विश्वासाची विसंगती Subhash Mandale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विश्वासाची विसंगती

'विश्वासाची विसंगती'

आईने मटर पनीर बनवायचा बेत ठरवला, अन् मला पनीर आणायला बेकरीत पाठवले, बेकरी घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे,
जाताना मोबाईल हातात घेऊन प्रतिलीपीवर
पाटलांची प्राजु यांची 'विश्वास' ही सत्यकथा वाचत हळूहळू चालत जात होतो.कुणावर विश्वास ठेवावा की नाही. वाचून मन सुन्न झालं.

मी बेकरीत पोहोचलो,पण निशब्द होऊन थोडा वेळ तसाच उभा राहिलो.बेकरीचे मालक 'आण्णा' मला चांगले ओळखतात.त्यांनी मला दंडाला हलवून विचारले,"कुठे हरवलास.काय देऊ?"
"२५० ग्रॅम पनीर दया", असे म्हणून मी पाकिटातून दहाच्या सात नोटा असे सत्तर रुपये काढून दिले.
त्यांनी त्या नोटा माझ्यासमोर एकदा मोजून घेतल्या, पुन्हा एकदा नोटा मोजल्या.आणि ड्राॅवरमध्ये ठेवल्या.
विश्र्वास ही कथा वाचून मन अगोदरच हळवे झाले होते.त्यात आण्णांनी माझ्यासमोर दोनदा नोटा मोजल्या अन् वाटले,'आण्णा मला घरच्यासारखे समजतात अन् माझ्यावर विश्वास नाही'?.
मन नाराज झाले, पण मनाला समजूत घातली, 'ठिक आहे,हा व्यवहाराचा भाग आहे'.तरीही मनात थोडा राग आला होता.

मी विचारात मग्न होतो तोपर्यंत अण्णांनी पनीर छोट्या बॅगमध्ये पॅकिंग करून माझ्यासमोर आणून ठेवले.तसा मी भानावर आलो.

"पुन्हा वजन करून दया, मी पाहिले नाही."
असे मी म्हणताच ते हसत म्हणाले,
"विश्वास नाही का?"
यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता मी तसाच उभा राहिलो.
माझा रिप्लाय मिळाला नाही म्हटल्यावर, त्यांनी पॅकिंग उचलून वजन करायला घेऊन गेले.पॅकिंग वजन काट्यावर ठेवत ते म्हणाले,"हे बघ"
पण वजन २२०ग्रॅम दिसले.म्हणजे २०ग्रॅम कमी दिसले.
त्यांनी पॅकिंग उचलून पुन्हा वजन काट्यावर ठेवले.पण या वेळी मात्र वजन २५०दिसले.
"बहुतेक, वजन काटा बिघडला आहे"असे म्हणून त्यांनी ते पॅकिंग माझ्या समोर ठेवले.

"असं किती दिवस चालणार?"

"उद्याच दुरुस्त करून घेतो"

"तोपर्यंत असंच चालणार?"

"विश्वास नावाची काय चिज आहे की नाही, आम्ही ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.ग्राहकांचा आमच्यावर विश्वास आहे?"

"आणि तुमचा?"

"नक्कीच, दुनिया विश्वासावर चालते,साहेब?"

"मग पैसे मोजून का घेता?"

"जाऊ द्या हो साहेब, तुम्ही शिकलेली लोकं बोलायला ऐकनार नाही, तसंपण गर्दी खूप झाली आहे, नंतर बोलू.",असे बोलून मला आणि माझ्या विषयाला त्यांनी नजरअंदाज केले.
शंकांचं निरसन करणे दुकानदाराचं काम असते,पण त्यांनी तसे केले नाही.माझ्या मनाचं समाधान झाले नाही.मी ते पॅकिंग घेऊन घरी आलो.

तिसऱ्या दिवशी सायंकाळी,आई म्हणाली"दुध आणायला डेअरीत जातेय"
मी तिला आडवले,"थांब, मी जातो"
"नको,परवा कधी नव्हे ते बेकरीत पाठवले तर हुज्जत घालून आलास,आज काय दुध डेअरीत हुज्जत घलायचा विचार आहे का?"
परवा घडलेला विषय मी विसरून गेलो होतो.

"तुला कुणी सांगितलं?"

"दुपारी निर्मला देशपांडे सांगत होत्या की तु वादावादी करत होता.पण काय गरज आहे तुला त्यांच्या वजनकाट्याबद्दल बोलायची."

"ठिक आहे नाही घालणार हुज्जत,दे हिकडं ती बॅग", असे म्हणून मी बॅग घेऊन डेअरीकडे निघालो, जाताना बेकरीच्या समोरून जावं लागत होतं.
डेअरीतून दुध घेऊन घरी येताना वाटलं,'आण्णांची माफी मागावी कारण वयाने मोठे असुनही आणि या व्यवसायात त्यांनी आख्ख आयुष्य घालवले असुनही त्यांच्यावर मी अविश्वास दाखवला.'
जावं का नको, जावं का नको असं करत मी बेकरीत गेलो.मी काही बोलणार इतक्यात तेच बोलले,"या साहेब, परवा तुम्ही वजन काट्याचा प्रश्र्न मांडला आणि त्यावेळपासून बेकरीत गिऱ्हाईक कमी झाले आहे, तुम्ही विश्वासाचं बोलत होता.खरंय विश्वास उडायला वेळ लागत नाही."

"आण्णा,माफ करा.पण माझा तसा विचार नव्हता.तुम्ही माझ्यासारख्या वयाने लहान असणाऱ्या लोकांना देखील आदराने बोलता,तुम्हाला व्यवहारातील खाच खळगे पुर्णपणे माहीत असणार तरीही मी तुमच्यावर अविश्वास दाखवला, सॉरी आण्णा "

"असुदया,चालायचंच, हा वजन काटा बिघडला आहे आणि नवीन वजन काटा दोन दिवसांनी मिळणार आहे. मला आता प्रश्र्न पडलाय की इतकी वर्षे गिऱ्हाईकांचा टिकवलेला विश्वास पुन्हा कसा मिळवावा?"

मी थोडा वेळ विचार केला आणि म्हणालो,"आण्णा, बेकरीच्या बाहेर एक पाटी लावा,त्यावर लिहा 'वजनकाटा दुरुस्त होईपर्यंत बेकरी बंद राहील."

"म्हणजे?"

"नवीन वजन काटा येईपर्यंत बेकरी बंद ठेवा, लोकांच्या लक्षात येईल की बिघडलेल्या वजन काट्यामुळे गिऱ्हाईकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बेकरी बंद ठेवली आहे, लोकांचा तुमच्यावर पुन्हा विश्वास बसेल.लोकांची गैरसोय होईल आणि तुमचं थोडं नुकसान होईल पण विश्वास मिळवण्यासाठी हे करणं गरजेचं आहे."

"खरंच, इतक्या वर्षांपासून मी हा धंदा करतोय, व्यवहारातील गणित मला पक्क माहीत होतं, पण विश्वासाचं गणित माझ्या कधीच लक्षात आले नव्हते,लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी मी आजच बेकरीच्या बाहेर 'वजनकाटा दुरुस्त होईपर्यंत बेकरी बंद राहील'अशी पाटी लावतो‌ आणि बेकरी बंद ठेवतो."

मी म्हटलो तसंच झालं, लोकांचा पुन्हा विश्वास बसला आहे, बेकरी पहिल्यासारखी तेजीत चालू आहे‌,आण्णाही जाता येता नमस्कार करतात.

यश आणि अपयश दोघांची सुरुवात विश्वासापासून होते.कधी कधी आपण कमी काळाचा विचार करून लोक व्यवहार करतो,पण त्याचा परिणाम खूप दिवसांपर्यंत दिसतो,मग तो परिणाम चांगला असेल किंवा वाईट.

_सुभाष मंडले

पुणे (9923124251)