लेख- रक्षाबंधन- बंधन नव्हे- स्नेहबंधन

लेख-
रक्षाबंधन -
बंधन नव्हे -स्नेहबंधन 
----------------------------------------------------------
आपल्या सांस्कृतिक जीवनास संपन्न बनवणारे आपले सणवार आणि दिन-विशेष यांचे महत्व कालातीत आहे ,या आधीच्या पिढ्यांनी या सणांना खूप
महत्व दिले ,त्याचे कारण त्या वेळच्या सामाजिक वातावरणात अशा प्रकारच्या सणवार साजरे करण्यामुळे सामंजस्य आणि सलोखा यांच्यात सुरेख 
असा समन्वय साधणे शक्य झाले .

आजच्या आधुनिक जीवन शैलीतील नव्या पिढीला आपल्या संस्कार -मुल्या संबंधी माहिती करून देण्याचे फार मोठे कार्य आजची जेष्ठ पिढीला करणे 
भाग आहे . तरच आपल्या प्राचीन आणि उच्चतम अशा सांस्कृतिक वैभवाचा वारसा आपण आपल्या नव्या पिढीला देऊ शकलो तर आपण आपले जबाबदारी 
सार्थ पणे पार पाडतो आहोत हे समाधान आपल्याला नक्कीच लाभणार आहे.

वर्षा-आगमनाने धरतीवर हिरवाई अवतरलेली असते, वातावरणात एक सुखद आणि मनाला प्रसन्न करणारे वातावरण असते , सहाजिकच समाजात 
एक स्थिर -शांत अशी मनोवस्था असते . अशात श्रावण महिना सुरु होतो ,..विविध व्रत -वैकल्ये ,देव-देवतांचे पूजन  आणि दर्शन यात जन-सामान्य रंगून 
गेलेले असतात .. या श्रावण महिन्यातला एक लोकप्रिय सण आहे- राखी- पौर्णिमा , रक्षाबंधन.

ही राखी-पौर्णिमा नारळी- पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते , आणि एखादेवेळी जर लागोपाठ दोन दिवस पौर्णिमा असेल तर , अशावेळी दुसर्या दिवशीच्या 
पौर्णिमेला राखी-पौर्णिमा , रक्षाबंधन हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. रक्षा-बंधन "हा सण..बहिण-भावाच्या पवित्र नात्याला अधिक दृढ करणारा आहे.
असे असले तरी ..या रक्षा -बंधनाच्या सणाकडे सामाजिकदृष्ट्या पाहिले तर त्याचे अनन्य साधारण असे महत्व जाणवेल.

प्रेमभावनेचे प्रतिक असलेला रक्षाबंधन या शब्दात ..मातृभूमीची रक्षा , पर्यावरणाची रक्षा ,आणि आपल्या सभोवताली असलेल्या सामन्य लोकांच्या भावनांची 
रक्षा " याचे स्मरण करून देणारा हा विधी म्हणजे सुद्धा "रक्षा-बंधन "आहे. सह-सोबत करीत राहणे ..यातून जवळीक साधली जातेच ,यातूनच परस्पराविषयी 
वाटणारा विश्वास अधिक बळकट व्हावा  या साठी रक्षाबंधन आहे. "मी तुझ्यासाठी ,तुझ्याविषयी काही चांगले आणि उपयोगी कार्य करण्यासाठी आहे ",
तुझे रक्षण केले पाहिजे ,ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली तर  एकोपा ,सलोखा ,शांतता "हे आता मोठे अवघड प्रश्न वाटतात ते सोपे होण्यास 
अशा स्वरूपाच्या सामाजिक -सामुहिक रक्षाबंधनाची खरेच खूप गरज आहे. ही आत्यंतिक गरज जाणवून देण्यासाठी हा रक्षाबंधन सण आहे. राखी बांधतो 
म्हणजे नेमके काय करतो आपण - ?
तर -एकमेकांच्या हातावर राखी,स्वरूपातला रेशीम-धागा बांधून आपण मनाने नक्कीच एकमेकांच्या जवळ येतो .ही जवळीक आपल्या मनाला मोठी आधार 
देणारी असते . यामुळे आपल्या सोबत कुणी आधार देणारा आहे" हा विश्वास आपल्या अस्थिर मनातली भीती नाहीशी करणारा आहे.

राखी- या शब्दाचा अधिक व्यापक अर्थ .."राख . म्हणजे सांभळून घेत रक्षण करणे "रक्षण करणारा  असा अर्थ असेल तर , समाजातील कर्तबागार आणि समर्थ 
व्यक्तीने याचक , दुर्बल, आजारी , वृध्द , अबला ,असहाय " अशांचे रक्षण करणे .हा पुरुष-धर्म आहे, पुरुषार्थ आहे. अशा योग्य आणि समर्थ पुरुषांकडून 
अभय मिळावे या हेतूने ब्राम्हण - पुरोहित आपापल्या यजमानांना राखी बांधून "असे स्मरण करून देत असतात  .अशा  रक्षा -बंधनाच हेतू - म्हणजे सर्वांचे रक्षण "हा 
मोठा संस्कार करणे हाच आहे.

रक्षा-बंधन -राखी-पौर्णिमा म्हणजे बहिण-भावाच्या उत्कट अशा भावनिक नात्याची आठवण करून देणारा एक भावपूर्ण असा सणाचा मंगल आणि पवित्र दिवस आहे.
राखी बांधतांना बहिणीच्या मनात आपल्या भावाविषयी वाटणारी माय आणि प्रेम तर असतेच , याच बरोबर बहिण आपल्या भावाचे क्षेम- कुशल  आणि कल्याण 
व्हावे अशी कामना मनोमन करीत असते . राखी बांधून घेणे ,राखी बांधणे  ..या दोन्ही मध्ये स्नेह भावना ,आपुलकी आणि जिव्हाळा वाढत राहो ही इच्छा आणि अपेक्षा 
व्यक्त केली जाते . रक्षा बंधन म्हणजे फक्त बहिणीने भावला राखी बांधली असे नाही, तर भावासमान असलेल्या ,बंधुभाव जपणार्या ,ज्याला मानलेला भाऊ "
असे प्रेमाने म्हटले जाते .अशा व्यक्तींना रक्षा - राखी बांधली जाते .
रक्षाबंधन - हे बंधन नव्हे तर एक स्नेहबंधन आहे " .
या सगळ्यातून आपण साधित असतो ते प्रेम आणि आपलेपणा . व्यक्ती-व्यक्ती मधले नाते अधिक स्नेहपूर्ण व्हावे हा हेतू रक्षाबंधन "नक्कीच पूर्ण करते 

सर्व वाचकांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- रक्षाबंधन -
बंधन नव्हे - स्नेहबंधन 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Verified icon

Surekha 5 महिना पूर्वी

Verified icon

Dharmik Parmar 5 महिना पूर्वी