Baji - A blood war - 8 books and stories free download online pdf in Marathi

रक्तरंजित रणसंग्राम - भाग-८

भाग ८ - रक्तरंजित रणसंग्राम

(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.)

रात्रीचा दुसरा प्रहर, काळोखी रात्र, घनदाट वनराई, मिट्ट अंधार, रातकिड्यांची किरकिर अन सोबत पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. वाटा निसरड्या झालेल्या होत्या. नाईकांच्या हेरांनी आधीच निश्चित केलेल्या वाटेवरून मार्गक्रमण चालू होते. ठीक ठिकाणी आधीच हेर पेरून ठेवलेले होते. शिवाय, ठरवलेल्या वाटेवर थांबलेले मावळे हातात मशाली घेऊन उभे होते. जसे बाजी अन त्यांचे सोबती येताना दिसतील तेव्हाच मशाली पेटवायचे अन सगळे त्या वाटेवरून गेले की लगेच विझवून टाकायचे. त्यामुळे गडाखाली असलेल्या शत्रूच्या पाहरेकऱ्यांना कशाची चाहूल लागायला नको. हेरांनी आणलेल्या खबरीनुसार सिद्दी मसूद ज्या छावणी मध्ये तळ ठोकून होता, त्याच बाजूने हल्ला करायचं नक्की झालं होतं. तो दिवस होता पळण्याचा अन आज होता पळवण्याचा. त्या दिवशी बाजी मसुदला पाठीवर घेऊन पळत होते, आज मात्र छातीवर घेणार होते. छावणी मधे ठीक ठिकाणी पडलेल्या डेऱ्यांच्या आजूबाजूला ठेवलेल्या मशालींच्या ज्वाळा आता दृष्टिपथात येऊ लागल्या होत्या.

इशारा होताच मावळ्यांनी एकाच वेळी जोरजोरात कर्णे फुंकायला सुरुवात केली. त्यातच 'हर हर महादेव' अन 'जय भवानी' चा जयघोषही घुमू लागला. अचानक कर्ण्यांच्या अन अन आरोळ्यांच्या आवाजाने शत्रू सैन्य भयभीत झालं. अन त्याच वेळी मावळ्यांनी हल्लाबोल केला. समोर येणारे काळ्या कपड्यांतील मावळे म्हणजे जंगली भुतचं भासत होती. मावळ्यांचा आवेश एवढा जबरदस्त होत कि, तिथं पडलेला तळ पूर्णपणे उध्वस्त झाला.
"शैतान आये .. शैतान आये ... "
"मरहट्टे आये.. मरहट्टे आये .."
"भागो... भागो...", म्हणत आदिलशाही सैन्य वाट फुटे तिकडं सैरावैरा धावू लागलं. काही तर मागच्या मागे जंगलात पळत सुटले. बाजी अन काही निवडक मावळे सिद्दी मसूदच्या डेऱ्याकडे सरकत होते. तोपर्यंत सगळीकडे बोभाटा झाला होता. सिद्दी मसूद झोपेतून कसाबसा जागा झाला.
"या अल्ला... चैन से सोने भी नहीं देते ये मरहट्टे ।"
अन हुजऱ्यावर ओरडला, "जाओ.... बाकी सैनिकोंको आगा कर दो । और वो दळवी और सुर्वे सरदारोंको भी जल्दी से जगाव । जा ssss व ।"
डेऱ्या बाहेर घोडा तयार होता. घाई घाईत मसूद बाहेर पडला. हळू हळू आदिलशाही सैन्य जमा होऊ लागलं.

सिद्दी मसूदचा डेरा जवळ येऊ लागला होता. बाजींनी दोन्ही हातात तलवार पेलली होती. समोर जर चुकून एखादा गनीम आलाच तर बाजींच्या ताकतवर वाराने जागीच कापला जात होता. तोच डेऱ्याच्या बाहेर सिद्दी मसूद घोड्यावर चढताना बाजींच्या नजरेस पडला.
बाजींनी "हर हर महादेव" म्हणत त्याच्या दिशेने धाव घेतली. मावळेही बाजींच्या साथीनं पळत होते. एवढ्या वेळात शत्रूच्या पलीकडच्या छावणीत असलेल्या सैनिकांना खबर पोहोचली होती. सैन्य गोळा होऊ लागलं होतं. काही क्षणांत बाजींनी मसूदला गाठलं.
"आ ही गये ये मरहट्टे । जलद से जल्द सैनिक भेजो जाओ l" मसूद आजूबाजूला जमलेल्या सैन्यावर ओरडू लागला.
"आरं... बगताय काय? हाणा.. मारा ... ", बाजींनी आरोळी ठोकली.
मसूद बरोबरच्या तुकडीची अन बाजींच्या पथकाची गाठ पडली. हाणा मारी चालू झाली. मसूद घोड्यावरून तलवार फिरवत होता. तर बाजींसमोर येणारा सपासप कापला जात होता. ज्यांनी ज्यांनी घोडखिंडीत बाजींचा रुद्रावतार पहिला होता ते तर "शैतान आया.. शैतान आया.. " म्हणत, दूर पळू लागले. . आता सिद्दी मसूद अन बाजी समोर समोर होते. मसूदचा घोडा कधीच गारद झाला होता. एका हातात ढाल अन दुसऱ्या हाती तलवार घेऊन मसूद बाजींसमोर उभा ठाकला होता. पहिला वार बाजींनी केला. वार एवढा जबरदस्त होता कि, मसूद एक दोन पावलं मागेच सरकला.
"काफर कि *** । जैसे तेरे भाई तो जहन्नुम ने भेजा था । वैसे, तू भी जायेगा ।"
"आरं जा रं कुत्र्याची अवलाद.. आज तर तुला जित्ताच सोडत न्हाय. जन्नतच दावतु तुला.."
खण खण आवाज घुमू लागले. मसुदही बाजींच्या वाराला प्रत्युत्तर देत होता. बाजींचा दुसरा वार ढालीवर झेलत होता. पण बाजींसमोर मसूदच्या निभाव लागेना. बाजींच्या एका एका वारसरशी मसूद मागे मागे हटत होता. पलीकडे "दीन दीन" म्हणत मसूदचे पलीकडच्या छावणीतले सैन्य जमा होऊ लागलं होत. मसूद हसत हसत बाजींचे वार झेलत होता. तोच एका ताकतवर वाराने मसूदची तलवार खाली पडली. अन दुसरा वार मसूदच्या छाताडावरच झाला.
"या अल्ला ssss", म्हणत सिद्दी मसूद मागे कोसळला.
मागच्या मागे मसूदला त्याच्या सैन्याने पकडलं अन दूर घेऊन जाऊ लागले. तोच शे दोनशे शत्रू सैन्य मावळ्यांच्या सामोरं आलं. तुंबळ लढाई चालू झाली. बाजींसोबत फक्त पन्नास साठ मावळा होता. बाजी आज पुन्हा एकदा गरगर तलवार फिरवत होते. जखमी मसूदला घोड्यावर टाकून दुसऱ्या छावणीकडे नेण्यात आलं.
बाजी तलवारी फिरवतच होते. सामोरा येणारा गनीम जखमी होऊन पडत होता.
'आज पळणे नाही. जीव गेला तरी बेहत्तर पण मागे हटने नाही.'
तोच एक मावळा बाजींच्या जवळ येऊन म्हणाला, "बाजी, गनीम लय हाय. आणि समोरून आणखी येत्यात. चला बाजी.. चला.."
पण बाजी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आज पुन्हा एकदा रुद्र संचारला होता अंगात. लढता लढता बाजी शत्रूच्या गराड्यात जाऊन पोहोचले. त्यांच्यात अन मावळ्यांच्यात अंतर पडू लागलं. शत्रूची संख्या वाढू लागली. मावळे मागे हटू लागले. बरेचसे मावळे धारातीर्थी पडले होते. उरलेले पंचवीस तीस कसे बसे निसटून जाण्यात यशस्वी झाले. बाजी माघार घ्यायला तयार नव्हते. एव्हाना आता बाजींना माघारी परतणं अशक्य झालं होतं. आजूबाजूला सारा आदिलशाही सेनासागर जमला होता. फिरवून फिरवून तरी किती वेळ तलवार फिरवणार? बाजींच्या हालचाली मंद होऊ लागल्या. कुणी संधीचा फायदा घ्यायचं, अन सपकन बाजींच्या पाठीत वार करायचं. जखमी झालेलं अन दमलेलं शरीरं पेलणं आता बाजींना शक्य होईना. तलवारीच्या वारासह बाजी भेलकांडू लागले. संधी मिळताच बाजींवर वार होत होते.

"मारो.. काटो... काफर कि ***.. " गोंधळ चालू होता.

महादरवाजाकडे तोंड करत बाजींनी गुडघे टेकले.


"राजं...

माफ करा या बाजीला...

पर जातु आता...

आमची येळ भरली राजं...

दादा बी वाट बगत आसलं आता...

आमच्या हातानं एवढीच सवराज्याची सेवा झाली...

पर तुमी हाय ना राजं...

सांभाळा सवराज्य..."


महादरवाजाच्या बुरुजाकडे बघत बाजी म्हणाले, "राजं... ह्यो बाजीचा शेवटचा मुजरा.'

तलवार खाली पडली. डोळे मिटले, अश्रू चिखलात मिसळून गेले. उजवा हात कपाळाला टेकला. राजांना मुजरा झाला. तोच समोरून एक गनीम ओरडत तलवार उगारत बाजींवर धावला. दुसऱ्या क्षणी बाजींची डाव्या हातातली तलवार सपकन घुमली. समोरच्या हशमाचं मुंडकं उंच उडालं. एवढा वेळ आजूबाजूला चाललेला गोंधळ अचानक थांबला.

तलवार पडली... श्वास थंडावला... देह कोसळला...

बाजीप्रभू देशपांडे नावाचं वादळ शांत झालं. तिकडे फुलाजींनी घोडखिंड पावन केली तर इकडे बाजींच्या रक्तानं विशाळगडाचा पायथा पावन झाला.

- समाप्त -

"जय जिजाऊ"
"जय शिवराय"

(माहिती - वाचकांनी नोंद घ्यावी. ही कथा, निनाद बेडेकर यांच्या युट्यूब वरील शिवचरित्रातील बाजी प्रभू देशपांडे यांच्या प्रसंगावर लिहिलेली आहे. काही प्रसंग काल्पनिक आहेत. अधिक माहितीसाठी त्यांचे युट्युब वरील व्याख्यान ऐकावे ही नम्र विनंती.)

(संदर्भ :
श्रीमानयोगी, पावनखिंड - रणजित देसाई,
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
शिवचरित्र - निनाद बेडेकर (https://youtu.be/_jEj6YYAOJQ)
शिवराय - नामदेवराव जाधव,
शिवरायांच्या स्फूर्तिकथा - शांताराम कर्णिक)

- ईश्वर त्रिम्बकराव आगम
वडगांव निंबाळकर, बारामती
भ्रमणध्वनी - ९७६६९६४३९८

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED