दुःखी.. - 13 Sane Guruji द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दुःखी.. - 13

दुःखी..

पांडुरंग सदाशिव साने

१३. शेवट

लिली आता सासरी राहते; परंतु ती रोज वालजीकडे जाते. त्यांना जेवण नेते. त्यांच्याजवळ बोलत बसते. कधी कधी बरोबर दिलीपही असतो; परंतु वालजीचे दुर्दैव अद्याप सरले नव्हते.एके दिवशी दिलीपकडे एक गृहस्थ आला.'काय पाहिजे आपणाला?' दिलीपने विचारले.'तुमच्याशीच खाजगी बोलायचं आहे,' तो नवखा म्हणाला.'चला, वर बसू.'दोघे वर गेले. एका खोलीत बसले. तो नवखा बोलू लागला.'महाराज, ज्या मुलीजवळ तुम्ही लग्न लावलं, तिचा तो पालनकर्ता एक खुनी दरोडेखोर आहे. कुठून आणले त्यानं लाख रुपये? अहो, मी त्याला ओळखतो, कारण मी त्याच जातीचा! परंतु पुढं मागं तुमच्यावर आरोप, आळ येऊ नये, तुमच्यावर संकट येऊ नये म्हणून मी आज धोक्याची सूचना देण्यासाठी आलो आहे. त्या वालजीचा संबंध सोडा. त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका. तुमच्या पत्‍नीस जाऊ देऊ नका. अहो, तो जो पोलिस अंमलदार आत्महत्या करून मेला म्हणून प्रसिध्द झालं, त्यानं आत्महत्या नाही केली. त्याला या वालजीनं समुद्रात ढकललं. त्या धक्क्यावर दोघे उभे होते. यानं दिलं ढकलून! ज्या गाडीतून रात्री तुम्हाला आणण्यात आलं, त्या गाडीत हे दोघे होते. दोघे गाडीतून उतरून चांदण्यात फिरत गेले. वालजीनं त्या अंमलदाराला फसवून धक्क्याकडे नेलं व केलं ते कृष्णकृत्य! महाभयंकर माणूस!' तो नवखा सांगत होता.'खरं का हे?' दिलीपने विचारले.

'मी खोटं कशाला सांगू? तुमच्यावर संकट येऊ नये म्हणून सांगतो. तुमचा नवीन जोडा सुखाचा नांदो. मी जातो.'तो नवखा गृहस्थ गेला. थोडया वेळाने वालजी आला. रोजच्याप्रमाणे आला. तो वर गेला. दिलीप व लिली काही बोलत होती. लिलीच्या डोळयांत पाणी आले होते.'लिल्ये, काय झालं? प्रेमाचंच भांडण ना?'कोणी बोलेना. तेथली ती स्तब्धता मारक होती.'वालजी, आजपासून तुम्ही इथं येऊ नका. लिलीही तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही खुनी व दरोडेखोर आहात. आज मला कळलं. अशांशी संबंध ठेवणं पाप आहे. तो कमीपणा आहे,' दिलीप म्हणाला.'क्रांतीत हेच शिकलास वाटतं?''ते काही असो. तुम्ही आहात की नाही खुनी व दरोडेखोर?'

'मी जातो. मी कुणीही असेन. मी कोण आहे ते देवाला माहीत. जातो लिल्ये. तुम्ही सुखानं राहा.' वालजी उठला. तो निघाला. लिली पाठोपाठ जाऊ लागली.'लिल्ये, मी पाहिजे असेन तर इथं बस. मी नको असेन तर त्यांच्या पाठोपाठ जा.'लिली थबकली. तिला अश्रू आवरत ना. ती खोलीत जाऊन रडत बसली. ज्याने तिला लहानाचे मोठे केले, मध्ये तिच्यासाठी हालअपेष्टांशी, मृत्यूशी, गोळीबाराशी झुंज दिली, त्याच्यापासून ती दूर ओढली जात होती. वालजीच्या उपकारांच्या राशी, प्रेमाचे पर्वत लिलीसमोर उभे राहिले. ती दु:खाने गुदमरली. ती कावरीबावरी झाली.वालजी खोलीत गेला. त्याच्या जीवनाचा तंतू जणू तुटला. हृदयात काही तरी तटकन् तुटल्यासारखे झाले. त्याने अंथरूण धरले. एक मोलकरीण काम करायला येई. ती खोली स्वच्छ करी, अंथरूण झाडी, पाणी भरी. काही खायला करून देई, वालजीच्या डोळयांत कृतज्ञता भरे.लिलीचे कपडे, तिची लहानपणची खेळणी, तिची पुस्तके, सारे वालजीने आपल्या अंथरुणाभोवती गोळा करून ठेवले. तो लिलीची खेळणी हातात घेई व ती हृदयाशी धरी. माझी खेळकर लिली, पोरकी लिली, सुखात नांदो, असे म्हणे. तिची पुस्तके तो उघडी. आपण लिलीबरोबर एखादे वेळेस कसे वाचीत असून. ती चित्रे कशी पाही, त्याला आठवे व त्याचे डोळे भरून येत. एखादे वेळेस लिली पाठीमागून येऊन डोळे कसे झाकी ते त्याच्या डोळयांसमोर येई. दिलीपची व तिची प्रेमवेल वाढत असता आपण दुसर्‍या देशात जाऊन राहू, इथं नको, असं म्हणताच ती कशी गळयात गळा घालून रडली व आपण इथंच राहू, नको दुसरीकडे, वगैरे कसं म्हणाली व मी 'बरं हो, इथंच राहूं' कसं म्हटलं व ती कशी हसली ते त्याला सारं आठवलं. मी एकटा होतो. माझ्या जीवनात लिलीने प्रेम ओतले. मला कृतार्थ केले तिने. वालजीच्या मनात शेकडो स्मृती, शेकडो प्रसंग, शेकडो भावना!

आज वालजीला अस्वस्थ वाटत होते. लिलीची ती आठवण करीत होता. येईल का लिली भेटायला? येईल का देवाला दया?दिलीपकडे तो मनुष्य आज पुन्हा आला होता. ज्याने वालजीबद्दल विष ओतले तो आज अमृत ओतायला आला होता.'काय पाहिजे?' दिलीपने विचारले.'तुमच्याजवळ बोलायचं आहे.' तो नवखा म्हणाला. ते दोघे वर गेले. तो नवखा बोलू लागला, 'महाराज, तुम्हाला मी मागं सांगितलं ते खोटं. केवळ द्वेषामुळं ते मी सांगितलं. वालजी महात्मा आहे. त्या पोलिस अंमलदारानं आपण होऊनच उडी घेतली होती. मी ते पाहिलं होतं. त्यानं उडी नाही घेतली. तो समुद्रात शिरला होता. वालजीचा मी द्वेष करीत असे. ती लिली माझ्याकडे होती. त्यानं माझ्याकडून नेली. तिच्या आईच्या सांगण्यावरून त्यानं नेली. त्याच्याजवळून अधिक पैसे मला पाहिजे होते. त्यानं पैसे न देता माझा अपमान केला. त्या अपमानाचा सूड घेण्याची मी प्रतिज्ञा केली. मी पूर्वीचा खुनी दरोडेखोर. लढाईत मेलेल्या शिपायांच्या अंगावरचे कपडे, दागिने चोरणारा मी. मी पुढं खाणावळ घातली; परंतु ती मोडून वालजीचा सूड घेण्यासाठी मी शहरात आलो. तुमच्या खोलीजवळ मी राहात होतो. वालजीचे तुकडे करणार होतो. परंतु पोलिस आले - जाऊ द्या त्या गोष्टी. वालजी महात्मा आहे. तुम्ही वर्तमानपत्रात मागं नाही वाचलं? एका निरपराधी माणसावर खटला भरला जात होता. वालजी तिथं उभा राहिला. लिलीला विचारा ते सारं, - ती सांगेल. तिला माहित असेल. तुम्हीही वाचलं असेल. तो हा वालजी. जा त्याच्याकडे. तो मरणोन्मुख आहे. मरण समोर येईपर्यंत द्वेष धरावा, कोणाला छळावं? वालजीला का मरतानाही मी दु:ख देऊ? तो मृत्युशय्येवर असतानाही का द्वेष धरू? त्याची तुमची ताटातूट केली हा सर्वात मोठा सूड घेतला. वालजीला रडवलं. माझा सूड संपला. जा तुम्ही. त्याला मरताना भेटा.'

'बरं केलंस. तूही भलेपणानं वाग. तू माझ्या वडिलांचे न कळत प्राण वाचवले आहेस. रणांगणावर ते पडले होते. त्यांच्या अंगावरचे मुडदे तू दूर केलेस. त्यांना हवा मिळाली. तू त्यांच्या गळयातील साखळी नेलीस. परंतु त्यांचे प्राण दिलेस. मी तुला पैसे देतो. दुसर्‍या प्रांतात जा. प्रामाणिकपणं धंदा कर. हे घे पाच हजार रुपये. माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण होवो. जा!' दिलीप म्हणाला.तो खाणावळवाला पाच हजार रुपये घेऊन गेला. त्या रुपयांचा त्याला आनंद झाला, परंतु त्यापेक्षाही हृदय निर्मळ व हलके झाल्याचा त्याला अधिक आनंद झाला.दिलीपने लिलीला हाक मारली.'काय?''चल, आजोबांकडे जाऊ, त्यांचे पाय धरू. ते महात्मा आहेत. आज खरं कळलं.''चला. लवकर जाऊ. मला कसं तरी वाटत आहे. आजोबा भेटतील का?' दोघे निघाली. वालजीच्या खोलीजवळ आली. मोलकरीण तेथे होती.'कसं आहे?' त्यांनी विचारले.'तुम्हीच आत जाऊन बघा.' ती दु:खाने म्हणाली.दोघे आत गेली. वालजी शान्तपणे डोळे मिटून पडला होता. हातात लिलीची खेळणी होती. दोघे दोन बाजूला बसली.'आजोबा,- आजोबा, डोळे उघडा. ही तुमची लिली आली आहे. तिला आशीर्वाद द्या. शेवटचं प्रेमानं पाहा. आजोबा...' लिली दु:खाने हाक मारीत होती. वालजीने डोळे उघडले. प्रेमळ डोळे! त्याच्या तोंडावर प्रसन्नता फुलली. शेवटचा प्रकाश फुलला. पवित्र- शांत प्रकाश.'लिल्ये, आलीस? मला वाटतच होतं की येशील. देव शेवटी सारं चांगलं करतो. दिलीप, आलास? बरं झालं. मला किती आनंद होतो आहे! आता मी सुखानं मरतो.' वालजी क्षीण स्वरात म्हणाला.'आता मरू नका. तुम्ही आमच्याकडे चला. आम्ही तुमची सेवा करू.' लिली म्हणाली.'लिल्ये, आता आशा नाही. तुझ्यासाठी प्राण घुटमळत होते. आता ते राहाणार नाहीत. लिल्ये, जप. दिलीप, एकमेकांस अंतर देऊ नका. परस्परांवर प्रेम करा. संशय नका एकमेकांचा घेऊ. कधी संशय आला तर तो फेकून घ्यावा आणि जगाला प्रेम द्या. चोर, दरोडेखोर,खुनी तेही थोर असतात. आपणात दिव्यता नसते ती त्यांच्यातून कधी कधी प्रगट होते. देवानं दिव्यता सर्वांच्या ठायी ठेवली आहे. प्रगट होण्यास वाव मिळत नाही. लिल्ये, तुझा हात दे हातात. दिलीप, तुझाही दे.'लिलीचा व दिलीपचा असे ते दोन्ही हात वालजीने आपल्या हातात एकत्र धरले. आता बाहेर सायंकाळ झाली. मोलकरणीने घरात दिवा लावला. वालजी शान्तपणे पडून होता. 'लिल्ये, जगाला प्रेम द्या. प्रेम एक सत्य आहे. निरपेक्ष प्रेम. आत्म्याचं ते खरं वैभव हो, दिलीप.' पुन्हा वालजी थांबला. बाहेर बरीच रात्र झाली. लिली व दिलीप रडू लागली. त्यांचे अश्रू घळघळले. वालजीने ते अश्रू पाहिले.'रडू नका बाळांनो, गरिबांसाठी असे अश्रू तुमच्या डोळयांतून येऊ देत. गरिबांचे संसार सुंदर करण्यासाठी झटा. समाजरचना बदला. समता आणा. मग ना कोणी चोर, ना दरोडेखोर. माणसाची विटंबना मग थांबेल. मनुष्याची दिव्यता फुलेल. लिल्ये, दिलीप, माझा तुम्हाला शेवटचा संदेश म्हणजे निरपेक्ष प्रेम जगाला द्या. प्रेम, प्रेम. एक प्रेम खरं आहे.'संपले. तो पाहा एकदम एक तेजस्वी तारा खळ्कन आकाशातून तुटला. त्याची रेषा कशी तेजस्वी उमटली. त्या खिडकीतून ती दिसली. वरचा तारा खाली आला. खालचा वर गेला. एक महान आत्मा वर गेला. त्याला नेण्यासाठी का तो वरचा तारा खाली आला होता? जा, महान आत्मा, जा. तुझा प्रेमाचा संदेश या संसारात चिरंतन राहील!