Baji - A blood war - 6 books and stories free download online pdf in Marathi

चक्रव्यूह भेदले - भाग-६

भाग ६ - चक्रव्यूह भेदले

(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.)

अन अचानक समोरील झाड झुडपांतून येणाऱ्या घोड्यांच्या खिंकाळयांनी आणि हर हर महावेदच्या आरोळ्यांनी शत्रूंची घोडी जागेवरच थबकली.

क्षणभर बांदलही गोंधळले. मागे शत्रू अन समोर हे सिद्दी मसूदचे सैन्य आले कि काय? म्हणून राजांच्या मनात क्षणभर भीती दाटली. पण दुसऱ्याच क्षणी समोरून भरधाव येणाऱ्या घोड्यावर आरूढ असलेल्या बाजींना पाहून राजांच्या चेहरा आनंदानं फुलून गेला. पाठोपाठ घोड्यांवर स्वार असलेल्या बांदलांनी डावी अन उजवी कडून एकाच वेळी शत्रूवर हल्ला केला. मावळ्यांपाठोपाठ आलेले दळव्यांच्या घोडेस्वारांना अचानक आलेल्या टोळधाडीने पुन्हा माघारी वळून पळायलाही संधी मिळाली नाही. अन येणाऱ्या बांदल स्वारांनी क्षणात त्यांची खांडोळी केली. शे दीडशे बांदल मावळे घोड्यांवर आल्याने मावळ्यांनी पुन्हा फिरून जोराचा हल्ला केला. समोर येणारा शत्रू बाजींच्या मावळ्यांनी पळता भुई थोडा केला. सुर्वे दळवींच्या सैन्याची दाणादाण उडाली, वेढा फुटला. बाजींनी राजांची भेट घेतली. मुजरे झाले.
बाजी म्हणाले, "राजं... आता लवकरात लवकर गड गाठा अन तोफेचं तीन बार करा. फुलाजी दादा खिंडीत वाट बगत आसल."
राजांनी एक भुवई हलकेच वर केली अन म्हणाले, "तुम्ही नाही येणार?"
"तुम्ही आधी वर पोहोचा राजं... आम्ही आलोच मागोमाग."

राजांनी निवडक मावळ्यांना सोबत घेऊन गड गाठला. राजे सुरक्षित विशाळगडावर पोहोचले. तोफची आधीच तयारीत होते. राजे महाद्वारापाशी पोहोचते न पोहोचते तोच, तोफेचे बार उडाले.

"धडाडंम् धूम... धडाड्म धूम.. धडाड्म धूम..."

दूर घोडखिंडीत फुलाजींनी तोफेचे बार ऐकले अन राजांना शेवटचा मुजरा केला. तोफेच्या आवाज ऐकताच मावळ्यांनी आजूबाजूच्या जंगलात धूम ठोकली अन नाहीसे झाले. सिद्दी मसूदने उरलेले जखमी अन पळणारे मावळे कापून काढले. सोबत शिल्लक असलेल्या तीन चार हजार सैन्याला घेऊन विशाळगडाकडे दौडू लागला.
*****

गडावर पोहोचताच राजांनी शिव शंभुचे दर्शन घेतले. अन राजे आपल्या विश्राम गृहाकडे निघाले. लगोलग सदरेवर मुख्य सरदारांना उपस्थित राहण्याचे निरोप मिळाले. घटका दोन घटका होतो न होतोच राजे अन काही निवडक सरदार सदरेवर हजर झाले.
राजांनी किल्लेदारांकडे कटाक्ष टाकला, "किल्लेदार... सर्व मावळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. अन लागलीच जखमी मावळ्यांवर उपचार करण्याची घाई करा."
"जी राजं...", म्हणत किल्लेदार राजांना मुजरा करुन निघणार तेवढ्यात राजे म्हणाले, "एक महत्त्वाचं, लढाईत कामी आलेल्या मावळ्यांची यादी करा. अन हो सावजीला पाठवून द्या."
"जी राजं...", म्हणत किल्लेदार सदरेहून निघाले.
जखमींना तुपाच्या विहिरीतील जुने तूप जखमांवर लावले जात असे. अन ते लावल्यावर होणारी आग, तगमग त्या जखमेपेक्षाही खूप वेदनादायक होती. पण त्यामुळे जखम चिघळत व पु धरत नसे अन लवकर खपली धरून भरून येत असे. पण या इलाजासाठी मावळे नेहमी का कु करत. राजांनी सर्वांना यासाठी सक्त ताकीत दिली होती अन जो नाही करणार त्याला स्वतः राजे येऊन लावतील म्हणूनही बजावून ठेवले होते.

सदरेवरच्या गवाक्षातून राजे दूरवर पसरलेल्या सह्याद्रीकडे पाहत विचारात गुंग होऊन गेले होते. रात्र झाली होती. सदरेवर समयीतील वातींचा मंद प्रकाश पसरला होता. गडावर येताच बाजींना ताबडतोब भेटण्यासाठी सांगावा गेला होता. जीवावर बेतलेला केवढा मोठा प्रसंग टळला म्हणून, राजे आई जगदंबेचे मनोमन आभार मानत होते. घोडखिंडीत लढत असलेल्या फुलाजींचा विचारही मनात घोळत होता. थोड्याच अवधीत बाजीही काही बांदल सैनिकांसह गड चढून वर आले. जखमींसाठी उपचार चालू असलेल्या वाड्यात बाजी दाखल झाले. तोवर सावजी आपल्या जखमांवर उपचार करून सदरेवर हजर झाला. सदर रिकामीच होती, आसनाच्या मागे पाठमोरे उभे असलेले राजे गवाक्षातून बाहेर पाहत होते.
सदरेच्या मध्यभागी येऊन सावजीने, "मुजरा राजं" म्हणत उजवा हात छातीशी नेला. राजांची विचार तंद्री भंगली. वळून राजांनी सावजीकडे पहिले अन हलकेच हसले. सावजी समोर येत राजांनी सावजीचे खांदे दोन्ही हातांनी धरले अन म्हणाले, "तुझ्यासारखे मर्द मावळे आमच्या पाठीशी आहेत, म्हणून आम्ही आज सुखरूप आहोत."
सावजी म्हणाला, "राजं तुम्ही आमच्यासाठी सवराज्यासाठी एवढं करता मंग तुमच्यासाठी आमी एवढं बी कराय नगं.", अन झटकन सावजीने राजांचे चरण स्पर्श केले.
राजे सावजीला धरत त्याला उठवत म्हणाले "अरे...! हे काय करतोयस?"
सावजीचे डोळे अश्रूंनी भरले होते.
"राज... आजवर बाजींसंगट व्हतो पर कवा तुमास्नी भेटायचा योग न्हाय आला. आन, आज तुम्ही सवता मला बलिवलत, म्हणून उर भरून आला... राजं... तुमच्यासाठी, तुमच्या संगट लढलो जीवाचं सार्थक झालं बगा.."
"पथकातील जखमी झालेल्या मावळ्यांची यादी करा अन जे जे मावळे कामी आले त्यांचीही."
काही वेळ राजे सावजीशी बोलले. बाजी गडावर आलेले आहेत कळताच बाजींना त्यांच्या दालनात पाठवून देण्यासाठी सांगितले अन राजांनी सावजीला निरोप दिला.

बाजींना आपल्या दालनात आलेले पाहताच राजांचे डोळे पाणावले. राजांनी बाजींना आलिंगन दिले. अन घोडखिंडीत घडलेल्या प्रसंगाची विचारपूस केली. बाजींनी सगळा प्रसंग राजांना कथन केला. राज्यांच्या नेत्रकडांतून अश्रूंनी दाटी केली होती. ऐकता ऐकता आलेला हुंदका राजांनी कसाबसा आवरला. आपला उजवा हात छातीवर टेकवला, डोळे बंद केले अन "जगदंब...जगदंब.." स्वतःशीच पुट पुटले. भावनेचा पूर ओसरल्यावर. बाजींना एकत्रच थाळा घेऊ म्हणून विचारले. बाजींनी थाळा घेण्यास नकार दिला अन म्हणाले,
"राजं... दादाची अजून काय खबर न्हाय आली. आन म्या कसा घास खाऊ?"
राजे, "ठीक. आम्हीही थांबू मग."
बाजी, "नगं राज... आमच्यासाठी तुम्ही नका थांबू."
"नाही बाजी. तुम्ही आमच्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावता. तिकडे फुलाजी, संभाजी ,सिद्दी हिलाल यांच्यासारखे असंख्य मावळे आमच्यासाठी थकलेला भागलेला जीव घेऊन, उपाशी पोटाने छातीचा कोट करून खिंड लढवता. मग आमच्या गळ्याखाली तरी कसा घास उतरेल?"
बाजींनी खूप सांगूनही राजे काही केल्या ऐकेनात शेवटी राजांसोबत कसाबसा थाळा संपवून बाजी त्यांच्या विश्राम गृहाकडे निघून गेले.

क्रमश:

"जय जिजाऊ"
"जय शिवराय"

(माहिती - वाचकांनी नोंद घ्यावी. ही कथा, निनाद बेडेकर यांच्या युट्यूब वरील शिवचरित्रातील बाजी प्रभू देशपांडे यांच्या प्रसंगावर लिहिलेली आहे. काही प्रसंग काल्पनिक आहेत. अधिक माहितीसाठी त्यांचे युट्युब वरील व्याख्यान ऐकावे ही नम्र विनंती. लिंक : https://youtu.be/_jEj6YYAOJQ)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED