युवाप्रेरणा- पुस्तक परीक्षण Subhash Mandale द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

युवाप्रेरणा- पुस्तक परीक्षण

तरूण, तरुणींची मनं पेटवत ठेवणारी क्रांतीमशाल, म्हणजे 'युवाप्रेरणा'


१२ जानेवारी हा 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून प्रा. कवी देवबा पाटील यांनी आपला 'युवाप्रेरणा' हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे.
हा कवितासंग्रह १४ जानेवारीला, म्हणजे मकरसंक्रांतीच्या सणा दिवशी माझ्या हातात आला.
रजिस्टर पोस्टाने आलेल्या पाकिटातून जेव्हा मी पुस्तक बाहेर काढले व पुस्तकाचे छानसं मुखपृष्ठ पाहून माझं मन प्रफुल्लित झालं. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिल्यानंतर जे चित्र दिसते, त्यात पानाफुलांच्या मध्ये उंच हिरवी झाडे आणि त्यापेक्षाही उंच युवा जोश दर्शवणारी झेप घेणारा तरूण. आशेचे, यशाचे आकाश दोन्ही हातांनी कवेत घ्यायला तरूण निघालेला आहे. तरुण जिथून उंच झेप घेत आहे, त्याच्यामुळाशी शुद्ध चारित्र्याचे प्रतिक असणाऱ्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या फुलांचा गुच्छ आहे. उंच आकाशात गरूड मुक्त संचार करत आहे. त्या गरूडाप्रमाने युवक/युवती गरुडझेप घेत आहे.
पुस्तकातील एक एक करून कविता वाचत पुढे जात असताना मुखपृष्ठावरील चित्राप्रमाणेच पुस्तकाच्या अंतरंगात पानोपानी तरुणाईला साद घालत सळसळता उत्साह निर्माण करणाऱ्या कविता वाचायला व अनुभवायला मला मिळाल्या.

आपण सगळेच जण आहे, त्यापेक्षा पुढच्या म्हणजे प्रगत पायरीवर पोहचण्याची स्वप्न पाहत असतो.
असे म्हणतात, की 'स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पहिल्यांदा ती पहावीच लागतात', पण कवी देवबा पाटील आपल्या 'युवाप्रेरणा' या कवितासंग्रहाच्या माध्यमातून युवक युवतींना जरा हटके पद्धतीने प्रेरणा देत आहेत. त्यांच्या मते स्वप्न पहावीत, पण ती झोपेत असताना नव्हे, तर ती जागेपणी पहायची असतात आणि ती सत्यात उतरवण्यासाठी कवितेतून प्रेरणा देताना ते सांगतात,
*असे करावे प्रयत्न,*
*घामाचेही व्हावे रत्न.*
*नसावे कधी मग्न,*
*फक्त बघण्यात स्वप्न.*

कवी फक्त आपले मत मांडून बाजूला झाले नाहीत, तर युवांसोबत सकळ जणांना पुढे जाण्यासाठी आपल्या कवितांमधून विचार करायला भाग पाडले आहे.

कवी कधी मायेच्या ममतेने तरुणाईला साद घालताना कवितेतून सांगतात, की चारित्र्य जपणं अत्यंत आवश्यक आहे, चारित्र्यवान व्हा, त्याच बरोबर स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या शारीरिक, मानसिक बौद्धिक आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, तर कधी वडिलांप्रमाणे सक्त होऊन,
*चुकीवर घालू नये पांघरूण,*
*चुक सुधारावी प्रामाणिकपणानं.*
असा सल्लाही ते देतात.

हे युवकांनो!,
हे तरूणांनो!,
हे मुली!,
बा तरुणा!,
सुशिक्षितांनो!
या कवितांच्या शिर्षकांमधून कवी युवांना साद घालत प्रगतीचा मार्ग मोकळा करत आहेत.
चुकीच्या मार्गांचा अवलंब करून मिळालेलं यश जास्त काळ टिकत नाही. आळस शुन्य करुन कष्टाची सवय लावावी. बुद्धीवर श्रद्धा ठेवावी. श्रद्धेने कर्माला बळ मिळते. जीवनाचे गणित टप्प्याटप्प्याने पार पाडावे, असे अनेक प्रेरणा संदेश कवी आपल्या कवितांमधून देत आहेत.

युवाप्रेरणा म्हणजे फक्त तरूण मुलांनीच नव्हे, तर तरूणींनीही, मुलींनीही शिक्षणाचा आग्रह धरावा यासाठीही त्यांनी काही काव्य रचना केल्या आहेत. हा फक्त कवितासंग्रह नाही, तर अखंड तरुणाईला आपण निवडलेल्या मार्गावर कार्यरत राहत असताना पाय लडखडणार नाहीत, याची दक्षता घेत मार्गात अडथळा निर्माण करणारे खाच खळगे दाखवून त्यावर उपाय सुचवले आहेत.

माणसं माणसांची नाही, तर फोनची झाली आहेत.
टिव्ही, संगणकाची झाली आहेत, अनेक तरुण व्यसनांच्या आहारी गेले आहेत. धावत्या युगात अनेक युवक युवतींच्या मनावर ताण व निराशेचे आभाळ पसरत असतानाचे चित्र चहुकडे दिसत आहे. अशा वेळी त्यांची मने आपल्या कवितेच्या माध्यमातून पेटवून जगण्यासाठी. हातात क्रांतिमशाल म्हणजे प्रेरणा देत आहेत. असे करत असताना नियमित व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणतात,

*जयाचे शरीर धड*
*तयाचे मन सुदृढ*
*मन जयाचे धड*
*तो जिंके प्रगतिगड.*

कवितासंग्रहाच्या पानोपानी तरुणाईला साद घालत सर्वांमध्ये सळसळता उत्साह निर्माण करणारे
कवी प्रा. देवबा पाटील यांच्याबद्दल जाणून घेणं माझ्यासाठी खूप उत्सुकतेचे होतं. त्यांचा अल्प परिचय कवितासंग्रहाच्या शेवटच्या पानावर दिला आहे.
लेखक, कवी देवबा पाटील हे एक निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापक असताना भौतिकशास्त्राची पदवी अभ्यासक्रमाची एकुण एकवीस इंग्रजी पुस्तके प्रकाशित केली आहेत. याशिवाय धार्मिक, प्रेम, देशभक्ती, बालकुमार, किशोर, विज्ञान अशा विविध विषयांवरचे एकूण सत्तावीस कवितासंग्रह प्रकाशित केले आहे. चार कथासंग्रह, एक समिक्षाग्रंथ . इतक्या विपुल प्रमाणात साहित्यिक योगदान देऊनही ते स्वतःला,

*मी न कवी। ना लेखक।*
*श्री गणेश शारदेचा। मी उपासक।*
*नाही कथाकार। न साहित्यिक।*
*साहित्य विज्ञानाचा। मी सेवक।*
*नसे निर्मिक। ना प्रबोधक।*
*शब्द विचारांचा। मी प्रसारक।*

असे संबोधतात. इतकंच नव्हे, तर इतकी साहित्य सेवा करूनही कवितासंग्रहातील मनोगतात पहिल्या ओळीतून ते व्यक्त होताना म्हणतात, "मी फार मोठा प्रतिभावान कवी नाही." या वरून कवीची अजूनही नवनवीन शिकण्याची आणि पराकोटीची नम्रपणाची भावना आपल्या लक्षात येईल.

युवा या शब्दाचा स्फुर्ति, चेतना, जोश, परिवर्तन, यशस्विता हा अर्थ जर आपणाला अभिप्रेत असेल, तर व शुन्यातून सर्वस्वाकडे वाटचाल करायची असेल तर 'युवाप्रेरणा' हा कवितासंग्रह युवक/ युवतींनी जरूर वाचायला पाहिजे. एकदा नव्हे, तर पुन्हा पुन्हा वाचायला पाहिजे.

श्री. सुभाष आनंदा मंडले
पुणे. (९९२३१२४२५१)