Ath disekshanadhyay books and stories free download online pdf in Marathi

अथ डिसेक्शनाध्यायः।

अथ डिसेक्शनाध्याय:।
©डॉ. क्षमा शेलार

   ( १)

     मेडीकल कॉलेजला admission मिळाल्यानंतरचा सगळयात मोठा प्रसंग म्हणजे 'डिसेक्शन'.अभ्यासासाठी केली जाणारी शवचिकीत्सा.
      कॉलेज लाईफ तर थोड्याफार फरकाने सगळया युवामंडळींचं सारखंच असतं.पण जी इतर शाखांच्या विद्यार्थ्यांच्या वाटेला येत नाही अशी मोठी नवलाईची आणि तितकीच भीतीदायक गोष्ट म्हणजे डिसेक्शन.
       कॉलेजचे पहिलेवहिले दिवस आणि मनात भीती डिसेक्शनची हे सगळं मनात ठळक कोरलं गेलेलं आहे.
       मला अजूनही लख्ख आठवतो तो दिवस...
डिसेक्शनचा पहिला दिवस...
त्या दिवसाच्या आदल्या रात्री-
उद्या नक्की काय काय बघावं लागेल या भीतीने प्रत्यक्ष अनुभवाच्या आधीच काय काय भयानक असं सगळं बघून झालं होतं अर्थातच स्वप्नात हं.
      तर असा बहूप्रतिक्षित असा तो दिवस उजाडला.आमची बॅच चुळबूळत ऍनाटॉमी लॅब मध्ये थांबलेली. कुणी अतिउत्साही बॉडी कधी येईल आणि कधी एकदाचं आपण डिसेक्शन करतोय अशा तयारीत,काही विद्वान लोक पूर्वतयारी म्हणून पुस्तक उघडून बसलेले.काही मनानं नाजूक प्राणी तळव्यावरचा घाम लपवण्यासाठी एप्रनच्या खिशात हात घालून बसलेले.
         अखेर बॉडी आली. i mean आणली गेली.तिला पाहिल्यावर डोक्यात विचारांचे पंखे झरझर सुरू झाले. फिमेल बॉडी. तरूण होती बिचारी. कशानं गेली असेल? का तिला घ्यायला; तिचे रितसर अंत्यसंस्कार करायला कोणी आलं नसेल? खरच ती बेवारस असेल??
      तिच्या अवघ्या शरीरावर मरणकळा साकळलेली...पण तरीही तिचा मूळचा रंग छान केतकी गोरा असावा हे कुणाच्याही सहज लक्षात येण्याजोगं होतं.
       अचानक-
तिची जिवंतपणीची आठवण दिसली.मन विदीर्ण झालं जेव्हा माझं
तिच्या हाताकडे विशेष लक्ष गेलं. कशी काय कोणास ठाऊक पण तिच्या उजव्या हातात एक डाळींबी रंगाची बांगडी तशीच होती.
बिचारीनं..
      कधीतरी...
       कुणासाठी तरी
.... कित्ती कित्ती हौसेनं भरली असेल तिनं नै?
          (२)
   पहिल्या काही practicals ला अगदीच चिलखत घातल्यासारखे वावरणारे आम्ही आताशा डिसेक्शन जरासं लाईटली घ्यायला शिकलो होतो. 
आता एका मेल बॉडीचं डिसेक्शन सुरू होतं.त्या मेल बॉडीचे दोन्ही पाय खूप जास्त खराब झाल्यामुळे शेवटी ते थेट घोट्यापासून कापून टाकले होते. त्यांच्या डोक्यावरच्या केसांच्या जटा झालेल्या होत्या. त्या ही काळजीपूर्वक काढून टाकल्या होत्या.इतकं सगळं करूनही त्या बॉडीतून भरपूर दुर्गंधी येत होती. आमचे सर काही अजून आले नव्हते. So तिथे सगळा आम्हा नवशिक्यांचाच कारभार चाललेला.त्या दुर्गंधीसाठी काय करावं असा यक्षप्रश्न आमच्या समोर पडला होता.उणीपूरी १८-१९ वर्षांची आम्ही मुलं.समोर सगळं कधी न पाहिलेलं ,अमानवी  वाटणारं दृश्य.आमच्यातल्या काहीजणी तो ताण असह्य होऊन अगदी चक्करच यायच्या बेतात होत्या.
     आमच्या कॉलेजमच्या चाणाक्ष शिपाईमामांनी हे हेरलं.कदाचित दुर्गंधी तोंडावाटे येत असावी असं वाटून त्यांनी बॉडीच्या तोंडात डेटॉल ओतलं आणि वातावरणात निर्माण झालेला तणाव हलका करण्यासाठी एक विनोदी उखाणा घेतला.
     "डिसेक्शन पाहून होतात दिलाचे तुकडे
      डिसेक्शन पाहून होतात दिलाचे तुकडे
     डेटॉल देतो आजोबा चेहरा करा इकडे"
त्यांच्या गावठी हेलातला तो उखाणा ऐकून डिसेक्शन रूममध्ये मोठा हास्यस्फोट झाला..
          (३)
     आज चेहऱ्याचं प्रॅक्टीकल.
चेहरा -माणसाची ओळख..डोळे ,ओठ, नाक माणसाच्या ओळखीचा, आस्तित्वाचा एक अविभाज्य भाग असतो.
     अशा चेहऱ्यावर धारदार स्काल्पेल कसं चालवायचं म्हणून माझ्यातली कवयित्री मात्र चिंतेत पडलेली.बाकी सगळी बॉडी तोपर्यंत छिन्नविच्छिन्न झाली होती. बॉडीचा चेहराच तेवढा intact.ती बॉडी त्या चेहऱ्यानेच तर आम्ही ओळखत होतो. आज तो चेहराही जाणार...कायमचा दिसेनासा होणार...काळीज भरून आलंय.
   सर ग्लोव्हज चढवताहेत आणि मी मात्र त्या चेहऱ्याकडे बघत काय काय विचार करत बसल्येय.
       काळा सावळा राकट चेहरा. कुठल्याही कष्टकऱ्याचा असावा तसाच. वय फार तर फार ४०-४५.कधीतरी या ही चेहऱ्यावर कुणी जीव ओवाळून टाकला असेलच ना?ह्याच चेहऱ्याने मिशीतल्या मिशीत हसत प्रतिसाद दिला असेल ना?ह्याच जाड्याभरड्या ओठांनी कुणाशी गुजगोष्टी केल्या असतील ना?
     तेवढ्यात सरांच्या आवाजाने माझी तंद्री भंगली, 
     "चलो स्टूडंट्स!! लेट्स स्टार्ट!!"

  आणि सरांनी निर्विकारपणे सटकन ओठ छाटला.
          इति।

©डॉ क्षमा शेलार

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED