धडक - भाग-५ Ishwar Trimbak Agam द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

धडक - भाग-५

भाग ५ - धडक

(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.)

घोडखिंडीतून निघून राजांना आता एक दिड प्रहर लोटला होता. लवकरात लवकर राजांना कुमक करण्यासाठी विशाळगडाचा पायथा गाठणं गरजेचं होतं. बाजी अन त्यांच्या सोबत असलेले शंभर दीडशे मावळे भरधाव घोडा दौडवत होते. घोडीही जीव खाऊन दौडत होती. जंगलातील खाचखळग्यांच्या वाटेवरून दौडताना घोड्यांची दमछाक होत होती. धावून धावून तोंडाला फेस आला होता. आता कोस दोन कोसांचा अंतर बाकी होतं. विशाळगड नजरेस पडू लागला होता. पण आधीच आदिलशाही मराठी सरदार सूर्यराव सुर्वे आणि जसवंत दळवी यांचा हजार दीड हजार सैन्याचा विशालगडाला वेढा पडलेला होता. एवढ्या मोठ्या गडासाठी हजार दीड हजार सैन्याचा वेढा अगदीच तुटपुंजा होता. तरीही वेढा फोडून गड गाठणं आवश्यक होतं.

राजांनी पूर्ण अंगावर योद्धयाचा वेश परिधान केलेला होता. चिलखतही चढवलेले होते. शिरस्त्राण घालून पूर्ण डोकंही झाकलं होत. फक्त डोळे दिसत होते. राजांनी दोन्ही हातात दांडपट्टा पेललेला होता. ज्या बाजूला शत्रूंचे कमी सैन्य होते. त्या बाजूने निकराचा हल्ला चढवायचा बेत नक्की झाला होता. विशाळगडावर किल्लेदाराला इशारा मिळताच मावळ्यांची कुमक घेऊन राजांच्या मदतीला येण्याचा सांगावा पोहोचलेला होता. गडावरून खाली पाहिलं तर राजांचे सैन्य झाडाझुडपांमध्ये दबा धरून बसलेलं दिसत होत. तर अलीकडे सुर्व्यांचा सैन्याचा तुटक राबता दिसत होता. बाजूलाच काही अंतरावर गडाच्या बाजू बाजूने दळव्यांचे मोर्चे लागलेले होते. सुर्व्यांचे सैन्य ज्या बाजूने कमकुवत वेढा लावून होते त्याच बाजूने किल्लेदार सोबत दीड दोनशे मावळे घेऊन झाडाझुडपांच्या आसरा घेऊन खाली उतरलेले होते. खालून हर हर महादेवचा गजर होताच वरच्या मावळ्यांनीही एकाच वेळी हल्ला करायचा होता. गडावर तोफा होत्या पण खाली खुद्द राजे अन मावळे असल्याने त्या उडवणे धोक्याचे होते. राजांनीच तोफा न उडवण्याबाबत सक्त ताकीत दिलेली होती.

पलीकडच्या झुडपात हात दोन हातांच्या अंतरावर लपलेल्या सावजीला राजांनी प्रश्न केला, "सावजी, गडावर निरोप पोहोचला?"

आपले नाव राजांना कसे माहित? अन राजांनी अचानक केलेल्या प्रश्नाने सावजी जरा चपापलाच.

स्वतःला सावरून सावजीने गडाच्या पायथ्याच्या थोडं वरच्या दिशेने बोट दाखवून राजांना सांगितलं, "जी राजं, त्ये बगा त्ये आपलं मावळं. भगवी निशाणं घेऊन दबा धरून बसल्यात. आपला इशारा मिळताच ते वरून हल्ला करत्याल."

"ठीक.. सावजी आता घाई करा अन इशारा द्या मावळ्यांना लढण्यासाठी. आपल्याला लवकरात लवकर गड गाठायचा आहे. तिकडे घोड खिंडीत बाजी फुलाजी आपल्या इशारतीची वाट बघत असतील."

"जी राजं.", म्हणत सावजी बाजूला झाला.

हातातली तलवार वर उगारली. अन मावळ्यांना हर हर महादेव च्या गजरात शत्रूच्या दिशेने तलवार दाखवत हल्ला करण्याचा इशारा दिला. सोबत आणलेले कर्णे जोरजोरात फुंकत अन "हर हर महादेव", "जय भवानी" अशा आरोळ्या ठोकत मावळे सुर्व्यांवर चालून जाऊ लागले. तीनशे साडे तीनशे बांदल एकाच वेळी सुर्व्यांच्या सैन्यावर तुटून पडले. अचानक आलेल्या शिवाजी राजेंच्या मावळ्यांच्या वावटळीने सुर्व्यांच्या सैन्याची त्रेधा तिरपीट उडाली. काहींना तर हातात शस्त्रही घेण्याची संधी मिळाली नाही. सावध असलेल्या काही सैनिकांनी फळी उभारून निकराचा लढा चालू केला. तलवारींवर तलवारी खणाणू लागल्या. सुर्व्यांचं सैन्यही याच मराठी मातीतलं, राकट अन चिवटही. काही केल्या मागे हटेनात. राजे दोन्ही दांडपट्टा गरगर फिरवत पुढे पुढे सरकत होते. स्वतःभोवती जणू हात दोन हाताचं सुरक्षा कवचच उभं केलं होतं, अशा सफाईदारपणे दांडपट्टा फिरवत होते. समोर येणार शत्रू अंगावर वार होऊन बाजूला पडत होता. राजांच्या आजूबाजूलाही अंतर ठेऊन दहा पंधरा मावळ्यांचं पथक राजांना साथ देत होतं. अन तेवढ्यात समोरून झाडाझुडपांतून हर हर महादेव अशा आरोळ्या ठोकत गडावरचे मावळे सुर्व्यांच्या सैन्यावर तुटून पडले. दोन्ही बाजूने होणारा हल्ला पाहून सुर्व्यांचे सैन्य बिथरले. अन सैरावैरा वाट मिळेल तसे धावू लागले. पण जवळच असलेल्या दळव्यांच्या सरदाराने सैनिकांची जमवजमाव केली अन तीन चारशे सैन्य घेऊन लढाईचं मैदान गाठलं. आलेल्या कुमकेने सुर्व्यांच्या सैन्याचे मनोबल वाढले अन ते पुन्हा निकराने लढू लागले. आता आमने सामने ची लढाई चालू झाली होती. जो जिंकेल त्याची सरशी. नव्या दमाच्या आलेल्या शत्रू सैन्याने केलेल्या जोराच्या हल्ल्याने मावळ्यांची पीछेहाट होऊ लागली.

दुपार टळून संध्याकाळ होऊ लागली होती. पळून पळून दमलेले उपाशी तापाशी देह, त्यात ना धड विश्रांती अन लगेच हातघाईची लढाई. शरीरं थकली होती, रेटा कमी पडू लागला होता, सपासप वार होतं होते. तलवारींचा खणखणाट, आरडा ओरडा, अन हल्लकल्लोळ माजला होता.
'हाना मारा'
'हर हर महादेव'
'जय भवानी'
अशा आरोळ्यांनी सावजी आपल्या बांदल मावळ्यांना प्रोत्साहन देत नेटानं एक बाजू लढवत होता. काहीही झालं तरी राजांना सुखरूप गडावर पोहोचवणं महत्वाचं होतं. आता मावळ्यांची शक्ती कमी पडू लागली होती. दळव्यांची सेना कडवा प्रतिकार करत होती. राजेही आता बराच वेळ दांडपट्टा चालवून दमले होते. गडावरून अजून कुमक येण्याची शक्यता नव्हती. तोफा उडवूनही आपल्याच जीवितास धोका होता. अन मागूनही कोणी मदतीला येईल म्हणून आशा मावळल्या होत्या. घाई एवढ्यासाठी होती कि, सिद्दी मसूद ने जर गाठले तर मात्र पुन्हा पलायनाशिवाय पर्याय नव्हता. आणि आता पुन्हा माघारी पळणं शक्य नव्हतं. मावळ्यांच्या संरक्षणात राजे थोडा वेळ एका दगडावर विश्रांती साठी थांबले होते. विचारचक्र चालू होती. आता काय पावित्रा घ्यावा? आपल्या जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांचा जीव असा हकनाक शत्रूच्या पुढ्यात ठेऊन चालणार नव्हतं. वेळ दवडणे धोक्याचे होते.

राजांनी एका मावळ्याला बोलावून सांगितले, 'सावजीला सांगा तूर्तास माघार घ्या. जंगलाचा आसरा घ्या. नाहीतर उगाच सगळ्यांना जीव गमवावा लागेल. चला घाई करा.'

राजे काही बांदल सैनिकांसोबत हळू हळू रण मैदान सोडून मागे हटू लागले. सावजीला निरोप मिळताच त्याने मावळ्यांना माघारी वळण्यास सांगितले.

'आरं.. चला... फिरा माघारी.. पळा... '.

तोच माघारी पळणाऱ्या मावळ्यांना पाहताच शत्रू सैन्याला आणखीच चेव आला. जे जे घोड्यावर स्वार होते त्यांनी पळणाऱ्या मावळ्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. दळवींच्या सरदाराने राजांच्या दिशेने घोडी वळवली. अन अचानक समोरील झाड झुडपांतून येणाऱ्या घोड्यांच्या खिंकाळयांनी शत्रूंची घोडी जागेवरच थबकली.

क्रमश:

"जय जिजाऊ"
"जय शिवराय"

(माहिती - वाचकांनी नोंद घ्यावी. ही कथा, निनाद बेडेकर यांच्या युट्यूब वरील शिवचरित्रातील बाजी प्रभू देशपांडे यांच्या प्रसंगावर लिहिलेली आहे. काही प्रसंग काल्पनिक आहेत. अधिक माहितीसाठी त्यांचे युट्युब वरील व्याख्यान ऐकावे ही नम्र विनंती. लिंक : https://youtu.be/_jEj6YYAOJQ)