Baji - A blood war - 4 books and stories free download online pdf in Marathi

शर्थ - भाग-४

भाग ४ - शर्थ

(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.)

खिंडीत घुसलेल्या चारशे सैनिकांचा धुव्वा उडाला होता. पन्नास एक कसेबसे जीव वाचवून पळून जाऊ लागले. तोवर मावळ्यांनी खिंडीत जखमी अन मेलेल्या मसुदच्या सैनिकांची हत्यारे अन घोडी गोळा करून आणले होते. शे दीडशे घोडी मिळाली होती. धावत जाऊन बाजींनी फुलाजीचा मिठी मारली.

"आरं, दादा कुठं व्हता एवढा येळ ."

"राजं ..?? राजं, कुठं हाईत??", फुलाजी इकडे तिकडे बघत म्हणाला.

"त्यांना खेळणा गडावं फूडं पाठवून दिलंय. तीन साडे तीनशे मावळा हाय संग."

"क्क क्काय?????? घात झाला बाजी. खेळणा गडाला सुर्वे अन दळवी आधीच वेढा देऊन बसल्यात. राजांकडे मावळ बी कमी हायीत. राजं संकटात हायीत. कुमक पाठवाया पायजे."

हे ऐकताच बाजीही चिंतातुर झाले. "आता रं दादा?? म्या तर राजांना सांगितलंय कि जसं गडावं पोहोचताल तसं तोफचं बार उडवा. तोवर आम्ही खिंड लढवतो."

"आता एक काम करा. बाजी तुम्ही घोड्यावर शे दीडशे मावळा घेऊन निघा. खिंड म्या लढवतो. जोवर तोफेचं आवाज होत नाही तोवर एकही गनीम सुटू द्यायचो नाय म्या. निघा तुम्ही."

बाजींनी पुन्हा फुलाजीचा मिठी मारली अन शे दीडशे मावळा घेऊन खेळणा गडाकडे घौडदौड करू लागले. फुलाजी त्याच्या शे दीडशे ताज्या दमाच्या साथीदारांसोबत आला पण बाजी तेवढ्याच मावळ्यांना घेऊन गेला होता. पन्नासेक मावळे कामी आले होते. तिनशेच्या आसपास बांदल मावळे उरले होते. सिद्दी इब्राहिम जखमी होऊन पडला होता. फुलाजी आल्यामुळे मावळ्यांना पुन्हा एकदा जोश आला होता. बराच वेळ झाला हल्ला झाला नाही. तोवर मावळ्यांनी पुन्हा होत नव्हतं ते खाण्याचं सामान खाऊन घेतलं. काही वेळची विश्रांती अन पुन्हा लढाईसाठी सज्ज झाले.

राजे निघून आता प्रहर दोन प्रहर उलटून गेले होते. संध्याकाळ होत आली होती. एव्हाना राजे खेळणा गडावर पोहोचून तोफांची इशारत व्हायला हवी होती. फुलाजी चिंतेत होते की, 'अजून राजे गडावर कसे पोहोचले नाहीत.' इकडे सिद्दी मसुदची ताज्या दमाची फौज येतच होती. मारा थांबायचं नाव घेईना. सततच्या हातघाईच्या लढाईमुळे मावळेही आता दमून गेले होते. फुलाजी दोन्ही हातात तलवार पेलून गरगर फिरवत होते. समोर येणारा एक एक हशम होणाऱ्या वाराने जखमी होऊन तर कोण जागीच गतप्राण होऊन पडत होता. लढाई करत करत फुलाजी कधी गनिमांच्या गराड्यात जाऊन पोहोचले कळलंही नाही. आजूबाजूला पाहावं तर सगळीकडे काळ्या हिरव्या पेहरावातील आदिलशाही यवनी सेना. फुलाजी एकटेच प्रतिकार करत होते. वार होत होते, जखमा होत होत्या. संभाजी जाधव अन त्याच्या पाच सात मावळ्यांनी त्यांना पाहिलं पण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं म्हणजे पन्नास एक हशमांना पार करून जावं लागणार होतं. संभाजी त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन त्या दिशेने सरकू लागला. वाटेत येणारा एक एक गनीम संभाजीच्या ताकतवर वाराने सपासप कापला जात होता. फुलाजी आता दमून गेले होते. त्यांच्या हालचाली मंद होऊ लागल्या होत्या. त्यांच्या शरीरावर अशी एकही जागा नव्हती जिथे वार झाला नसेल. एवढा वेळ दुरून लढाई पाहणारा सिद्दी मसूद घोड्यावर खिंडीत घुसला होता. फुलाजीला पाहताच त्याने आपला घोडा त्या दिशेने वळवला. अन त्यांच्यावर वार करायला सरसावला. संभाजीने हे पाहिलं अन तोही घाई करू लागला. पण तोवर मसुदचा एक वार फुलाजीचा छातीवर झाला. प्राणांतिक वेदनेने फुलाजी ओरडले, हातातील तलवारी खाली पडल्या अन शुद्ध हरपून खाली कोसळले. समोरून येणाऱ्या संभाजी अन सात आठ मावळ्यांना पाहून मसुदने त्याचा घोडा वळवला अन माघारी दौडू लागला. मावळ्यांनी फुलाजीचा उचलून घेतले, संभाजी अन मावळ्यांनी त्यांना संरक्षण देत मागे हटू लागले. फुलजींना मागे दगडाला टेकून बसवण्यात आले. तोंडावर पाणी मारले, त्यांना पाणी पाजलं. इकडे संभाजी अन त्याचे साथीदार आता आघाडी सांभाळत होते.

फुलाजींनी शुद्ध हरपू लागली होती. डोळ्यांची झापडं जड झाली होती. चेहऱ्यावरचं रक्त सुकून गेलं होतं. सारं अंग जखमांनी भरून गेलं होतं. वेदनांनी शरीरातील एक न एक अवयव ठणकत होता. चार पाच मावळे फुलाजींच्या आजूबाजूला जमले होते. शत्रूंच्या रेट्याला संभाजी अन उरले सुरले बांदल प्रतिकार करत होते. अन अचानक....

"धडाड धूम ... धडाड धूम..."

तोफांचे लागोपाठ तीन चार बार ऐकू येऊ लागले. मावळ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले. होती नव्हती तेवढी शक्ती एकवटून, सगळे प्राण आपल्या जिभेत आणून फुलाजी अस्पष्ट पुटपुटले,
"राजं... पोहोचलासा नव्ह..."

फुलाजींनी राजांना मुजऱ्या साठी आपला हात उंचावला अन म्हणाले, "राजं.. ह्यो फुलाजीचा अखेरचा मुजरा........"

अर्धवट वर आलेला हात तसाच खाली कोसळला अन फुलाजींचे प्राण घोड खिंडीला पावन करून अनंतात विलीन झाले.

क्रमश:

"जय जिजाऊ"
"जय शिवराय"

(माहिती - वाचकांनी नोंद घ्यावी. ही कथा, निनाद बेडेकर यांच्या युट्यूब वरील शिवचरित्रातील बाजी प्रभू देशपांडे यांच्या प्रसंगावर लिहिलेली आहे. काही प्रसंग काल्पनिक आहेत. अधिक माहितीसाठी त्यांचे युट्युब वरील व्याख्यान ऐकावे ही नम्र विनंती. लिंक : https://youtu.be/_jEj6YYAOJQ)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED