३०. महाराष्ट्रातील किल्ले- ५

३०. महाराष्ट्रातील किल्ले- ५

* महाराष्ट्रातले किल्ले

४. प्रतापगड-

पौराणिक व एतिहासिक वारसा लाभलेले महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील पर्यटकांच आवडत पर्यटन स्थळ आहे. आणि इथे जवळच प्रतापगड हा लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत हा किल्ला उभा आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सुमारे १३ किमी. वर आहे. शाहीर तुळशीदास यांनी म्हणल्याप्रमाणे ‘राजगड राजाचा, प्रतापगड जिजाईचा!’.. म्हणजेच राजमाता जिजाबाईंचा सर्वांत आवडता किल्ला हा प्रतापगड होय. नीरा आणि कोयना नदीच्या परिसरात मराठ्यांनी सत्ता मिळवली होती त्याच रक्षण करणे गरजेचे होते. त्यासाठी मजबूत किल्ला हवा होता. ह्यासाठीच १६५७ साले प्रतापगड बांधण्यात आला. प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी इ.स. १६५६ ते १६५८  म्हणजेच २ वर्षाचा कालावधीत लागला. प्रतापगड किल्ला हा मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली बांधला गेला. प्रतापगडचे ऐतिहासिक महत्व अफझलखान-शिवाजी भेट ह्यामुळे सर्वांच्याच ओळखीचे आहे. आणि त्या वेळी झालेला अफझलखानाचा वध या ही घटना प्रतापगडाला वेगळेच महत्व मिळवून देते. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाची लढाई आहे. आणि ही शिवाजी महाराज आणि अफजल खानची  लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक क्षण मानला जातो. इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आला. पण शिवाजी महाराजांनी आपल्या युक्तीने आणि गनिमी काव्याने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोऱ्यात आणले. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रुपात आलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले. आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून दिला. स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. इ.स. १६६१ मध्ये महाराजांनी गडावर महिषासूरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली. इ.स १६५९ ते १८१८ ह्या प्रदिर्घ कालखंडात १६८९ सालातील काही काळ वगळता हा किल्ला शत्रुला जिंकता आला नाही.

 

* प्रतापगडावर गाजलेली शिवाजी महाराज आणि अफजल खान भेट-

अफजल खान शिवाजी महाराजांवर स्वारी करण्यासाठी येणार होता. ही बातमी समजताच महाराज प्रतापगडावर आले. आणि शिवाजी महाराजांनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो आहोत असा दिखावा केला आणि आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही त्याचबरोबर, आपण समझोत्यास तयार आहोत असे कळवले. अफझल  खानाने प्रथम महाराजांना वाईस बोलवणे धाडले  पण शिवाजी महाराजांनी त्याला नकार दिला. दोन्ही बाजूंकडून हल्ल्याची शक्यता होती हे शिवाजी महाराजांनी हेरले. आणि महाराजांनी  आपण खूपच घाबरलो असल्याचे अफझल खानाला दाखवले. त्यावेळी अफझल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान असे ठरले दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही. प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील आणि त्यातील एकजण शामियान्या बाहेर थांबेल. शिवाजी महाराजांनी जाणून बूजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. इतर अंगरक्षक शामियाना पासून दूर रहातील असे ठरले. भेटीच्या दिवशी अफजलखान भेटीच्या वेळेच्या आधीच शामियान्यात हझर झाला. निःशस्त्र भेटायचे असे ठरले असतांना देखील अफझल खानने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता. पण महाराजांना खानाकडून घातपाताची शक्यता होईल असा १०० टक्के अंदाज होता त्यामुळे त्यांनी अंगरख्या खाली चिलखत चढवले होते आणि वाघनखे हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीलाच अफजल खानाने शिवाजी महाराजांना अलिंगन देण्यासाठी बोलवले आणि उंच अफजलखानाने शिवाजींना आपल्या काखेत दाबले आणि बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. अफजल खानाने दगा केलेला पाहून शिवाजींनी लपवलेली वाघनखे काढली आणि क्षणाचाही विलंब न लावता खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला आणि इतर अंगरक्षकांना सावध केले. त्यामुळे इतर अंगरक्षकांच्यात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजी महाराजांवर वार केला परंतु तो जिवा महालाने आपल्यावर घेतला. त्याचवेळी अफझल खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणार्‍या भोईंचे पाय तोडले आणि जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून वेगळे केले. शिवाजी महाराजांनी हे शीर नंतर आपल्या जिजाऊंकडे पाठवले. शिवाजींनी झपाट्याने किल्यावर प्रयाण केले आणि तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले.

 

* किल्ल्याची माहिती आणि तिथे पाहता येणाऱ्या जागा-

 

समुद्रसपाटीपासून सुमारे ३५४३ फुट उंचीवर हा किल्ला आहे. आणि प्रतापगडाच्या दोन्ही बाजूस २०० ते २५० मी खोल दरी आहे. महाबळेश्वरच्या सानिध्यात असलेला हा प्रतापगड किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. प्रतापगडाच्या अर्ध्या उंचीपर्यंत गाडी जाण्यासाठी मार्ग आहे. याचबरोबर,  किल्ल्यावर फिरण्यासाठी बनवलेल्या सिमेंटचे रूंद रस्ते सुद्धा आहेत. प्रतापगडावर खाण्याची सोय असल्यामुळे इथे पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात भेट देतात. सह्याद्री पर्वताच्या रांगेत आणि जावळीच्या खोर्‍यात घाटमाथ्यावरती प्रतापगड आहे. प्रतापगडाच्या आजुबाजुला घनदाट जंगल आहे. त्यामुळे फिरण्यासाठी ही जागा अत्यंत सुंदर आहे. प्रतापगडाच्या जवळच कडेलोट पॉईंट आहे. तेथून दोषी आरोपींना कडेलोटाची शिक्षा देण्यात येत असे. याकड्यावरुन खाली पाहिले असता डोळे फिरतात. प्रतापगडाच्या डोंगराला पूर्वी भोरप्याचा डोंगर असे म्हणत. या गडावरुन पश्चिमेला रायगड तर दक्षिणेला मकरंद गड दिसतो.

 

वाहनतळावरून गडाच्या दक्षिण दिशेला टेहळणी बुरुजाच्या खालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यापाशी जाते येते. इथले वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो आणि सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. इथून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानी मातेची प्रसन्न मूर्ती पाहायला मिळते. ही मूर्ती शिवाजी महाराजांनी नेपाळ मधल्या गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली होती. या मूर्ती शेजारीच शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग आहे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार सुद्धा इथेच आहे. ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे जायला लागल की लागल्यास उजव्या बाजूला समर्थ रामदासांनी स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती दिसते. पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ जाता येते. ह्या मंदिरात एक भव्य शिवलिंग पाहायला मिळते. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे. किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पाहिले की मोठे पर्वत दिसतात. आणि या प्रत्येक पर्वतांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे ही गोष्ट लक्षात येते.

केदारेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. त्याचबरोबर, इथेच उजवीकडे बगीचा आहे आणि ह्या बगीच्याच्या मधोमध शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजे राहायचे तो वाडा होता. या पुतळ्याशेजारी शासकीय विश्रामधाम आहे. आणि इथे असलेल्या बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने असलेल्या तटबंदी वरून फेरफटका मारताना जावळी खोर्‍याचे अतिशय सुंदर दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्या बरोबरच घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्‍याचा दिंडी दरवाजा आहे. ह्या दिंडी दरवाज्य जवळ रेडका बुरूज आहे आणि पुढे यशवंत बुरूज तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज पाहायला मिळतात.

अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी याने अफजल खानाचे शिर या बुरुजात पुरले असे इतिहासात सांगितले आहे. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. या भवानी मंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधिक उंच आहेत. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते.

 

* गडावर कसे जाल-

प्रतापगडावर जायचा मार्ग-

उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिम दिशेला प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावां मध्ये असलेल्या डोपर्‍या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे.

जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या बाजूला एक पायवाट आहे तिथे दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. आणि दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर तिथे पाहायला मिळते.

 

महाबळेश्वरला आलेला पर्यटक ह्या जागेला न चुकता भेट देतो आणि ही जागा पर्यटकांची आवडती जागा आहे. हा भाग हिरवाईने नटलेला आहे आणि इथे आल्यावर मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही.

 

 

 

 

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Mate Patil

Mate Patil 1 वर्ष पूर्वी

VaV

VaV 1 वर्ष पूर्वी

शेयर करा