डाक्टरकी-गंगादादा Kshama Govardhaneshelar द्वारा आरोग्य मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

डाक्टरकी-गंगादादा

#डाक्टरकी 

गंगाधर गायकवाड....
गंगादादा म्हणून सगळीकडे परिचित...
व्यवसायानं ट्रकड्रायव्हर.
व्यवसाय हा असा आणि नावात दादा म्हटल्यावर असं वाटू शकतं की हा कुणीतरी टपोरी वागणारा माणूस असेल.पण असं अजिबात नव्हतं.
      माझ्या लक्षात आहे ते गंगादादाचं वत्सल रूप.त्यांच्या मुलीच्या प्रेग्नन्सीच्या वेळी एक दोनदा ते दवाखान्यात आले होते.
     ग्रामीण भागात भागात स्त्रियांच्या शारीरिक तक्रारींबद्दल अजूनही बरीच उदासीनता आढळते.कुणी पुरुष सोबत आलाही तर तो असतो नवरा .इतर कुणी जर असलाच  तर तो पूरूष पेशंटच्या सोबत कधीच नसतो .पेशंट एकटी माझ्याशी बोलत असणार आणि सोबत आलेली व्यक्ती बाहेर बसलेली असते. तिचा संबंध फक्त फी देण्यापुरता...
 तर असं असताना गंगादादा मुलीसोबत फक्त आतच आले नाहीत तर, सर्व शंका (ज्या मुलगी किंवा बायको बोलायला कचरते आहे असं लक्षात आल्यावर ) त्यांनी पुढे होऊन विचारल्या होत्या. त्यांचं हे वेगळेपण माझ्या आवर्जून लक्षात राहिलं होतं. त्यांची पत्नी अधूनमधून तिच्या तब्येतीच्या किरकोळ तक्रारींसाठी येत असे .त्यातून त्यांच्या घरची पार्श्वभूमी कळत गेली. चार मुली ,त्यांच्या पाठीवर सात वर्षांनी नवसा सायासांनी झालेला एकुलता एक मुलगा .जो आत्ताशी चौथीला होता. 
 मुली मात्र लग्न करून बऱ्या ठिकाणी पडलेल्या होत्या.
गंगादादांनी मुलींची बारावीपर्यंतची शाळा, लग्नं ड्रायव्हरकीच्या धंद्यातून आणि तुटपुंज्या जिरायती शेतीतून करून दिली होती .शिवाय प्रत्येकवर्षी येणारं एकेकीचं बाळंतपण, मुलीचं बाळंतपण तिच्या माहेरच्यांनीच केलं पाहिजे असा रिवाज खेड्यात असल्यानं तोही भार गंगादादांच्या डोक्यावर होताच .
पण गंगादादा कधीच टेन्शन घेताना दिसले नाही .त्यांची पत्नी कधीतरी माझ्याजवळ मन मोकळं करायची. 

  "या पोरींच्या सासरच्यांना काय कमी आहे ?पहिली डिलवरी आम्ही केली बया कशीतरी कर्जपानी करुन. पन दुसरी डिलवरी पन पोरीच्या बापानेच करायची असा काय कायदा ए का?"

  मग गंगादादा गमतीनं तिला दिलासा देत म्हणत,

 " तू कशाला फालतू त्या मॅडमच्या डोक्याला टेन्शल देती? मी हाय ना ?
मी पाहतो ना काय करायचं ?कसं करायचं? कशाला रिकामी बडबड करती??"
  अशी त्यांची किरकोळ नोकझोक  माझ्यासमोर चालत असे.

   बरेच दिवस गंगादादांच्या कुटुंबीयांपैकी कुणीच आलं नाही. तब्बल वर्ष दीड वर्षाचा काळ गेला असेल .आणि एक दिवस दोघेही पती पत्नी माझ्या दवाखान्यात आले .
गंगादादा आणि पत्नी दोघेही अगदीच सुकले होते .मोठ्या मुश्किलीने गंगादादा एक एक पाऊल टाकत तपासणी टेबलपर्यंत आले. झालं असं  होतं की ,त्यांना गेल्या काही काळापासून अचानकच पोटदुखी व पित्ताचा त्रास वाढला होता .
नातवाच्या वाढदिवसाला दोघे पती पत्नी मुलीच्या सासरी गेले होते .तिथे अचानक त्रास वाढला .इतका की त्यांना हॉस्पिटलाईज करावं लागलं. तपासण्यांमध्ये कळालं की,लिवरचा प्रॉब्लेम झालेला आहे .पोटात पाणीही झालं होतं .एकंदर सगळी लक्षणं व तपासण्यांचे रिपोर्ट्स बघता त्यांना लिव्हर सिरॉसिस निदान झालं होतं. दोघेही पती पत्नी नियतीच्या ह्या आकस्मिक हल्ल्यानं हडबडले होते.पोटाला सुई लावून पाणी काढणं त्यांच्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही वेदनादायी होतं.घरातला कर्ता माणूसच आजारी पडला म्हटल्यावर घरातल्या आर्थिक जबाबदाऱ्यांची भूतंही मानगुटीवर बसली होतीच.
   सुरवातीच्या धक्क्यांनतर दोघेही सावरली.लेकजावयांच्या मानसिक व काही प्रमाणात आर्थिक आधारानं दादांच्या पत्नीनं कंबर कसली.काय होईल ते होईल पण दादांना बरं करायचंच असा त्यांनी चंग बांधला.मग सुरू झाल्या हॉस्पिटलच्या फेऱ्या.पण आजार आता बराच बळावला होता.अधूनमधून होणारा पण काही दिवसांपासून अचानक जास्त वाढलेला पित्ताचा त्रास ड्रायव्हिंगमुळे होणाऱ्या जागरणांमूळे होत असेल असं वाटून त्यांनी फार मनावर घेतलाच नव्हता. ह्या दुर्लक्षामुळे आता परिस्थिती हाताबाहेर गेली होती. सतत गोळ्याऔषधं,पोटातलं पाणी काढणं,वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या आणि हे सगळं लेकीच्या घरी राहून ह्याचा त्यांना ताण आलाच होता.....
 ....पण सर्वात जास्त ते खचले ते एका गोष्टीनं....
दादांचा व्यवसाय, त्यांचं साधंस थोडंसं गबाळं राहणीमान आणि त्यांचा आजार ह्याची एक पूर्वग्रहदूषित संगती तिथल्या स्टाफने लावली होती की, हा पेशंट नक्कीच अट्टल दारुडा असणार.त्यामुळे त्या दोघांनाही थोडीशी हेटाळणीयुक्त वागणूक दिली जायची.ऍडमिट असताना ह्या जोडप्याच्या साध्या साध्या तक्रारी वा मागण्यांकडे लवकर लक्ष दिलं जात नसे.
दादांची पत्नी डोळ्यात पाणी आणून म्हणायची,
"अवो डाक्टर!! हा मानूस दारूडा नाय वो.तुमी सांगा ना तुमच्या लोकांना.. आमच्याकडं नीट लक्ष द्या म्हनून."
"हे बघा बाई.तुम्ही उगीच त्यांना पाठीशी घालताय.विचारा बरं त्यांना. त्यांनी कधीच दारू घेतली नाही का?ड्रायव्हर लोक कसे असतात आम्हाला काय माहीत नाही का?"
मग गंगादादा मोठ्या डॉक्टरांसमोर दबून बोले.
  "डाक्टर! बेवडा म्हनू नका.उगाच वर्सातून एकदा दोंदा जोडीदाराबरोबर घेतली व्हती.खोटं कशाला सांगू?पन..."
  "मग काय तर...हे बघा बाई ते स्वतःच सांगतहेत घेतली म्हणून.तुम्ही उगीच वेळ घेताय माझा"
   दादांचं बोलणं पूर्ण न होऊ देताच संवाद आटोपता घेतला जाई.दोघे नवराबायको तोंडात मारल्यासारखे गप्प बसून घेत.पिल्लू आईपासनं सुटावं आणि त्याला परतीचा रस्ताच सापडू नये अशी गत त्यांची शहरात गेल्यापासून झाली होती.जवळचे पैसेही संपत आले होते.पैशाची तजवीज करण्यासाठीच दोघे गावी आले होते.
   दोघेही हताश,निराश होते.खासकरून गंगादादा.
"म्याडम! मला आजाराचं काय वाटत नाई.माझं नशीब रांडकं.पन कुनी दारूडा/बेवडा म्हनलेलं आपल्याला सहनच व्हत नाई.पार अंगाला गोचीड चिकटल्यासारखं वाटतं बघा.मी कवा घेतलीच नाई असं नाई पन घेतली तं राजासारखी घेतली. आपन दारूचा गुलाम नाई झालो कदी.मी आता मेलो तरी आपल्याला काय वाटायचं नाई पन माझ्या माघारी कोनी असं नाई म्हनू का हा दारूमूळं मेला."
  त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं आणि मी निशब्द होते.
    पुढेही आमचं बरंच बोलणं झालं.दोघांनाही थोडा मानसिक आधार देत व त्यांच्या तक्रारींसाठी पुढे रिफर करून घरी पाठवलं.
     माझ्या डोक्यात मात्र त्यांना असा आजार का झाला होता हा विचार घोळत होताच.त्या अनुषंगाने मी बरेच प्रश्नही विचारले होते त्यांना. सगळ्या विचारमंथनातून एकच कारण वारंवार समोर येत होतं.जे वरवर पाहता अगदी क्षुल्लक वाटत होतं.त्यामुळे ते खुद्द दादांकडूनही दुर्लक्षिलं गेलं आणि डॉक्टरांकडूनही.
   झालं होतं असं की,कधीतरी एकदा गंगादादा लेकीच्या सासरी जात असताना बसमध्ये बरीच गर्दी होती.तीन तासाचा प्रवास उभ्याने करावा लागला.वळणावळणाचा रस्ता. कुठेतरी अचानक कचकन ब्रेक मारला गेला तेव्हा पुढच्या सीटचा लोखंडी दांडा त्यांना पोटात उजव्या बाजूला जोरात लागला होता.छोटीशी घटना.ते विसरूनही गेले होते.त्यानंतर अधूनमधून पोट जरा जास्त दुखायचं पण मूळचं निरोगी,रगदार शरीर आणि दुखणं रेटून न्यायची गावच्या मातीतली सवय त्यामुळे त्याचं त्यांना विशेष वाटायचं नाही.
   सगळ्या घटनाक्रमाची सुरुवात तिथून झाली असावी.म्हणजे हा लिवरला मार लागल्याने होणारा लिवरचा त्रास होता जो फक्त दुर्लक्षामूळे व चुकीच्या दिनचर्येमूळे बळावला होता व पुर्वग्रहामूळे दारूचा दुष्परिणाम म्हणून गणला जात होता.मला आता सर्व संगती लागत होती.
    पुढच्या वेळी गंगादादा आले की मी त्यांना आवर्जून सांगणार होते.कारण आजारापेक्षाही दारूडा ह्या शब्दामूळे त्यांचं जास्त खच्चीकरण झालं होतं.आजाराची स्थिती गंभीर होती.पण माझ्या ह्या कारणमीमांसेमूळे त्यांच्या अपमानित मनाला जरासं बरं वाटलं असतं.
पण...
गंगादादांची व माझी भेट होऊ शकली नाही. काही दिवस गावाला काढल्यानंतर पैशाची तजवीज करून ते परत मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले.तिथेच त्यांचं देहावसान झालं.कदाचित दारूडा शब्दाचा डंख घेऊनच.
एक घर पोरकं झालं.
कुणी त्यांना दारुडा म्हणत असतीलही पण माझ्या स्मरणात मात्र ते राहतील एक वत्सल पिता म्हणूनच..

डॉ क्षमा शेलार
बेल्हा