मी एक अर्धवटराव - 13 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 13

१३) मी एक अर्धवटराव!
ऊतू जाणारे दूध! या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व नवरे मंडळीचे मनापासून अभिनंदन! या परीक्षेला यशस्वीपणे वा अयशस्वीपणे सामोरे गेलेल्या पतीराजांना अजून एका परीक्षेला नेहमीच सामोरे जावे लागते ती म्हणजे भाजी आणणे! काही वेळा तर एक वेळ दूध परवडले पण भाजी खरेदी नको अशी माझ्यासारख्या अनेक नवऱ्यांची स्थिती होते. कितीही पायपीट करून, घासाघीस करून, पाहून- निरखून, हाताची बोटे लालभडक होईपर्यंत सांभाळून आणलेल्या पिशव्या, हाताला, खांद्याला लागलेली कळ हे सारे सोसून भाज्या आणल्या तरीही शाबासकी म्हणून काय मिळते तर बायकोने भाज्यांकडे बघत कडकड मोडलेली बोटे आणि साता जन्माचा उद्धार! 'एक मानव दाखवा मजसी, बायकोने गौरवले असेल आणलेल्या भाजीसी!' अपवादात्मक स्थितीत तोंडदेखले कौतुक, नाइलाजास्तव करावे लागलेले भाज्यांचे गुणगान, चारचौघात नवऱ्याचे अवगुण, त्याचा धांदरटपणा सांगणे नको त्यापेक्षा पोटातच ठेवलेले बरे किंवा नवऱ्याच्या भीतीपोटी केलेली स्तुती अशा काही प्रसंगी झालेले कौतुक ही बाब निराळी! हे सोडले तर भाज्या घेऊन थकूनभागून आलेल्या पतीला पाण्याचे घोट गिळताना शिव्यांचे लोटही गिळावे लागतात. असू शकतात, नाही असे नाही तर अनेक पुरुष असेही आहेत की, ज्यांना कपड्यांची पारख खूप छान असते. बरेच लोक संसारोपयोगी वस्तुंची योग्य अशी निवड करु शकतात. बायकोच्या पसंतीला उतरतील अशा भाज्या आणणारे, भाज्यांसाठी बायकोवास सोसण्याची वेळ न येऊ देणारे असेही अनेक नवरे आहेत. अशा नवरे मंडळीस माझी एक कळकळची विनंती अशी आहे की, कृपया आपण 'बायकोला आवडणाऱ्या' वस्तू कशा खरेदी कराव्यात असे एखादे पुस्तक लिहून प्रकाशित करावे किंवा त्या संदर्भात शिकवणी वर्ग सुरू करावेत. खात्रीने सांगतो, छप्पन इंच नसलेली छाती बडवून सांगतो की, एवढी उडी पडेल, अशी गर्दी होईल ना की ज्याचे नाव ते! बरे, बायकोकडून भाज्यांना बायकोने लावलेली विशेषणे कमी आहेत का? ताज्या, शिळ्या, नासक्या, कुजक्या, रसरशीत, उतरलेल्या, लहान-मोठ्या अशा अनेक प्रकारांमधून बायकोच्या पसंतीस उतरणारी भाजी आणणे हे एक फार मोठे दिव्यच आहे. मला वाटते 'नमनाला घडीभर तेल' खूप झाले...
त्यादिवशी मी नेहमीप्रमाणे वेळ आणि पैसा खर्चून आणलेल्या सर्व भाज्या फरशीवर पसरून सौभाग्यवती निरीक्षण करीत होती. माझी अवस्था मात्र प्रेयसीला दिलेले पहिलेवहिले प्रेमपत्र तिच्या हातात न पडता तिच्या खडूस बापाच्या हातात पडल्यानंतर त्याच्यासमोर दीनवाणे उभे राहिलेल्या प्रियकराप्रमाणे झाली होती. येणाऱ्या प्रसंगाचा, धडाडणाऱ्या तोफांचा सामना कसा करावा या विचाराने हातात भ्रमणध्वनी घेऊन त्याच्याशी चाळा करीत होतो. तितक्यात आमच्या शेजारी असलेल्या जिन्यावर कुणाची तरी पावले वाजली. आमची सदनिका पहिल्याच मजल्यावर असल्याने येणारी-जाणारी प्रत्येक व्यक्ती देवळापुढून जाताना मंदिरात जशी डोकावते तसे आमच्या घरात डोकावण्याचा जणू नियम केल्याप्रमाणे डोकावून पुढे जाते. बरे, आमचेही कसे झाले बघा ना, कुणाचीही चाहूल लागली की, आम्ही दोघेही वाकून पाहतो. काहीही देणेघेणे नसते पण सुरुवातीची उत्सुकता नंतर सवय बनून गेली. तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरणाऱ्या काकूंनी आत डोकावून विचारले,
"भाज्या निवडताय वाटते?" खरेतर हा प्रश्न अत्यंत निरर्थक असाच कारण समोर एखाद्या भाजी विकणाऱ्या बाईप्रमाणे माझी बायको भाज्या पसरवून फतकल मारून बसलेली दिसत असतानाही हा प्रश्न विचारून उत्तराची वाट न पाहता आणि कुणीही 'या ना' असे न म्हणता काकू घरात शिरल्या. घरात कुणीही स्त्री आली की, मी दिवाणखान्यात बसलेलो असेल तर मी उठून ताबडतोब शयनगृहात जावे हा नेहमीचा शिरस्ता मी पाळला. काकूंचा आवाज आला,
"कुणी आणल्या हो भाज्या? आमच्याकडे की नाही, भाजी मीच जाऊन आणते. यांना आणा म्हणायची सोयच नाही हो. भाज्या कमी आणि कचराच जास्त येतो..."
"आमच्याकडे तोच प्रकार आहे. बघा ना, कशा नासक्या, कुजक्या, सडक्या भाज्या आणल्यात..."
"अहो, आमच्या यांच्यापेक्षा लाखपटीने बऱ्या. किमान पन्नास टक्के भाज्या तुम्हाला उपयोगात आणता येत असतील..." काकुंचे बोल ऐकून मी गदगद झालो.
"काय झाले, परवा मला गुरुवारचा उपवास होता. यांना म्हणाले की, लिंब आणा. हे काय घेऊन आणले असतील..."
"लिंबच असतील पण निव्वळ सडकी असतील..."
"तेही चालवून घेतले असते हो, पण आमच्या अर्धवटरावांनी चक्क अंडी आणून थेट फ्रीजमध्ये ठेवली हो." काकू हसत म्हणाल्या. मला वाटले, चला आपण एकटेच अर्धवटराव नाही आहोत. तिकडे काकू सांगत होत्या,
"वर म्हणतात कसे, मला वाटले तुला एखाद्या बुवाने अंडी उतरवून टाकायला सांगतिले असेल..."
"काकू, तुम्ही अंडी खाता हे तर माहितीच नव्हते. ब्रेकिंग न्यूज आहे ही तर..." तिथे आलेली एक स्त्री म्हणाली. पाठोपाठ आलेल्या महिलेने माझ्या बायकोला विचारले,
"काकू, तुम्ही आणलीत का भाजी? किती टवटवीत, ताजी भाजी आहे हो?"
"मी कशाची आणतेय? मला कुठेय वेळ..."
"म्हणजे काकांनी आणलेय. अरे व्वा! कमाल आहे, काका, एवढी चांगली भाजी आणतात? आमच्या ह्याने आणलेल्या भाज्यांमध्ये सागरामध्ये मीठाचा खडा शोधल्याप्रमाणे ताजे, टवटवीत, लुसलुशीत असे वाण शोधावे लागते..."
"तुम्ही जात नाहीत का मग बाजारात?" सौभाग्यवतीने विचारले
"शीः बाई, कित्ती घाण, कुजकट, सडका वास येतो ना त्या भाजीबाजारात. मला तर बाई चक्क ओकारीच येते. दुसरे सांगू काय त्या कमी जागेत ना, पुरुष बरोबर मोका साधून असा धक्का मारतात ना. बरे काही बोलताही येत नाही..."
"मी नेते बाई माझ्या नवऱ्याला सोबत... भाज्यांच्या पिशव्या धरायला!..." ती बाई बोलत असताना मला तीन चार दिवसांपूर्वींचा प्रसंग आठवला...
मी नेहमीप्रमाणे भाजीबाजारात शिरत असताना मला ह्याच बाई नवऱ्यासोबत दिसल्या. नवऱ्याच्या दोन्ही हातात भाज्यांनी गच्च भरलेल्या पिशव्या होत्या. ह्या बाईसाहेब मात्र मैत्रिणीशी बोलण्यात दंग होत्या. मी पुढे सरकलो. मला हव्या असलेल्या भाज्या घेतल्या तरीही अर्धा तास लागला. मी परत निघालो. पाहतो तर काय हे त्रिकुट त्याच जागेवर उभे होते. नवरा बिचारा अवघडलेल्या स्थितीत दोन्ही हातात पिशव्या घेऊन उभा होता तर मैत्रिणींच्या गप्पांचा फड संपत नव्हता. माझी आणि तिच्या नवऱ्याची नजरानजर झाली. मी केलेल्या स्मितहास्याला त्याने केविलवाणे हसत उत्तर दिले. मी घरी परतलो...
तिकडे दिवाणखान्यात संवाद रंगात आलेला होता. एका बाईने विचारले,
"मला एक समजत नाही, हे पुरुष अशी अर्धवट कामे, कामचुकारपणा का करत असतील हो?"
"पुन्हा बायकोने काम सांगू नये म्हणून..." ती बाई हसतहसत म्हणाली.
"खरे कारण तुम्हाला कुणालाच माहिती नाही..." काकू हसतच म्हणाल्या.
"म्हणजे? अजून वेगळे कारण आहे का?"
"तर मग? बहुतेक सारे भाज्यांची खरेदी भाजीवाल्या बाईकडूनच करतात ती ही एखाद्या तरूण- नखरेल बाईकडून! ती बाई मस्तपैकी ओठांचा चंबू करून मधाळ आवाजात, गुलुगुलु बोलताना, मानेला आणि केसांना झटका देत डोळे गरगर फिरवून गिऱ्हाईकांच्या डोळ्यात डोळे घालून..."
"हो. हो. काकूंचे बरोबर आहे. मी ह्यांना घेऊन भाजी आणायला जाते ना, तेव्हा हे काहीच कुरकुर करत नाहीत. माझी नजर चुकवून तिच्या नजरेत नजर मिसळतात. घरी आल्यावर कुलूप काढायला क्षणाचाही उशीर झाला की मग असे कासावीस होतात ना..."
"तुम्ही सोबत असताना म्हणून ठीक हो पण जी माणसे बाजारात जातात ना ते त्या नखऱ्यांना भुलून बर्फ विरघळावा तसे विरघळून जातात ...
"आणि मग न खपणारा माल घेऊन येतात नि मग निसता, निवडता आपल्या नाकीनऊ येतात. चला. कशीही का असेना भाजी गिळायला मिळते हेच खूप आहे. चला. भाजी करायची आहे..."
"सडक्या भाजीची... " कुणीतरी म्हणाले आणि तो भाजीसत्राचा विशेष तास संपला...
एक एक करीत साऱ्या बायका निघून गेल्या. बायकोने भाज्या निवडायला घेतल्या. मला दिवाणखान्यात आलेले पाहताच म्हणाली,
"काय करावे बाई या आठवणीला. वांग्याची भाजी करायची होती पण परवा आणलेले वांगे आतच विसरले. अहो, जरा आतून चार पाच वांगी आणा ना..."
"दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडेपाषाण! मला सारखे 'अर्धवटराव' म्हणून हिणवतेस आणि आता हे कशाचे लक्षण आहे?"
"आता वांगी आणणार आहात की मला हिणवणार आहात..." ती बोलत असताना मी धावतच आत गेलो आणि चार पाच वांगी उचलून घेऊन आलो. वांगी तिच्यासमोर टाकून वळतो न वळतो तोच ती कडाडली,
"झाले! पुन्हा अर्धवट काम! वांगी सांगितली तर बटाटे आणलेत..." मी पटकन वांगी समजून तिच्यासमोरची कोथिंबीर उचलत असल्याचे पाहून ती पुन्हा खेकसली,
"काय करावे आत्ता! अर्धवटमहाराज, बटाटे नेऊन वांगी आणायची असताना तुम्ही कोथींबीर कशाला उचलता?" ते ऐकून मी जुडी खाली ठेवली आणि बटाटे उचलत असताना तिने विचारले,
"आता काय आणणार?"
"त्या काकूंसाठी अंडी..." मी हसत म्हणालो. तीही हसण्यात सामील झाली. मी आत जाऊन वांगी घेऊन आलो. ती पाहून ही ओरडली,
"बघा.बघा. हे वांग. अर्ध्या किलोचे एक! वांगी कशी कोवळी, ताजी, रसरशीत असली पाहिजेत. ही बघा कशी निब्बरडग आहेत ते."
"कसे आहे, आणताना प्रत्येक गोष्ट बारीक, कोवळी, ताजी नि रसरशीत असतात पण कालांतराने ती गोष्ट निब्बरडग होते ग. निसर्ग नियम आहे तो..." मी तिच्याकडे बघत म्हणालो त्यातला मतितार्थ जाणून तीही हसली पण लाजत! काही क्षणात भाज्या बळी जाण्यासाठी सिद्ध होताच बायको स्वयंपाक घरात गेली आणि मी सुटकेचा श्वास घेतला.
@ नागेश सू. शेवाळकर