इश्क – (भाग २३) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इश्क – (भाग २३)

नेपल्सच्या आकाशातली निळाई कमी होऊन गडद लाल, गुलाबी, केशरी रंगांची मुक्तहस्ते उधळण झाली होती. दिवसभर मवाळपणे तळपणारा सुर्य़ मावळतीकडे झुकला होता. समुद्रकिनारी जाणार्‍या रस्त्याच्या काही किलोमीटर आधी असलेल्या अरुंद रस्त्यांच्या कडेने उभारलेल्या कॅफेंमध्ये बाहेर रस्त्याच्या कडेला लावलेल्या खुर्च्यांवर बसुन राधा पुनमबरोबर ग्रिल्ड सॅंन्डविच आणि कॉफी घेत होती. बरोबरची ट्रिप आदल्या रात्रीच परतली होती आणि ती आणि पुनम, अवंतीकाने सांगीतल्याप्रमाणे महीना दोन महीने तेथे थांबुन रेकी करणार होत्या.

“राधा.. तो शेफ़ बघ नं.. कसला हॉट आहे ना?”, पुनम आतल्या काऊंटरकडे बोट दाखवत म्हणाली..
“हो ना अगं.. नाही तर आपल्या इथले.. दोन-चार सन्माननीय अपवाद सोडले तर…”
“तो बघतोय मगाच पासुन तुझ्याकडे…”, राधाला चिडवत पुनम म्हणाली..”चल बोलुयात त्याच्याशी..”
“गप गं.. उगाच काय बोलायचं..”
“चल तर.. त्यात काय होतंय.. मे बी.. एखादी वाईनची बॉटल देईल तो..कॉम्लमेंटरी..”, पुनम राधाला ओढत म्हणाली..
“नको.. जा तुच.., मला खुप भूक लागलीय… मला एक पास्ता घेऊन ये येताना…”

शेवटी पुनम एकटीच निघुन गेली.

राधाने मोबाईल उचलला आणि मेसेज बघत असतानाच तिला कबीरने पाठवलेला फोटो दिसला. रोहन आणि मोनिकाला ती चेहर्‍याने ओळखत होती, पण कबीरच्या शेजारी बसलेली ती मुलगी, रती, कोण हे काही तिला उमजेना.

कबीरच्या ऑफ़ीसमध्ये कोणी मुलगी असल्याचे तिच्या ऐकीवात नव्हते. कबीरला बहीण असल्याचेही तो कधी काही बोलला नव्हता.

“राधा.. तुझं नाव विचारत होता तो…”, टेबलावर पास्ताची डिश ठेवत पुनम म्हणाली..
“हम्म..”
“अगं हम्म काय? फ़िदा आहे बहुतेक तुझ्यावर तो.. संध्याकाळी बिचवरच्या शॅक्समध्ये डिनरला भेटायचं का विचारत होता..”
“ओके..”
“बरं, तुला विचारायचं राहीलं, तुला पास्ता रेड सॉस मधला हवा होता का व्हाईट?”, राधासमोर पास्ताची डीश ठेवत पुनमने विचारलं
“हम्म..”
“एsssss.. मी वेडी आहे का एकटीच बडबडायला? काय ते फोन मध्ये डोकं खूपसुन बसली आहेस.. आण तो फोन इकडे…” असं म्हणुन पुनमने राधाच्या हातातला फोन काढुन घेतला.

राधाच्या मोबाईलवरचा तो फोटो पाहुन पुनमने विचारलं, “कुणाचा फोटो आहे हा?”
राधाने काहीच न बोलता पास्ताची डीश पुढे ओढली, पण तिचं खाण्यात लक्षच नव्हतं, चमच्याने ती पास्ता नुसताच इकडे तिकडे करत बसली होती.

“राधा.. काय झालंय? का डिस्टर्ब झालीस एकदम? ह्या फोटोशी काही संबंध आहे का त्याचा?”
“अगदीच असं काही नाही.. सोड ना, खूप मोठ्ठी कहाणी आहे ती..”, राधा..
“मग आपल्याला आता उद्या सकाळपर्यंत तरी काय काम आहे?.. आय एम ऑल ईअर्स..”

“ठिक आहे.. आधी हा पास्ता संपवु, मस्त कॉफ़ी ऑर्डर करु आणि मग तुला सगळं सांगते..”
“बरं.. ह्या शेफ़चं काय करायचं? त्याला आजच्या ऐवजी उद्या संध्याकाळी भेटू म्हणुन सांगते.. ओके?”
“हम्म ओके…”

पुनम त्या शेफ़शी बोलायला निघुन गेली

राधाने कबीरचा मेसेज उघडला.. तिला काय रिप्लाय करावा काहीच सुचत नव्हतं.. उघड उघड “ही मुलगी कोण?”, असं विचारणंही तिला बरोबर वाटेना..

तिने फ़क्त “थंब्स अप.. मस्त दिसताय तुम्ही सगळे..”, एव्हढाच मेसेज पाठवुन दिला


राधा आणि पुनमच्या गप्पा संपल्या तेंव्हा संध्याछाया जाऊन अंधार पडला होता. त्या गल्लीचं तर रुपडंच पालटुन गेलं होतं. सर्व रेस्तॉरंट्स रंगेबीरंगी दिव्यांच्या माळा आणि मंद दिव्याच्या प्रकाशाने उजळली होती. काही ठिकाणी सिस्टीमवर तर काही ठिकाणी चक्क लाईव्ह बॅड्स संगीत वाजवत होते.. बिकीनी मध्ये फ़िरणार्‍या ललना आता रात्रीच्या वन-पिस पार्टीवेअर्समध्ये आपापल्या बॉय-फ़्रेंड्स, नवर्‍यांबरोबर फ़िरत होत्या.

“हम्म.. तर असं आहे सगळं…” थोडा वेळ शांततेत गेल्यावर पुनम म्हणाली.. “बट यार.. ग्रेट आहेस तु.. खरंच मानलं तुला.. स्वप्नांचा पाठलाग कसा करावा हे तुझ्याकडुन कुणी शिकावं…”
“जिंदगी बडी होनी चाहीए, लंबी नही.. हो ना? मला त्या त्या वेळेला जे वाटलं ते केलं.. त्याचे भविष्यात काय परीणाम होतील ह्याचा विचार सुध्दा केला नाही..”, राधा
“पण मग हा जो कोणी कबिर आहे, त्याचं काय? तुला तो आवडतो? का नाही?, नाही म्हणजे त्याचा दुसर्‍या मुलीबरोबरचा फोटो बघुन तु डिस्टर्ब झालीस म्हणुन विचारतेय..”, पुनम
“मी स्वतःच खूप कन्फ़्युस्ड आहे त्याच्या बाबतीत.. म्हणजे.. तसा तो चांगला आहे.. मला कधी कधी त्याच्याबद्दल फ़िलिंग्स वाटल्याही.. पण कदाचीत माझं ध्येय स्पष्ट होतं..मला रिलेशन्सच्या भानगडीतच पडायचं नव्हतं.. त्यामुळे त्याच्याबद्दल इतका.. आणि त्या दृष्टीने कधी विचारच केला नाही..”
“पण त्याला तु आवडतेस.. ना?”
“दोनशे टक्के..”, हसत हसत राधा म्हणाली..

“तुझ्याजागी मी असते ना, तर कदाचीत मी निदान विचार करायला वेळ तरी घेतला असता.. लगेच नक्कीच नाही नसते म्हणले.. म्हणजे तुझ्याकडुन जे ऐकले त्यावरुन तरी साधा-भोळा वाटतोय.. दिसायला ही क्युट आहे.. आणि मुख्य म्हणजे तुझ्यावर प्रेम करतोय.. त्या प्रेमाखातर त्याने अख्खं एक पुस्तक लिहीलंय..”, पुनम
“अगं पण आम्ही दोघं दोन वेगवेगळे ध्रुव आहोत. तो अगदीच साधं, निरस आयुष्य जगणारा.. मला असं सतत काहीतरी नविन, रोमांचक लागतं. कधी मला अस्ं वेड्यासारखं भटकावंस वाटतं.. कधी वाटतं एखादा रॉक बॅंड जॉईन करावा.. कधी वाटतं दुर कुठेतरी निर्जन ठिकाणी तंबु ठोकुन रहावं.. तो ह्यातलं कध्धीच काही करणार नाही..”

“बरोबर आहे तुझं.. पण मला वाटतं तु फ़क्त वर्तमानकाळाचाच विचार करतेस.. भविष्याच्या दृष्टीने कधी विचार केलाएस..म्हणजे.. आज तुला जे करावंस वाटतंय ते तु करु शकतेस कारण तुझं शरीर तुला साथ देतंय.. तुझं मन खंबीर आहे.. तुझ्यात पोटा-पाण्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची धमक आहे.. पण..”
“कुठ्लं भविष्य पुनम.. उद्या कुणी बघीतलाय.. त्या उद्यासाठी आजचं आयुष्य निरस.. बोअरींग करायचं.. आणि तो उद्या आलाच नाही तर? कुणी सांगावं मी प्रवास करणारं एखाद्या प्लेन-क्रॅश होईल, रस्त्याने जाताना एखादा ट्रक उडवेल.. हार्ट-अ‍ॅटॅक येईल.. काहीही होऊ शकतं ना..”, पुनमचं वाक्य तोडत राधा म्हणाली..
“पण तो उद्या येणारंच नाही.. असंही नाही ना.. समजा तो उद्या आला तर? तर काय करशील?”, पुनम..
“एनीवेज.. हे कोंबडी आधी की अंड असं झालं.. जाऊ देत.. आपण ह्या सुंदर संध्याकाळी कश्याला उगाच फिलॉसॉफीकल गप्पा मारतोय.. चलं.. सोड.. ह्या फोटोचं काय करु ते सांग..”

“हे बघ.. मला वाटतंय, त्याने हा फोटो तुला मुद्दाम पाठवलाय.. तु त्याला तिच्याबद्दल आत्ता काहीच विचारु नकोस.. बघु काय करतोय..”, पुनम म्हणाली..
“बरं..आता काय करायचं? जेवायला तर मला आत्ता आज्जीबात भूक नाहीए..”, राधा
“चल.. नाईट-आऊट्स साठी रेकी करु अजुन..”, पुनम
“नको प्लिज.. खूप झालंय आज काम.. त्यापेक्षा ड्राईव्ह-इन ला जाऊयात का.. ओपन स्क्रिन थिएटर्स आहेत.. मस्त कार मध्ये बसुन पिक्चर टाकु एखादा..”, राधा
“नको गं.. तिकडे सगळे कपल्स असतात.. आपण दोघी..”
“मग काय झालं.. विचारलं तर सांगु लेस्बो आहोत.. चल.. निर्लज्जं सदा सुखं..”, पुनमला उठवत राधा म्हणाली…

दोघींनी बिल भरले आणि कारमध्ये बसुन डाऊनटाऊनच्या रस्त्याला वळल्या..


राधाचा रिप्लाय बघुन कबीरचं मन खट्टू झालं.. त्याची अपेक्षा होती की राधा रतीबद्दल विचारेल.. पण तिने तसं काहीचं केलं नव्हतं. कबीरने तो विषय तेथेच सोडुन दिला. राधानेही नंतर तो विषय मनातुन काढुन टाकायचं ठरवलं.


एके दिवशी रोहन आणि कबीर ऑफ़ीसमध्ये गप्पा मारत बसले होते.

“सो.. काय म्हणतीय रती.. आजकाल जोरदार भेटताय तुम्ही एकमेकांना.. हम्मं?”, रोहन
“रती.. खूपच मस्त आहे ती ह्यात वादच नाही. तिच्याशी गप्पा मारायला लागलं की वेळेचं भानंच रहात नाही. विषय कुठलाही चालतो अरे आम्हाला.. आणि आम्ही कश्यावरही तासंतास बोलु शकतो..”, कबीर
“हात्तीच्या.. म्हणजे अजुन तुमचं गप्पांमध्येच अडकलं आहे.. मला वाटलं.. पुढे काही तरी घडलं असेल..”, रोहन
“अरे खरंच आहे तिचा बॉयफ़्रेंड तो कोण पिटर का कोण.. मध्ये बोलताना मध्येच कधीतरी त्याचा विषय निघाला होता.. तिच्या बोलण्यावरुन तरी वाटत नाही, ती खोटं बोलत असेल असं…”
“बरं.. एक काम करु चलं.. खरंच एक पिक्चरचा प्लॅन करु.. आपण चौघं.. आणि त्या पिटरलापण बोलावु.. बघु तरी तो खरंच कोणी असेल तर येईल.. नसेलच कोणी तर रती काहीतरी कारण सांगेल.. काय बोलतोस?”, रोहनने शक्कल लढवली.

“ठिक आहे चल.. तु म्हणतोएस तर.. पण आपल्याला एकदम शेवटच्या शो ला वगैरे जावं लागेल, ११.३० वाजता वगैरे.. पिटरची ड्युटी असते ना बाऊंसरची…”
“आय एम ओक विथ इट.. तु बोल रतीशी आणि तिकीटं काढुन टाक…”


ठरल्याप्रमाणे सिनेमाचा प्लॅन ठरला. पिटरला बोलावण्याबाबत रती म्हणाली, “तो वेळेवर सुटला ड्युटीवरुन तर येईल.. त्याला लेट हो असेल तर नाही जमायचं.. सो तिकिट्स आधी नको काढुस..ऐन वेळी काढु…”

कबीर मनोमन खुश झाला होता. मनात कुठेतरी त्याला रोहनचं बोलणं खरं वाटु लागलं होतं. रती नक्कीच फ़ेकतेय.. कोणी पिटर वगैरे नाहीए.. ऐनवेळी सांगेल त्याला उशीर होतोय निघायला म्हणुन… अशी आशा मनात धरुन तो थिएटरमध्ये पोहोचला होता.

रोहन आणि मोनिका आधीच पोहोचले होते.

थोड्याच वेळात रती पण पोहोचली. ह्यावेळी फ़क्त कबीरच नाही, तर रोहनसुध्दा तिच्याकडे पहात राहीला.. आणि रोहनच का.. थिएटरमधले बरेच तरुण तिच्याकडे बघत होते.

ऑलीव्ह रंगाचा.. आणि त्यावर रंगीत मोठ्या फुलांचा पॅटर्न असलेला स्लिव्हलेस फ़्रॉक तिने घातला होता. केस मोकळे सोडले होते आणि केसांची एक बाजु छोट्या पिन्स लावुन घट्ट बसवली होती. चंदेरी रंगाचे कानातले छोटेसे झुमके तिच्या गोर्‍या वर्णावर चमकुन दिसत होते. पायातल्या ग्लॅडीएटर स्टाईल्सच्या सॅन्डल्स तिच्या नाजुक पायांभोवती नक्षी करुन बसल्या होत्या. रती जवळ येताच एक मंद परफ़्युमचा सुगंध कबीरच्या नाकात शिरला.

“लुकींग ब्युटीफ़ुल..”, नकळत कबीर म्हणाला..
“थॅंक्स..”, रती..
“पिटर येणार आहे ना?”, रोहनने विचारलं.
“काय माहीती आता काय करतोय.. मी मगाशी फोन केला होता तर त्याने उचलला नाही.. बघु थोड्यावेळ वाट नाहीतर आपलं आपण जाऊ..”, वैतागुन रती म्हणाली

१०-१५ मिनीटं शांततेतच गेली.. कबीर मनोमन प्रार्थना करत होता की हा कोण जो पिटर आहे तो येउच नये.. तो अस्तीत्वातच असु नये… पण कबीरची प्रार्थना व्यर्थ ठरली कारण तेव्हढ्यात रतीचा फोन वाजला…

“हुश्श.. बरं झालं वेळेवर आलास.. कित्ती वेळ अरे…”, रती फ़ोनवर बोलत होती..
“हो मला माहीते.. तु कामावर होतास.. ..बरं सॉरी.. आता आपण फोनवर भांडत बसणारे का?… हम्म ये.. आम्ही फ़र्स्ट लेवलवर आहोत…”, रती
“आला बाबा एकदाचा..”, फोन ठेवल्यावर रती म्हणाली.

कबीरच्या हृदयातली धडधड वाढत होती. प्रत्येक सेकंदागणीक त्याची अस्वस्थता वाढत होती.

थोड्याच वेळात एक बलदंड शरीरयश्टीचा तरुण त्यांच्यात येऊन मिसळला. साधारण ६ फुटाच्या जवळपास असलेली उंची.. गोरापान.. आखुन रेखुन केलेली दाढी, जेल लावुन घट्ट बसवलेले स्पाईक्स.. कानात चमचमणारा डायमंड स्टड.. एकुणच आकर्षक व्यक्तीमत्व होतं. रती त्याच्यासमोर एखाद्या बाहुलीसारखी भासत होती.

“गाईज.. धिस इज पिटर..”, रतीने सर्वांशी ओळख करुन दिली..
रोहनची आणि कबीरची नजरानजर झाली…

“सो कुठला मुव्ही बघतोय आपण?”, पिटरने विचारलं…
“लास्ट विकला तो एक रोम-कॉम लागलाय.. फ़ार मस्त आहे म्हणे तो…”, रती म्हणाली..
“ए प्लिज.. उगाच सेंन्टी वगैरे नको हा.. त्यापेक्षा आज रिलीज झालेला तो झोंबी मुव्ही बघुयात…”, पिटर..
“ए नको रे.. फ़ार ब्लड-शेड असते झोंबी मुव्हीज मध्ये.. ह्या दोघी घाबरतील उगाच…”, कबीर म्हणाला..
“घाबरायला काय लहान आहेत का? दर वेळी आपणच का अ‍ॅडजस्ट करायचं त्यांच्या आवडीचे मुव्ही बघुन…?”, पिटर..

कबीरने सगळ्यांवरुन नजर फ़िरवली.. कुणीच काही बोलले नाही.. शेवटी त्याने नाईलाजाने तिकीटं काढली..

सिनेमा त्याच दिवशी रिलिज झाल्याने बर्‍यापैकी गर्दी होती.. त्यामुळे सर्वांना एकाच रांगेत तिकीट्स मिळाली नाहीत. चार तिकिटं एका रांगेत.. आणि दोन समोरच्या रांगेतली होती…

कबीरने ती दोन तिकीट्स रती-पिटरला दिली, आणि तो, रोहन आणि मोनिका त्यांच्याच मागच्या रांगेत बसले.

सिनेमा अपेक्षेप्रमाणे फ़ालतु… किळसवाणाच होता.. थिएटर किंकाळ्या, गोळ्यांचे आवाज.. हाणामार्‍या.. टेंन्शन.. ब्लड-शेड्सने भरुन गेले होते. कबीरचे तर सिनेमाकडे लक्षच नव्हते. तो सतत समोर बसलेल्या रती-पिटरकडेच बघत होता.. अर्थात रतीलाही तो सिनेमा आवडलेला नव्हताच. पिटर मात्र सिनेमाचा मनसोक्त आनंद घेत होता. काही भयाण प्रसंगांमध्ये रती डोळे झाकुन पिटरला बिलगत होती ते पाहुन तर कबीरचा अधीकच जळफ़ळाट होत होता.

सिनेमामध्ये झोंबिंची एक मोठ्ठी लाट शहरावर आक्रमण करुन जाते तो सिन सुरु होता आणि सिनेमाचा हिरो तलवार, बंदुक जे सापडेल त्याने सपासप झोंबिंना मारत होता. कुणाचं डोकं फुटत होतं.. कुणाचं पोट फुटुन आतुन आतडी बाहेर येत होत्या.. रतीला तो सिन असह्य झाला आणि ती उठुन बाहेर पडली.. पण जाताना तिने कबीरकडे एक कटाक्ष टाकला.

कबीरने काही सेकंद थांबुन पिटरचा अंदाज घेतला.. तो सिनेमात पुर्णपणे रममाण झाला होता. शेजारुन रती निघुन गेल्याचेही त्याला भान नव्हते ते पाहुन कबीरही हळुच बाहेर पडला.

रती बाहेर कॉफ़ी काऊंटरपाशी कॉफ़ी घेत होती.. कबीरला येताना पाहुन तिने अजुन एक कॉफ़ी ऑर्डर केली..

“हॉरीबल मुव्ही ना..?”, रती
“हम्म..”
“आय एम सॉरी.. उगाच आमच्यामुळे संध्याकाळची वाट लागली तुमच्या.. उगाच आलो आम्ही.. त्यापेक्षा तुम्ही दुसरा एखादा सिनेमा बघीतला असतात..”
“ए प्लिज.. इट्स ओके… एक वेगळा अनुभव..”, हसत हसत कबीर म्हणाला..
“माझ्या आणि पिटरच्या आवडी-निवडी खुप वेगळ्या आहेत.. त्यामुळे आमच्या बहुतेक डेट्सचे रुपांतर भांडणातच होते..”, कसंनुस हसत रती म्हणाली.. “पण तो चांगला आहे.. मुडमध्ये असतो तेंव्हा खुप काळजी घेतो माझी.. त्याच्याबरोबर खुप सेफ़ वाटते मला..”

कबीरला अचानक राधाची आठवण झाली. त्यालाही जाणवलं की आपलं आणि राधाचं पण अस्संच आहे.. दोघांच्याही आवडी निवडी दोन टोकांच्या. जर कधी राधा-कबीर दोघं एकत्र आलोच तर आपलं पण अस्संच होईल का? भांडणंच जास्ती?

दोघं बाहेरच गप्पा मारत बसले होते.. दहा मिनिटं झाली असतील तोच पिटर बाहेर आला..
“ए.. तु इथं काय करतीएस..”, काहीसा चिडुन आणि मग कबीरकडे संशयाने बघत पिटर म्हणाला..
“पिटर..प्लिज.. अरे कसला बोअरींग आहे मुव्ही तो… मी नाही बघु शकत अजुन..”
“मग काय झालं.. मी नाही तुझे रडके मुव्हीज बघत?”
“कुठे बघतोस.. लास्ट टाईम आपण नटसम्राटला गेलो होतो तर अर्ध्यातच निघुन गेलासच की मला एकटीला सोडुन तिथे..”
“मग काय… म्हातार्‍यांचे सिनेमे बघायचं वय ए का आपलं… बरं एनिवेज.. चल जाऊ यात आपण..”
“कुठे?”

“अगं, रॉनीचा फ़ोन आला होता.. ‘हार्ड-रॉक-कॅफ़े’ मध्ये पार्टी आहे.. तिकडे जायचंय..”, पिटर
“आणि सिनेमा?”
“जाऊ देत.. मी नंतर डाऊनलोड करुन बघेन.. चल..”
“अरे पण इतरांच काय.. तुझ्यासाठी ते तो सिनेमा बघताएत ना..?”

एव्हाना रोहन आणि मोनिका पण बाहेर आले होते..

“कुठे कोण बघतंय.. सगळेच तर बाहेर आहेत…”, पिटर..
“प्लिज रे.. मला बोअर होतो तुमचा तो ग्रुप.. तुम्ही नुसते पित बसता…”
“मग तु घे ना कोल्ड्रींक.. तेथे मसाला दुध मिळत नाही..नाही तर तेच दिले असते तुला..”, मोठ-मोठ्यांदा हसत पिटर म्हणाला.. पण रती हर्ट झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.. “ओके ओके.. सॉरी.. चल जाऊ यात? बाय गाईज..”

“बरं निदान घरी जाऊन चेंज तरी करते.. हे असे छोटे कपडे घालुन येऊ का तिकडे..?”
“त्यात काय झालं..? इथं आली होतीसंच की..”
“अरे पण थिएटर आणि हार्ड-रॉक मध्ये काही फ़रक ए की नाही.. त्यात तेथे सगळे तुझे मित्र असे बघतात की..”
“चल गं..मी आहे ना.. बघतो मी कोण काय म्हणतंय..”
“रती.. तुला पाहीजे तर.. माझं स्पोर्ट्स जॅकेट घेऊन जा बरोबर..”, आपलं जॅकेट काढुन रतीला देत कबीर म्हणाला..
“थॅंक्स..”, असं म्हणुन रती नाईलाजाने सगळ्यांना बाय करुन पिटरसोबत बाहेर पडली.

“आता काय करायचं?”, दोघं निघुन गेल्यावर कबीर म्हणाला..
“हो ना.. आम्हाला काही तो उरलेला सिनेमा बघण्यात उत्साह नाहीए.”, मोनिकाकडे बघत रोहन म्हणाला..
“हो.. त्यापेक्षा जेवायला जाऊया कुठेतरी..”, मोनिका
“एक काम करा.. तुम्ही दोघं जा जेवायला.. मी उगाच कश्याला मध्ये.. आधीच आपली संध्याकाळ बोंबललीए..”, कबीर
“ए.. मध्ये काय त्यात.. तु काय नविन आहेस् का आम्हाला?”, रोहन
“तसं नाही रे.. पण खरंच जा तुम्ही दोघं.. मला तशीही फ़ारशी भूक् नाहीए”, कबीर..
“नक्की? नाही तर खरंच आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीए तु आलास तर..”, मोनिका

मोनिकाची मनोमन इच्छा होती की कबिरने बरोबर यावं.. कबीर तिच्या मनातले भाव तिच्या डोळ्यात वाचु शकत होता..आणि म्हणुनच त्याला जायचं नव्हतं.. मोनिका आता रोहनची होती.. आणि कबीर त्यांच्याबरोबर असता तर कदाचीत मोनिका पुर्णपणे रोहनकडे लक्ष देऊ शकली नसती असा काहीसा विचार त्याच्या मनात आला.

“खरंच नक्की.. जा तुम्ही..”, कबीर

एकमेकांचा निरोप घेऊन तिघेही बाहेर पडले.


कबीर घरी आला, बुट कोपर्‍यात भिरकावले आणि तो बेडवर सुन्नपणे बसुन राहीला.. साधारण १० मिनिटंच झाली असतील तो त्याचा मोबाईल नविन मेसेज-साठी किणकिणला.

रतीचा मेसेज होता.

“कॅन यु पिक-मी अप फ़्रॉम कोरेगांव पार्क.. सिनेमा हॉलमध्ये नसशील आणि बिझी नसशील तर प्लिज कॉल..”
कबीरने लगेच फ़ोन लावला..

“कुठेस कबीर..?”, काहीशी मुसमुसत रती म्हणाली..
“घरीच आहे.. का? काय झालं..?”, कबीर..
“प्लिज मला पिक-अप करतोस का? मी कोरेगाव-पार्कला आहे..”
“हो करतो.. पण पिटर कुठे आहे?”
“तो मला सोडुन गेला इथेच रस्त्यात.. ते नंतर बोलते.. पण प्लिज पटकन ये.. मी एकटीच आहे इथे..”, रती

कबीरने घड्याळात नजर टाकली.. १२.३० होऊन गेले होते. कोरेगाव-पार्क, शहराबाहेरचा तसा निर्जन भाग होता.. ह्यावेळ रती अशी एकटीच रस्त्यावर.. ते पण अश्या कपड्यात… त्याच्या काळजात धस्स झालं..

“रती.. हे बघ.. अशी रस्त्यावर एकटी नको थांबुस.. आजुबाजुला काही आडोसा आहे का?”
“नाहीए.. काहीच नाहीए इकडे.. मोकळा रस्ता आहे..”, रती.. “थांब एक मिनीट.. तिकडे पुढे.. श्शी.. सुलभ शौचालय आहे..”, कसंसं हसत रती म्हणाली..
“व्हेरी गुड.. तेथे आत जाऊन थांब.. मी लग्गेच येतोय..”, कबीर
“श्शी.. वेडा आहेस का.. अरे पब्लिक टॉयलेट आहे ते.. काही तरी काय.. किती घाण असेल तेथे..”, रती
“हे बघ रती.. मी लगेच पोहोचतोय.. अशी रस्त्यावर एकटी नक्को थांबुस प्लिज ऐक.. मला व्हॉट्स-अ‍ॅपवर तुझं लोकेशन पाठवं.. तु आत थांब. मी निघालोय…” असं म्हणुन कबीर लगेच बाहेर पडला.. जाताना दोन-तिन पर्फ़्युमच्या बाटल्या बरोबर घेतल्या आणि त्याने गाडी वेगाने रतीच्या दिशेने वळवली..

रात्रीची वेळ असल्याने रहदारी तुरळक होती. २० मिनिटांत कबीर तेथे पोहोचला.. कबीरला बघताच रती धावत धावत आली आणि त्याला बिलगली..
“मी.. मी.. आतमध्ये उलटी केलीय..”, रती रडत रडत म्हणाली..
“ईट्स ओके.. इट्स पर्फ़ेक्टली ओके..”, तिची पाठ थोपटत कबीर म्हणाला..

त्याने गाडीतुन पाण्याची बाटली आणि पर्फ़्युम्स तिला दिले.. रडुन रतीच्या आयलायनर्सची वाट लागली होती.. गालांवर काळे ओघळ पसरले होते. केस विस्कटले होते.

रती जरा नॉर्मल झाल्यावर कबीरने तिला गाडीत बसवले आणि त्याने गाडी माघारी वळवली.

“काय झालं?”, कबीर..
“नेहमीप्रमाणे आमची भांडणं झाली.. मला नव्हतं जायचं कबीर त्याच्या त्या मित्रांच्या ग्रुपमध्ये.. त्यात तो तुमच्याशी जे वागला त्याचा मला राग आला होता… आमचं दोघांचही भान सुटलं.. मी म्हणलं चिडून त्याला.. सोड मला इथंच.. तर त्याने खरंच मला गाडीतुन उतरवलं आणि निघुन गेला…”, रती..
“काय मुर्खपणा आहे हा… मग? काय केलंस तु?”, कबीर..

रतीने आपला मोबाइल चालु केला आणि त्यातला सेंन्ट फ़ोल्डरमधला एक मेसेज उघडुन कबीरसमोर धरला..

“पिटर.. आय एम ब्रेकींग-अप विथ यु.. प्लिज उद्यापासुन माझ्या समोर येऊ नकोस..”

तो मेसेज पाहुन कबीरचे डोळे चमकले तसं रती म्हणाली.. “मी तुझ्यामुळे त्याच्याशी ब्रेक-अप केलंय असं समजु नकोसं हा…”
“छे.. मी कुठं तसं म्हणालो..”, कबीर..

रतीने कबीरच्या गाडीतल्या डॅशबोर्ड्सवरील पॅनलकडे नजर टाकली.
“काय झालं?”, कबीर
“पेट्रोल किती आहे बघतेय..”, रती
“आहे बरंच.. का?”, कबीर…
“जिकडे फ़िरवायची आहे गाडी तिकडे फ़िरव.. मला आत्ता आज्जिब्बात घरी जाण्याचा मुड नाहीए..”, असं म्हणुन रतीने गाण्यांचा आवाज वाढवला, सिट-बेल्ट लावला आणि सिट थोडं मागे करुन ती डोळे झाकुन आरामशीर बसली..

“युअर विश.. माय कमांड मॅम..ड्रायव्हर कबीर अ‍ॅट युअर सर्व्हीस..”, असं म्हणुन कबीरने गाडी सिटी-एक्झिटला वळवली..

[क्रमशः]