तू माझा सांगाती...! - 7 Suraj Gatade द्वारा मानवी विज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तू माझा सांगाती...! - 7

"तू माणसासारखं काहीच करत नाहीस का?"
"सध्या तरी नाही. माझी एआई अजून डेव्हलप होत आहे."
"म्हणजे तू खरचं एक लहान मूल आहेस!" जनार्दन सारंग हसले,
"काळजी नको. सोय करू काही तरी! सध्या माझ्या खोलीत चार्जिंग पॉईंट जवळची जागा तुझी!" ते त्याला म्हणाले.
"साहेब एक विचारू?" यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ने जनार्दन सारंग यांची परवानगी मागितली.
"बोल ना. पण आधी साहेब, सर म्हणायचं बंद कर!"
"मग काय म्हणू?"
"तुला हवं ते. प्रश्न विचार."
"तुम्ही एकटेच! तुम्हाला कोणी...?" रोबोट असून त्याला वाक्य पूर्ण करता आले नाही. कदाचित इमोशन्स त्याच्यात डेव्हलप होत असावेत... किंवा त्याला जनार्दन सारंग यांना हा प्रश्न विचारून दुखवायचे नसावे म्हणून त्याचा हा संकोच असावा...
"नाही. माझं कोणी नाही. सध्या तरी... तरुण होतो. त्या कैफात, धुंदीत स्वैर जगलो. हा! पण गैरवर्तन नक्कीच केलं नाही. स्वातंत्र्य होतं. पण म्हणून स्वैराचार कधीच केला नाही. फक्त कोणाचं बंधन आपल्यावर नसावं असं वाटत होतं. म्हणून फॅमिली बनवण्याकडे मी काहीच खास लक्ष दिलं नाही. म्हणजे मला तसं कधी आकर्षणच वाटलं नाही. पण... पण उतरत्या वयात वाटतं, कोणी तरी असावं आपल्यासोबत. म्हणून तुला बनवायला मी एप्लाय केलं. नोकर म्हणून नाही. माझा फॅमिली मेंबर म्हणून!
"रोबोट आणि माणसामधलं नातं एक चांगलं उदाहरण बनेल. नाही?..."
जनार्दन यांच्या प्रश्नाचं उत्तर तर यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ने दिलं नाही, पण तो एव्हढं मात्र म्हणाला, की -
"माझ्या सिस्टीममध्ये ह्यूमन रिलेशन्सच्या काही फाईल्स आहेत. आपल्या वडिलांना मुलं 'बाबा' म्हणतात. मी आपल्याला बाबा म्हणालो, तर चालेल?"
"हो! म्हण ना. मला आवडेल!" जनार्दन सारंग वाईनचा घोट घेत यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ला म्हणाले.
"आणि एक गोष्ट लक्षात घेत युनिट 26..."
"यूनीट 15 ओर्डर नंबर 26!"
"मित्च् स्स्स्! तुझ्या नांवाचं आधी काही तरी केलं पाहिजे. आज पासून तू विक्टर! माय विक्टरी ऑफ जॉय!"

"म्हणजे?"
"आज खूप दिवसांनी मनमोकळा हसलोय. तुझ्यामुळे. तू माझ्या आनंदाचा स्रोत आहेस. आज कित्येक वर्ष झाकोळलेल्या माझ्यातील आनंदाचा विजय झालाय असं मला वाटलं. म्हणून हे नांव. आवडलं?"
"हो बाबा!" विक्टरने आपल्या नांवाला सहमती दर्शवली.
आणि त्याने जनार्दन सारंगना 'बाबा' म्हणून त्यांच्यातील नवीन नात्याची त्याच्याकडूनही सुरवात केली.
.
.
.

"चांदणं काय मस्त पडलंय. नशीब आहे, या डेव्हलपमेंटच्या धबडग्यात किमान काही जुन्या गोष्टी आणि अशी ठिकाणं अजून शिल्लक आहेत आनंद लुटण्यासाठी..." चांदण्यांवरून नजर हटवून हातातील वाईनच्या ग्लासकडे पाहत जनार्दन सारंग म्हणाले,
"तू पहिल्यांदाच असा काही अनुभव घेत असशील. नाही?" त्यांनी विक्टरला विचारलं आणि वाईनचा घुटका घेतला.
"तुम्ही हे का पिता? अल्कोहोल कँज्यूम करणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. आपल्याला माहीत असेलच."
"वाईन म्हणजे काही दारू नाही रे!" जनार्दन सारंग विक्टरला मनवण्यासाठी म्हणाले.
"वाईनमध्ये एव्हरेज अकरा पॉईंट सहा प्रसेन्ट तरी अल्कोहोल असतंच." विक्टर निर्विकार चेहऱ्याने बोलला.
"तू तुझे स्टॅटिस्टिक्स जरा बाजूला ठेवा ना. एन्जॉय द लाईफ सन!" जनार्दन सारंग यांनी विक्टरला सल्ला दिला.
"तारे खरंच सूंदर आहेत. मी फील करू शकतो..."
"हा थंड, आल्हाददायक वारा देखील?"
"नाही! आय डोन्ट हॅव स्किन. बट आय हॅव सेन्सर्स टू सेन्स. एआई..."
"अजून डेव्हलप होतंय. माहिती आहे. माहिती आहे. तू सोबत आहेस हे पुरेसं आहे..." जनार्दन सारंग हसत म्हणाले.
आणि त्यांनी वाईनचा ग्लास तोंडाजवळ नेला. आणि काहीतरी आठवल्यासारखं ते थांबले. थोडा विचार करून त्यांनी ग्लास बसलेल्या कड्यावरून खाली ओतून दिला. विक्टर हे पाहत होता. पण त्याचा चेहरा निर्विकार होता. जनार्दन सारंग यांनी असं का केलं हे समजण्यासाठी त्याचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अजून डेव्हलप होत होते...
.
.
.
काही कामानिमित्त घराबाहेर गेलेला विक्टर परतत असताना त्याचा सेन्सर वाजू लागला. काही तरी महत्त्वाचा मेसेज असेल, म्हणून तो लगबगीने घरी पोहोचला. पाहतो, तर जनार्दन सारंग एका होलोग्राम इमेज सोबत बोलत होते. याच संबंधी त्याला माहिती मिळावी म्हणून तो सेन्सर बीप झाला असेल हे विक्टरच्या लक्षात आले आणि तो देखील जनार्दन सारंग यांच्या बाजूला उभारून त्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकू लागला...