गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांची सांकेतिक भाषा Subhash Mandale द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांची सांकेतिक भाषा

गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांची सांकेतिक भाषा.


शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांना स्वराज्याचा तिसरा डोळा समजलं जातं कारण शिवाजी महाराजांनी कित्येक लढाया गुप्तहेरांनी दिलेल्या योग्य माहितीमुळे जिंकल्या.त्यात बहिर्जी नाईक यांनी मोलाची कामगिरी बजावली.त्यांना हे शक्य झालं ते त्यांनी कसबीने वापरलेल्या कौशल्यामुळे अडचणीच्या ठिकाणी वापरलेल्या सांकेतिक खानाखूना, सांकेतिक इशारे आणि मुख्य म्हणजे सांकेतिक भाषा.
बहिर्जी नाईक वेगवेगळ्या प्रांतांत फिरत त्यामुळे त्यांची बाकी गुप्तहेरांसोबत बोलण्यासाठी आणि इतरांना न समजण्यासाठी एक वेगळीच भाषा निर्माण केली.त्या भाषेला 'पारूशी' भाषा म्हणतात.या पारूशी भाषेच्या किमयेमुळे बहिर्जी त्यांच्या कारकिर्दीत एकदाच ओळखले गेले.तेही जॉर्ज ओग्झेन्डन या सुरतेच्या इंग्रज वखारवाल्याने..!(शिवराज्याभिषेकाचे जे चित्र आपण पाहतो त्यात महाराजांना लवून मुजरा करणाऱ्या हेन्‍री ओग्झेन्डनचा हा भाऊ). सुरतेची लूट चालू असताना वखार वाचवण्यासाठी महाराजांची विनवणी करावयास गेला,तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम (बहिर्जी) आणि आपल्या वखारीसमोर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले.हे त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात हे नमूद केले होते. पण त्यावर कृती होण्याआधीच सुरतेची लूट झाली होती.


पश्चिम महाराष्ट्रात रामोशी समाज मोठ्या प्रमाणात आहे.या समाजात आजही 'पारुशी'ही भाषा बोलली जाते.
इतर समाज या भाषेला बुयालांची भाषा म्हणतात.रामोशी समाजाला कर्नाटकात आणि महाराष्ट्रातील काही भागात बुयाल,बोया,बेरड, नाईक या नावाने ओळखले जाते. या भाषेतील शब्द उदाहरणार्थ
'आडतुल' म्हणजे 'बाई'
'नोडगा' म्हणजे 'माणूस'
हे शब्द पश्चिम महाराष्ट्रात वापरतात,तर पुणे, बारामती,बीड या भागात याच रामोशी समाजाच्या सांकेतिक भाषेत 'बाई' आणि 'माणूस' या आणि अशा अनेक शब्दांना वेगवेगळ्या सांकेतिक भाषेत संबोधले जाते.

पारूशी भाषेसंर्दभातील एक किस्सा,

मी पहिल्यांदाच मुंबईला गेलो होतो.माझा स्वप्निल जाधव नावाचा मित्र अंबरनाथ, मुंबईमध्ये राहतो.तो मला घरी घेऊन जाण्यासाठी आला होता.जाताना एक टॅक्सीवाला भेटला.तो स्वप्निलचा मित्र होता.मित्र असल्यामुळे त्याचाकडून पैसे घेऊ शकत नव्हता,पण मी त्याच्यासाठी उपरा, अनोळखी होतो.काही अंतर गेल्यावर त्या टॅक्सी ड्रायव्हरने मला तिकीटाचे ३०रू मागितले.
स्वप्निल मध्येच बोलला,"सुभाष,दमुल्या ठिकवायची गरज नाही"
टॅक्सीवाला मित्र स्वप्निलला बोलला,"काय म्हणालास?"
"काय नाही.मुंबईत माझ्याकडे निश्चिंत राहा,काळजी करायची गरज नाही असे सांगत होतो त्याला.तो गावाकडून आलाय ना.म्हणून."

"ओके."

मला प्रश्न पडला स्वप्निल आमच्या समाजाचा नसून आमच्या समाजाची(रामोशी समाजाची) भाषा कसं काय बोलतोय.मला आश्र्चर्य वाटलं.
स्वप्निल पारुषी भाषेत'दमुल्या ठिकीवायची गरज नाही'म्हणजे पैसे द्यायची गरज नाही'असे म्हणाला होता,पण त्या ड्रायव्हरला त्याने वेगळेच सांगितले.यामागे त्याचा काही तरी हेतू आहे असे मी समजून गेलो.
त्या ड्रायव्हरने मला पुन्हा पैसे मागितले.
आता काय बोलावं सुचलं नाही म्हणून मी म्हणालो,"स्वप्निल आहे, मला काळजी करायची गरज नाही."
तसा तो गप्प बसला,कारण स्वप्निलकडून तो कधीच पैसे घेत नव्हता.
स्वप्निलने असं का केलं ते नंतर समजलं.
त्याच्या मित्राला पैसे घेऊ नकोस असे म्हणू शकत नव्हता आणि माझ्या जवळचे पैसे खर्च होऊ नयेत, असंही वाटत होते, म्हणून तो पारूशी भाषेत असं बोलला.
त्याच्या सोबत बोलताना समजलं की त्याच्या समाजातही ही भाषा बोलली जाते.

आण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीत पारूषी भाषेचा वापर लहान लहान मुलांनी गंमतीशीर केला आहे.

"आरिल ठिकलाय, रं"

"आरं आरिल नव्हं, झिंमक"

"आरं वासरू नगं"

"पेडू द्या"

या चार वाक्यांचा अर्थ आत्तापर्यंत कुणीही लिखीत स्वरूपात सांगितलेला मला ज्ञात नाही.

आरिल- कुलवाडी

ठिकलाय- थांबलाय

झिंमक- गोंधळी (?)

वासरू नको- सावध करू नको

पेडू द्या- टिंगल करणे, वेड्यात काढणे.

पुर्वी गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, शिकलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी ,महार,मांग आणि रामोशी अशा अनेक भटक्‍या ज़मातींचा मुक्काम कधीच एका जागी नसे. सदैव भ्रमणात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द येतात. आपली कौशल्ये आपल्याच ज़मातीत रहावीत यासाठी मराठी भाषेला सलग्न अशी 'पारुशी' या बोली भाषेचा उपयोग या समाजामध्ये केला जात होता.

अजूनही काही समाजांत 'पारूशी' ही सांकेतिक भाषा बोलली जाते.

सुभाष आनंदा मंडले
हणमंत वडीये,
तालुका-कडेगांव जिल्हा-सांगली
सध्या राहणार-पुणे(९९२३१२४२५१)