३५. महाराष्ट्रातील किल्ले - १० Anuja Kulkarni द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

३५. महाराष्ट्रातील किल्ले - १०

३५. महाराष्ट्रातील किल्ले- १०

९. सज्जनगड-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड ही शिवशाहीची तर सज्जनगड ही अध्यात्मिक राजधानी मानली जात होती. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या या सज्जनगडाला महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्त्व असलेले दिसते. समर्थ रामदास स्वामींनी या गडावर बराच काळ घालविला आणि याच गडावर त्यांनी समाधी घेतली. समर्थ रामदास स्वामी यांनी जिथे समाधी घेतली तो सज्जनगड किल्ला सातारा शहरापासून अवघ्या ९ कि.मी. अंतरावर आहे. या किल्ल्याला ७५० पायऱ्या आहेत. तसेच याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ३००० फुट आहे. या किल्ल्यावरती २ तलाव आहेत. समर्थ रामदास स्वामी यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई लढली. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरु होते. दास नवमी दिवशी असंख्य भाविक इथे जमतात आणि दास नवमीचा उत्सव साजरा करतात. इ.स. १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड ताब्यात घेतला होता. पूर्वी या गडाचे नाव परळी असे होते. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे परळीचे नाव सज्जनगड झाले. ३३५० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातला आहे.

आश्वलायन कृषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्वलायनगड असे सुद्धा ह्या गडाला म्हणाले जाते. त्याचबरोबर, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड आणि नवरसतारा अशीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत. परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधीव तटबंदीने प्रवेश करणे अवघड आहे.

* गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे -

सज्जनगड - सज्जनगड सातारा शहराच्या पश्चिम दिशेला दहा किलोमीटरवर अंतरावर आहे.

सज्जनगड विशेष प्रसिद्ध आहे तो रामदास स्वामींमुळे. रामदास स्वामींनी सज्जनगडावर वास्तव्य केले होते आणि समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हा गड चढण्यासाठी अगदी सोप्पा आहे. गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अर्ध्या वाटेवर शिष्य कल्याण स्वामी यांचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे आणि दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर पाहायला मिळते. किल्ल्याचा दरवाजात श्रीधर स्वामी यांनी स्थापित केलेल्या मारुती आणि याचबरोबर, वराहाच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजा जवळ अंगलाई देवीचे मंदिर पाहायला मिळते. इथेच, अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात समर्थ रामदास स्वामींना रामाची मूर्ती सापडली होती. रामाच्या मूर्ती बरोबर, अंगलाईची मूर्ती सुद्धा सापडली होती. अंगलाईचे देवीचे मंदिर समर्थांनी बांधले. शके १६०३ माघ नवमी सन १६८२ रोजी रामदास स्वामींनी समाधी घेतली. म्हणून या तिथीला दासनवमी म्हणाले जाते. समर्थांच्या समाधीवर रामाची मूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले. राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक आणि हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती पाहायला मिळतात. जवळच समर्थांची धातूची मूर्ती सुद्धा आहे. तिथे असलेल्या भुयारात समर्थांचे समाधिस्थान पाहायला मिळते. आणि समाधी च्या मागे असलेल्या कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका पाहायला मिळतात. मंदिराच्या बाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे. दुसऱ्या कोपऱ्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन पाहायला मिळते. मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक वृंदावन पाहायला मिळते हे वृंदावन शिष्या आक्काबाई हिचे आहे. माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी साजरी करतात.

गडावर शिरतांना आग्नेय दिशेस लागणाऱ्या पहिल्या द्वारा ला 'छत्रपती शिवाजी महाराजद्वार' असे म्हणले जाते.

इथे असलेला दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख आहे आणि ह्या दरवाज्याला 'समर्थद्वार' असेही म्हणले जाते.

पूर्वी पासून चालत आल्याप्रमाणे, आजही हे दरवाजे रात्री नऊ नंतर बंद होतात. समर्थ प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर भिंतीवरील पर्शियन शिलालेख पाहायला मिळतो. शिलालेख ५६ सेंमी x ४१ सेंमी आकाराचा असून उठावाच्या पद्धतीने कोरलेला शिलालेख पाहायला मिळतो.

ह्या शिलालेखावरील फार्सी वाचन पुढीलप्रमाणे आहे-

दौलत झ दरत हमहरा रूए नुमायद
हिम्मत झ कार ऊ हमह नुव्वार कुशायद
तू कब्लह व मर हाजतमन्द हाजती
हाजत हमह अझ दर कब्लह बर आयद
बिनाए दरवाज इमारत किलआ परेली आमिर शुद बतारीख ३
दर जमादी उल आखिर कार कर्द रेहान आदिलशाही

ह्याचा मराठी अर्थ पुढीलप्रमाणे आहे:

१. ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे.

२. हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे.

३. तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहेस.

४. तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात.

५. परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाज्याचा पाया ३ जनादिलाखर या तारखेस तयार झाला. आदिलशहा रेहान याने काम केले.

इथे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळल्यावर समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशीदवजा इमारत पाहायला मिळते. तर समोरच आंगलाई देवीचे मंदिर दृष्टीस पडते. ही देवी रामदास स्वामींना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली.

गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर. समर्थ रामदासांच्या निर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक आणि त्यावर श्रीरामाचे मंदिर उभारले गेले.

मंदिराला लागुनच वेणाबाईचे वृंदावन, अशोकवन, ओवऱ्या, अक्काबाइचे वृंदावन आणि समर्थांचा मठ ह्या वास्तु पाहायला मिळतात. जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजघर नावाची एक खोली पाहायला मिळते. या मठात असलेल्या शेजघराचे रुपांतर आता संग्रहालयात करण्यात आले आहे. ह्या शेजघरात पितळी खुरांचा पलंग आहे. या पलंगावर तंजावर मठाचे मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र पाहायला मिळते. पलंगाशेजारी एक स्टॅंड आहे. ह्या स्टॅंडमध्ये एक कुबडी, गुप्ती, वेताची काठी आणि सोटा ठेवलेला पाहायला मिळतो. कुबडी श्रीदत्तात्रयांनी दिलेली समर्थांना दिली आणि गुप्तीत फिरंगी तलवार असून ही तलवार छत्रपती शिवाजीमहाराजांनी ३६० होनांना विकत घेतलेली आहे असे सांगितले जाते. या गुप्तीमध्ये एक मोठी धारदार तलवार आहे. इथे लाकडी सोटा सुद्धा पाहायला मिळतो. लाकडी सोटा हिमालय परिभ्रमणाच्या वेळी एका सिद्धी पुरुषाने (बहुधा मच्छिंद्रनाथयांनी) समर्थांना दिला अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. इथे असलेल्या स्टॅंडच्या शेजारी दोन मोठे तांब्याचे हंडे पाहायला मिळतात. या हंड्यांच्या कावडीतून कल्याण स्वामी उरमोडी नदीचे पाणी समर्थांना आणून देत असत असे सांगितले जाते. येथेच समर्थांच्या नित्य वापरातील पाणी पिण्याचा लोटा, पीकदाणी आणि विड्याच्या पानांचा डबा ठेवलेला पाहायला मिळतो. मारुतीने समर्थांना प्रसाद म्हणून दिलेला हुर्मुजी रंगाचा फेटा आणि हिमालयातील थंडीचा त्रास होऊ नये म्हणून मारुतीने दिलेली वल्कलेही येथे ठेवलेली बघायला मिळतात. शेजघरात अग्निकुंड व प्रतापमारुतीची पितळी मूर्तीसुध्दा आहे. येथे असलेल्या मातीच्या सिंहासनावर मुख्य मंदिरातील श्रीराम मूर्ती सुरुवातीला त्यावर ठेवल्या होत्या. समर्थांचे देहावसनही याच मठात झाले होते.

मंदिर आणि मठ यां दोघांच्या मध्ये असलेल्या पश्चिम दिशेच्या दरवाज्याने बाहेर पडल्यावर काही अंतरावर असलेले मारुती मंदिर नजरेस पडते. हे मंदिर आहे किल्ल्याच्या पश्चिम टोकाला असलेल्या बुरूजाजवळ आहे. या मारुतीला धाब्याचा मारुती असे म्हणाले जाते. तटाच्या रक्षणासाठी या मारुतीची स्थापना रामदास स्वामी यांनी केलेली आहे. मूळ छोटेखानी मंदिराच्या सभोवती नवीन सुंदर आणि प्रशस्त मंदिर, फरसबंदी आणि मंदिराच्या बाहेर विश्रांतीसाठी कट्टे बांधलेले आहेत. इथे आल्यावर मन:शांती मिळते. आणि ह्या जागी एकांत मिळतो. रामनामात तल्लीन होण्यासाठी ही जागा अतिशय सुंदर आहे.

धाब्याच्या मारुतीचे दर्शन घेतले की समाधी मंदिराच्या इथे परत येत असताना साधारणपणे मध्यावर तटाच्या कडेजवळ ब्रह्मपिसा हे स्थान आहे. येथे असलेल्या ओट्यावर हनुमानाची मूर्ती आहे. हे ठिकाण कल्याण स्वामींशी निगडीत आहे.

गडाच्या उत्तर दिशेला बाटेवरच गायमारुती आणि कल्याण स्वामी मंदिर पाहायला मिळते. गायमारुती देवळाच्या जवळून कड्याच्या कडेने एक पायवाट आहे. तिथून साधारणत: १०० मीटर अंतरावर एक गुहा आहे. त्याला रामघळ असे म्हणले जाते.

सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे. कुस गावापासून जवळच मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय़ पाहायला मिळते.

सज्जनगडावर दासनवमी, रामनवमी, हनुमानजयंती, गुरुपोर्णिमा, श्रीवेणाबाई पुण्यतिथी, अक्काबाई पुण्यतिथी, गणेशोत्सव, विजयादशमी, श्रीधरस्वामी पुण्यतिथी हे दिवस साजरे केले जातात. सज्जनगडावर भक्तांसाठी निवासाची व्यवस्था आणि प्रसादाच्या भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे. पण त्याचबरोबर, इथे अनेक उपहारगृहेसुध्दा आहेत. सज्जनगडाचे दरवाजे रात्री बंद करून पहाटे पुन्हा उघडले जातात.

* सज्जनगडावर जाण्याच्या वाटा-

गडावर जाण्यासाठी दोन मार्गांचे पर्याय आहेत. त्यांपैकी एक गाडीमार्ग आहे.

परळीपासून कसे जाता येईल- सातारा ते परळी अंतर १० कि.मी. चे आहे. परळी पासून सज्जनगडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण ७८० पायऱ्या चढल्यानंतर सज्जनगडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरेसा ठरू शकतो

गजवाडी पासून कसे जाता येईल- सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे ३ कि.मी. अंतरावर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे गेल्यावर १०० पायऱ्या चढल्या नंतर सज्जनगडाचा दरवाजा लागतो. रस्त्यापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे पुरेशी ठरतात.

समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या १९ मारुतींपैकी २ मंदिरे इथे पाहायला मिळतात. आणि इथे हजारो भाविक भेट देतात. रामदास पंथाचे महाराष्ट्रातील हे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. अतिशय सुंदर ठिकाण सज्जनगडाला एकदा तरी भेट दिली पाहिजे.