Baji - A bood war - 3 books and stories free download online pdf in Marathi

रणकंदन - भाग-३

भाग ३ - रणकंदन

(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.)

सकाळचा प्रहर चालू झाला होता. इकडे बाजी आपल्या बांदल मावळ्यांना आपली योजना सांगू लागले. कोण दरडीवर चढु लागलं, तर कोण खालील दगडी गोळा करू लागले. पाच पन्नास मावळे दरडीवर चढून मोठं मोठाले दगड गोळा करू लागले. गोफणीसाठी लागणारे लहान दगडही जमा होऊ लागले. काही जण खालील मोठाले दगड दोरीने वर उचलून घेत होते. बघता बघता काही वेळातच मावळ्यांनी मोठ्या अन लहान दगडांचे ढिगारेच्या ढिगारे जमा केले. सगळ्यांनी सोबत आणलेल्या शेंगदाणे अन फुटाणे काम करता करता बकाबक खाऊनही घेतले होते. जवळच वाहत असलेल्या ओढ्यातील पाणी पिऊन अन विश्रांती घेऊन मावळे ताजे तवाणे होऊ लागले अन माऱ्यासाठी सज्ज झाले. बाजींनी सगळ्यांना आप आपल्या जागा घेऊन शांत बसण्याची सूचना केली. सगळीकडे शांतता पसरली होती. वातावरण अजूनही ढगाळच होते, त्यात दाट झाड झुडपांचा परिसर असल्याने प्रकाशही कमीच होता. आता सिद्दी मसूदचे सैन्य हळू हळू जवळ येत असल्याचे आवाज येऊ लागले होते. बाजी, संभाजी (राजांचे सख्खे मामा अचलोजी जाधव यांचा मुलगा), सिद्दी इब्राहिम सज्ज झाले होते. घोड्यांच्या दौडीचे अन खिंकाळण्याचे आवाज क्षणाक्षणाला वाढू लागले होते.

सिद्दी मसूदचे पुढे आलेले पन्नास एक हशम "दीन दीन, पकडो, मारो, काटो" म्हणत गजा खिंडीपाशी येऊन पोहोचले होते. गजखिंडीत प्रवेश करायला काही अंतरच बाकी असताना एवढा वेळ दबा धरून बसलेले मावळे हातात गोफण गुंडे गोल गोल फिरवत हर हर महादेवचा गजर करत सटासट दगडी त्यांच्यावर फेकू लागले. एक एक हशम अचूक टिपला जात होता. कुणाच्या टाळक्यात, कुण्याच्या चेहऱ्यावर, कुणाच्या छताडात धडाधड येऊन दगडी बसत होती, त्यासरशी एक एक हशम घोड्यावरून खाली कोसळत होता. जर कोणी गोफणीच्या माऱ्यातून सुटून पुढे आलाच तर तिरकामठा वाले मावळे त्याचा अचूक निशाणा साधत होते. काही वेळातच तीस पस्तीस यवनांच्या फडशा पडला होता. काही हशम जखमी होऊन, काही अर्धमेले होऊन तर काही मृत्युमुखी होऊन पडले होते. कसेबसे वाचलेले व मागेच थांबलेले दहा पंधरा हशम मागच्या मागे पळून गेले. मावळ्यांनी त्या तीस पस्तीस यवनांचा होता नव्हता सगळा माल पळवून आणला. घोडे, हत्यारे, अन बरच काही. घोडे मागच्या बाजूला नेऊन बांधून ठेवले. पुन्हा गोफणीसाठी वापरलेले दगड, धनुष्याचे तिरही गोळा केले गेले. अन पुन्हा एकदा सगळे लढाई साठी सज्ज झाले.

या वेळी जास्त शत्रू सेना आली होती. चारशे हशम असतील अंदाजे पण खिंडीची वाट चिंचोली असल्याने सगळ्यांना एकाच वेळी घुसने अशक्य होते. जस जसे सैन्य पुढे जायचे दगडांचा अन बाणांचा असा वर्षाव व्हायचा की आदिलशाही सैन्याची त्रेधातिरपीट होऊन जायची. बरेचशे सैन्य पुढे आले होते. त्यांची मावळ्यांशी आमने सामने लढाई सुरू झाली. पण मावळ्यांच्या रेट्यापुढे मसुदच्या सैनिकांचा काही निभाव लागेना. सिद्दी मसुदही आता हट्टालाच पेटला होता.

"कैसे है ये मऱ्हाट्टे.. पत्थर से जंग.. जाओ.. आज कुछ भी हो जाये, उस शिवाजी को पकडना हि है हमे ।"

आणखी शंभर एक हशम खिंडीत घुसले. काही घोड्यावर तर काही समोर ढाली धरून. जेव्हा गोफणीचा अन बाणांचा काही उपयोग होत नव्हता, तेव्हा मात्र मावळे जे दरडीवर मोठं मोठाले दगड होते ते वरून खाली फेकून द्यायचे. एवढे मोठाले दगड एकतर अंगावर किंवा डोक्यात बसायचे. कुणाची डोकी फुटायची तर कुणी जागेवरच जायबंदी होऊन व्हीवळत पडायचं. सगळीकडे हल्लकल्लोळ माजायचा. त्यातूनही जर काही सैन्य सुटून पुढे आले तर संभाजी अन सिद्दी इब्राहिमच पथक भाले घेऊन त्यांचा समाचार घायचं. ते दमले कि स्वतः बाजी आघाडी घ्यायचे. बाजींनी आता दोन्ही हातात दांडपट्टा चढवला होता. "हर हर महादेव" "जय भवानी" च्या गजरात त्यांचा रौद्रवतार प्रकटला होता. एक एक हशम सपासप कापला जात होता. एकही शत्रू पुढे जायची हिम्मत करत नव्हता. अजूनही दोनशे गनीम खिंडीतच होते. येताना तर चारशे होतो मागे पाहावं तर काही जखमी, काहिंचे मुडदे पडलेले तर काही जीव वाचवून मागे पळत होते. मसूदच सैन्य आता लढाईसाठी खिंडीत प्रवेश करू धजावेना. तरीही सिद्दी मसूद त्यांना पिटाळून लावत होता. अचानक, सिद्दी मसूद अन त्याची सेना ज्या ठिकाणी थांबली होती, दोन्हीही बाजूने "हर हर महादेव", "जय भवानी" चा गजर ऐकू येऊ लागला. सिद्दी मसूद अन सैन्याला काही कळायच्या आत दोन्ही बाजूने सटासट दगडांचा अन बाणांचा वर्षाव होऊ लागला. कुठून बाण येतोय, कुठून दगड येतोय काहीच कळेना. सैन्य जखमी होऊ लागलं. सिद्दी मसुदही आता भांबावून गेला, 'नेमकं शिवाजीकडे किती सेना आहे?' त्यांची पीछेहाट होऊ लागली. हीच संधी साधून फुलाजी अन त्यांच्या बांदल मावळ्यांनी मोठं मोठ्याने हर हर महादेव च्या आरोळ्या ठोकत खिंडीकडे धाव घेतली. अगोदरच खिंडीत घुसलेले चारशे पाचशे यवनी सैन्य आता दोनशे अडीचशे च्या आसपास शिल्लक होते, मागून येणाऱ्या अचानक हल्ल्याने त्यांची तर बोबडीच वळली.

"या अल्ला , काफर आया, काफर आया, भागो sssss"

फुलाजी अन त्यांच्या मावळ्यांनी मागून अन बाजींनी समोरून उरलेल्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला. भयंकर रणकंदन माजले. बाजी अन फुलाजीचा रौद्रवतार पाहून मसुदच्या सैन्य समोर यायला थर थर कापू लागले. सहा साडे सहा फूट उंच धिप्पाड देह बाजी अन फुलाजी दोन्ही हातात गरगर दांडपट्टा फिरवत शत्रू सैनिकांना सपासप कापत सुटले होते. अंगावर झालेल्या वारांनी कपडे कधीच लालेलाल झाले होते, मोठाले डोळे अन भादरलेले डोके त्यावर रुळणारी लांब शेंडी असा अवतार झाला होता दोघांचाही.

लढता लढता जर बाजी अन फुलाजी दिसले तर मसुदचे सैन्य, "शेतान आया.. शेतान आया.... भागो ।" म्हणत पळत सुटायचं.

सिद्दी मसुदही आता विचार करून वेडा व्हायची वेळ आली होती. एवढे चार पाच हजार सैन्य असूनही केवळ तीन चारशे लोक आपली वाट रोखून धरतात.

"क्या शेतान है ये मरहट्टे.. कैसे कैसे लोग पाल रख्खे है इस शिवाजीने। हटनेका नाम हि नहीं ले रहे।"

क्रमश:

"जय जिजाऊ"
"जय शिवराय"

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED