विरह - भाग ६ Ishwar Trimbak Agam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विरह - भाग ६

भाग ६ - विरह

प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.

सदरेवर कारस्थानं शिजू लागली होती. राजांनी मुख्य सरदार अन कारभारी मंडळी यांच्यासोबत मसलती करून योजना नक्की केली होती. हजार दिड हजार मावळ्यानिशी लालमहालावर छापा घालून शास्ताखानाला संपवायचा कट नक्की झाला होता. आधीच एका सरदाराला शे दोनशे मावळ्यांसह शास्ताखानाच्या फौजेत सामील होण्यासाठी धाडून दिलेले होते. दिवस अजून ठरला नव्हता. इकडे शिवाला पारूला भेटायची आस लागली होती. एक एक दिवस कसाबसा ढकलत होता. सुभेदार येसाजी कंक यांच्याकडे दोन तीन वेळा, 'एकदा गावी जाऊन येतो' म्हणून शब्द टाकला होता. मोहिमेची गडबड चालू होती, त्यामुळे सुभेदारांनी शिवाला आत्ताच जाता येणार नाही म्हणून सांगितले होते. शेवटी खूप गयावया करून आणि दोन दिवसांत माघारी येण्याच्या वायद्यावर येसाजींनी शिवाला जाण्याची परवानगी दिली. गडाचे दरवाजे उघडताच शिवाने घोड्याला टाच दिली अन भरधाव आपल्या गावाकडे दौडू लागला. दुसऱ्या दिवशी गडाचे दरवाजे बंद व्हायच्या आधी शिवाला पुन्हा माघारी परतायचं होत. दिवसभराची दौड करून शिवा अन त्याचा घोडाही थकला होता.

सूर्य मावतीकडे झुकू लागला होता. गावाची वेस नजरेस पडू लागली होती. मंद मंद पावलं टाकत शिवाचा घोडा गावात प्रवेशला. शिवाने पहिल्यांदा आपल्या मित्राच्या घरी जाऊन पारुला कळवायला सांगितलं. अन सरळ घरी जाऊन आई अन आबांना भेटला. खूप दिवसांनी घरी आलेलं आपलं पोर पाहून आई बापाला खूप आनंद झाला होता. अंगावर मावळ्याची कपडे आली होती, कमरेला तलवार, खंजीर अन पाठीवर जाडजूड ढाल. मांडीखाली भारदस्त अरबी घोडा. शिवाच्या बापाची तर अभिमानाने छाती भरून आली होती. राजांच्या सैन्यामध्ये मावळा म्हणून आपलं पोर गेलंय हेच त्याच्यासाठी खूप होत. साऱ्या गावात तो अभिमानाने मिरवत असे. गप्पा मारता मारता जेवण वगैरे आटोपलं. उद्या सकाळीच पुन्हा माघारी फिरायचं आहे, असं शिवाने सांगितल्यावर त्यांचा चेहरा पडला. पण पंधरा एक दिवसांत मोहीम पार पडली की, लागलीच घरी येईन म्हणून शिवाने सांगितलं.

रात्रीचा पहिला प्रहर संपत आला होता. चंद्राचा शितल प्रकाश धरणीवर पडला होता. आकाश चांदण्यांनी भरून गेलं होतं. शिवा रानातल्या झोपडी बाहेर असलेल्या बाजेवर चंद्राकडे बघत, पारूच्या आठवणीत रममाण झाला होता. पारूला भेटण्यासाठी जीव कासावीस झाला होता. पुनःपुन्हा तो पारू नेहमी येत असलेल्या वाटेकडे पाहत होता. अन अचानक ,"शिवा ssss" म्हणत पारू धावत शिवाकडे झेपावली. झटकन बाजेवरून उठत शिवाने पारुला घट्ट मिठी मारली. दोघेही प्रेमाश्रुंनी न्हाऊन निघत होते. एवढ्या दिवसांचा विरह अन काही क्षणाचं मिलन. मनाची बेचैनी अन जीवाची हुरहूर वाढवून जात होतं. बराच वेळ पारू तशीच शिवाच्या मिठीत होती.
"अंग वेडाबाई... आता काय झालं रडायला? माघारी ईन म्हून सांगितलं व्हतं नव्हं."
पारू मुसमुसतच बोलू लागली, "हम्... इथं एक एक दिस मी कसा काढत होते? माझं मलाच माहित."
बराच वेळ दोघेच बाजेवर बोलत बसले होते. शिवा आकाशाकडे पाहत गडावरच्या गमतीजमती सांगत होता. पारू त्याच्या शेजारी हाताची उशी करून त्याची भरदार छाती कुरवाळत होती. खूप दिवसांनी असा एकांत मिळाला होता. चंद्राच्या प्रकाशात पारूच्या चेहरा उजळून निघाला होता. शिवाच्या घाऱ्या डोळ्यांत पारू स्वतःला हरवून गेली होती. कपड्यांचा अडसर दूर झाला. पारुचा कोमल स्पर्श शिवाच्या अंगावर शहारे उठवून जात होता. तर शिवाच्या मजबूत बहुपाशांत पारू स्वर्ग सुख अनुभवत होती. हवेची थंडगार झुळूक अंगाला झोम्बत होती तर एकमेकांच्या उष्ण श्वासांनी वातावरण धुंद होऊन गेलं होत. तृप्तीचा आनंद पारूच्या चेहऱ्यावर झळकत होता. प्रेमवर्षावात दोघेही चिंब चिंब न्हाऊन निघत होते. चंद्राच्या प्रकाशात शरीरं कधी एकरूप झाली कळलंही नाही. पहाट होत आली होती. शिवाने स्वतःला पारूच्या मिठीतुन अलग केले. महिन्याभरात मोहीम फत्ते करून पुन्हा भेटायला यायचं वचन दिलं. भरल्या डोळ्यांनी शिवाने पारुचा निरोप घेतला. घरी आई आबांचा आशीर्वाद घेतला अन शिवा राजगडाकडे दौडू लागला.

क्रमशः