मी एक अर्धवटराव - 18 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 18

१८) मी एक अर्धवटराव!
सायंकाळची वेळ होती. मस्त थंडगार हवा सुटली होती. खिडकीतून बाहेर पाहिले की, छान पैकी पसरलेला संधीप्रकाश लक्ष वेधून घेत होता. तशा वातावरणात गॅलरीमध्ये आम्ही दोघेही गप्पा मारत बसलो होतो. बायकोचा मुड चांगला असला म्हणजे आम्ही दोघेही गॅलरीत नेहमीच बसतो. कधी चहा घेत. कधी वातावरण जास्तच आल्हाददायक असले तर गरमागरम भज्यांचा आस्वाद घेत. कधी मक्यांची कणसं खात तर कधी काही आणि उन्हाळ्यात तर दररोज तिथे बसून जेवणाचा आमचा नित्यक्रम ठरलेलाच. अचानक काही तरी आठवल्याप्रमाणे बायको म्हणाली,
"अहो, काल सायंकाळी तुम्हाला ब्लाऊजपीस आणि अस्तरचा कपडा आणायला सांगितले होते. आणला का हो?"
"कालच सायंकाळी आणला. मी आलो तेव्हा आपल्या घरी महिला मंडळ जमले होते म्हणून मी सरळ आत जाऊन आलमारीत ठेवूनही दिले. तुला दाखवावे म्हटलं तर उगीच नको त्या गोष्टींवर महिला मंडळ चर्चा करेल आणि तुझ्या झंपराची कीर्ती सर्वत्र पसरेल."
"तुमचे आपले काही तरीच! पण काल सर्वांसमोर दाखवले नाही ते बरेच झाले. उगीच आणण्यात काही बिघडले असते तर सर्वांसमोर न राहवून मी तुमची हजेरी घेतली असती तर नको ती चर्चा झाली असती. काल माझ्या लक्षात नाही राहिले. आता पाहते, काय दिवे लावलेत ते..." असे म्हणत ती आत गेली आणि मी वर आकाशाकडे पाहिले. हेतू हा की, 'हे परमेश्वरा, काल आणलेले सारे हिच्या पसंतीला पडू दे रे बाबा.' पण कसचे काय? माझी प्रार्थना सुरू होत नाही तोच एखादी तुफान मेल धडधडत यावी तशी बायको बाहेर आली. हातातला पसारा माझ्यासमोर फेकत कडाडली,
"वाटलेच मला. तुमच्याकडून कोणतेही काम धड होणारच नाही. एक तर अर्धवट करायचे नाही तर सपशेल उलटे करायचे."
"आता काय झाले? तू सांगितल्याप्रमाणे..."
"आणले असते तर मला शिमगा करायची काही गरज पडली असती का? मला काय वेड लागलय का, काही कारण नसताना उगाच आरडाओरडा करायला? अहो, ज्या साडीसाठी ब्लाऊज आणायला सांगितले होते तिथे तुम्ही आणले अस्तर आणि ज्याचे अस्तर आणायचे होते तिथे आणला ब्लाऊजचा कपडा. काय सांगावे बाई, मला तर वाटते, तुम्ही मुद्दाम करता का हो? पुन्हा काम सांगू नये म्हणून. शीः! आता मात्र कहर झाला कहर! देवापुढे डोके फोडून शपथ घेते, पुन्हा तुम्हाला काम सांगणार नाही अशी. कितीही त्रास होऊ दे, हातपाय तुटू दे पण सारी कामे मीच करील."
"शपथ जरूर घे पण डोके फोडून, हातपाय मोडून घेऊ नकोस. मलाच पुन्हा दवाखान्यात न्यावे लागेल. चुकून म्हणा किंवा तुझ्या म्हणण्यानुसार वेंधळेपणाने मी तुला माणसाच्या दवाखान्यात न नेता ढोरांच्या दवाखान्यात..."
"न्या हो, न्या. या गरीब गायीला जनावरांच्या दवाखान्यात न्यायलाही तुम्ही मागेपुढे पाहणार नाहीत. बरे झाले हो, ढोर दवाखाना तरी म्हणालात... नाही तर मसणात नेईल असे म्हणायलाही कमी करणार नाहीत. एखादेवेळी म्हणाल, अग, उद्या तुझा वाढदिवस आहे. आपण एखाद्या मंदिरात जाऊ आणि मला न्याल चक्क... स्मशानात! तुमचे काही सांगता येत नाही हो. कधी काय बोलाल ते. आता काय या कपड्यांचे लोणचे घालू?" तिने रागारागाने विचारले
"लोणचे? भारी आयडिया आहे. कपड्यांचे लोणचे! ह्या लोणच्याचा पेटंट मात्र आपणच ठेवायचा. घाल की लोणचे. काय काय साहित्य लागते याची यादी दे. लगेच जाऊन आणतो..."
"काही नको. पुन्हा तिखट सांगितले तर साखर आणाल..." असे बोलताना तिला काही तरी आठवले आणि ती स्वयंपाक घरात गेली. तसा माझा जीव भांड्यात पडला...
मी बैठकीत बसलो होतो. समोर टीव्ही चालू होता. एक छान सिनेमा लागला होता पण का कोण जाणे माझे नेहमीप्रमाणे लक्ष लागत नव्हते. काही तरी वेगळेच वाटत होते. मन अशांत, अस्वस्थ वाटत होते. मनात विचारांचे थैमान सुरू झाले...
'माझ्याचकडून का साध्या साध्या चुका होतात? ही सातत्याने समजावून सांगते, ओरडते, प्रसंगी खडे बोल सुनावते पण मी असा अर्धवटपणा, वेंधळ का करतो? बरे, घडणाऱ्या चुका अगदी साध्या असतात. त्या सुधारण्यासाठी विशेष परिश्रम करण्याची गरज नसते तरीही त्याकडे दुर्लक्ष का व्हावे? ही रागावते, ओरडते तेव्हा तिचा हेतू आपणास दुखवायचा निश्चितच नसतो. घरात स्वच्छता, टापटीप, व्यवस्थितपणा असावा हा बहुतेक महिलांचा कटाक्षात्मक आग्रह असतो. त्यांचा तो स्वाभाविक, नैसर्गिक गुण असतो. आपल्या सौभाग्यवतीच्या बाबतीत हा आग्रह हट्टामध्ये बदलला हे खरे आहे परंतु तिचा हा हट्ट जेव्हा इतरांच्या स्तुतीला पात्र ठरतो तेव्हा आपल्याला वेगळेच समाधान वाटते. मग आपणही तिच्या मनाप्रमाणे थोडे अधिक लक्ष देऊन काम केले तर तिलाही वेगळेच समाधान मिळेल. इतरांच्या घरी गेल्यावर काही घरांमधला गचाळपणा, अस्वच्छता, अप्रसन्नता आपल्यालाही जाणवतेच ना, मग आपली बायको आपल्या संसारात प्रचंड मेहनत घेऊन काम करीत असेल तर आपणही आपल्या वृत्तीमध्ये, कामामध्ये तिच्या मनाप्रमाणे बदल घडवून आणायला काय हरकत आहे? परंतु लहानपणापासून लागलेल्या अशा सवयी या वयात बदलणे शक्य आहे? बालपणीच मला माझ्या कामामुळे उपद्व्यापामुळे कुणी वेंधळा, कुणी आळशी तर कुणी अर्धवटराव अशा उपाध्या दिल्या आहेत. अगदी आईवडील, भाऊबहिणी आणि मित्रांनीही!' मी असा विचार शृंखलेत अडकलो असतानाही टीव्हीवरील वाहिन्या मात्र बदलत होतो. तितक्यात एका भारतीय फलंदाजांने सलग तीन षटकार ठोकलेले पाहून माझ्या मनाची अस्वस्थता, बेचैनी कुठे तरी दूर पळाली.माझ्या शरीरात वेगळेच काही तरी संचारले. मैदानावरील जल्लोष ऐकता यावा, समालोचकांचे उत्स्फूर्त समालोचन ऐकता यावे म्हणून मी आवाज मोठा केला परंतु गोंधळ एवढा प्रचंड प्रमाणात होता की, टीव्हीचा आवाज एक वर असूनसुद्धा प्रेक्षकांचा गोंधळच ऐकू येत होता. त्यामुळे ज्याची भीती होती, जे व्हायला नको होते तेच झाले. त्या आवाजाने बाईसाहेबांची झोप चाळवली गेली. जगातील सर्वात वेगवान गोलंदाजाच्या वेगवान चेंडूपेक्षाही अधिक वेगाने शाब्दिक मारा आला,
"अहो, सकाळपासून राब-राब राबून आत्ताच थोडी पाठ टेकवली ना टेकवली तर तुमचे क्रिकेटप्रेम उफाळून आले ना? माझ्या झोपेची वेळ साधून तुम्ही नेहमीच क्रिकेट लावता. माझ्या झोपेचे खोबरे करून तुम्हाला काय मिळते हो? कधी तरी जरा माझाही विचार करा हो. नेहमी आपलीच हुकुमत गाजवायची सवय..." ती बडबडत असताना तिचे काही ऐकले, काही न ऐकले या स्थितीत मी तणतणत उठलो आणि रागारागाने टीव्हीच बंद करून टाकला. तत्क्षणी माझ्या मनात विचार आला,
'पतीपत्नीचं नाते जन्मजन्मांतरीचे आहे म्हणतात ना मग प्रत्यक्षात संसारामध्ये आमच्यासारखी अशी 'विरुद्ध नीती' का असावी? छत्तीस गुण जुळलेल्या जोडप्यांमध्येही षडाष्टके का व्हावीत? आजचेच साधे उदाहरण बघा. सकाळी फराळ करताना गर्मी होतेय म्हणून मी खिडकी उघडली तर नेमकी त्याचवेळी हिला हुडहुडी भरली. तिने खिडकी बंद करण्याचे कडक शब्दात दिलेले आदेश मला गर्मी होत असूनही मी क्षणार्धात निमुटपणे पाळले. त्यानंतर दुपारी आम्ही त्याच ठिकाणी जेवायला बसलो. त्यावेळी खिडकी बंद होती. माझे दोन-तीन घास खाऊन होतात न होतात तोच ही म्हणाली,
"अहो, दारे, खिडक्या बंद करून का बसलात हो? जनावरांचा गोठा आहे का? गुदमरून जीव जायची वेळ येतेय. उघडा ती खिडकी..."
"अग पण सकाळी तुलाच थंडी..."
"काय बाई, कोणत्याही गोष्टीवरून लगेच टोमणे मारायचे, उचकणे द्यायचे? केवढे गरम होतेय आणि तुम्ही थंडी म्हणताय? हवामानाखातेसुद्धा दर मिनिटाला वेगवेगळे अंदाज वर्तवतात. सकाळी थंडी वाजत होती आता तर सूर्य चांगलाच वर चढलाय..."
"सूर्याचे सोड ग पण तू मात्र माझ्यावर कायम चढलेली असतीस..." असे म्हणत मी हसतहसत उठून खिडकी उघडली. मी परत माझ्या जागी येत असताना तिने चुटकी वाजवत पंखा सुरू करण्यासाठी अंगुलीनिर्देश केला. तिच्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या नवऱ्याने म्हणजे मी तिचा तोही आदेश विनाअट पाळला...
@ नागेश सू. शेवाळकर