१५) मी एक अर्धवटराव !
'काय करताय? चला. जाऊ साडी घ्यायला... बाप रे! केवढ्यांदा दचकलात तुम्ही? अहो, मी तुम्हाला साडी घ्यायला येताय का असा साधा प्रश्न विचारला तर तुम्हाला जसे काय मी सीमेवर शत्रूशी लढायला नेतोय असा तुमचा चेहरा झाला. पण खरे सांगू का, तुमची अवस्था एकदम बरोबर आहे. बायकोबरोबर साडी घ्यायला जायचे म्हणजे किंवा बायकोसाठी तिला दुकानात न नेता स्वतःच्या पसंतीने साडी आणायची म्हटलं की, प्रत्येक नवऱ्याचा असाच थरकाप उडतो. नवऱ्याने मोठ्या प्रेमाने आणलेली साडी बायकोला पसंत पडेल याची शून्य टक्के खात्री असते. एखादा नवरा अमेरिकेत गेला म्हणजे आजकाल हे सहज शक्य आहे. तिथली कामे, वास्तव्य संपवून तो मायदेशी परतताना बायकोसाठी अमेरिकेत तयार झालेली, तिकडची फॅशनेबल साडी घेऊन येतो. घरी पोहोचतो. मोठ्या आनंदाने, उत्साहाने, कौतुकाने, अभिमानाने तिथून सांभाळून आणलेली, कदाचित ह्रदयाशी लावून आणलेली साडी बायकोच्या हातात देऊन म्हणतो,
"हे बघ. अमेरिकेत सध्याची लेटेस्ट डिझाइन असलेली साडी तुझ्याचसाठी आणलीय..." साडी हातात घेताना बायकोच्या डोळ्यात कौतुक असते, नवऱ्याने आठवणीने साडी आणली हा अभिमान असतो पण साडी हातात घेऊन काही क्षणातच तिचे निरीक्षण होत असताना ते कौतुक, तो अभिमान पार लयाला जातो आणि त्याठिकाणी नापसंतीचे भाव उमटतात. दुसऱ्या क्षणी ती चवताळून म्हणते,
"ही साडी? माझ्यासाठी? अमेरिकेतून आणली. अहो, अशा साड्या आपल्या इथे सेलमध्ये किलोवर मिळतात... किलोवर! मला बावळट समजलात? मी मुर्ख आहे? वेंधळी आहे? खेडूत आहे? वेडी आहे? अडाणी आहे की नालायक आहे?"
"अग... अग, बस. स्वतःच्या गुणांची अशी उधळण करु नकोस. काय झाले या साडीला? दुकानात ही साडी पसंत करून जेव्हा पैसे देत होतो ना, तेव्हा त्या दुकानात असलेल्या अमेरिकन बायका या साडीकडे आशाळभूत नजरेने बघत त्या दुकानदाराला म्हणाल्या की, "अहो, असा एखादा पिस असेल तर द्या ना..."
"खरे की काय? पण काय हो, त्या बायका 'असा एखादा पिस' साडीसाठीच म्हणाल्या की, असा वेंधळा, अर्धवट, सहज फसला जाणारा पिस म्हणजे तुम्हाला तर म्हणाल्या नाहीत ना? महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेतील बायका साड्या नेसतात हे अजून तरी पाहिले, ऐकले किंवा वाचले नाही. ते जाऊ द्या. मी निक्षून सांगते मी हे पोतेरे नेसणार नाही आणि घरातही ठेवणार नाही. कामवाल्या बाईला देऊन टाकते. ती नेसून मिरवेल सर्वत्र. मला तर शंका येतीय की मला खुश करण्यासाठी ही साडी अमेरिकेत नाही तर भारतात उतरल्यावर एखाद्या सेलमध्ये घेतली आहे. किंवा रेल्वेत जसे विक्रेते येतात ना, तसा एखादा विक्रेता विमानात साड्या विकायला घेऊन आला असेल आणि तुमच्या गळ्यात ही साडी मारून मोकळा झाला असेल. तुम्ही साडी खरेच अमेरिकेतून आणली असेल ना, तर पुन्हा जेव्हा अमेरिकेत जाल तेव्हा बदलून भारीची साडी आणा. समजले. विषय बंद! चर्चा नको..."
बघा. साडीपुढे नवऱ्याची काही तरी किंमत आहे का? परदेशातून कुणी पुरूषासाठी साधा हातरुमाल आणला तर आपण भेटेल त्याला दाखवत सुटतो पण या बाईंनी ताबडतोब विषय बंदही करून टाकला. चर्चेची दारेही बंद केली. पण आपले काय?
त्यादिवशी आमच्या सौभाग्यवती दुपारीच संक्रांतीची साडी खरेदी करायला गेल्या होत्या. मलाही 'चला ना गडे!' असा खूप लाडाने आग्रह केला होता. पण मीही तितक्याच प्रेमाने नकार दिला. त्याची शिक्षा म्हणून बाईसाहेब चक्क माझे एटीएम कार्ड घेऊन गेल्या होत्या. डोक्यावर हात ठेवून बसण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. बरे, कोणताही सण म्हटला की, प्रत्येक कंपनी, दुकानदार नानाविध प्रकारच्या सुट, सवलती जाहीर करतात. आपण नागरिकही त्या भूलथापांना बळी पडून वारेमाप खरेदी करून बसतो. अशा प्रकारे 'आवळा देऊन कोहळा काढण्याच्या' चक्रव्यूहात आपण बरोबर अडकतो. संक्रांतीचा सण आणि हेल्मेट सक्ती ह्या दोन्ही बाबी एकमेकांच्या हातात हात देऊन आल्या होत्या की काय देव जाणे! कारण सकाळी सकाळी आलेल्या वर्तमानपत्रासोबत एका छोट्या रंगीबेरंगी कागदावर एक जाहीरात आली होती त्यानुसार हेल्मेट सक्तीचा निर्णय लक्षात घेऊन शहरातील एका मोठ्या दुकानदाराने 'एका साडीवर एक हेल्मेट मोफत' अशी योजना जाहीर केली होती. मी दररोज काय करतो, वर्तमानपत्र आल्याबरोबर त्या सोबत आलेली अशा प्रकारच्या जाहिरातीची पत्रके मी बायकोच्या हातात पडूच देत नाही. अगोदरच त्या पत्रकांचा खातमा करून टाकतो पण त्यादिवशी माझे दुर्दैव नेमके आडवे आले. सुट्टी असल्यामुळे मी थोडा उशिरापर्यंत लोळत पडलो होतो. तिकडे दिवाणखान्यात बायकोही मला सुट्टी असल्यामुळे सारी कामे निवांतपणे करीत होती. आलेले वर्तमानपत्र आणि त्यातली जाहिरात नेमकी बायकोच्या हाती पडली. ती जाहिरात घेऊन बायको अत्यानंदाने शयनगृहात आली आणि म्हणाली,
"अहो, तुम्ही माझ्यासाठी हेल्मेट घेणार होतात ना, आता घ्यायची गरज नाही..."
"का? पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेटची गरज नाही असा सरकारने निर्णय घेतल की काय?"
"सरकार कसला असा निर्णय घेतेय. एक दुकानदार संक्रांतीनिमित्त साडीवर हेल्मेट फ्री देतोय..."
"म्हणजे तू साडी घेणार आहेस? अग, परवाच तर भारीची साडी ...."
"मग काय झाले? संक्रांतीची साडी नाही म्हणजे काय?"
शेवटी ती माझे एटीएम घेऊन साडी खरेदी करायला गेली. मी बिचारा गपगुमान बायकोच्या सवतींसोबत खेळत बसलो. अहो, दचकू नका. भ्रमणध्वनी, वर्तमानपत्र आणि टीव्ही ह्या गोष्टी बायकोच्या लेखी तिच्या सवतीच आहेत. पण छेः! काही केल्या कशातच मन रमत नव्हते. अचानक मला एक जुना परंतु साडी खरेदीचा प्रसंग आठवला...
माझे नवीन लग्न झाले होते. माझा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याच उत्साहाच्या भरात मी माझ्या बायकोला आमच्या लग्नानंतर पहिली साडी घ्यावी म्हणून दुकानात घेऊन गेलो. सायंकाळची वेळ होती. साडी खरेदीचा तसा कोणताही खास हंगाम नव्हता तरीही दुकानात बरीच गर्दी होती. काही क्षण वाट पाहताच एक नोकर आमच्या जवळ आला आणि आमच्यासमोर एक-एक करीत साडी टाकताना त्या साडीचे गुणविशेष रंगवून सांगत होता. एखादी साडी हिच्या हातात रेंगाळत असताना त्याच्या उत्साहाला भरते यायचे आणि तो आनंदी होत ती साडी पूर्णपणे उकलून दाखवू लागला. मधूनच साडी स्वतःच्या अंगावर, खांद्यावर पांघरून दाखवू लागला. परंतु तितक्यात माझ्या बायकोने मुरडलेले नाक, कपाळावर घट्ट झालेले आठ्यांचे जाळे पाहून तो दुसऱ्याच क्षणी हिरमुसला होत असे. मात्र पुन्हा नव्या जोमाने तो दुसऱ्या साडीचे गुण गायला सुरुवात करीत असे. परंतु कोणतीही साडी माझ्या बायकोला भुरळ घालू शकत नव्हती. एकदा तर त्या माणसाने माझ्या बायकोला दुकानातील मोठ्या आरशासमोर उभे केले. तिच्या खांद्यावर साडी टाकताना त्याचे हात नको तिथे रेंगाळत असल्याचे पाहून माझा राग अनावर होत होता. एकदा तर वाटले, असेच उठावे आणि त्याच्या कानाखाली आवाज काढावा. पण मी स्वतःला सावरले. संयमाने सारे घेतले. असे करता करता रात्रीचे नऊ वाजले तशी नोकरांची चुळबूळ वाढली. दुकान बंद करायची वेळ झालेली पाहून तो म्हणाला,
"बाईसाहेब, आतापर्यंत खूप साड्या दाखवल्या पण... जरा लवकर साडी पसंत करा ना, दुकान बंद करायची वेळ झाली आहे..."
"अरे, तू चांगली, फ्रेश साडी दाखवतच नाही तर पसंत कशी करु?" बायको बोलत असताना दुकानाचा मालक आमच्याजवळ येऊन म्हणाला,
"साहेब, दुकान बंद करायचे आहे. नियम फार स्ट्रीक्ट झाले आहेत. असे करा ना, सकाळी येता का? नाही तर असे करु या का, राग मानू नका पण आम्ही आता दुकान बंद करून जातो. सकाळी बरोबर नऊ वाजता येतो तोपर्यंत ताईंना नक्कीच एखादी साडी पसंत पडेल..." त्यावर तो स्वतः, सारे नोकर आणि खुद्द आमच्या बाईसाहेबही हसू लागल्या परंतु त्याच्या बोलण्यातील टोमणा माझ्या लक्षात आला आणि माझी मान मात्र लाजेने खाली गेली... असे आहे आमच्या पहिल्या साडी खरेदीचे पुराण ...
मी वैवाहिक जीवनात घडलेल्या अशा प्रसंगाची उजळणी करीत असताना एक बाई आमच्या घरात घुसली. डोक्यावर हेल्मेट घातलेल्या अवस्थेत ती म्हणाली,
"अहो, असे पाहताय काय? साडीवर हेल्मेट फ्री मिळाले. किती छान वाटतेय ना म्हणून ऑटोत येतानाही हेल्मेट घालूनच आले. अहो, हे कसे काढायचे हो? काढायला मदत करा ना..." ती म्हणाली तसा मी तिच्याजवळ गेलो. हेल्मेटचा आकार आणि सौच्या डोक्याचा आकार यात जमीन आस्मानचा फरक होता. मी थोडा जोर देऊन ते हेल्मेट काढायचा प्रयत्न केला. काही क्षणातच ते हेल्मेट निघाले पण बायको ट्यांहा.. ट्यांहा.. ओरडत कान धरून नाचायला लागली. काय झाले होते, मी जोर लावून हेल्मेट काढायचा प्रयत्न करीत असताना तिच्या एका कानातला डागिणा माझ्या हातात आला आणि जोरात ओढला गेल्यामुळे तिच्या कानाला जखम झाली. 'अर्धवटराव' या माझ्या स्वभावाप्रमाणे मी वागलो होतो...
@ नागेश सू. शेवाळकर