Ramacha shela..- 12 books and stories free download online pdf in Marathi

रामाचा शेला.. - 12

रामाचा शेला..

पांडुरंग सदाशिव साने

१२. भेट

वर्णाश्रम-स्वराज्य-संघांची ती प्रांतिक परिषद सकाळी समाप्त झाली. त्या परिषदेतील गोष्टी सर्व शहरभर गेल्या. घरोघर त्यांची चर्चा चालली होती. घाटांवर, बाजारात, शाळांतून, कोर्टकचेरीतून एकच विषय बोलला जात होता. सनातनींच्या परिषदेची अशी फलश्रुती झाली. तिकडे अस्पृश्यांच्या परिषदेची काय होणार?

आज रात्री त्यांची परिषद होती. त्या परिषदेत एक स्वामीही बोलणार होते. कोणते ते स्वामी? त्यांचे नाव सेवकराम असे होते. सेवकराम बोलणार, सेवकराम बोलणार असे शहरभर झाले. कोण हे सेवकराम? कोणाला माहीत नव्हते. कोणी मोठे साधू असावेत असा अनेकांनी तर्क केला. सेवकरामांना पाहण्यासाठी, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी, शहरातील स्पृश्य मंडळीही बरीच जाणार होती.

“शेटजी, मी जाऊ का अस्पृश्य बंधूंच्या सभेला? त्यांचा सत्याग्रह होणार असेल तर त्यात आपणही भाग घ्यावा असे मला वाटत आहे. निदान त्यांचे विचार तरी ऐकून यावे असे सारखे मनात येत आहे. जाऊ का?”

“सरलाताई, संकटातून नुकतीच तू मुक्त झाली. पुन्हा नको एकटी जाऊस. कदाचित गुंड टपलेले असतील. तुला पुन्हा पकडतील. उचलून नेतील.”

“मग तुम्ही या माझ्याबरोबर. याल का? तुमच्या जीवनात क्रांती ना झाली आहे? मग चला अस्पृश्य बंधूंकडे. त्यांना किती आनंद होईल ! ते तुमचे स्वागत करतील. येता?”

“तू माझी गुरू आहेस. सरले, आज तू किती सुंदर बोललीस ! जणू तुझ्याद्वारा प्रभूच बोलत होता. कोठून आणलेस हे विचार? कोणी शिकविले?”

“शेटजी, मी महिला महाविद्यालयात शिकत असताना कधी कधी ग्रंथालयात वाचीत बसत असे. रामतीर्थ, विवेकानंद यांची पुस्तके मला आवडत. पुढे उदय भेटला. त्याच्या प्रेमात रंगून गेल्ये. उदयचे प्रेम पुरे, बाकी काही नको असे वाटे. परंतु ते वाचलेले मेले नव्हते. उदयवर केलेल्या प्रेमाने ते वाचलेलेही जणू जीवनात मुरले, अंकुरले. प्रेम जीवनाला ओलावा देते. आणि त्या ओल्या मनोभूमीत वाचलेले वा ऐकलेले विचार अंकुरतात, मोठे होतात. शेटजी, माझा उदय भेटेल का हो? कसे पहाटे सुंदर स्वप्न पडले होते !”

“सरले, तू येणार ना आमच्याकडे. आमच्याकडच्या मुलामुलींना शिकव. आमच्या घरातील देवता हो.”

“परंतु उदय आला तर?”

“तुम्ही दोघे राहा.”

“शेटजी, कोठे तरी सेवा करावी असे वाटते.”

“तिकडे ठाणे जिल्हयात एक सुंदर संस्था निघाली आहे. आदिवासी-सेवा-संघ. ठाणे जिल्हयात कातकरी वगैरे लोक आहेत. वारली लोक आहेत. वास्तविक तेच मूळचे तेथले राहणारे. परंतु आज ते केवळ गुलाम आहेत. ठिकठिकाणी जमीनदार आहेत. पारशी जमीनदार, ब्राह्मण जमीनदार, गुजराथी जमीनदार. या गरिबांची दशा फार वाईट आहे. त्यांना थोडे पैसे कर्जाऊ देतात. आणि त्यांचे व्याज कधीच फिटत नाही. जंगलातले गवत कापणे, लाकडे तोडणे, कोळसे तयार करणे, सारी कष्टाची कामे ते करतात. परंतु पोटभर खायला नाही. अंगावर नीट वस्त्र नाही. त्यांनी जरा हालचाल केली तर त्यांना धमक्या देतात. मेले तरी त्यांची दादफिर्याद कोणी घेत नाही. अन्याय, जुलूम, दारिद्रय कोण दूर करणार? मागे ३० साली सत्याग्रह चळवळ झाली, तर ठाणे जिल्हयातील पारशी वगैरे जमीनदार म्हणायचे, “आम्ही चळवळीस पैसा देतो. परंतु त्या वारली वगैरे लोकांत नका प्रचार करू. त्यांच्यात नका जाऊ. ते केवळ रानटी आहेत.” त्या गरिबांत विचार जाऊ नयेत म्हणून भांडवलवाले, जमीनदार, सावकार सारे खटपट करीत असतात. परंतु या श्रमणार्‍यांची संघटना केली पाहिजे. त्यांच्यात गेले पाहिजे. सेवेच्या साधनाने गेले पाहिजे. त्यांना उद्योग दिला पाहिजे. खादीचा, किंवा दुसरा कसला तरी. त्यांना स्वावलंबी केले पाहिजे. साक्षर केले पाहिजे. निर्भय केले पाहिजे. यापुढे माणसांसारखे जगायला त्यांनी उभे राहिले पाहिजे. परंतु सेवक हवेत. हुशार, त्यागी कार्यकर्ते हवेत. मागे ती संस्था पाहायला मी गेलो होतो. परंतु अद्याप बाल्यावस्थेत ती आहे. दहा-वीस निष्ठेची माणसे मिळाली तर काम होईल. तुझा उदय आला तर तू त्याला घेऊन त्या संस्थेत जा. मिशनरीप्रमाणे सेवा करा. मी आर्थिक मदत करीन. आता अशा सेवेच्या कामाला मदत देणे हाच धर्म. तुझ्या रामाच्या शेल्याने मला हे शिकविले.”

“रामाचा शेला काय काय तरी शिकवील. भिकारी जिणे श्रीमंत करील. रडके जिणे हसवील. जीवनाच्या चिंध्यांना भरजरी पीतांबराची शोभा देईल. नाही का? उदय आला तर खरेच आम्ही असे सेवक होऊ. परंतु भेटेल का उदय? येईल का? आणि शेटजी, हे सेवकराम कोण आहेत? स्वामी सेवकराम-तुम्ही पाहिले आहे त्यांना?”

“मी त्यांना पाहिले नाही. नावही ऐकले नव्हते. कदाचित आर्यसमाजी असतील. उत्तरेकडचे आर्यसमाज खूप सेवा करीत आहेत. अस्पृश्यता ते मानीत नाहीत. हुतात्मा श्रध्दानंत अस्पृश्यांसाठी वर्तमानपत्र चालवीत. हे स्वामी सेवकराम असेच कोणी असतील. येथील सत्याग्रहासाठी आले असतील.”

“आपण त्यांना पाहू. आर्यसमाजाने गुरूकुले चालविली आहेत. मुलांसाठी, मुलींसाठी. आपणांकडे अशा संस्था नाहीत. स्त्रियांसाठीही संस्था हव्यात. अनाथांना आश्रम देणार्‍या; त्यांना तेथे आश्रय देऊन स्वावलंबी बनविणार्‍या. मनात किती विचार येतात, किती कल्पना येतात.”

“परंतु एक काही तरी निश्चित करावे आणि त्यासाठी सारे आयुष्य द्यावे. मर्यादित क्षेत्र हाती घेऊन तेथे सर्व शक्ती ओतावी म्हणजे थोडेफार तरी करता येते. समाधानही मिळते.”

“मग आज रात्री जायचे ना?”

“तू म्हणत असशील तर जाऊ. परंतु मला थकल्यासारखे वाटत आहे.”

“तुमच्या मनावर कालपासून खूप ताण पडला आहे. होय ना?”

“होय. नवे जीवन जणू मिळत आहे. जुनी कात टाकताना अशाच वेदना होतात.”

“परंतु मला तर अपार सामर्थ्य वाटत आहे. अगदी हलके वाटत आहे. जणू मला पंख फुटले आहेत. किती दिवसांत असा अनुभव नव्हता.”

“कारण तू बंधनात होतीस. अति संकटात होतीस.”

“आणि तुम्ही सोडवलेत. तुमचे उपकार.”

“तू मलाही सोडवलेस जुन्या विचारांच्या तुरुंगातून, जुन्या रूढींच्या शृंखलातून मलाही तू मुक्त केलेस. मलाही आज अपार आनंद झाला पाहिजे. होत आहे. परंतु जरा उदासीनताही आहे.”

“मी एकटीच जाऊ?”

“मोटारीतून जा. म्हणजे रस्त्यात कोणी गुंड भेटणार नाहीत.”

“बरे तर. तुम्ही विश्रांती घ्या. मी एकटीच जाईन. बरोबर हा रामाचा शेला आहेच. कोणी तरी म्हटले आहे :

‘निर्बल के बल राम’

ते खरे आहे. माझ्यासारख्या अबलेत केवढे बळ या शेल्याने निर्मिले आहे !”

असे म्हणून सरला उठून गेली. ती थोडा वेळ बगिच्यात हिंडत होती. आज शेटजी फिरायला गेले नाहीत. तेही बगिच्यातील एका बाकावर एकटेच बसले होते. कारंजे थुईथुई उडत होते. कोठून तरी उंचावरून पाणी आल्याशिवाय कारंजे उडत नाही. त्याप्रमाणे हृदयाचे कारंजेही उच्च भावनांचे, उदात्त विचारांचे पाणी जोराने आले तरच उडते. सरलेच्या हृदयाचे कारंजे का उडत होते? ती त्या कारंज्याजवळ उभी होती. तिचे मन जणू थुईथुई नाचत होते. तिने एक सुंदर गुलाबाचे फूल तोडले व शेटजींना नेऊन दिले.

“तुझ्या केसांत घाल बेटी.”

“उदय आला म्हणजे तो घालील. तोवर नको. माझे हृदय नाचत आहे, उदय येईल असे म्हणत आहे.” असे म्हणून

‘हासवि नाचवि हृदयाला’

हे गाणे ती गुणगुणू लागली. आणि गुणगुणत निघून गेली.

शेटजी व सरला इकडे बगिच्यात आहेत. परंतु तिकडे शहराबाहेर नदीकाठी कोण बसले? दाढी वाढलेली आहे. केस वाढलेले आहेत. अंगात लांब, स्वच्छ असा पायघोळ झगा आहे. कोण हे गृहस्थ? एकटेच आहेत. गोदावरी प्रसन्नपणे वाहात आहे. मंद मंद वाहात आहे. सूर्यास्त झाला. आणि आकाश शतरंगांनी भरून गेले. प्रथम केवळ लाल लाल होते. परंतु हळूहळू कितीतरी रंगांच्या छटा तिथे दिसू लागल्या !

“स्वामी, चलायचे ना परत?” एक मुलगा येऊन म्हणाला.

“तू का बोलवायला आलास?”

“हो.”

“तू जा. मी येईन. सभेच्या वेळेपर्यंत येईन. मला खायचे नाहीच. येथे आनंद वाटत आहे. तू जा. मी चुकणार नाही. गोदावरीचा तो डोह येथेच पलीकडे आहे. अरे, नाशिक शहरात मी लहानपणी होतो. हिच्या पुरात पोहलो आहे. हे शहर मला सारे माहीत आहे. ही गोदावरी ओळखीची आहे. तू जा. या गंगामातेजवळ बोलू दे.” तो मुलगा गेला. अस्पृश्यांच्या छावणीतून तो आला होता. तो स्वयंसेवक होता. स्वामींची विचारपूस करावयाला मुद्दाम आला होता. तो गेला. आणि स्वामी तेथे हिंडू लागले. गंगेचे थोडे पाणी प्यायले. त्यांच्या मनात नाना प्रकारचे विचार येत होते. हे नाशिक पवित्र शहर; येथे राम, सीता, लक्ष्मण किती वर्षे राहिली ! प्रभू रामचंद्र येथे हिंडले असतील. सीतामाई हिंडली असेल. तो बंधुप्रेमाचा पुतळा लक्ष्मण फळे गोळा करीत हिंडला असेल. हा सारा प्रदेश पवित्र आहे. येथील अणुरेणू पवित्र आहे. हे भूमाते, तुला वंदन करू दे, तुझ्या धूलिकणांत लोळू दे. असे जणू ते स्वामी मनात म्हणत होते. आणि मनातले विचार ओठांवर आले. ते कविता म्हणू लागले :

“तुझ्या धूळिमाजी वाटे लोळणे सुखाचे
इथे पाय पावन फिरले राम-जानकीचे”

आणि खरेच ते खाली वाकले. तेथील धूळ त्यांनी कपाळाला लावली. आणि पुन्हा तीरावर मांडी घालून ते बसले. मध्येच ते डोळे मिटीत. मध्येच ते डोळे उघडीत. डोळे उघडून समोरचे गंभीर सौंदर्य बघत आणि डोळे मिटून आंतरिक सौंदर्य बघत.

हळूहळू तो सुंदर प्रकाश संपला. रात्र झाली. तारे चमकू लागले. आणि स्वामींनी शहराकडे पाय वळविले. थंडगार वारा येत होता. स्वामींच्या केसांशी खेळत होता. ते गंभीर होते, मधूनमधून त्यांच्या तोंडावर खिन्नताही थोडी येई. परंतु पुन्हा ते गाणे गुणगुणू लागत. कोणते होते गाणे? ते नीट स्पष्ट ऐकू येत नव्हते. पण हा पाहा चरण ऐकू आला :

“असार पसारा
शून्य संसार सारा
प्रभूराजा, जिवाचा प्रभू राजा”

“प्रभू राजा, जिवाचा प्रभुराजा”, एवढेच ते घोळघोळून पुन:पुन्हा म्हणत होते. ईश्वराशिवाय बाकी सारे फोल, मिथ्या असे का त्यांना वाटत होते? याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की देवाला जे जे आवडेल ते ते करणे म्हणजे सत्यता. बाकी सारे मिथ्या. फोलकट, पसारा. परंतु देवाला अमूक आवडेल असे कोणी सांगावे? जो तो देवाची साक्ष काढीत असतो. येथे स्वत:चा प्रामाणिकपणा, याहून दुसरा कोणता पुरावा? आपले मन आपणास खात नसले म्हणजे झाले. ज्या कारणाने मनाला रूखरुख लागणार नाही ते करावे.

हरिजनांच्या वस्तीत आज अपार उत्साह आहे. बायका, पुरूष, मुले सर्वांची गर्दी सभेच्या ठिकाणी जात आहे. स्वयंसेवकांसाठी शिबिर आहे. तेथे पुढारी आलेले आहेत. चर्चा चालल्या आहेत. कोणी म्हणतात की सत्याग्रह पुढच्या वर्षी करावा. या वर्षी तितका प्रचार झाला नाही. काहींचे मत पडले की, “झाला आहे तेवढा प्रचार पुरे. आता सत्याग्रह न करू तर औदासीन्य येईल. हे भ्याले असे घमेंडखोर सनातनी म्हणतील. आरंभ करावा. काही लोक तुरुंगात जाऊ देत.” अद्याप निश्चित काही ठरत नव्हते.

आज रात्री सभा होती. प्रचाराची सभा. सत्याग्रह करायचा की नाही याचा निर्णय या सभेत नव्हता व्हायचा. त्याचा निर्णय एका समितीकडे सोपविला होता. एक मोठे पुढारी अद्यापि यावयाचे होते. शेवटी त्यांनी शेवटचा निकाल द्यावा असे समितीतील काहींचे म्हणणे होते. ते पुढारी आज रात्री यायचे होते. तोपर्यंत ही प्रचारसभा होती.

सभेच्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमली होती. पोवाडे, गाणी सुरू झाली. स्वयंसेवक व्यवस्था ठेवीत होते. अस्पृश्य बंधूंतील ती जागृती पाहून कोणाला आनंद वाटणार नाही? अन्यायाच्या विरूध्द जे जे उभे राहतील ते ते धन्य होत. मागासलेले हे हरिजनबंधू ! परंतु त्यांच्यात शिस्त येत होती. स्वाभिमानाची ज्योत पेटू लागली होती. आत्मविश्वास येत होता. संघटना होत होती. सुंदर दृश्य ! स्फूर्तिदायक दृश्य !

ते पाहा लहानमोठे पुढारी आले. आबासाहेब अध्यक्ष निवडण्यात आले. सभेला सुरूवात झाली. आबासाहेब म्हणाले :

“बंधू-भगिनींनो,

आज आपल्यापैकी कोणाची भाषणे होणार नाहीत. सत्याग्रह या वर्षी करायचा की पुढील वर्षी याचा निर्णय आज रात्री समिती घेईल. आपले थोर पुढारी आज येतील. ते येईपर्यंत ही सभा चालेल. आजचे मुख्य वक्ते स्वामी सेवकराम हे आहेत. ते एक त्यागी सेवापरायण तरूण आहेत. शिकलेले आहेत. परंतु संसारात न पडता त्यांनी जनसेवेस वाहून घेतले आहे. जेथे जेथे अन्यायाविरुध्द लढा असेल तेथे तेथे जायचे असे त्यांनी ठरविले आहे. आपल्या सत्याग्रहाची वार्ता ऐकून त्यात सामील होण्यासाठी ते येथे आले आहेत. त्यांचे काही विचार तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी आशा आहे.”

आणि सेवकराम उभे राहिले. त्यांची उंच व सुंदर मूर्ती पाहून सर्वांना आनंद झाला. त्यांच्या चेहर्‍यावर ती दाढी खुलून दिसत होती. तो लांब झगा आणि ते सुंदर डोळे ! सारी सभा तटस्थ होती. इतक्यात मोटारीचा आवाज झाला. पुढारी आले की काय? स्वयंसेवक धावले. परंतु पुढारी नव्हती. सरला आली होती.

“तुम्ही तिकडे सभेत येता?” स्वयंसेवकाने विचारले.

“मला बरे नाही. येथे मोटारीतच मी बसून ऐकते. स्वामी सेवकरामांचे भाषण ऐकायला मी आल्ये आहे.”

“ठीक.”
स्वयंसेवक गेले. अध्यक्षांना वार्ता देण्यात आली. स्वामींचे भाषण सुरू झाले.

“माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो,

तुम्हांला पाहून मला किती आनंद होत आहे ! ज्यांनी तुमच्यावर शेकडो वर्षे अन्याय केले, त्यांच्यापैकी मी एक आहे. तुमच्यावर होणार्‍या अन्यायाला सीमा नाही. तुमचे दारिद्रय अपरंपार आहे. तुम्हांला जमीन नाही, नीट धंदा नाही, आणि स्वाभिमानाचे स्थान नाही. आम्ही तुम्हांला जणू दास्यात ठेवले. आणि आम्हीही दास झालो.

“तुही आज जागृत झाला आहात. “जो जागत है वो पावत है.” तुमचा उध्दार आता जवळ आला आहे. आपले नागरिकत्वाचे हक्क जिंकून घेण्यासाठी तुम्ही सत्याग्रहाचे शस्त्र हाती घेत आहात. फार सुंदर आहे ही गोष्ट. तुमच्या सत्याग्रहात सामील होण्यासाठी मी आलो आहे. तुमच्याबरोबर मलाही घ्या, मला स्पृश्य नका समजू. अस्पृश्यच समजा. तुमच्यातील एक समजा.

“बंधूंनो, तुही राममंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करणार आहात. ठीक आहे. परंतु मला आपले कधी कधी वाटते की मंदिरात शिरण्यासाठी कशाला धडपड? काय आहे त्या मंदिरात? तेथे आज देव नाही. तेथे पावित्र्य नाही, क्षेत्रस्थानातील मंदिरे म्हणजे घाण वाटते. तेथे दंभ, व्यभिचार यांचे साम्राज्य आहे. या मंदिरांतून देव नाही. कशाला तेथे जाता? तुम्ही याहून थोर धर्म घ्या. मंदिरातील मूर्ती म्हणजे एक खूण आहे. ईश्वराची एरव्ही कल्पना करता येत नाही म्हणून ती मूर्ती आपण स्थापीत असतो. परंतु परमेश्वराने स्वत:च्या अनंत मूर्ती निर्मिल्या आहेत. हे पाहा आकाशातील अनंत तारे ! हे तारे म्हणजे प्रभूच्या मूर्तीच आहेत. अंधारात चमकणारे, शांत, सुंदर तारे ! नियमितपणे उगवणारे, मावळणारे तारे ! आणि सुंदर चंद्र व तेजस्वी सूर्य म्हणजे प्रभूच्याच मूर्ती नाहीत का? आणि हे वडाचे प्रचंड झाड म्हणजे प्रभूचीच मूर्ती नाही का? हिरवी हिरवी झाडे पाहिली म्हणजे किती आनंद होतो ! या हिरव्या झाडांखाली कोणीही यावे. अस्पृश्याने यावे, हिंदूने यावे, मुसलमानाने यावे. पशुपक्षी, कोणीही यावे. आणि त्यांची फुले, फळे कोणीही घ्यावी. झाडे म्हणजे प्रभूची हिरवी मंदिरे असे मला वाटते. या हिरव्या मंदिरांत दंभ नाही. पैशांनी येणारी व्यसने नाहीत. श्रेष्ठ-कनिष्ठपणाचे खोटे भेद नाहीत. आणि तुमची ही गोदावरी? देवाची झुळझूळ वाहणारी ही करूणा ! ही परमेश्वराची खूण नाही का? जिकडे पहाल तिकडे प्रभूच्या मूर्ती ! आणि तुम्ही-आम्ही? आपण प्रेमाने एकमेकांस पाहतो, प्रणाम करतो, तेव्हा आपण देवच जणू असतो. आपल्या हृदयात तेव्हा प्रभू असतो. आपण जणू त्याचे मंदिर बनतो.

“बंधूंनो, कशाला त्या चार भिंतीच्या संकुचित मंदिरात जाता? हे पाहा विश्वमंदिर ! या विशाल आकाशाच्या खाली कोठेही बसावे, क्षणभर डोळे मिटावे आणि त्या जगच्चालकाला प्रणाम करावा. उत्साहित होऊन पुन्हा आपल्या कामाला लागावे. रामतीर्थ म्हणत असत, “मला जेव्हा थकवा वाटते, उदासीनपणा वाटतो, तेव्हा मी खोलीच्या बाहेर पडतो. मैदानात फिरायला जातो. मोकळा वारा अंगाला लागतो. विशाल अपार सृष्टीचे दर्शन होते. आणि पुन्हा मी ताजातवाना होतो.” हा उत्साह कोठून येतो? सृष्टीच्या स्पर्शाने ही स्फूर्ती येते. सृष्टी म्हणजेच प्रभूचे रूप. साधी फुले पाहा. किती गोड दिसतात ! एक मोठा कवी होऊन गेला. तो एके दिवशी सारखा विचार करीत होता. त्याचे एक मन म्हणे, “या जीवनात अर्थ नाही. कशाला जगतोस ! या जगात किती रोग, किती दु:खे ! आणि या जगाचे स्वरूप तरी कोणाला समजले आहे का? प्राणी कोठून येतो, कोठे जातो? सा-या आशा-आकांक्षांची एक दिवस चिमूटभर राख होते. तुम्हाला प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे खंडित रती. तुम्ही शोध लावता. त्यांचा मोठा गर्व मानता. परंतु किती अज्ञात विश्व पडले आहे. फुकट आहेत तुमचे खटाटोप. मालव तुझा दिवा. मरून जा.” त्याचे दुसरे मन म्हणते, “नको रे मरू. पाहा सृष्टी किती सुंदर आहे ! सृष्टीत विकास आहे. अरे, शेकडो, हजारो स्थित्यंतरांतून तू मनुष्यप्राण जन्मलास. प्रथम पशूसारखा तू होतास. पुढे सुधारणा केलीस. शेतीभाती केलीस. घरदार करून राहू लागलास. कुटुंबपध्दती आणलीस. आई-बाप, बहीण-भाऊ, पति-पत्नी अशी सुंदर नाती निर्माण केलीत. नीती निर्मिलीस. शास्त्रे शोधलीस. रस्ते बांधलेस. पूल बांधलेस. गलबते बांधलीस. ग्रंथ निर्मिलेस. छापखाने आले. आपले अनुभव पुस्तकरूपाने सर्वत्र जाऊ लागले. मानव चांगला होत आहे. अद्याप भांडणे आहेत. लढाया आहेत. द्वेषमत्सर आहेत. स्वार्थ आहे. दास्य आहे. पिळवणूक आहे. तरीपण मनुष्य सुधारत आहे. मानवांत अशी थोर माणसे झाली. दुसर्‍यासाठी झिजणारी. जगासाठी सुखावर निखारे ठेवणारे भगवान येशू ख्रिस्त ! सर्वांना समानता शिकविणारे ते भगवान महंमद पैगंबर ! थोर थोर माणसे. जगाला ज्ञान देताना विषाचा पेला पिणारे ते सॉक्रेटिस ! जगात शास्त्रीय ज्ञान यावे म्हणून हुतात्मे होणारे ते शास्त्रज्ञ आणि ते अनेक स्वातंत्र्यवीर ! आणि ते ! धर्मात्मे, प्रेमात्मे, किती संत, किती महर्षी ! मनुष्यप्राणी प्रयत्नाने किती उंच स्थिती प्राप्त करून घेतो ते अशा थोरांच्या जीवनावरुन समजते. थोर कवी बघ. थोर चित्रकार बघ. मोठे संगीतज्ञ बघ. महान शिल्पी बघ. कोणी रामायणे लिहिली; कोणी ताजमहाल बांधले; कोणी प्रचंड मंदिरे बांधली. कोणी सुंदर लेणी खोदली. हे जीवन सुंदर आहे. अधिकाधिक सुंदर होत आहे. अरे, केवळ मातेच्या प्रेमाचा अनुभव मिळावा म्हणून या जगात पुन:पुन्हा जन्मावे. आणि भावाबहिणींचे प्रेम, भावाभावांचे प्रेम, पतिपत्नी प्रेम, मित्रप्रेम अशी ही निरनिराळी मधुर मधुर प्रेमे ! यांना का अर्थ नाही? छे ! मरू नकोस. जग.”

“त्या कवीच्या मनात असा झगडा चालतो. आणि रात्र संपत येते. तो त्रस्त झालेला असतो. आता उजाडते. प्रकाश पसरतो. रस्त्यातून मुले हातांत फुले घेऊन जात असतात. तो कवी दारात उभा राहतो. ती आनंदी मुले तो पाहतो. ती फुले पाहतो. त्याला सारे जीवन एकदम सुंदर वाटते. मरणाचे विचार जातात. जगावे असे त्याला वाटते.

“बंधूंनो, त्या लहान फुलांमध्ये त्या कवीच्या मनात क्रांती करण्याची शक्ती होती. अशी ही फुले म्हणजे प्रभूच्या मूर्तीच नाहीत का? पवित्र, निर्मळ, सुंदर सुगंधी मूर्ती ! म्हणून माझे तुम्हाला सांगणे आहे की मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह नको. तुम्ही या विश्वमंदिरातील नाना रूपांनी प्रकट होणार्‍या विश्वंभराची पूजा करा. सत्याग्रह इतर गोष्टींसाठी आपण करू. इतर अन्याय का थोडे आहेत? तेथे झगडू. तरीही हा सत्याग्रह करायचाच असे तुमचे ठरले तर त्यात मलाही घ्या. सनातनींनी दगड मारले तर ते मलाही लागू देत. त्यांची लाठी या माझ्या डोक्यावरही पडू दे. पोलिसांचा दंडुका बसू दे. किंवा त्यांची गोळी या छातीत घुसू दे. मी तुमचा आहे. मला तुमचा माना. परका नका समजू. तुम्हाला समाजात सन्मानाचे स्थान मिळो. तुमचा उत्कर्ष व उध्दार होवो. तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे यात शंका नाही. कारण खरी जागृती तुमच्यात आली आहे. आणि तीच महत्वाची गोष्ट आहे. ही जागृती वाढो. आणि तुमचे ग्रहण सुटो. बंधने तुटोत. दुसरे मी काय सांगू?”

सेवकरामांचे भाषण बराच वेळ चालले होते. इतक्यात मोटार आली. जयजयकार झाले. ते मोठे पुढारी आले. सभा संपली. पुढार्‍यांचे स्वागत झाले. नेतानिवासात मंडळी गेली.

“मी जातो. सत्याग्रह ठरलाच तर येईन.”

“हे पहा सेवकराम, आम्हालाही मंदिरांचे मोठे प्रेम आहे असे नाही. परंतु त्यानिमित्ताने संघटना होते. ही संघटना महत्त्वाची आहे. शेवटी पोटापाण्याचे प्रश्न हीच मुख्य बाब आहे. आमचे बाबासाहेब बुध्ददेवांना मानतात आणि भगवान बुध्द तर देवबीव मानीत नसत. सहानुभूतीचा व प्रेमाचा व्यापक उदार धर्म हीच मुख्य वस्तू आहे. परंतु संघटना करण्यासाठी, जागृती करण्यासाठी हे मंदिरसत्याग्रह वगैरे करायचे. अणि एकदा संघटना उभी राहिली की तिच्या जोरावर आम्ही राजकीय क्षेत्रातही मानाचे स्थान घेऊ आणि आमची दु:खे दूर करू.”

“तसे असेल तर ठीक. बरे मी जातो. बाबासाहेब आले आहेत. तुमचे समितीचे काम आहे ते चालवा. मी जातो गंगेच्या तीराने फिरत. आता चंद्रही उगवत आहे.”

असे म्हणून सेवकराम गेले, सभेतील मंडळीही चालली. सरला मोटारीत होती. ती अनिमिष नेत्रांनी स्वामी सेवकरामांकडे पाहात होती. सेवकरामांजवळ बोलावे असे तिला वाटले. ते आपल्याला सेवेचा मार्ग दाखवतील असे का तिला वाटले? ते भाषण ऐकताना तिच्या डोळयांतून पाणी येत होते. का बरे?

सरला मोटार हाकणार्‍यास म्हणाली, “तू येथेच थांब. मला कदाचित उशीर होईल. तू मोटारीत झोप. मी परत आल्यावर तुला उठवीन. जरा काम आहे. मी जाऊन येत्ये.”

असे म्हणून सरला बाहेर पडली. ते सेवकराम जात होते त्या दिशेने तीही निघाली. सेवकराम झपझप जात होते. सरला पाठीमागून पळत होती. आणि गोदावरीचा तो पाहा प्रशान्त प्रवाह ! चंद्रप्रकाशात ते पाणी किती सुंदर दिसत आहे ! सेवकराम पुढे पुढे गेले. आणि एका दगडावर बसले. सारी सृष्टी शांत होती.

आणि सरला आली. कोणी तरी येत आहे असा सेवकरामांना भास झाला. त्यांनी समोर पाहिले. कोण येत होते? कोणी स्त्री का? इकडे कोठे रात्रीची येत आहे? पलीकडे तो मोठा डोह आहे ! जीव देण्यासाठी ही अभागिनी येत आहे की काय? सेवकराम थरारले. ती अभागिनी अधिकच जवळ आली. चपापून जणू उभी राहिली.

“कोण आहे?” सेवकरामांनी विचारले.

“मी अभागिनी !”

“इकडे कोठे जाता?”

“आधार मिळतो का पाहायला.”

“कोणाचा आधार?”

“विशाल हृदयाचा.”

“म्हणजे त्या डोहाचा ना?”

“देवाची तशी इच्छा असेल, तर डोहाचा.”

“तुम्ही जीव नका देऊ, तुम्ही त्या व्याख्यानास होतात?”

“होत्ये.”

“तरी जीव द्यायला निघाल्यात? आणि जीव देणारा का व्याख्यान ऐकायला येईल?”

“व्याख्यान ऐकूनच इकडे येण्याची बुध्दी झाली.”

“मी तर सांगितले की साधे फूल पाहूनही मनुष्य आत्महत्येचा विचार दूर ठेवील.”

“मीही फुलासाठीच आल्ये आहे.”

“कोणते फूल?”

“प्रेमाचे फूल.”

“ते इकडे कोठे मिळेल?”

“तुमच्या हृदय-बागेत!”

“मी स्वामी आहे.”

“खरे आहे. स्वामीकडेच मी आल्ये आहे.”

“माझ्याकडे?”

“होय. तुम्ही माझे स्वामी आहात.”

“काय हे बोलता?”

“खरे ते मी बोलत्ये. तुम्ही तुमचे हृदय तपासा. तेथे का कोणी नाही? तुम्ही तरूण आहात. केवळ दाढीने हृदय झाकता येत नाही. मला तुमचे अंतरंग दिसत आहे. तेथे फुललेले प्रेमाचे फूल मला दिसत आहे. चिरप्रफुल्लित प्रेमाचे पुष्प. कधी न कोमेजणारे प्रेमाचे कुसुम. ते पाहा, मला त्याचा सुगंध येत आहे. तो सुगंध मला तुमच्याकडे ओढीत आहे. तुमच्याकडे खेचीत आहे. तो सुगंध मला मस्त करीत आहे. मला पागल बनवीत आहे. ये सुगंधा, ये. ने, त्यांच्या चरणांशी मला ने.”

आणि सरला धावत आली व सेवकरामांच्या पाया पडली.

“कोण तू?”

“उदय, कोण म्हणून काय विचारतोस? तुझा आवाज मी हजार वर्षांनंतरही ओळखीन. आणि तू का तुझ्या सरलेचा आवाज विसरलास? उदय, ही तुझी सरला ! जिच्या कपाळावर तू कुंकू लावलेस ती ही सरला ! घे तिला जवळ नाही तर त्या डोहात तिला लोट !”

“सरले, प्रेममूर्ती सरले ! तू आहेस? जिवंत आहेस? “

“तुझ्या आशेने मी प्राण ठेवले. मनात कोणीतरी म्हणे की तू येशील. आणि खरेच रे गडया आलास ! आता नको कोठे जाऊस. तुला या रामाच्या शेल्याने बांधून ठेवू का? ठेवू बांधून?”

“कोठला रामाचा शेला?”

“तू नाही का ती कथा ऐकलीस? सार्‍या शहरभर झाली आहे. सकाळच्या सनातनींच्या सभेत ती मी सांगितली होती.”

“मला नाही माहीत. सांग.”

आणि सरलेने सारी कथा सांगितली. उदय गेल्यापासूनची कथा. ती सांगताना ती मधून सद्गदित होई. तिला हुंदके येत. उदयच्या खांद्यावर मान ठेवून ती रडे. पुन्हा अश्रू पुसून ती कथा पुढे सुरू करी. उदयच्या डोळयांतूनही पवित्र गोदावरी स्त्रवत होती.

“उदय, घेशील का तू मला जवळ?”

“असे का विचारतेस?”

“उदय, सीतेहून पवित्रतम कोण? परंतु रावणाकडे राहिली म्हणून रामरायांनी तिला अग्निदिव्य करायला लाविले. मी तर सामान्य स्त्री. त्या नरकपुरीत आज सात-आठ महिने होत्ये. शक्यतो पवित्र व निष्कलंक राहिल्ये. परंतु उदय, तुला शंका असेल तर त्या डोहात मला लोट. तुझ्या हातचे मरणही अमृत आहे हो.”

“सरले, वेडी आहेस तू. कशीही असलीस तरी मला प्रिय आहेस. तू निष्कलंक आहेस. आणि त्या दुष्टांनी तुझ्यावर संकट आणलेच असते, तरीही मी तुझा स्वीकार केला असता. कारण मनाने तू तेथे संन्यासिनी होतीस. सरले, किती ग तुला दु:खे, किती यातना, वेदना? आणि हे सारे माझ्यामुळे ! अरेरे!”

“उदय, तुला मी रमविले नसते, आईकडे जाऊ दिले असते तर अशी ही दशा झाली नसती. त्या मातृप्रेमाची मी अवहेलना केली म्हणून या नरकात पडले.”

“आता नको रडूस.”

“उदय. मनात येते की हा शेला आपण दोघांनी आपल्याभोवती गुंडाळून त्या डोहात उडी घ्यावी. म्हणजे पुन्हा वियोग नको.”

“सरले, देवाने तुला उध्दरिले ते का पुन्हा जीव देण्यासाठी? मी जीव दिला नाही, तू जीव दिला नाहीस. आणि आता भेट झाल्यावर का जीव द्यायचा? आणि आपला बाळ आहेस त्याला विसरलीस वाटते?”

“आपण उद्याच जाऊ. पंढरपूरला जाऊ.”

“येथे सत्याग्रह असला तर?”

“असलाच तरी तो रामनवमीला सुरू होणार. उद्याच नाही काही. सुरू होणार असे कळले तर आपण परत येऊ. त्यात भाग घेऊ.”

“तूसुध्दा येशील?”

“हो.बाळाला घेऊन येईन.”

“सरले?”

“काय उदय?”

“तू मला नावे ठेवली असशील. मी तुला फसवले असे तुला वाटले असेल. परंतु तसे नव्हते हो. स्मृती येताच तुझ्याकडे मी धावत आलो.”

“होय रे उदय. तू माझा आहेस. माझा.”

“चल आपण जाऊ.”

“कोठे जायचे?”

“स्टेशनवर जाऊ.”

“शेटजींकडे जाऊ. त्यांचा निरोप घेऊ. मोटार तेथे उभी आहे. बंगल्यात जाऊ. आणि उद्या जाऊ. त्या शेटजींचे उपकार ! त्यांना सदबुध्दी आली म्हणून हो ही सरला तुला दिसत आहे. चल उदय, ऊठ.”

दोघे हातांत हात घेऊन निघाली.

“उदय, उद्या सकाळी ही दाढी काढ. नीट केस कापून घे. तू माझा साधा, सुंदर उदय हो.”

“स्वामी सेवकरामाचा अवतार संपला म्हणायचा !”

“उदय. आपण सेवाच करू. शेटजींनी एक संस्था सांगितली आहे. परंतु ते पुढे बोलू. उदय, आलास रे परत ! कसा भेटलास ! तुला कल्पना तरी होती का?”

“आणि तुला तरी होती का?”

“मला पहाटे स्वप्न पडले होते. तू पाठीमागून हळूच येऊन माझे डोळे धरीत आहेस असे स्वप्न.” बोलत बोलत दोघे मोटारजवळ आली. तेथे कोणी नव्हते. मोटारीत ड्रायव्हर निजला होता. सरलेने त्याला उठविले. दोघे मोटारीत बसली. बंगल्याजवळ मोटार आली. दोघे उतरली. बंगल्यात गेली. शेटजी बाहेर आले.

“तुम्ही अद्याप झोपला नाहीत शेटजी?”

“नाही. तुझी वाट पाहात होतो. हे कोण?”

“शेटजी, हे ते सेवकराम.”

“तुझी त्यांची ओळख निघाली वाटते?”

“हो. फार ओळख. चला, तुम्हांला त्यांची ओळख करून देत्ये. वर गच्चीत बसू. चंद्रही चांगला वर आला आहे.”

आणि सारी गच्चीत गेली. सरलेने वृत्तान्त सांगितला. शेटजी ऐकत होते.

“तुझे स्वप्न खरे ठरले !”

“होय शेटजी. परंतु हे सारे तुमच्यामुळे.”

“रामरायाच्या कृपेमुळे !”

“शेटजी, आम्ही दोघे उद्या पंढरपूरला जाऊ. बाळाला आणू.”

“मी मुंबईस उद्या जाईन. तुम्ही पुढे दोघे मुंबईस या.”

“शेटजी, आता उदय आहे. तो कोठे नोकरी करील. आता आम्ही नीट राहू.”

“उदय तुम्ही का नोकरी करणार? तुम्ही सेवकराम नाव घेतले होते. सेवक व्हा. ठाणे जिल्ह्यात आदिवासी सेवा मंडळ म्हणून नवीन संस्था आहे. तुम्ही तिला मिळा. मी लाख रूपयांची देणगी देईन. संस्था नावारूपाला आणा. तेथील दीनदरिद्री जनतेत चैतन्य ओता.”

“शेटजी, कोठेतरी असे कार्य करावे हेच माझ्याही मनात आहे. आम्ही मुंबईस तुमच्याकडे येऊ व पुढे बोलू. उद्या आम्ही जाऊ ना मग?”

“हो, जा. बाळाला भेटा. आणि आता मी जातो. मला झोप येत आहे. तुम्ही पोटभर बोला. तुमची हृदये उचंबळत असतील. प्रभुकृपेने एकत्र आला आहात. पुन्हा तुमचा वियोग न होवो.”

असे म्हणून शेटजी गेले. सरला नि उदय तेथे बसली होती. आणि तीही थोडया वेळाने भावनांच्या समुद्रावर हेलावत निजण्यासाठी निघून गेली. देवाच्या लाडक्या लेकरांनो, शांत झोपा.

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED