“अशक्य आहे अरे हे सगळं.. असं कसं कोण करु शकतं..”, कबीरने आदल्या रात्रीचा किस्सा ऐकवल्यावर रोहन म्हणाला..
“हो ना अरे.. रात्रीचं असं निर्जन रस्त्यावर सोडुन गेला निघुन सरळ, काही वेडं वाकडं झालं असतं तर?”, कबीर
“नंतर काय केलंत मग? कुठे फ़िरलात?”, रोहन
“खोपोलीपर्यंत जाऊन आलो न मग.. सॉल्लीड भुक लागली होती, खरं तर मस्त धाब्यावर जाऊन जेवायचा विचार होता, पण एक तर रात्रीची वेळ, त्यात हिचे असे तोकडे कपडे.. एकट्याने ढाब्यावर जायची हिम्मत होईना.. मग फ़ुड-मॉलला हादडलं…”
“बरं केलं तिने ब्रेक-अप केला पिटरशी..तु तर खुशचं असशील..”, रोहन
“हो.. पण अरे.. मला थोडं असं इम्मॅच्युअर बिहेव्हिअर वाटलं तिचं.. आय मीन.. पिटरने जे केलं ते चुकीचंच होतं.. पण असं तडका-फ़डकी ब्रेक-अप म्हणजे..”, कबीर थोडा विचार करुन म्हणाला.
“म्हणजे काय अरे? कोण सहन करेल असला फ़ालतुपणा.. आणि तुला काय माहीत ह्या एका गोष्टीमुळेच तिने ब्रेक-अप केले असेल.. कदाचीत आधीपासुनच्या अनेक गोष्टी असतील साठलेल्या मनात.. हे एक कारण झालं.. एव्हढंच..”, रोहन
“असेलही.. पण ती थोडी अल्लड, इम्मॅच्युअर वाटते मला..”,कबीर
“आणि तु काय फ़ार मॅच्युअर वगैरे समजतोस का स्वतःला.. स्वतःचच बघ काय चाललंय.. आधी मोनिकाला सोडलंस..”
“एक मिनिटं, मी नाही मोनिकाला सोडलं.. तिनेच सोडलं होतं मला..” रोहनचं वाक्य तोडत कबीर म्हणाला..
“बर नंतर राधा…”
“ते ही मी नाही.. आधीच क्लिअर करतो.. ती नाही म्हणाली..”, कबीर..
“अरे हो.. मी कुठे म्हणालो तु ब्रेक-अप केलेस.. पण राधा मनात असतानाच..आता तुला रती पण आवडतेय..”
“मग? तुझं म्हणणं आहे.. एकदा राधा आवडली.. की मला कुणीच आवडु नये.. आणि राधा तर नाही म्हणालीय मला..मग काय मी तिची वाट बघत.. आयुष्यभर एकट्याने बसायचं का? माझ्याकडे का बोटं दाखवता..? तुम्हा कुणाला एक असताना दुसरी आवडत नाही का? नॅचरल आहे ते..”
“बर.. बरं.. ओके.. चिडु नकोस..जाऊ दे तो विषय.. आज संध्याकाळी एका पब्लीशरबरोबर मिटींग आहे.. ४.३० ला वगैरे.. कन्फ़र्म करु ना?”
“हम्म.. कर फ़ायनल..”, लॅपटॉपमध्ये डोकं खुपसत कबीर म्हणाला..
चार-पाच दिवसांनी, साधारणपणे बुधवारी रतीचा कबीरला फोन आला..
“शनिवारी सकाळी काय करतोएस?”, रती
“काही विशेष नाही..का?”
“घरी येतोस?”
“तुझ्या?”
“हो.. मग कुणाच्या?”
“का?”
“अरे सहज.. आपण एकमेकांना इतके दिवस ओळखतोय.. मी जनरली बोलवते माझ्या मित्र-मैत्रीणींना घरी…”
“ओके.. येतो.. ११.३० ठिक आहे?”
“चालेल, मी वाट बघते…”
ठरल्यावेळेप्रमाणे कबीर रतीच्या घरी पोहोचला. डेनिमची शॉर्ट आणि फ़िक्कट गुलाबी रंगाचा टी-शर्ट अश्या साध्या घरातल्या ड्रेसमध्येच रतीने दार उघडले.
“गुड मॉर्नींग..” चेहर्यावर गोड हास्य पसरवत रती म्हणाली.. “वेल-कम..”
कबीरने हातातल्या पिवळ्या फुलांचा बुके रतीच्या हातात दिला.
हॉलमध्ये रतीचे आई-बाबा सुध्दा बसलेले होते.
“वेल-कम यंग मॅन..”, रतीचे बाबा सोफ़्यावरुन उठुन कबीरशी हास्तांदोलन करत म्हणाले.
कबीर खुर्चीवर बसेपर्यंत रती पाणी घेऊन आली.
“कबीर .. तुझी ओळख करुन देते.. हे माझे आई-बाबा.. आणि आई-बाबा.. हा कबीर..”, रतीने एका वाक्यात दोघांची एकमेकांशी ओळख करुन दिली.
“सॉरी कबीर.. आम्ही काही तुझी पुस्तकं वाचलेली नाहीत.. पण रतीकडुन खूप ऐकालंय त्याबद्दल.. खुप काही काही सांगत असते.. सिम्स लाईक यु आर अ गुड ऑथर..”, रतीचे बाबा म्हणाले.
“थॅंक्यु सर..”, कबीर कसंबसं म्हणाला…
“कबीर, रतीने त्या रात्रीबद्दल सांगीतलं.. थॅंक्स टु यु.. तु तेथे पोहोचलास…”
“ओह नॉट अ बिग डील, माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी ही तेच केलं असतं..”
“एनीवेज.. रती.. जा तुझी रुम दाखवं कबीरला…”
“काय ओ बाबा.. रुम काय दाखवं.. तो काय मला लग्नासाठी बघायला आलेला मुलगा आहे का?”
“नाही का? मग बघं आता…”, रतीचे बाबा हसत हसत कबीरला म्हणाले.. तसं रतीने सोफ़्यावरची उशी बाबांना फ़ेकुन मारली आणि कबीरला घेऊन तिच्या वरच्या मजल्यावरच्या खोलीत घेऊन गेली.
रतीची खोली अगदी तिच्यासारखीच होती, एकदम कलरफ़ुल. गडद निळ्या रंगांच्या भिंती, पुर्व-दिशेकडे उघडणारी मोठ्या काचेच्या तावदानांची खिडकी, त्यावर लटकलेले गुलाबी, पर्पल रंगाचे ड्रिम-कॅचर.. पानं,फुलं, पक्ष्यांच्या स्टिकर्सने रंगलेल्या भिंती, एका बाजुला पुस्तकांची मोठ्ठीच्या मोठ्ठी रॅक, रंगीत-फ़्रेश फुलदाणी, पिसांची रंगीत पेनं, टेडी-बेअर्सने सजलेला रायटींग-डेस्क, एका भिंतीवर एल.ई.डी.लाईट्सची माळ आणि मधोमध चिकटवलेले अनेकविवीध फोटो.. पायाखाली मऊ-मऊ कार्पेट.. एखाद्या स्वप्नील जगात गेल्यासारखा कबीर त्या खोलीत हरखुन गेला.
“मस्त सजवली आहेस खोली..”, कबीर रॅकमधील पुस्तकं न्हाहाळत म्हणाला..
“थॅंक्स.. बसं ना..”, खिडकीशेजारील खुर्चीकडे हात करत रती म्हणाली..
“गाणी लाऊ? कुठली आवडतात तुला?”, रती
“माझं असं काही विशेष आवड-निवड नाहीए.. काहीही चालतं.. अगदी मेटॅलीका-हार्ड-रॉक पासुन.. मराठी शास्त्रीय संगीतापर्यंत…तुला?”, कबीर..
“अं.. मी खूप चुझी आहे गाण्यांच्या बाबतीत.. पण त्यातल्या त्यात जगजीतची गझल्स.. मराठी नाट्य/शास्त्रीय संगीत, हिंदीमध्ये शक्यतो अरजीत सिंगच.. बाकी पार्टीजमधला धांगडधिंगा तेव्हढ्यापुरता बरा वाटतो.. कट्यारची लावु गाणी?”, रती..
“व्वा.. का नाही.. घेई छंद लाव.. फ़ार भारी ए..”
“रतीने ड्रॉवरमधुन कट्यारची सिडी काढली आणि प्लेअरमध्ये ढकलली..”
गाणं सुरु होईस्तोवर रतीच्या आईने सरबंत आणि खाण्याचे पदार्थ आणुन ठेवले..
“रती.. मी आणि बाबा.. मार्केटमध्ये जातोय.. आणि मग बाहेरच जेऊन नाटकाला जाऊ म्हणतोय.. चालेल ना तुला?”, रतीच्या आईने विचारलं..
“हो आई.. चालेल…”, रती..
“कबीर… जेऊनच जा.. रती चांगला स्वयंपाक बनवते.. सकाळपासुन स्वयंपाक-घरातच होती बघ…” असं म्हणुन, खोलीचं दार लावुन तीची आई निघुन गेली…
शंकर-महादेवनच्या स्वर्गीय सुरांनी खोलीचा कोपरां-कोपरा मधुर होऊन गेला होता. गाणी संपेस्तोवर अर्धा-पाऊण तास कसा निघुन गेला कळालेच नाही. कबीर वेळ-काळ-स्थळ सगळं विसरुन गेला होता. डोळे मिटुन तो ती गाणी ऐकण्यात रममाण होऊन गेला होता. इतकं शांत त्याला गेल्या कित्तेक महीन्यांत.. वाटले नव्हते. हा केवळ गाण्यांचा प्रभाव होता? की रतीची त्या खोलीतली त्याला लाभलेली साथ ह्याच्या त्याला पत्ता लागेना..
त्याने डोळे उघडले तेंव्हा तळहातावर हनुवटी टेकवुन रती त्याच्याकडेच हसत बघत होती.
“काय झालं?”, भानावर आल्यावर कबीर म्हणाला..
“काही नाही.. कुठेतरी हरवला होतास तु…”, रती
“खरंय गं.. काय गाणी आहेत मस्त… खरंच मी हरवलो होतो कुठेतरी…”, कबीर..
“आई-बाबा गेले?”, काही वेळ शांततेत गेल्यावर कबीर म्हणाला..
“केंव्हाच…”, रती अजुनही कबीरकडेच बघत होती…
काय होत्ं तिच्या नजरेत? काय म्हणायचं होतं तिला? तिचे ते टप्पोरे डोळे कबीरला खुणावत होते.. पण काय? कश्यासाठी?
“कबीर.. एक विचारु?”, रती
“हो.. विचार की…”, कबीर..
“पण त्यातुन काही अर्थ काढु नकोस हं.. सहजचा प्रश्न आहे.. सहजच, पण खरं खरं उत्तर दे..”
“बापरे.. काय विचारणार आहेस असं?”
“..तु मोनिकाबरोबर लिव्ह-ईन मध्ये रहात होतास?”
“हम्म..”
“कधी तिच्याबरोबर सेक्स..”
“हो.. पण खरं तर मला नाही वाटत त्यात रोमांन्स असा काही होता.. इट वॉज वन ऑफ़ दोज क्रेझी नाईट्स.. रोमॅन्सची माझी व्याख्या खुप वेगळी आहे..”, कबीर
“म्हणजे कशी..”
“म्हणजे असं मुसळधार कोसळणार्या पावसात हातात हात धरुन फ़िरणं… कडाडणार्या विजा.. सोसाट्याच्या वार्यात एकमेकांना किस्स करणं मला जास्ती पॅशनेट वाटतं..”, कबीर..
“मग मोनिकाबरोबर रहाताना असा कोसळणारा वारा.. कडाडणार्या विजा आल्या नाहीत का कधी?”, हसत हसत रतीने विचारलं..
कबीर नुसताच हसला…
“आणि राधाबरोबर?”, अचानक गंभीर होत रती म्हणाली…
“नाही..”, क्षणाचाही विलंब न करता कबिर म्हणाला.
“पण कधी तसं वाटलं तरी असेल ना?”, रती..
“पण तु हे का विचारते आहेस..?”, कबीर..
“आधी उत्तर दे…”
“नाही वाटलं.. पण तेंव्हा मुसळधार पाऊस.. कडाडणार्या विजा असत्या तर…”.. कबीर अचानक थांबला..
“तर काय कबीर?”
“एनिवेज.. जाऊ देत तिचा विषय…”, कबीर थोडासा अनकंफर्टेबल होतं म्हणाला..
“बरं, चल, जेऊयात? तुला न जेवता सोडलं तर आई रागावेल मला..”, तोंड फ़ुगवुन रती म्हणाली..
“आई रागावेल का?”, कबीर गालातल्या गालात हसत म्हणाला..
“हो..”
“आणि तु? तु नाही रागावणार?”, रतीच्या नजरेला नजर देत कबीर म्हणाला..
“बघं बरं.. मी रागावले ना.. तर मला मनवताना तुला ब्रम्हांड आठवेल..”
कबीरने खिडकीतुन बाहेर बघीतलं.. मे महीना संपत आला होता आणि आकाशात काळ्या ढगांचे पुंजके अधुन-मधुन डोकावत होते. अश्याच एका ढगाने आग ओकणार्या सुर्याला झाकुन बाहेर मळभ आणला होता…
“मुसळधार पाऊस येणार बहुतेक…”, काही मिनिटांपुर्वीच्याच मुसळधार-पावसाचा संदर्भ घेत कबीर म्हणाला..
रतीला त्याच्या बोलण्यातला अर्थ कळाला आणि ती खळखळून हसली..
“मग काय होतं कबीर.. मुसळधार पाऊस आला तर?”, रती अजुनही खोलीच्या दारातच थांबली होती..
“धरणं भरतात.. सगळीकडे हिरवं गार होतं..”, कबीर
“आणि..”
“आणि.. उन्हाळ्याची गर्मी जाऊन सगळीकडे सुखद गारवा होतो..”
“ते जाऊ देत.. तुला काय होतं कबीर?”
रतीच्या आवाजातला कंप कबीरला जाणवत होता..
कबीर रतीच्या जवळ जाऊन थांबला. त्याच्या शरीराचा स्नायुं-स्नायु रतीला बाहुपाशात समावुन घेण्यासाठी आसुसलेला होता. त्याने एक पाऊल पुढे टाकले असते तरी रतीने त्याला थांबवले नसते. पण ह्यावेळी त्याला रतीबद्दल शंभर-टक्के स्वतःकडुन खात्री हवी होती. त्याला रती आवडत होती हे शंभर टक्के खरं होतं.. पण त्याच्या मनातुन राधा गेलेली नव्हती हे ही तितकेच खरं होतं आणि तो रतीला कुठल्याही प्रकारे फ़सवु इच्छीत नव्हता.
मोठ्या कष्टाने त्याने स्वतःला सावरले..
“एनिवेज.. चल जेऊयात.. खुप भुक लागली आहे..”, कबीर..
रतीने अविश्वासाने वळुन एकवार कबीरकडे पाहीले आणि मग ती जेवायचं वाढायला स्वयंपाक-घरात निघुन गेली.
कबीर घरी परतला तेंव्हा त्यच्या मनामध्ये विचारांचे काहुर उठले होते.
“आपण केलं ते बरोबर केलं का?”
“रतीला काय वाटलं असेल?”
“आपण एक चांगली संधी गमावली का?”
“पण रती काय संधी नाहीए.. आत्ता भावनेच्या भरात काही करुन तिला भविष्यात दुखावायची आज्जीबात इच्छा नव्हती.”
“आपण असं स्वतःला थांबवले ह्याचे एकमेव कारण राधा आहे का? आपण अजुनही तिच्यावर प्रेम करतोय? अजुनही तिच्या परत येण्याची वाट बघतोय? का? कश्यासाठी?”
एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात थैमान घालत होते. त्याची तंद्री भंगली ती फ़ोन वाजण्याचा आवाजाने.
कबीरच्या बाबांचा फोन होता..
“हा बाबा.. बोला..”, कबीर..
“कबीर.. ह्या मंथ-एंडला मी आणि तुझी आई येतोय तिकडे..”
“अरे व्वा.. का? सहज?”
“नाही अरे.. श्रेयाचं (कबीरच्या चुलत बहीणीचं) लग्न ठरलंय”
“ऑं? कधी? आणि इतक्या लगेच?”
“हो अरे.. तिचा होणारा नवरा संगणक क्षेत्रातला आहे.. अमेरीकेत असतो तो.. त्याला जास्तं सुट्टी नाहीए, अनायसे इथेच होता.. भेटीगाठी झाल्या.. दोघंही एकमेकांना पसंद पडले आणि असं तडकाफ़डकी लग्न करायचं ठरलंय..”
“पण मग बाकीचे…?”
“सगळेच येतोय.. बसेस केल्यात दोन-तिन.. आम्ही तुझ्या घरीच येऊ…”
“ओ्के…”
“कबीर!!”
“हां बाबा..”
“एव्हरीथींग ऑलराईट..?”, कबिरच्या आवाजात लग्नाचा किंवा सगळ्या नातेवाईकांना भेटण्याचा कसलाच उत्साह नव्हता..
“हम्म.. एव्हरीथींग ऑलराईट..”
“कबीर.. मी बाप आहे तुझा… काय झालंय..एखादी मुलगी वगैरे…”
“हम्म.. पण एक नाही दोन..”, कबीर कसंनुसं हसत म्हणाला..
“अरे बापरे… मला वेळ आहे आत्ता.. बोलायचंय?”
पुढच्या दहा-पंधरा मिनिटांत कबीरने बाबांना राधा आणि रतीबद्दल सगळं सांगुन टाकलं..
“मलाच कळत नाहीए.. मला कोण जास्ती आवडतं.. राधा? का रती? आणि राधा आवडत असेल.. तरीही.. तिच्या मनात काय आहे काही कळत नाहीए.. ती परत येईल.. नाही येणार.. ह्याचाही काही भरवसा नाही.. आणि समजा, ती येणार नाही म्हणुन रतीला आपलंसं केलं..आणि राधा समोर आली तर.. तर काय होईल हे सुध्दा मला ठाऊक नाही..”, कबीर…
“हे बघ कबीर.. माझं तरी असं मत आहे की आपण पळत्याच्या मागे न लागता.. जे हातात आहे तेच गोड मानुन घ्यावं.. राधाची न्युज आम्हीपण टी.व्ही. वर पाहीली होती.. अर्थात शेवटचा निर्णय सर्वस्वी तुझा आहे…”
…
“एक काम कर.. लग्नात रतीला पण घेऊन ये.. जमेल?”
“हो.. येतो घेऊन.. ठेवु फोन मग?”
“हम्म.. चल बाय.. आणि उगाच देवदास होऊन बसु नकोस.. पुस्तकाच्या पुढच्या भागावर काम चालु करं, इथे सगळे विचारायला लागलेत पुढचा भाग कधी येणार म्हणुन..”, कबिरला चिअर-अप करत त्याचे बाबा म्हणाले…
“मी लाख लिहीन हो पुढचा भाग.. पण शेवट मलाच सापडत नाहिए त्याचं कायं?..”, कबीर स्वतःशीच म्हणाला आणि त्याने फोन ठेवुन दिला.
नेपल्समध्ये काढलेले अनेक सुंदर सुंदर फोटो पोस्ट करण्यासाठी राधाने बर्याच दिवसांनी फ़ेसबुक उघडलं..
पहील्या काही पोस्ट स्क्रोल केल्यानंतर एका फोटोपाशी राधा घुटमळली. रतीने तिचा कबीरबरोबर काढलेला एक सेल्फ़ी फ़ेसबुकवर कबीरला टॅग करुन पोस्ट केला होता.
“कोण आहे ही रती? आणि कबीर तिच्या बेडरुममध्ये काय करतोय..?”, तो फ़ोटो एन्लार्ज करुन बघत राधा स्वतःशीच म्हणाली..
“दाल मै कुछ काला है..” मागुन लॅपटॉपवरचा तो फोटो बघत पुनम म्हणाली..
“चुप गं चुडैल.. काही काला वगैरे नाहीए..”, राधा
“कमऑन राधा.. यु आर अ वुमन.. रतीच्या चेहर्यावरचे.. डोळ्यातले भाव बघुनच तु सांगु शकतीस.. कश्याला फ़सवतेस स्वतःला..”, पुनम
“एनिवेज.. आपण चाललोच आहे इंडीयात मंथएंडपर्यंत… गेल्यावर कळेलच खरं काय आणि खोटं काय…”, राधा..
“आणि समजा हे खरं असेल.. तर काय? आणि खोटं असेल.. तर काय?”, पुनम
“माहीत नाही..”, राधा..
“अॅक्सेप्ट इट राधा.. तुला कबीर आवडतो.. आणि तु चक्क जळती आहेस.. त्याला दुसर्या मुलीबरोबर बघुन.. हो ना?”
“असेल.. पण पुनम, माझ्या स्वप्नांचं काय? माझ्या आयुष्याकडुन ज्या अपेक्षा आहेत त्याचं काय? मी कबीरला ‘हो’ म्हणुन एक तर त्याच्या.. किंवा माझ्या आयुष्याला न्याय देऊ शकणार नाही हे खरं आहे ना? आणि कॉम्प्रमाईज करुन त्यावर बेतलेली रिलेशनशीप मला नकोय..”
“विचार कर राधा.. निट विचार कर.. अजुन दोन आठवडे आहेत तुझ्या हातात.. इंडीयात आपण परत जाऊ तेंव्हा एकदाचा काय तो सोक्ष-मोक्ष लावुन टाक.. इस्स पार.. या उस्स पार.. तु स्वतःही त्यात अडकली आहेस.. आणि कदाचीत कबीरही..”
राधाने लॅपटॉप बंद केला आणि डोळे मिटुन टेबलावर डोकं ठेवुन राधा विचारात गढुन गेली…..
[क्रमशः]