एक देशभर गाजलेलं बलात्कार प्रकरण झाल्यानंतरच्या काही दिवसात माझ्याकडे आलेली एक केस.
14-15 वर्षांची एक मुलगी आणि तिची आजी क्लिनिकमध्ये आल्या.
"काय झालं आजी ?"
"अगं काय नाय बाय.तू माझ्या लेकीसारखी.तुला काय सांगु ?
3-4 महिने झाले ,माज्या नातीची पाळी नाइ आली.आता पिशवीत (गर्भाशयात ) लै मळ झाला असल .तेवडी पिशवी साफ करुन दिली अस्ती तर बर झालं अस्तं.तिचं अजुन लगीन व्हायचय ,नंतर प्राब्लीम नको."
आजी माझ्याकडे निरमा पावडर उपलब्ध असल्याइतक्या सहजतेने म्हणाल्या आणि मिश्री तोंडात टाकत्या झाल्या.
स्वत:च्या हतबुद्धनेस ला अंमळ सावरत मी म्हणाले ,
""अहो आजी असा मळ वगैरे काही होत नसतं.काय नेमकं कारण आहे ते मला तिला तपासल्यावर कळेल्."
आजीच्या नातीला , सुनिताला मी पुढे बोलावले.(नाव बदलले आहे ).
सुनिताची तपासणी करताना मला काही गोष्टी संशयास्पद वाटल्या.त्यामुळे ती अविवाहित असुनही मी तिची प्रेग्नंसी टेस्ट करायची ठरवली.लघवी चेक करायची म्हटल्यावर आजींचा विरोध सुरु झाला.
"आमच्याकडे पैसे नैत.आमी गरीब हायेत."
मी थोडा ठाम पवित्रा घेऊन सांगितले."
"आजी पैसे नसुद्या पण मला माझ्या पद्धतीनेच तपासावी लागेल ही केस.माझ्या अंदाजानुसार टेस्ट पोजिटिव आली.आजीबाईंना बाहेर पाठवुन मी तिलाच विचारलं ,"काय झालं नेमकं ?"
तर ती रडायलाच लागली.तिचा काकाच या अवस्थेला जबाबदार होता.आईवडील गरीब .काका कारभारी.
एकीकडे नात आणि एकीकडे मुलगा अशा कात्रीत आजी सापडलेली.'आपलेच दात आणि आपलेच ओठ '.शेवटी नाईलाज म्हणुन दवाखान्याची पायरी चढलेली.
"आजी मला असं काही करता येणार नाही.या गोष्टिंना कायद्याने बंदी आहे ".
बिथरलेल्या आजीबाईंनी तिथेच सुनिताला मारायला सुरुवात केली.
"काळतोंडी कुडतरी शेन खाल्लं असल आन माझ्या लेकावर आळ घेती."
महद्प्रयासाने त्यांना आवरलं.एका स्त्रीरोगतद्न्याचा पत्ता दिला आणि पुढच्या ट्रिटमेंट साठी तिकडे पाठवलं.
मला मात्र थोडस अपराधी वाटत राहीलं की ,अरे आपण as a doctor कर्तव्य केलं पण माणुस म्हणुन तिला ठोस अशी काहीच मदत करु शकलो नाही.दोन दिवस माझच मन मला खात राहिलं.
तिसर्या दिवशी आजींचे पतीही किरकोळ तक्रारीसाठी क्लिनिक ला आले.माझ्या मनात ,'या आजोबांनी कसा सांभाळला असेल हा प्रसंग ?काय दिव्य कराव लागलं असेल त्याना.??आपण किमान यांना तरी मानसिक आधार द्यावा ',या हेतुने मी हळुच त्यांना विचारलं ,
"बाबा घरी सगळं ठीक आहे ना ?सुनिताची तब्येत कशी आहे आता ?"
.....
.......
दोन क्षण शांतता......
"हात्तिच्या.....ला xx!!!!
आमची म्हातारी काय बी उद्योग करित रहाती.xxx
अवो म्याडम ती आमची नात नव्हतीच ....."
....
....सन्नाटा.....
....
....
आपण सगळेजण खूप अस्वस्थ झाला असाल. तिचं नेमकं काय केलंय घरच्या लोकांनी?
तिचं अस्तित्व पुसून टाकलं की काय ?
की, तिने स्वतःला संपवलं? आणि घरचे आता तिचं कधी काळी असलेलं अस्तित्व नाकारत आहेत की काय ?
असे खूप सारे प्रश्न तुम्हाला पडले असतील. संताप ,करूणा ,वेदना ,अश्रू हेही सगळं तुमच्या मनात उमटलं असेल.
पण ही झाली एक बाजू.
आता आपण बघूया नाण्याची दुसरी बाजू .
आजोबांच्या स्पष्टीकरणानंतर मी पुसटशी नोंद घेतलेल्या काही गोष्टी मला आठवल्या .
आजी आणि नात क्लिनिकमध्ये माझ्यासमोर तर बऱ्याच दुःखी होत्या. पण त्या जेव्हा बाहेर वेटिंग रूममध्ये बसल्या होत्या, तेव्हा त्यांच्यातला संवाद बऱ्यापैकी नॉर्मल ,हसत खेळत चाललेला होता.
शिवाय त्या नातीच्या सांगण्यातल्या काही गोष्टी तद्दन अशास्त्रीय होत्या. पण इतक्या लहान मुलीकडून शास्त्रीयदृष्ट्या बरोबर सांगण्याची अपेक्षा करणं मी त्यावेळी महत्त्वाचं मानलं नाही. तिला लवकरात लवकर चांगला सल्ला देऊन स्त्रीरोगतज्ञाकडे पाठवणं मी गरजेचं समजलं.
या नोंदींचा उलगडा अर्थातच आजोबांच्या स्पष्ट बोलण्यामुळे झाला .
आणि मी फक्त शॉक्ड होते .
आजोबा म्हणाले ,
"हात्तीच्या!! आमची म्हातारी काय बी उद्योग करीत राहती.आहो ती कार्टी आमची नात नव्हतीच.
भानगड काये की दोघी एकाच टोळीमंदी रोज कामाला संगतीच जात्यात. त्या टोळीच्या मुकादमाशीच ह्या फिंदारडीचं लफडं होतं.यातून ती पोटुशी राह्यली .
आता त्या कार्टीच्या घरी कळलं तर पंचायतच व्हईल.
म्हनून त्या मुकादमानं पैसं देवून दोघींना आजीनाती बनवून तुमच्याकडं पाठवली व्हती.माझ्या समदं नंतर कानावर आलं. मग काय !!
म्हतारीला म्या अशी फोडली ना×××!!
हिला काय गरजए
का ? म्हातारपनी ×××× काय बी उद्योग करीत राहती.आयची×××××××."
आजोबांनी आजीच्या सात पिढ्यांचा उद्धार केला .
तर वाचकांनो !
एकंदरीत हे असं आहे. आता बोला!!
डॉ क्षमा शेलार