Shokantika books and stories free download online pdf in Marathi

शोकांतिका

शोकांतिका

"मी काय करु ? कुठ जाऊ ?"
सुरेखा ढसढसा रडत होती आणि मी हतबल झाले होते तिच्या भोगवट्याची गाथा ऐकून.

  ही काय अठराव्या शतकातली गोष्ट नाही.आज आताच्या कल्पना चावला ,सुनिता विल्यम्सच्या युगातली...
          सुरेखा तिसर्यावेळी प्रेग्नंट होती.आधीच्या दोन मुली.घरी गडगंज शेती,गाईगुरं,दूधदुभतं.इतक्या मोठ्या व्यापाला वारस नको का? अशा मानसिकतेतून तिसर्यांदा तरी मुलगा व्हावा म्हणुन तिच्या सासूनं देव पाण्यात ठेवले होते.गंडेदोरे बाबा बुवा सगळं झालं होतं.
          पण सुरेखाचं दुर्दैव(?) ....
आताही मुलगीच झाली....
          शेतकरी ,अडाणी कुटुंब पण हाती शेतीवाडी भरपूर,आणि त्यामूळंच 'पैसा फेकला की कायबी व्हतंय'अशी वृत्ती-सर्वांचीच...
   त्यात सुरेखाचा नवरा अकाली विधवा झालेल्या सासुचा एकुलता एक मुलगा.एकूलता एक,बिनबापाचा म्हटल्यावर नको ते लाड होऊन रगेल झालेला.त्यामुळे सुरेखाला ताब्यात ठेवलेली.
           तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर सुरेखाच्या साडेसातीला सुरुवात झाली.बाळंतपण कसेबसे माहेरी झाले खरे पण नंतरची काळजी घेण्याचा उत्साह खाण्यापिण्याची वानवा असणाऱ्या माहेरी कोणीच दाखवला नाही.'दिल्या दावणीला सुखी (आणि मुकी) रहा ' असं म्हणतच तिची पाठवणी झाली.
           तेव्हापासुन सुरेखा मुकाट्यानं काम करीत राहीली.तिन्ही पोरी तिच्या आगेमागे खेळतरांगत ,रडतधडपडत वाढत होत्या.सासुने मुलीना हात लावणं सोडून दिलं होतं.वर सुरेखा तीन मुलीना जन्म देणारी अपशकुनी बाई म्हणुन तिच्या हातचं खाणही सोडलं होतं.
            नवराही आईने वडीलांच्या मागे आपल्याला मोठ केलं या उपकाराच्या ओझ्याखाली दबुन गेलेला.शिवाय बायकोची बाजू घेणारा पुरुष बैलच असतो अशा वातावरणात वाढलेला.दर दोन दिवसाआड बायकोला मारणं म्हणजेच पुरुषार्थ असतो असं मानणारा होता. 
                  त्यामुळे सासुचं अजुनच फावलं होतं.त्यातच तिच्या लेकीने एकामागे एक अशा चार मुलाना जन्म दिला होता तेव्हा माझी लेक किती थोर आणि सून कशी टाकाऊ अशा आशयाचे टोमणे सुरेखाला उठताबसता खावे लागत .पण काहीका असेना आपलं हक्काचं घर आहे या समाधानातच गुराढोरासारखं काम करायचं.दर दिवशी कधी मारासाठी तर कधी अत्याचारासाठी नवर्याला शरीर सुपुर्द करायचं असेच तिचे दिवस चालले होते.
            पण आता वेगळीच समस्या तिच्यापुढे ठाकली होती.सासुने मुलासाठी दुसरी बायको करायचा घाट घातला होता हे तिच्या कानावर आलं होतं.आता मात्र सुरेखाचा धीर सुटला.कारण चौथ्या वेळी काहीकेल्या तिला दिवस जात नव्हते.खरतर तिला आता शस्त्रक्रिया करण्याची गरज होती पण वंशाला दिवा पाहीजे या रोगट मानसिकतेची ती बळी होती.  आणि आतातर सवत डोक्यावर बसेल या भीतीपायी ती जीवावर उदार झाली होती.
           "म्याडम कायबी करा पन मला दिवस जान्यासाठी गोल्या द्या.तरच माझा संसार व्हैल्.नायतर मला इष खाऊन मरायला लागल."
              माहेरून तिच्या आईने कसेबसे गुपचूप 300 रुपये पाठवले होते ...
          अशा परिस्थितीत तिच्याकडुन फी घेणं पाप ठरलं असतं.औषधे घेऊन सुरेखा लगबगीनं गेली.कारण झोळीत झोपलेल्या अडीच वर्षाच्या मुलीच्या तोंडाला रडून रडून फेस आला असता तरी सासुने किंवा नवर्याने घेतलं नसतं याची तिला खात्री होती...
            खूप दिवस तिची खबरबात कळली नाही.एक दिवस तिची शेजारीण दवाखान्यात आली. 
      " अवो म्याडम तुमी दिल्याली औशदं घेऊन सुरेखा रस्त्यानं चालली व्हती तवा मोटरसायकलचा तिला धक्का लागला.औशदं गटारीत पडुन वायाला गेली.सुरेखाचा पाय मुरगाळला आन कुट गेली व्हती आसं म्हनुन नवर्यानी लाथानं तुडवली त्ये वेगळच...दुसरी कोंती गरीबाची पोर त्यान बायको करुन आनलीय "
            हळहळण्याव्यतिरीक्त काहीच करु शकले नाही मी....
            काही दिवसानी सुरेखाची सासु व नवरा त्याच्या नविन बायकोला घेऊन दवाखान्यात आले.मूल रहाण्यासाठी ट्रिटमेंट द्या म्हणाले.
               "त्या कुत्रीला ( सुरेखाला ) निस्ती पोरींचीच पिलावळ.तिचं चालचलन बी चांग्ल नवतं म्हनुन दिली हाकून ...
आता ह्या नव्या सुनबाईला एक पोरगा झाला म्हंजे मी डोळे मिटाया मोकळी."
                तिला आवश्यक ट्रिटमेंट मी दिलीच पण अगदी सुन्न मनाने...
कारण सुरेखाची नंतरची हकिगत मला कळाली होती.
              .....नविन बायको केल्यावर साहजीकच सुरेखाचा जाच वाढला तरीही ती नशिबाचे भोग म्हणून सहन करत राहीली.कितीही त्रास दिला तरी ती माहेरी जात नाही असं बघितल्यावर तर सासूनं कडीच केली. "तू बदफैली आहेस" असा तिच्यावर आळ घेतला.मानिनी सुरेखा ते सहन करु शकली नाही.
.....दुसर्या दिवशी ....
.....पाटाच्या कडेला ....
.....तिची जोडवी आणि मंगळसुत्र सापडलं.....

              डॉ. क्षमा संजय शेलार

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED