मी एक अर्धवटराव - 22 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 22

२२) मी एक अर्धवटराव!
एक प्रसंग, एक घटना माझ्या कायम स्मरणात आहे. आमच्या लग्नानंतर आम्ही माझ्या नोकरीच्या गावी आल्यानंतर साधारणतः दोन महिन्यांनी घडलेली ही घटना... शनिवारची रात्र! झोपताना विचार केला की, उद्या रविवार आहे. जरा उशिराने उठू परंतु मध्यमवर्गीय मानवाच्या नशिबात कुठले आलेय हे भाग्य? 'जन्मोजन्मीचे नाते जडलेय बायकोशी, झोप कशी मिळेल सुट्टीच्या दिवशी?' असे काहीसे नाते नवराबायको, सुट्टी आणि झोपेचे असते.
रविवारी सकाळी गाढ झोपेत असताना कशाच्या तरी आवाजाने झोप चाळवली. उठावेसे वाटत नव्हते. डोळा उचलत नव्हता. पुन्हा तोच आवाज आला. यावेळी थोडा जागा असल्यामुळे आवाजाचा धनी कोण असेल याची पुसटशी कल्पना आली आणि मी दचकून, डोळ्यातील झोप अक्षरशः ओरबाडून फेकून द्यावी अशा अवस्थेत उठून बसलो तसा माझा अंदाज खरा ठरला. समोर कमरेवर हात देऊन बायको उभी होती.
"काय झाले? असा कोणता पहाड कोसळला?"
"इश्श! तुमचे आपले काही तरीच..." तिचा अंदाज पाहून माझ्या सर्वांगाला गुदगुल्या झाल्या.
"बाईसाहेब, काय विचार आहे? हां..हां..हां.. सकाळी सकाळी एवढ्या गोड आवाजात आळवणी, नक्कीच कुठल्या ना कुठल्या कामावर होणार माझी बोळवणी..."
"आळवणी नाही की बोळवणी नाही. आज एक सरप्राईज आहे..."
"सरप्राईज? सकाळी? काय आहे? ए...ए.. सांग ना..."
"छे बाई! तुमचे आपले भलतेच. अहो, सरप्राईज असे सांगायचे असते का? उठा. फ्रेश व्हा. मग आपोआप तुम्हाला सरप्राईज मिळेल.. समजेल..."
"म्हणजे? माझ्या आवडीची स्वीटडिश? कांदाभजी?गरमगुरम पोहे? इडली? डोसा? पण तसा कशाचा वास तर येत नाही. काय असेल बुवा? चला. 'आलिया सरप्राईजशी असावे सादर!'..." असे म्हणत मी ब्रश सुरू केले. दररोज कार्यालयात जायचे असूनही साडेसात नंतर उठणाऱ्या माझ्यावर सात वाजता उठायची वेळ आली. ब्रश करीत मी बैठकीच्या खिडकीतून बाहेर डोकावले. लवकर उठल्यामुळे वसाहतीत कधीच न दिसणारे वातावरण मला दिसले आणि मला आश्चर्याचा धक्का बसला कारण वसाहतीतील एकूणएक पुरुष कोणते ना कोणते काम करीत होते. तसे पाहिले तर काही अपवाद वगळले तर घरकाम हा पुरुषांचा प्रांत नाही पण काही दशकांपासून विभक्त कुटुंबाने डोके वर काढले आणि त्यातही 'हम दो, हमारे दो!' हा नारा प्रत्यक्षात येऊ लागल्यामुळे, महत्त्वाचे म्हणजे अर्थार्जनासाठी महिला नोकरी, व्यवसाय करू लागल्यामुळे साहजिकच पुरुषांनाही बायकोला घरकामात मदत करणे क्रमप्राप्त झाले. महिलांनी नोकरी हा पर्याय स्वीकारला असला तरीही पुरुषांना घरकाम तसे अवघड जाऊ लागले. असो.
मी बाहेर पाहत असताना मला दिसले की, सारी नवरे मंडळी राजरोसपणे परंतु एकमेकांना चुकवत काम करण्यात मग्न होती. 'चुकवणे' या अर्थाने मी बायकोच्या हाताखाली काम करतोय हे शेजारी कळू नये हा हेतू ठेवून जो तो आपल्याला मिळालेली जबाबदारी इमानेइतबारे पार पाडण्याचा प्रयत्न करीत होता. सातत्याने बायकोवर डाफरणारे पाटील चक्क रांगोळी काढत होते.आजकाल हौशीने रांगोळी काढणारे पुरुष आहेत. परंतु पाटील काढत असलेल्या रांगोळीचे रंग काही वेगळेच दिसत होते. रंगसंगतीचा प्रश्न तर दूरच राहिला परंतु पाटील जे रांगोळीचे पट्टे ओढत होते ना ते म्हणजे कबड्डीच्या खेळात आक्रमण करणाऱ्या खेळाडूवर बचाव पक्षाचे सारे खेळाडू कोलमडून पडावेत तसा प्रकार होत होता. बाजूचे देशमुख! त्यांचा सडा टाकण्याचा थाट काय वर्णावा? खरे तर सडा टाकणे म्हणजे नुसते पाणी फेकणे नाही तर सडा टाकणे ही एक कला आहे. तांब्यातील पाणी हाताच्या माध्यमातून जमिनीवर पडणे ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी अचूक टायमिंग साधावे लागते. मात्र देशमुखांचा हात आधी जमिनीच्या दिशेने जात होता तर तांब्यातील पाणी नंतर जमिनीकडे धाव घेत होते... 'बल्ला पहले घुमा, गेंद बादमे आयी!' असे! तांब्यातून पडणारे पाणी सरळ जमिनीवर न जाता मध्यंतरी देशमुखांच्या लुंगीवर एका विशिष्ट ठिकाणी विसावा घेत होते. त्यामुळे तो भाग 'पाणीदार' होत होता. त्यांच्यावर खिडकीतून लक्ष ठेवणारी त्यांची 'मनीमाऊ' त्यांची अवस्था पाहून फिदीफिदी हसत होती. आता आमच्या शेजारच्या जोशीकडे जाऊया म्हणजे ते काय करतात ते पाहूया. स्वतःचे शरीर सांभाळणे ज्यांना नेहमी अवघड जात होते असे अगडबंब जोशी रात्रीच्या भांड्यातील खरकटे पाणी बाहेर टाकायच्या कामगिरीवर निघाले होते याचा अर्थ जोशी भांडी घासण्याचे काम करीत होते. परंतु खरकट्या पाण्याने शिगोशीग भरलेल्या भांड्यातील पाणी बाहेर पडू नये अशी कसरत करणाऱ्या जोशींच्या नाकीनऊ येत होते. तितक्यात व्हायचे तेच झाले. भांड्यातल्या पाण्याने डाव साधला आणि पाणी फरशीच्या मिठीत शिरले. ते लक्षात येऊनही पाण्याच्या बाजूने जाण्याची किमया जोशींना साधता आली नाही आणि सांडलेल्या पाण्यावरून पाय घसरून जोशी चक्क उताणे पडले. भांड्यातल्या उरल्यासुरल्या पाण्याने त्यांना जणू अभ्यंगस्नान घडवले. त्यांच्यासमोर राहणारे माळबांडे मोठ्या दिमाखात फरशी पुसायला निघाले. पण झाले काय तर फरशी पुसताना फरशीवर भार देणाऱ्या त्यांच्या हातांना समोर त्यांच्या महाराणीचे पाय दिसले आणि माळबांडेंच्या हातांना त्या पायांना स्पर्श करण्याचा मोह आवरला नाही आणि माळबांडे सदेह पत्नीला साष्टांग दंडवत घालते झाले. त्यांच्या बाजूला राहणाऱ्या देशपांडे यांची कथा काय वेगळी होती? त्यांच्या मताप्रमाणे त्यांनी अंगण झाडून चकाचक केले होते. क्षणभर विसावा घ्यावा म्हणून ते उभे राहायचा प्रयत्न करू लागले परंतु झाडण्याच्या पराक्रमामुळे त्यांची कंबर सरळ होतच नव्हती. कमरेला हाताचा आधार देत ते उठण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या गृहमंत्री कडाडल्या,
"हे काय झाडणे झाले? हा पहा कचरा, ही झाडांची पाने, हा बघा केसांचा पुंजका..."
देशपांड्यांना दम लागला होता, शब्द फुटत नव्हता तरीही त्यांनी विचारले,
"हे..हे..केस तुझे तर नाहीतच. तुझे केस बघ कसे, काळेभोर, मऊशार आहेत. मग हा पांढऱ्या- तांबड्या केसांचा पुंजका कुणाचा? हां.. हां.. हा तर माळबांडे वहिनींच्या..."
"काय? तुम्हाला कसा माहिती तिच्या केसांचा रंग?" सौभाग्यवती देशपांडे यांनी क्रोधाने विचारताच आता आपले काही खरे नाही, रस्त्यावर तमाशा नको याविचाराने देशपांडे घरात पळाले... पाठोपाठ त्यांची पत्नीही...
"अग... अग.." ती सारी दृश्यं पाहून दात घासायचे सोडून आश्चर्याने मी आवाज दिला.
"का..य? झाले का दात घासून?" आल्याबरोबर पत्नीने विचारले
"अग, हे मी काय बघतोय?"
"मी रोजच बघतेय. म्हणून तर तुम्हाला आज लवकर उठवले."
"म..म..म्हणजे हेच का तुझे सरप्राईज?"
"नाही हो ही तर सुरुवात आहे. खरे सरप्राईज तर पुढेच आहे."
"म्हणजे?" मी वेगळ्याच शंकेने विचारले
"आजपासून ही सारी कामे तुम्हाला करायची आहेत."
"क..क..काय? छे! छे! मला नाही जमणार..."
"जमवावीच लागतील नवरोजी! ह्यांना जमतात मग तुम्हाला का जमू नयेत? आधी आपल्यासाठी गरमागरम चहा करा. तोच तुमच्या घरकामाचा श्रीगणेशा!..."
नाइलाजाने मी स्वयंपाक घरात प्रवेश केला. जेवण बनविण्याचे वाचले, चहावर भागले अशा परिस्थितीत मी दूध, साखर, पत्ती, गाळणी, पातेले, कपबश्या, लायटर सारे शोधून घेतले. लायटर हातात घेऊन गॅसवर आक्रमण करतानाचा माझा पवित्रा असा होता, जणू एखादा कसलेला फलंदाज हातात बॅट घेऊन फलंदाजीला उतरतोय. गॅस चालू करून मी लायटर दाबला पण छे! लायटर काही गॅसचे चुंबन घ्यायला तयार होत नव्हता. दोन-तीन प्रयत्न झाले परंतु यश मिळत नव्हते. कित्येक वेळा 'मी नाही जा...' असे लडिवाळपणे म्हणणाऱ्या प्रेयसीने अचानक कडाडून मिठी मारावी तशी गॅसने लायटरकडे झेप घेतली... लायटरमधून निघणाऱ्या ठिणगीचा आणि उतावीळ झालेल्या गॅसने एकमेकांना कवेत घेताच जो मोठ्ठा भडका उडाला म्हणता. त्या दोघांच्या तशा 'प्रिती' मध्ये माझा सर्व चेहरा मात्र भाजून निघाला...
काही क्षणातच मी चहाच्या कपबश्या घेऊन दिवाणखान्यात टीव्ही पाहणाऱ्या परमप्रिय पत्नीच्या पुढे उभा राहताच ती ओरडली,
"अहो, बाजूला व्हा. करिना किती छान नाचतेय ते पाहू द्या..."
करिनाकडे बघत बघत माझ्या हातावर करिनाप्रमाणे थिरकणाऱ्या कपबशीला हातात घेऊन बायकोने मला कृतकृत्य केले. मी माझी कपबशी घेऊन सोफ्यावर टेकत असताना वीज कडाडावी तशी सौ. कडाडली,
"अहो, हा काय चहा आहे? गुळमुच पाणी नुसते..." आणि तोंडात घेतलेल्या चहाचा घोट संतापाने तिने बाहेर फेकला. त्याचा प्रसाद माझ्या अंगाखांद्यावर आला. तोपर्यंत माझ्याही घशात चहाचा घोट घुटमळत होता कारण चहा झालाच होता त्या लायकीचा...'ना चव, ना ढव' असा...
एक मात्र झाले, सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे लग्नानंतर लगेचच हा प्रसंग माझ्या जीवनात आला आणि मी चहा करायला शिकलो....तो कायमचाच!
@ नागेश सू. शेवाळकर