12. लेह-लडाख मध्ये कधी जाल? Anuja Kulkarni द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

12. लेह-लडाख मध्ये कधी जाल?

12. लेह-लडाख मध्ये कधी जाल?

तुम्ही लेह- लडाख ची ट्रीप ठरवत असाल पण नक्की कधी जायचं हे कळत नाही अस होऊ शकत. त्यासाठी महत्वाच म्हणजे तुम्ही तुमची आवड आणि क्षमता तपासून पहा. कधी इच्छा असून हवामान सूट न झाल्यामुळे ट्रीप मध्ये अडचणी येऊ शकतात. लेह-लडाख हा अतिशय थंड प्रदेश आहे त्यामुळे ट्रीप ठरवतांना आपल्याला कोणता ऋतू मानवेल हे पाहण अत्यंत गरजेच असत. आपल्याला किती थंडी सोसेल, आणि बाकीच्या गोष्टी जश्या, काही ठिकाणी ऑक्सिजन कमी असेल तिथे त्रास होणार नाही ना हे पहायची नितांत गरज असते नाहीतर ट्रिपचा विचका होऊ शकतो. तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक ऋतू मध्ये तुम्ही लेह-लडाख ला भेट देऊ शकता. प्रत्येक ऋतूत वेगळेच अनुभव तुम्हाला घेता येतील. प्रत्येकाची आवड आणि तब्येत जपत लेह-लडाख च्या निसर्गाचा नुभव घेता येऊ शकतो. इथे प्रत्येक ऋतूत निसर्गाच वेगळंच रूप पाहायला मिळत. आणि ते अनुभवणे ही एक पर्वणीच असते.

*लेह-लडाख मध्ये कोणत्या ऋतूत काय काय अनुभव घेता येतील-

१. एप्रिल ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत-

एप्रिल मध्ये लडाख मध्ये टूरिस्ट सिझन चालू होतो. आणि ह्या काळात बरेच पर्यटक लडाख ला भेट देण्यासाठी येतात. ह्या काळात उन वाढायला लागल की बर्फ वितळायला लागतो. त्सो मोरिरी आणि पॅन्गाँग त्सो मधलं गोठलेल पाणी मूळ स्वरुपात यायला लागत. त्यावेळीचा निसर्गाचे वेगळे आणि सुंदर रंग पाहायला मिळतात आणि त्यावेळेची निसर्गाची किमया काही औरच असते. त्यामुळे पर्यटक इथे आवर्जून भेट देतात. आणि पर्यटकांना ही दोन्ही सरोवर मूळ स्वरुपात पाहता येतात त्यामुळे ह्या काळात पर्यटकांची गर्दी वाढलेली दिसते. मे महिन्याच्या सुरवातीलाच काश्मीर- लेह हायवे सुरु होतो. त्यामुळे पर्यटकांना तिथे मनाप्रमाणे हिंडता येत. खार्दुंग-ला आणि चांग-ला इथल निसर्ग सौंदर्य मात्र तुम्ही मिस कराल. त्याचे कारण म्हणजे ह्या काळात, खार्दुंग-ला आणि चांग-ला इथे बर्फाची चादर असल्यामुळे इथे फिरता येणार नाही हे विसरून चालणार नाही. बाकी इथे थंडी असतेच. इथे कमाल तापमान २५ अंश असते आणि किमान तापमान ५-७ अंशाच्या आस पास असू शकत. आणि ह्यावेळी केलेली लडाखच्या ट्रीप ची मजा घेता येऊ शकेल.

२. मे महिन्याच्या मध्यापासून ते जुलै-

हा काळ सुद्धा लडाख पर्यटनासाठी उत्तम मानला जातो. जून च्या पहिल्या आठवड्यापासून मनाली-लेह हायवे उघडला जातो. ह्या काळात हायवे च्या दोन्ही बाजूला बर्फाची चादर असते. रस्त्याच्या कडेला जिथे नजर जाईल तिथे बर्फ दिसतो. हे दृश्य विलोभनीय असते. आणि ह्या रस्त्यावरून प्रवास करतांना एक वेगळाच अनुभव मिळतो. ह्या काळात सुद्धा कमाल तापमान २५ अंश असते आणि किमान तापमान ५-७ अंशाच्या आस पास असू शकत. जूनच्या मध्यापर्यंत बर्फ वितळायला लागतो आणि हा फिरण्यासाठी उत्तम काळ असतो. जून महिन्यात साका दावा, युरू कोबग्यात आणि हेमिस फेस्टिवलची मजा सुद्धा अनुभवता येते.

३. ऑगस्ट ते सप्टेंबर मध्य-

ह्या काळात बर्फ पूर्णपणे वितळलेला असतो आणि हा काळ मोन्सूनचा आहे. ह्या काळात नद्या दुथदी भरून वाहत असतात. पण ह्या काळात दरडी कोसळण्याचा धोका असतो यामुळे पर्यटन थोड रिस्की होऊ शकत. बाकी हा ऋतू पर्यटकांना आकर्षित करत असतो. त्याच महत्वाच कारण म्हणजे ह्या काळात हवा आणि हवामान उत्तम आणि आल्हाददायी असते. लडाख मधला पीक सिझन ऑगस्ट पर्यंत असतो. सप्टेंबर पसून पर्यटक कमी होतात. आणि होस्टेल्स सुद्धा कमी दरात मिळू शकतात. कमाल तापमान २१ अंश असते आणि किमान तापमान ५ अंशाच्या आस पास असू शकत. सप्टेंबर महिन्यात कधी कधी इथे बर्फ वृष्टी सुद्धा होऊ शकते.

४. सप्टेंबर मध्यापासून ते मध्य ऑक्टोबर-

ह्या वेळी सुद्धा लडाख मध्ये पर्यटन सुखकर होऊ शकत. फिरण्यासाठी हा काळ उत्तम असतो. ह्याच दरम्यान इथला पाऊस कमी होतो. आणि चहुबाजूला रंगांची उधळण चालू होते. हे दृश्य मन प्रसन्न करत. ह्या वेळी रोड दुरुस्ती केली जाते. ह्यावेळी परिसरात बर्फ जाऊन निळ्या पाण्याच साम्राज्य दिसायला लागल. आणि निसर्गाची वेगळीच छटा पाहायला मिळते. रेड दी हिमालय रॅली च आयोजन सुद्धा होत. ही रॅली पर्यटकांच प्रमुख आकर्षण असते. पण ह्या दरम्यान लडाख मध्ये थंडी पडायला सुरवात होते. आणि हवेत बदल जाणवायला लागतो. ह्या काळात कमाल तापमान १४ अंश असते आणि किमान तापमान १ अंशाच्या आस पास असू शकत. ज्यांनी थंडी आवडते त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत सुखकर असेल. आणि लडाख मधली निसर्गाची किमायला देखील अनुभवायला मिळेल.

५. ऑक्टोबर मध्यापासून ते नोव्हेंबर मध्यापर्यंत-

ह्या काळात लडाख मध्ये थंडीचं साम्राज्य पसरायला लागत. थंडीचा जोर वाढायला लागतो. ह्यावेळी पण लेह-श्रीनगर हायवे खुला असतो पण हवामान थंड झाल्यामुळे इथल्या रास्यांवरून प्रवास टाळायची सूचना दिली जाते. ह्या काळात कमाल तापमान ७ अंश असते आणि किमान तापमान -६ अंशाच्या आस पास असू शकत. इतक्या थंडीमुळे सरोवर गोठतात आणि जास्ती करून प्रवाशी लडाख मध्ये येण बंद करतात. पण काही पर्यटक ज्यांना इतक्या थंडीत आणि बर्फात लडाख चा अनुभव घायचा असतो ते मात्र आपला मुक्काम इथून हलवत नाहीत. आणि जोरदार थंडीचा अनुभवाची मजा घेतात. नोव्हेंबर महिन्यात पाण्याचा सप्लाय बंद केला जातो आणि वीज सुद्धा संध्याकाळी ५ पासून रात्री ११ वाजेपर्यंतच राहते. ह्या काळात वीज फक्त ६ तास असते. वेगळाच अनुभव ह्या काळात इथे घेता येऊ शकतो.

६. नोव्हेंबर मध्यापासून मार्च-

हा सिझन लडाख मधला सगळ्यात थंड सिझन मनाला जातो. ह्या काळात रस्ते बंद होतात. फक्त हवाई वाहतून चालू असते पण ती सुद्धा खराब हवामानावर अवलंबून असते. काही दिवस जोरदार बर्फ वृष्टी इथे होते आणि संपूर्ण लडाख मध्ये बर्फाची दुलई पसरते. बर्फ वृष्टी थांबली की नुब्रा घाटी आणि पॅनॉन्ग त्सो चे रस्ते खुले होतात. आणि ते पूर्ण वर्ष भर खुले असतात. जानेवारीच्या मध्यापासून ते मार्च मध्यापर्यंत काळ राहसी पर्यटकांसाठी विशेष असतो. ज्यांना साहस करायची आवड असते आणि जे जोखीम पत्करायला तयार असतात, ते ह्या काळात लडाख ला जरुरू भेट देतात. ह्याच काळात चादर ट्रेक साठी बरेच पर्यटक येतात. ह्या काळात झान्क्सार नदी पूर्ण पणे गोठते आणि चादर ट्रेक बरोबर झंस्कार नदीवर चालणे हे सुद्धा पर्यटकांच विशेष आकर्षण असत. पर्यटकांबरोबर, सामान्य लोकांसाठी सुद्धा ही गोठलेली नदी एक चालण्याचा मार्ग बनते. पण अर्थात, ह्या ऋतूमध्ये बरीच जोखीम आहे कारण हवा अतिशय थंड असते. हवा विरळ होते. त्यामुळे कोणतीही जोखीम घेण्याआधी मनाची तयारी आणि काळजी घेण अत्यंत गरजेच असत. फक्त साहस करायची इच्छा पुरेशी नसते.

असा लडाख चा प्रवास आयुष्यात एकदा तरी केला पाहिजे. ज्या ऋतू मध्ये जमेल त्या ऋतू मध्ये.. प्रत्येक ऋतूत, निसर्गाच देखण रूप नक्की पाहायला मिळेल. अगदी शक्य झाल्यास प्रत्येक ऋतू मध्ये जाऊन लेह-लडाखच देखण रूप अनुभवता येत. पण प्रत्येक ऋतू मध्ये शक्य नसेल तर, तुम्हाला योग्य वाटेल अश्या ऋतूत तुम्ही लडाख ची ट्रीप ठरवू शकता. कधीही गेलात तरी इथे वेगवेगळे अनुभव घेता येतील. आणि स्वप्नवत निसर्ग पहायची संधी मिळेल.