26. Maharashtratil kille - 1 books and stories free download online pdf in Marathi

२६. महाराष्ट्रातील किल्ले- भाग १

२६. महाराष्ट्रातील किल्ले- भाग १

किल्ले हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला किल्ल्यांविषयी उत्सुकता असतेच. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. किल्ले शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेल्या वास्तू. इंग्रजीत कॅसल, फोर्ट, सिटॅडल, बर्ग वगैरे संज्ञांनी उल्लेख होतो. तर मराठीत दुर्ग, गिरिदूर्ग, द्वीपदुर्ग, जंजिरा, गढी, कोट, गड, बालेकिल्ला वगैरे संज्ञांनी या वास्तूचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. किल्ल्यांचे बांधकाम आणि उपयोग फार प्राचीन काळापासून पूर्ण जगभर होत आला आहे. ज्या काळी अनपेक्षित परकीय आक्रमणांची भीती होती त्या काळी घरे, मंदिरे, नगरे इत्यादि तटबंदी किंवा कोट बांधून सुरक्षित ठेवण्याची सोय केली जायची. शत्रूचा हल्ला झाल्यास नागरिकांना लगेच संरक्षण मिळावे आणि शत्रूशी मुकाबला करण्यास सोयीचे व्हावे यासाठी खूपशी नगरे ही किल्ल्याच्या आसपास किंवा अनेक वेळा किल्ल्यातच वसवली जात. किल्ल्यात पाणीपुरवठा, गुप्त खजिने, धान्यगुदामे, शस्त्रागारे, दारूची कोठारे, गुप्त मार्ग इत्यादींची अत्यंत चातुर्याने व काळजीपूर्वक आखणी करावी लागे. किल्ला सुरक्षित रहावा म्हणून युद्धपद्धतीनुसार बुरूज, दरवाजे, तटबंदी, तटबंद माची, खंदक अश्या वेगवेगळ्या रचना केल्या जायच्या. ज्यामुळे किल्ला सुरक्षित राहायचा. एवढेच नव्हे, तर युद्धप्रसंगी शस्त्रास्त्रे सुलभतेने हाताळता यावीत म्हणूनही काही खास योजना आखण्यात येत असे.

महाराष्ट्र गड किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा’ या शब्दांत सह्याद्रीच्या डोंगर-दर्‍यात वसलेल्या महाराष्ट्राचे अतिशय योग वर्णन गोविंदाग्रजांनी केलेले आहे. महाराष्ट्राला सह्याद्रीच्या रांगांमध्ये घनदाट जंगलांची निसर्गसंपत्ती लाभलेली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास ह्या दर्‍या-खोर्‍यांशी, डोंगरांशी जोडलेला आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. या डोंगर रांगांतील किल्ले प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आपणासमोर आजही हे किल्ले बोलके करतात. या किल्ल्यांवरच इतिहास जन्माला आला आणि यांच्या साहाय्याने स्वराज्याची स्थापना झाली. हे किल्ले इतिहासाची साक्ष तर देतातच तसेच गिर्यारोहण व पर्यटन यादृष्टीनेही हे किल्ले महत्त्वपूर्ण आहेत. हल्ली ट्रेकिंग ची आवड वाढतांना दिसते आहे त्यामुळेच किल्ले अधिकच प्रसिद्ध होत आहेत. दर वर्षी हजारो पर्यटक ह्या ठिकाणांना भेट देतात व इतिहासातील गतस्मृतींना उजाळा देतात. किल्ल्यांचे प्राचीन महाराष्ट्राचे लष्करी सामर्थ्य ठळकपणे दाखवणारे असे हे किल्ले आहेत. देशात इतरत्र कोठेही इतक्या बहुसंख्येने किल्ले आढळत नाहीत. त्यामुळे सध्या गड किल्ल्यांवर ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्रात असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. ह्या किल्ल्यांवर भ्रमण केल्यावर वेगळाच अनुभव आपल्या गाठीशी बांधला जातो. त्याचबरोबर, इतिहासाची आठवण मनात ताजी राहते. किल्ल्याचे भौगोलिक स्थान जेवढे महत्त्वाचे तेवढाच त्याचा इतिहास महत्त्वाचा असतो. किल्ला कुठल्या राजवटीत बांधला, किल्ल्यावर आणि परिसरात झालेली युद्धं, महत्त्वाच्या घटना किल्ल्यावर जाण्यापूर्वीच वाचलेल्या असल्या तर किल्ला समजायला त्याचा चांगला उपयोग होतो. त्यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचबरोबर, ह्या किल्ल्यामध्ये वैविध्य आहे ते विशेष! काही सागरी बेटांवर दिमाखात उभे आहेत तर काही डोंगरशिखरांचे देखणेपण वाढवताना दिसतात. किल्ल्यांचे ३ प्रकार आहेत. आणि तीनही प्रकारचे किल्ले महाराष्ट्रात आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. किल्ल्यांचे प्रकार-

१. गिरीदुर्ग- डोंगरावर असलेला किल्‍ला- हे डोंगरावरच बांधलेले किल्ले. अतिशय कठीण अशा पाऊलवाटांनी या किल्ल्यांवर जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याकडून येणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी हे किल्ले अतिशय उपयोगी पडत असत. लढाईत पराभव होऊ लागला की माघार घेऊन एकदा किल्ल्यात शिरले की शत्रूचा पाठलाग थांबायचा आणि सैन्याचा बचाव व्हायचा. महाराष्ट्रातील काही किल्ले फारच लहान आहेत. असे किल्ले म्हणजे निव्वळ पहाऱ्यासाठी बांधलेल्या चौक्या. काही किल्ले मात्र फारच मोठे आहेत.


२. जलदुर्ग- समुद्रात असलेला किल्‍ला- समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले. ह्यातल्या काही किल्ल्यांवर होडी मधून जावे लागते. किंवा काही किल्ल्यांना समुद्राच्या ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून किंवा किंवा पाण्यातून वर आलेल्या पायरस्त्यावरून पायी पायी जाता येते. तर काही किल्ल्यांना तीन बाजूंनी पाणी आणि चौथ्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी सरळ वाट असे. अलिबाग, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा ही जलदुर्गांची उदाहरणे. समुद्रावरून येणाऱ्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळून प्रतिकार करण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे.

३. भूईकोट- जमिनीवर असलेला किल्‍ला- या किल्ल्यामध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. भुईकोट किल्ल्याचा छोटा प्रकार म्हणजे गढी. सरदारांच्या, सावकारांच्या, इनामदारांच्या आणि देशमुख-पाटलांच्या अशा गढ्या महाराष्ट्राच्या अनेक गावांत आहेत. गढ्यांना किल्ल्यांप्रमाणेच, पण कमी प्रमाणात संरक्षण असे. गढीपेक्षा लहान म्हणजे वाडा असतो. आणि महाराष्ट्र मध्ये असंख्य वाडे आहेत.

महाराष्ट्रात ह्या तीनही प्रकारचे किल्ले आढळतात. त्यामुळे महाराष्ट्रातील किल्ले प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होता. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. त्यानंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत. महाराष्ट्रातील हे सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहेत. शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले १११ आहेत. आणि महाराष्ट्रात २३६हून अधिक किल्ले आहेत.

* किल्ल्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे भाग पाहायला मिळतात. त्यातल्या काही भागांची थोडक्यात माहिती-

१. अंधारकोठड्या- अंधारकोठडी म्हणजे कैदी ठेवायची जागा.

२. अंबरखाने-अंबरखाना म्हणजे धान्याचे कोठार.

३. उष्ट्रखाना- उष्ट्रखाना म्हणजे उंटशाळा. सुतरनाला नावाच्या हलक्या तोफा वाहून नेण्यासाठी आणि सांडणीस्वारांबरोबर पत्रांच्या किंवा अन्य वस्तूंच्या थैल्या पाठवण्यासाठी उंटांची आवश्यकता भासत असे.

४. औषधीखाना- आयुर्वेदप्रवीण वैद्यांसाठी गडांवर औषधीखाना असे. या कारखान्यात भस्मे, चूर्णे, अवलेह आणि अन्य रसायने बनवली जात. पाने, फुले, मुळ्या आणि कंद यांचा संग्रह इथे ठेवला जायचा.

५. कडा- कडा म्हणजे किल्ल्यावरून खाली दरीपर्यंत पोचणाऱ्या पर्वताची उभी भिंत. ही भिंत तासून तासून गुळगुळीत केलेली असते. त्यामुळे या कड्याच्या बाजूने शत्रूचा हल्ला होण्याची अजिबात शक्यता नसते.

६. कडेलोटाची जागा- रायगडावरील टकमक टोकावरून गुन्हेगाराला कडेलोटाची शिक्षा दिली जाई. अशीच एक कडेलोटाची वैशिष्ट्यपूर्ण जागा ब्रम्हगिरी किल्ल्यावर आहे. तिला दुर्गभंडार म्हणतात.

७. कलारगा- कलारगा म्हणजे गडाभोवतालच्या खोबणी. या बेचक्यांत मुद्दाम झाडी वाढवली जात असे.

८. कुरणे- कुरणे गडाखाली असत. गडावरील गुरांसाठी रोज चारा गडाखालून येत असे. आणि पुरेसा साठा गुरांसाठी आधीच गडावर करून ठेवलेला असे.

९. कुसवे- किल्ल्याच्या आतली छोटी तटबंदी किंवा कुंपणाची भिंत.

१०. कोठी आणि जिन्नसखाना- ही जागा म्हणजे गडावरील वस्तीस लागणाऱ्या गोष्टी ठेवण्याची जागा. नेहमी नेहमी लागणाऱ्या किरकोळ वस्तू जिन्नसखान्यात आढळून येत असत.

११. खंदक- किल्ल्याभोवती खोदलेला चर म्हणजे खंदक. याच्यावर एखादा पूल असे. खंदक ओलांडून किल्ल्यावर आक्रमण करणे सोपे नसे. त्यामुळे मुद्दाम खंदक बांधला जाई. खंदकामध्ये काटेकुटे असत आणि विषारी साप सोडलेले असत.

१२. खासगी वस्तुसंग्रह- पानदाने, पिकदाण्या, गंजीफा, सोंगट्यांचे पट, रुद्राक्षांच्या माळा, दुर्बिणी, लोलक घड्याळे आदी खासगी वस्तू या कारखान्यात ठेवल्या जात.

१३. गुहा- अनेक किल्ल्यांवर किंवा त्याच्या आजूबाजूच्या डोंगरांवर गुहा आहेत.

१४. झरोके किंवा छिद्रे- किल्ल्याच्या तटाला बंदुकीचा मारा करण्यासाठी छिद्रे किंवा झरोके ठेवलेले असतात. त्यांची दिशा तिरपी खालच्या बाजूला असते. जवळजवळच्या तीन झरोक्यांतून तटाखालच्या तीन बिंदूवर रोखलेल्या तीन तीन बंदुका असत. म्हणजे तटावरील एकच माणूस तीन ठिकाणी एकाच वेळी मारा करू शकेल अशी सोय असायची. जिथे शत्रू तटाच्या अगदी जवळ पोचण्याची संभावना असते तेथे छिद्र अधिक तिरके असते.

१५. जंग्या- या तटावरील छिद्रांनाच जंग्या म्हणतात.

१६. जामदारखाना- सिंहगड, रायगड, प्रतापगड, राजगड, आणि पन्हाळा या सर्व किल्ल्यांवर मोठमोठे जामदारखाने होते. जामदारखान्यात रत्ने, हिरे, पाचू, माणके आणि सोन्याचे होन ठेवलेले असत. शिवाय रायगडावरील जामदारखान्यात शिवारायांचे दोन सिंह असलेले सिंहासन ठेवलेले होते.

१७. टांकी, तलाव, विहीर- पिण्याच्या पाण्यासाठी गडावर अनेक टांकी, विहिरी आणि एखादा तलाव असत. टांकी खडकांत खोदलेली असत. पाच मीटर लांब, दोन-चार मीटर रुंद आणि आठ दहा मीटर खोल अशी टांकी गडाच्या चहूबाजूंना असत. पावसाच्या झिरपणाऱ्या पाण्यामुळे ही टांकी भरत. क्वचित दोन टांक्या जोडलेली असत.

१८. टोक- गडावरील टोक म्हणजे सपाट भिंतीसारख्या खोल कड्याचा गडावरील सपाट माथा.

१९. ढालकाठी- ढालकाठी म्हणजे निशाण रोवण्यासाठी बांधलेला दगडी ओटा. ढालकाठी बहुधा एखाद्या बुरुजावर असे.

२०. तट- तट म्हणजे मजबूत दगडी बांधकाम करून गडाभोवती बांधलेली भिंत. किल्ल्याच्या सर्व बाजूने तट असण्याची आवश्यकता नसते. जो भाग सरळ उभ्या कड्यामुळे वर चढण्यास अशक्य आहे तेथे तट बांधला जात नाही. कधीकधी दोन कड्यांच्या मधला भागच तटबंदी बांधून सुरक्षित केलेला असतो. तट हे नितळ घडीव दगडावर दगड रचून करीत किंवा तिरकस आणि एकमेकांत गुंतलेल्या दगडांचे बनत. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या काही तटांची बांधणी चिलखती पद्धतीची आहे. म्हणजे एकात एक असे दोन तट. तटांची रुंदी तीन मीटरांपासून १० मीटरपर्यंत असते. कोणत्याही किल्ल्याच्या तटावरून एक माणूस पाच हत्यारे घेऊन सहज फिरू शके. जलदुर्गांचे तट साधारणपणे रुंद असत.

२१. तवा- देवगिरीच्या किल्ल्याला असा एक तवा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी एक खंदक लागतो, त्यावर हा तवा ठेवलेला आहे. बिजागऱ्या लावून तो उभा करता येतो. तव्यामागे आग पेटवून तो तवा लालभडक करीत. हा तवा ओलांडून शत्रू किल्ल्यात प्रवेश करू शकत नसे. अल्लाउद्दीन खिलजीने पखालींनी पाणी ओतून ओतून हा तवा थंड केला आणि देवगिरीच्या किल्ल्यात प्रवेश केला.

२२. थट्टी (पागा)- थट्टी म्हणजे गडावरील घोडे बांधायची पागा. थट्टीमध्ये घोड्यांशिवाय दुभती जनावरेसुद्धा असत.

२३. दगडी जिने- किल्ल्यावरील उंचसखल जागी जाण्यासाठी उताराचे पायरस्ते किंवा दगडी जिने असत.

२४. दरवाजे- मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आगंतुकाला किल्ल्यावर हवे तेथे मोकळे फिरता येऊ नये म्हणून किल्ल्याच्या आतील वाटांवर आणखी एकदोन दरवाजे असू शकतात.

२५. उपदरवाजे- किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ठेवलेले मुख्य प्रवेशद्वाराशी असलेला दरवाजा सोडला तर बाकीच्या दरवाज्यांना उपदरवाजे म्हणतात.

२६. दिंडी दरवाजा- मोठ्या दरवाज्याच्याच भाग असलेला हा छोटा आणि बुटका दरवाजा. या दरवाज्यातून जाताना थोडे वाकूनच जावे लागते.

२७. चोर दरवाजा- रायगडाला असा एक दरवाजा आहे. मुख्य दरवाजा शत्रूने फोडलाच तर या चोर दरवाज्यातून दोरावरून सैनिक उतरवून चोरवाटेने पळून जायची सोय केलेली आहे.

२८. दारूची कोठारे- दारूची कोठारे किल्ल्याच्या तटाच्या एका बाजूस असत. कोठाराच्या इमारतीच्या बांधकामात आणि प्रत्यक्ष इमारतीत लाकडाचा अंशही नसे. दारूच्या कोठारांत बंदुकीच्या दारूने भरलेली मडकी, बंदुकीच्या गोळ्या, तोफांचे गोळे आणि बाण साठवलेले असत. ही कोठारे गडावरील वस्तीपासून शक्य तितकी दूर असत.

२९. देवड्या- देवड्या म्हणजे बुरुजांवरील किंवा दरवाज्यांच्या दोन्ही बाजूंस असलेली पहारेकऱ्याची जागा, चौकी.

३०. देवळे, समाध्या, स्मारकशिला आणि कबरी- प्रत्येक किल्ल्यावर दोन-तीन तरी देवळे आहेत. काही किल्ल्यांवर स्मारकशिला आणि काहींवर समाध्या आहेत.

३१. धान्यकोठ्या- या दगडामध्ये खोदलेल्या असत किंवा आयत्याच बनलेल्या गुहांमध्ये किल्ल्याचा धान्यसाठी ठेवला जाई.

३२. नगारखाना- नावाप्रमाणेच या कारखान्यात नगारा, शिंग, ताशे आणि इतर वाद्ये ठेवली जात.

३३. पाऊलवाटा

३४. पायथा

३५. पीलखाना- पीलखाना म्हणजे हत्ती ठेवायची जागा.

३६. पुस्तकशाळा- क्वचित एखाद्या किल्ल्यावर पुस्तकशाळा होती. ग्रंथ बहुधा हस्तलिखित असत.

३७. पेठा (पेठ-कारखाना)- किल्यासाठी असलेल्या बाजारपेठा बहुधा किल्ल्याखाली असायच्या. त्याला काही अपवाद आहेत.

३८. प्रवेशद्वार- प्रवेशद्वार हे एकच असेल तर चांगले नाही. याकरता किल्ल्याला दोन तीन दरवाजे आणि चोरदिंड्या असत. नेहमीच्या वापरासाठी पाहिजे तितके दरवाजे आणि दिंड्या ठेवून बाकीच्या दगडमातीने चिणून बंद केलेल्या असतात. संकटप्रसंगी ते मार्ग उघडून पळून जाण्याची ही सोय असते.

३९. प्रवेशमार्ग- किल्ल्यांना बहुधा अनेक वाटांनी जाता येते. असे असले तरी किल्ल्यावर पोचण्यासाठी बऱ्याच वाटा असू नयेत, आणि केवळ एकच वाटही असू नये. एका वाटेवर शत्रू आला असताना दुसऱ्या वाटेने पळून जाता आले पाहिजे. असा किल्ला जास्त सुरक्षित असतो. देवगिरीच्या किल्ल्याला एकच प्रवेशमार्ग असल्याने अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केल्यावर रामदेवरायाला शरण जावे लागले.

४०. फरासखाना- हा कारखाना वस्त्रे ठेवण्यासाठी असे. सतरंज्या, गादी, तक्के, लोड, सिंहासन, पडदे, गालिचे वगैरे ठेवण्याची जागा.

४१. बागकारखाना- बागेसाठी लागणारे साहित्य या कारखान्यात असे. देवांच्या पूजेसाठी लागणारी फुले इथल्याच फुलझाडांची असत.

४२. बर्दारी- बर्दारी म्हणजे अनेक खिडक्या असलेली बैठकीची खोली.

४३. बालेकिल्ला- बालेकिल्ला (मूळ अरबी शब्द बाला-इ-किला) म्हणजे गडावरील सर्वात सुरक्षित जागा. किल्ला ज्या शिखरावर असेल त्या शिखरावरच्या सर्वात उंच जागी बालेकिल्ला असतो. गरज असेल तर बालेकिल्ला तटबंदीने अधिक मजबूत केलेला असतो. क्वचित एका गडावर दोन बालेकिल्ले असतात.

४४. बुरूज- बुरूज ही पहाऱ्याची जागा. बुरुजाच्या आत पहारेकऱ्याची राहण्याची सोय असे. बुरुजांवर तोफा ठेवल्या जात. तोफांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना फिरवण्यासाठी त्या लाकडी गाड्यांवर बसवलेल्या असत.

४५. भुयार- काही किल्ल्यांवर किल्ल्यातून पळून जाण्यासाठी भुयारे आहेत.

४६. माची- माची हा किल्ल्याच्या बांधणीतला अत्यंत महत्त्वाचा घटक. ज्या गडाचा सपाट विस्तार अधिक त्या गडावर माच्याही अधिक असतात. असे गड जास्त सुरक्षित असतात. माची म्हणजे गडावरील तटांनी सुरक्षित केलेली जागा. माचीवर शिबंदी असते. माची त्या त्या भागाचे संरक्षण करते.

४७. राजमंदिर- हे बहुधा बालेकिल्ल्यावर असायचे. राजमंदिरात किल्लेदार हवालदार असे खासे लोक रहत. राजे मुक्कामावर येणार असतील त्यापूर्वी मामलेदार ते सारवून धूप वगैरे घालून स्वच्छ करीत. रामचंद्रपंत अमात्यांनी राजमंदिर कधीही रिकामे ठेवू नये अशी गडकऱ्यांना ताकीद दिली होती. राजे येण्याच्या काळात राजमंदिराजवळ सदर (कार्यालय) ठेवली जाई.

४८. शिलेखाना- शिलेखाना म्हणजे चिलखते आणि शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा. या कारखान्यावर धार लावणारे शिकलगार आणि लोहार नेमलेले असत.

४९. सडा

५०. सदर- सदर म्हणजे किल्ल्याचे कागदपत्री कामकाज सांभाळणारे कार्यालय.

५१. सरपणखाना- गडावर लागणारा जळाऊ लाकूडफाटा सरपणखान्यात असे. ही लाकडे अगदी किल्ल्याजवळच्या जंगलांतून आणता कामा नयेत असे आदेश असत. किल्ल्याभोवतालची झाडे किल्ल्याच्या रक्षणासाठी आवश्यक असत.

५२. स्तंभ आणि दीपमाळा- रायगडावर एक लोहस्तंभ आहे आणि दोन अनेकमजली जयस्तंभ आहेत. शिवाय अनेक किल्ल्यांवर दीपमाळांचे स्तंभ आहेत.

५३. रथखाना- रायगड आणि राजगडसारख्या एखाद्या किल्ल्यावर रथ ठेवण्यासाठी रथखाना होता.

ही किल्ल्यांबद्दलची माहिती... महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती पुढील लेखात..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED