकली तरी पैसा कमी पल्डा मग बापानी हातउसने ईस रुपये घेतले व्हते येका जोडीदाराकडून.नंतर बाप आजारी पल्डा.त्येच्याकडून काय ते फेडनं व्हईना.माजं लगीन झालं.खानारं येक तोंड वाल्ढं.बापाचा दवापान्याचा खर्च वाल्ढा.मग मी गेलो मंबईला."

"आणि मग तुमच्या मिसेस?"

"मिशेश इधंच ठेवली गावाला.गावचं यडं त्ये.त्याला काय करायचं मंबईत न्हेऊन?''

"बरं..!"

"मग तिधं गोदीत कामाला लागलो.वाळू वाह्यली.माझी हुशारी पाऊन मुकादमानं मला विदेशात पाठवलं"

"हो? काय सांगताय?"

"मग! पाकिस्तान म्हनु नका,नेपाळ म्हनु नका, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तुमाला सांगतो पठानकोट,दिल्ली.सारं जग फिरलो बगा."

माझ्या बुब्बूळांची त्रिज्या दुपटीनं वाढली होती.

"माला हिंदी बोलता येतं,गावठी मराठी बोलता येतं,भोजपुरी बोलता येतं,इंग्रजी बोलता येतं..."

"काय सांगता ?
तुम्हाला इंग्लिश बोलता येतं?तुमचं एज्युकेशन किती झालंय?"

"आवो म्याडम कहाचं एडूकेशन? हे आपलं ऐकून ऐकून जमातंय."

  माझी खात्री पटवण्यासाठी त्यांनी खरोखरच वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलायला सुरुवात केली. थोडफार जमतही होतं त्यांना बोलायला. पण इंग्लिश भाषा म्हणून अतीव आत्मविश्वासाने ,कुठेच न अडखळता त्यांनी 'च' ची भाषा बोलायला सुरुवात केली नं,तेव्हा मी तीनताड् उडाले होते.तेवढ्यात हे व्हिजीटवरून आले त्यामूळे आमच्या गप्पांचा ट्रँक बदलला.

"डाक्टर!! बरं झालं. लवकर आले तुमी.चला लवकर"

"कुठे जायचंय पाटील?"
"अवो आज येक तारीख हाये ना"
"बरं मग?"

  हे अजून मिश्कीलीच्याच मुडमध्ये.

"अवो उधारीची वही काढा लवकर.माझी पेन्शल आलीये.उधारी घेऊन टाका.चला लवकर.आजपर्यंत आपन कोनाची उधारी बुडवली नाई.तुमच्या का घरी पिकातं का डाक्टर?गोळ्या औशीद का झाडाला लागत्यात का?"

"ते सगळं खरं हो पाटील.  तुमच्यासारखा व्यवहाराला चोख माणूस कुठे मिळायचा नाही हल्लीच्या जगात."

  "मी आख्ख्या जगात फिरलो डाक्टर. पन् कोनाचा रुपाया ठिवला नाई.तुमी माझ्यासाठी येवढा महिनाभर रखाडले.कवा म्हन्ले नाई पैसं हायेत का नाई? मग म्या पैसं टायमावर द्यायला नको का? आपलं लोकांसारखं नाई.काढा बरं उधारीची वही."

हो नाही करता करता त्यांचा दोघांचा हिशोब एकदाचा क्लिअर झाला. नंतर हे दुसऱ्या पेशंट्समध्ये गुंतलेले बघून पाटील मला हळूच म्हणाले,

"म्याडम ,तुमच्या फायद्याची गोष्ट सांगतो.
डाक्टरांना लय वेळा सांगातलं पन् त्ये काई मनावर घेत नाई.तुमी म्हनून बगा म्हंजे ऐकलं तं ऐकलं."

"पण असं काय आहे की,..?"

माझं बोलणं अर्ध्यातच तोडून झिपरू पाटील म्हणाले,

"तुमाला मी सांगितलं ना मी देवरसपना करीत व्हतो.माझ्या अंगात गोसावीबाबा येतोय.तो मला तोडगा सांगतोय.कान द्येवून ऐका.तुमचं घर लय जुनं हाये.येका बामनाचा वाडा हाये हा.नाई का?"

"बरं मग?"

"ह्या वाड्यात डबोलं ठिवलेलं हाये."

"डबोलं??"

"गुप्तधन म्हन्त्यात त्येला."

   आता मात्र मला सशाचे कान उगवून आले होते.

"खरं की काय?"

"मग! गोसावीबाबाची शपथ.तुमी डाक्टरांना सांगून तो वास्तुपुरूषाच्या आंगची जमीन खांडायला सांगा मान्सं लावून..तिधं लय मोठं डबोलं हाये बगा.तुमीतरी मनावर घ्या.
डाक्टरांना मी सांगातलं म्हनून बोलू नका बरंका"

  तेवढ्यात हे बाकीचे पेशंट्स तपासून आले.मग ते बोलणं तेवढंच राहिलं.गुप्तधनाचा विषय मात्र माझ्या डोक्यात घोळत राहिला. मी ह्यांना बोलले पण ह्यांनी मला पुढच्या एक तारखेपर्यंत धीर धर सांगितलं.मला त्याचं कारण कळलं नाही पण,मी वाट पहायचं ठरवलं.महिनाभरात दोन तीन वेळा किरकोळ तक्रारींसाठी पाटील येऊन गेले पण माझी भेट होऊ शकली नाही आणि तसंही एक तारखेपर्यंत थांबायचं ठरलं होतंच ना.

पुढच्या एक तारखेलाही..
"म्याडम!!काय सांगू तुमाला अवो लय कामं केली आम्ही...."
ह्या वाक्यापासून सुरुवात झाली आणि शेवट डबोल्यानं झाला.

मी पहिल्यांदाच ऐकत असल्यासारखं ऐकलं खरं पण नंतर नंतर मात्र मला जांभया येऊ लागल्या.हे आपले गालातल्या गालात हसत होते.त्यापुढच्या प्रत्येक एक तारखेला हेच बोलणं.जणू काय परमेश्वरानं पाटलांना एक तारखेला बोलायची ठराविक स्क्रीप्ट देऊन पाठवलं होतं.ज्यात इतर कुणालाही स्वतःचे डायलॉग्ज् घुसडण्याची परवानगी नव्हती.
    पुढे पुढे मलाही ह्यांच्यासारखंच ठराविक अंतरानं हं ,हं ,अच्छा ,बरं,  हो का? म्हणणं सवयीनं जमू लागलं.कित्येक वर्षे हा पायंडाच पडून गेला होता.फक्त एवढ्या एक वर्षात एक नवीन डायलॉग पाटलांच्या स्क्रीप्टमध्ये समाविष्ट झाला होता.
  "देवानं आता उचलावं.आता नाई दम धरवत म्याडम."
पोटात तटकन तुटायचं हे ऐकल्यावर.
जुना डाईबेटीस,सांधेदुखी, किडनीस्टोन ह्या अनेक व्याधींनी पाटील ग्रासले होते.
  झिपरू पाटलांच्या महिनाभरात होणाऱ्या फेऱ्यांची वारंवारता वाढली होती.दवाखान्याचं बिल आम्ही जुन्या दरानंच घेत असुनही फुगत चाललं होतं. पण एक तारखेचा उधारी चुकती करण्याचा शिरस्ता कधी मोडला नाही आणि हळू आवाजात डबोल्याची कानगोष्ट सांगण्याचाही..
    कदाचित कुठल्या एक तारखेला झिपरू पाटील नसतील हा विचारसुद्धा मला पेलवत नसायचा.काही पेशंट्स खास असतात...
त्यादिवशी पण एक तारीख होती.पाटील नेहमीप्रमाणे दवाखान्यात आले आणि नित्यनेमाने स्क्रीप्टचे डायलॉग्ज् बोलून निघून गेले.माझ्या मनाला पाटलांशिवायच्या एक तारखेचा विचार नेहमीप्रमाणे शिवलाच.
दुपारी तीनच्या आसपास दवाखान्यात अचानक गलका ऐकू आला.इतकी गर्दी कसली झाली म्हणून मी जवळपास धावतच घराच्या खालच्या मजल्यावरील आमच्या क्लिनिकमध्ये गेले. टेबलवरच्या पेशंटला हे चेक करत होते.पेशंट पाठमोरं होतं.त्याचे कपडे रक्तानं भरलेले होते.मी कोण पेशंट आहे म्हणून बघू गेले.

ते...पाटील...होते...

त्यांची शान असणारी टोपी कुठेतरी पडून गेलेली होती.डोक्याला मार लागलेला होता.एका डोळ्याला सूज आलेली होती.नीट तपासू न देताच ते अस्वस्थपणे परत परत उठून बसत होते.दोन तीन नातेवाईक मिळून त्यांना धरून ठेवत होते.मी त्यांना हाक मारली पण त्यांनी ना ओ दिली...ना त्यांच्या डोळ्यात ओळख दिसली.माझ्या मनात चर्रर्र...झालं.त्यांच्या मेंदूला गंभीर मार लागला होता.अँब्युलन्स बोलावून त्यांना पुढे पाठवलं गेलं.सगळा घटनाक्रम कळाल्यावर माझे अश्रू थांबत नव्हते.
     त्यादिवशी क्लिनिकहून घरी जात असतांना पाटील एकाच्या मोटारसायकलवर बसले.चालवणारा प्यायलेला होता.कुठल्यातरी क्षणी त्याचं गाडीवरचं नियंत्रण गेलं...गाडी फरपटत गेली..गाडीच्या मागच्या चाकात पाटलांच्या धोतराचं शेव अडकलं...
पांढरस्वछ धोतर लालभडक झालं.
पुढे चार दिवस पाटील कोमामध्ये होते.इथूनपुढच्या कुठल्यातरी एक तारखेला पाटील नक्कीच हजर होतील अशी वेडी आशा मला वाटत होती.पण चार दिवसांनी कळालं मल्टीऑर्गन फेल्युअरनं पाटलांनी एक्झिट घेतली होती.
     
जाण्यापूर्वी आमची उधारी चुकती करून...

©डॉ क्षमा शेलार
बेल्हा ,जुन्नर