बोरमाळ Subhash Mandale द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बोरमाळ

'बोरमाळ'

कुणाच्या घरी गणपतीच्या वेळी पुजा ठेवतात तर कुणाच्या घरी वास्तुशांतीला पुजा ठेवतात.कुणी लग्नाची पुजा ठेवतात,तर कुणी मंदिरात मुर्ती स्थापन करताना पुजा ठेवतात.
गावात एकही ब्राम्हण किंवा पंडित नसल्यामुळे गावातील रामोशी जातीचे खाशाबानाना,सगळे त्यांना 'शाहीरनाना' म्हणतात.लग्न लावणं,सत्यनारायणाची कथा वाचने यासारखी धार्मिक कामं तेच करतात.
आता त्यांना धाप लागत असल्याने दोन एक किलोमीटर अंतर चालून जाणे शक्य नाही.आता ते घरापासून आवाक्याच्या आतल्या पल्ल्यापर्यंत जातात.कुणाचं लग्न लावायचं असेल तर लग्न मालक त्यांना घेऊन जाण्याची आणि आणून सोडायची जबाबदारी घेत असतील तरच जातात.
एकदा आमच्या मंडळ्याच्या गणपतीच्या वेळी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती.पुजेसाठी सत्यनारायनाची पुजा वाचण्यासाठी त्यांना बोलावलं होतं. कथा वाचताना मधेमधे त्यांना धाप लागायला लागली.निम्मी कथा वाचून झाल्यावर त्यांनी मला राहिलेली कथा वाचून पुर्ण करायला लावली.त्या वेळपासून जिथे शाहिरनाना जाऊ शकत नाहीत तिथे मला बोलावणं यायला लागलं.मीही जुण्या पोथ्यापुराणांची पुस्तके जमा केली.पुराणातल्या सगळ्या कथा संस्कृतमध्ये असल्यामुळे त्यांच वाचण करून मराठीत अर्थ समजून सांगू लागलो. मार्गशिर्ष महिन्यात गुरूवारी कित्येक जण नंबर लावायचे. त्यातून लोक दक्षिणा म्हणून पैसे,शिधा म्हणून धान्य देत होते.पैसे मिळत होते,पण तीच ती कथा घोकून घोकून मलाच नाही तर कित्येकांना ती तोंडपाठ झाली होती.
एका मंदिरात सत्यनारायणाची पूजा ठेवली होती.पुजेसाठी नवीन लग्न झालेलं कपल बसवलं होतं.बाकी लोक कथा ऐकण्यासाठी आजूबाजूला बसले होते.मी संस्कृतमधील एक परिच्छेद वाचून झाल्यावर त्याचा मराठीत अर्थ सांगत होतो.चार सहा परिच्छेद वाचून झाल्यावर ऐकणाऱ्यांना सत्यनारायणाची कथा तोंडपाठ झाल्यासारखी होती.काही टिंगल टवाळी करणारी तीन चार जणं, एक परिच्छेद वाचून झाला की दुसरा वाचताना हा नको तो वाच.तो झाला की हा वाच.कथेतली ती गोष्ट सांगितलीच नाही.हि कथा नाही ती दुसरी राजपुत्राची कथा सांग. राजकन्येची कथा छान आहे ती सांग.त्यादिवशी सांगितलेली कथा सांगितलीच नाही, असे प्रश्न विचारून त्यांना गोंधळून टाकत होते.त्यादिवशी वैताग आला आणि ठरवलं,'पोथ्यापुराण पुजापाठासाठी कुठेही जायचं नाही.'
काही लोक शुभ मुहूर्त विचारायला यायचे.मी कॅलेंडरमध्ये बघून सांगायचो.कुणाची म्हैस हरवली तर कुठे सापडेल ते मला विचारायला यायचे.मी सांगायचो,'आज रात्रीचं शोधाशोध करु नका उद्या सकाळी म्हैस आपोआप घरी येईल.' आणि घडायचंही तसंच कारण दिवसा माळरानावर चरत चरत कुणाच्या तरी शेतात घुसली असणार,शेतातून बाहेर येईपर्यंत अंधार पडल्यावर म्हैशीला घराची वाट सापडली नसणार.ती फार तर हंबरडा फोडेल, आणि एका जागेवर बसून राहिल.या ताळतंत्रानुसार काही सूचना द्यायचो.काही लोकांना हरवलेली वस्तू सापडणार नाही असे सांगून त्यांनी विनाकारण घेतलेला ताण घालवायचो,पण लोकांची श्रद्धा वाढत होती.मी पुजापाठ करायचं बंद केल्यावर वाटलं घरचे म्हणतील चार पैसे येत होते तेही बंद झाले.पण घरात कुणीही मला कधी टोकलं नाही.भविष्य सांगणं मला थोतांड वाटायचं.शिकलेला असून अंधश्रद्धा पसरवल्याची खंत वाटायची.या आडाणी आणि आडमुठ्या लोकांचं काय असणार आहे भविष्य?.कधी कधी मी थेट सांगुन टाकायचो,'मला पोथ्या पुराणातलं काही कळत नाही, मी नाही सांगणार भविष्य बिविष्य."
एका संध्याकाळी आमच्या जुन्या घरात मी वाचत बसलो होतो.बाहेरुन कुणीतरी आवाज दिल्याचा भास झाला पण तिकडे लक्ष न देता मी तसाच वाचत बसलो,कारण घर अडगळीत असल्यामुळे तिकडे कुणी फिरकत नसत.शिवाय घरात लाईट नव्हती.त्या घरात भिंतीतील खिडकीत खूप सारी जुनी पुस्तकं आणि एक झोपायला खाट या शिवाय त्या घरात काहीच नव्हतं, त्यामुळे फक्त वाचन आणि झोपायला त्या घराचा मी वापर करायचो.
बाहेरून पुन्हा एकदा आवाज आला आणि मी आतूनच
"आत या.मी घरातच आहे."
असा आवाज दिल्यावर रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात कुणीतरी आत आलं.जवळ आल्यावर समजलं,की तो माझा वर्गमित्र बळीराम होता आणि त्याच्यासोबत त्याची बायको आली होती.
मी बोललो,"बळी,ह्या टायमिंगला इथं काय काम काडलंस.ते बी जोडीनं आलायसा."

"आरं, काय न्हाय.हिला नको म्हंटलं तरी ऐकना,आत्ताच तुझ्याकडं जाऊया म्हणून तास झालं मागं लागली होती म्हणून तुझ्याकडं आलोय."

"का?, काय झालं?."

"आज वाडीची जत्रा हुती.गर्दीत हिच्या गळ्यातलं एक तोळ्याचं मंगळसूत्र चोरीला गेलं.आता सांग गर्दीत गेलेलं मंगळसूत्र सापडणार आहे का?. हिला म्हंटलं,'गेलं तर जाऊ दे.दुसरं घिऊ', पण हि आयकायला तयारच नव्हती म्हणून तुझ्याकडं आलोय."

"दादा, मंगळसूत्र सापडायचा एकच मार्ग आहे .ते म्हणजे तुम्ही.तुम्हीच सांगाल कुणी चोरी केलंय आणि सापडणार आहे का नाही."

"मी कसं सांगणार? मला काय माहीत.मला ज्योतिषपणा नाही जमत.जावा तुम्ही.बळी तु तर शिकल्याला आहेस.तु तरी सांगायचं."

"आरं, सांगुन सांगुन दमलू.पण दुपारपासून नुसतं डोकं खाल्लय.शेवटी वैतागून आलू तुझ्याकडं."

"जत्रेत गेल्यालं सापडणं अवघड आहे.'आपल्याकडं नव्हतच' असं समजून सोडून द्या विषय आणि नवीन घ्या."

"आसं कसं विसरायचं,हजार पाचशाचं असतं तर सोडून दिलं असतं पण तीस हजार रुपयाचं हुतं."

"बळी,आता तुच समजव.मला नाही कळत त्यातलं."

"बर असुदे.चोर कुठल्या दिशेला गेलाय ते सांग बाकी मी बघतो.", बायकोच्या समाधानासाठी बळी डोळे मिचकावत बोलला.
मला खरंतर काहीच सुचत नव्हतं.न सागावं तर हि दोघं घर सोडणार नाहीत आणि सांगितलं तर खोटं कसं सांगायचं.मी बळीकडे पाहिलं.त्याचं तोंड कसनुसं झालं होतं.त्याचं म्हणणं होतं,की काही तरी सांगून घालवून टाक.माझ्या मनात नसताना मी बोललो,"चोर पुर्वेला गेला आहे."
इतक्यात अंधारात बळीची आई आणि माझी आई घरात आल्या.
बळीची आई खाली बसत बोलली,"समजलं का कुणी चोरलंय.निदान ठाव ठिकाणा तरी समजला आसंल."

"अहो मावशी, जत्रेत चोरी गेलेल्या वस्तूचा ठावठिकाणा कसा लागायचा.शिवाय मला ज्योतिष जमत नाही त्यामुळं मी काही सांगणार नाही."

"आरं पोरा,नगो इतका भाव खाऊस.सांग पाटकीना."

मला वैताग आला होता‌‌.मी बोललो,"मी नाही सांगणार."

बळीची आई ऐकायला तयार नव्हती.ती बोलली,"तुला कळत नसतं तर गावातल्या सुलाबायची बोरमाळ चुरीला गिली हुती तवा कसं सांगिटलं हुतंस."

"मावशी,त्यांची बोरमाळ घरातून चोरीला गेली होती. सहाजिकच बोरमाळ घरातल्या, नाहीतर घराशेजारच्याच कुणीतरी चोरी केली असणार आणि थेट तसं सांगितलं असतं तर कुणी कबूल झालं नसतं म्हणून मीच बोललो होतो,'चोर आसपासच आहे.चोरी झालेली बोरमाळ तिसऱ्या दिवशी तुमच्या घरात आणून देईल."

"आरे,हो‌.हे कसं नेमकं सांगितलं होतंस‌.",बळीने कुतुहलाने विचारले.

"बळी, काय नाय रे.मी फक्त तर्क लावला होता.मी मुद्दाम त्यांना म्हणालो,'चोर आसपासचाच आहे.चोरी गेलेली बोरमाळ,तो तिसऱ्या दिवशी तुमच्या घरात आणून देईल,जर नाही आणून दिली तर तिसऱ्या दिवसापासून त्याला किंवा त्याच्या जिवाभावाच्या माणसाला रक्ताच्या उलट्या होतील.सहाजिकच ही गोष्ट सुलाताईं घरात आणि त्यांच्या आसपासच्या घरात सांगणार.चोरी केलेला अडाणी माणूस भितीनं भलतंसलतं होण्यापेक्षा चोरी केलेली बोरमाळ होती तिथं नेऊन ठेवलेली बरी असे समजून ती बोरमाळ आणून देईल.या हिशोबानं मी बोललो.आणि झालं अगदी तसंच.तिसऱ्या दिवशी दुपारी चोरी गेलेली बोरमाळ त्यांच्या घरात सापडली.जर बोरमाळ सापडली नसती तर उलट्या बिलट्या काय झालं नसतं.मी फक्त तर्क आजमावून बघितला आणि तो यशस्वी झाला,यवढंच.बाकी मला पोथ्या पुराणातलं काहीच कळत नाही"

"फार तर दक्षिणा वाढवून घि‌.पण सांगून टाक.आत्ता फक्त नारळ आणलाय.सकाळ घरी येवून शिधा घिऊन जा."

"मला तुमचं पैसे आणि शिधा नकोय."

मी ऐकत नाही म्हटल्यावर बळीची आई माझ्या आईला बोलली,"गोदाबाय, पोराला उंडरघुगऱ्या आल्यात्या.घरात आल्याल्या लक्सीमिला प्वॉर नगं म्हणतंय."
माझी आई काहीच बोलली नाही.तिला माहीत होतं,की ती बोलली न बोलली तरी मला करायचं आहे तेच मी करतो.
मी सांगून सांगून थकलो, पण बळीची आई आणि बायको ऐकायला तयारच नव्हत्या.मी त्यांना 'सकाळ या.उद्या सांगतो' असं सांगितलं.तेव्हा ते सगळे निघून गेले.
मी विचार करत होतो,'जग कुठं गेलंय, तरी लोकं सुधारायला तयार नाहीत.मंत्रा-तंत्रानं आणि पोथ्या पुराणं चाळून चोर सापडले असते तर पोलिसांनी चोरी कबूल करून घ्यायला थर्ड डिग्री का वापरली असती.नुसता वेळ आणि पैशाचा अपव्यय.
सकाळी मी झोपून उठायच्या अगोदरच बळीची आई आणि बायको घराच्या वट्ट्यावर येऊन बसल्या होत्या.बळी मात्र आला नव्हता.
मी घरातून बाहेर पडताना बघितलं आणि बळीची आई बोलली,"आत्ता सांगिटलंस तर बरं हाय न्हायतर दिसभर हितंच बसून ऱ्हाइन."
मी दारातून त्यांच्या जवळ येऊन बसलो.आणि काही बोलायच्या आतच त्या बोलल्या,"मला आता दुसरं कायबी कारण आयकायचं न्हाय."
मी विचार करून ठरवलं,की ह्यांना असं काही तरी सांगायचं की करणं शक्य झालं नाही पाहिजे.
"मी तुम्हाला मी उपाय सांगतोय.ऐका.प्रत्येक गुरूवारी रानातल्या महादेव मंदिरात रात्री बारा वाजता पांढऱ्या रंगाचं गुलाबाचं फुल वाहायचं.असं सहा गुरुवार खंड न पडता केलं तरच मिळेल हरवलेली बोरमाळ."
मी उपाय सांगितला तसं बळीची आई चटकन उठली आणि निघून गेली.मला वाटलं, की बहुतेक त्यांना अशक्य वाटलं असेल म्हणून त्या काही न बोलता निघून गेल्या.
तीन महिने उलटून गेले तरी बोरमाळेची काही खबर सांगायला ना बळी आला ना त्याची आई किंवा बायको आली.मी निश्चिंत झालो होतो.
एके दिवशी मी रस्त्याने जात असताना बळी आणि त्याची बायको मोटारसायकलवरून जाताना दिसले.बळीने माझ्यापासून काही अंतरावर जाऊन मोटारसायकल थांबवली आणि मागं वळून पाहिलं तसं माझ्या काळजात धस्स झालं आता तो चार शिव्या हासडणार म्हणून मी तिथून मागे वळलो आणि रस्ता चालू लागलो.इतक्यात बळीने मोटारसायकल माझ्या समोर आणून उभी केली.
मी हसलो आणि बोललो,"काय कसं चाललंय बळी, सगळं ठिक आहे ना?."
बळी थोडा हिरमुसला आणि पाठिमागं बसलेल्या बायकोकडे पाहिलं.तसं त्याची बायको बोलली, "दादा, दोन महिन्यात थोडी वडाताण झाली खरं, पण आता सगळं ठिक आहे."
मी त्यांच्याकडे पाहिलं तर गळ्यात बोरमाळ दिसत होती.मला वाटलं, मी सांगितलेल्या उपायाने खरोखरच बोरमाळ सापडली की काय.मी बळीला बोललो,"बळी,वहिणींची बोरमाळ सापडली वाटतं."
बळी पुन्हा एकदा हिरमुसून हसत बोलला,"का जखमंवरची खपली काढतोयस."
"का, काय झालं?."
"काय होणार आहे,तु माझ्या आईला सांगिटलं होतंस,'प्रत्येक गुरूवारी रानातल्या महादेव मंदिरात रात्री बारा वाजता पांढऱ्या रंगाचं गुलाबाचं फुल वाहायचं.असं सहा गुरुवार खंड न पडता केलं तरच हरवलेली बोरमाळ मिळेल'."

"हो, पण मी असंच म्हणालो होतो."

"तु असंच म्हणून मोकळा झालास,हित माझ्या जीवाला सुखाची झोप लागली नाही.तुला माहीत होतं,की ह्या हंगामात पांढऱ्या रंगाचं गुलाबाचं फुल मिळणं अशक्य आहे.तरीही खुप चौकशी केली पण कुठंही पांढऱ्या रंगाचं गुलाबाचं फुल मिळालं नाही.शेवटी प्रत्येक गुरुवारी मोटारसायकल घेऊन शहरात जात होतो आणि पांढऱ्या रंगाचं गुलाबाचं फुल घेऊन येत होतो.प्रत्येक गुरुवारी मोटारसायकलला सत्तर रुपयाचं पेट्रोल,वीस रुपयाचं गुलाबाचं फुल आणि दहा वीस रुपय इकडं तिकडं होऊन जायचं, असं सहा गुरूवारचं सहाशे रुपये खर्च झाले, पण काहीच फरक पडला नाही."

"अरे बळी तु तर शिकल्याला आहेस तुला तरी समजायला पाहिजे होतं, असं केल्याने हरवलेली वस्तू सापडणार आहे का?."

"मला तुझं म्हणणं पटतंय रं,पण काय करणार, बायकोला समजावून समजावून दमलो पण बायको ऐकायला तयारच होत नव्हती.शेवटी बायकोला अट्ट घाटली, की हे सगळं करतो, पण हे करूनही बोरमाळ सापडली नाही तर तु करत असलेले सगळे उपास तापास बंद करावं लागतील.त्यावर हि बया एका पायावर तयार झाली म्हणून मी हे सगळे उपाय करायला तयार झालो.पण एवढं सगळं करूनही बोरमाळ सापडली नाही. सुरवातीला उपासतापास सोडायला तयार झालेली ही (बायको),अजूनही व्रत,उपास करतेच."

"मग ही बोरमाळ?."

"सहा गुरुवार झाल्यावर बोरमाळ सापडत नाही म्हटल्यावर ही पुन्हा तुझ्याकडं नवीन उपाय विचारायला जाऊया म्हणून मागं लागली होती.मी हिला हात जोडले आणि म्हंटलं,'नवीन उपाय शोधून गेलेली बोरमाळ पुन्हा सापडणार नाही, त्यापेक्षा तुला नवीन बोरमाळ घेऊन देतो, पण पुन्हा नवीन उपाय करून पैसे वाया घालवण्यापेक्षा बोरमाळ विकत घ्यायला पैसे खर्च करू.तरीही तिचं मन शांत होत नसतं,मग आज हिला घेऊन शहरात बाजारात गेलो आणि एकतीस हजार रुपयांची नवी बोरमाळ विकत आणली.तवा कुठं हिचं मन थंड झालं.आत्ता शहरातूनच घरी निघालो होतो, इतक्यात वाटेत तु दिसलास"
"माफ कर बळी.तुला त्रास व्हावा असा माझा हेतू नव्हता.आणि ताई, असं व्रत,उपास करून किंवा अंधश्रद्धा ठेवून चोरी गेलेली वस्तू सापडत नसती."
"मी सांगून थकलो,आता तुच सांग.",बळी हसून बोलला.तसं बळीची बायको त्याला म्हणाली,"हुं उरका,मारा किक गाडीला. वावरात लय कामं पडल्याती."
बळीनेही गाडीला किक मारली आणि "चलतो.", असे म्हणून निघून गेला.
वाटलं,हरवलेल्या बोरमाळेनं बळीला तीन महिने शांत झोप लागली नसेल,पण आज तो शांत झोप घेईल.
कुणास ठाऊक,बळीला आज तरी शांत झोप लागेल,की अजूनही त्याला स्वप्नात बोरमाळच दिसेल.
???

सुभाष आनंदा मंडले

-हणमंत वडीये

ता.कडेगाव जि.-सांगली
आत्ता-पुणे

९९२३१२४२५१