उधे ग अंबे उधे Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

उधे ग अंबे उधे

उधे ग अंबे उधे....
गोंधळ घालताना ज्या देवीनं आवाहन केले जाते त्या काही देवतांच्या आजी-माजी रूपांची माहिती जाणून घेऊया

कोल्हापूरची महालक्ष्मी

करवीरनिवासिनी आदिशक्ती महालक्ष्मीला जाणून घेण्यासाठी आधी श्री, लक्ष्मी आणि महालक्ष्मी म्हणजे काय ते पाहू.

काळाच्या प्रवाहात जेव्हा मानवाच्या बुद्धीत हेय (नकोसे/ त्याज्य) आणि उपादेय (हवेसे/उपयोगी) वस्तूचा निर्णय करण्याची क्षमता आली तेव्हापासून भाग्य आणि शुभाशुभत्व या भावनांनी त्याच्या मनात प्रवेश केला .
लक्ष्मीचा जन्म या भावनांपासून झाला आहे. जीवनासाठी जे काही हितकर, जे उदात्त, जे सुंदर, जे आनंददायी त्या सगळ्याशी लक्ष्मीचा दृढ संबंध आहे. किंबहुना लक्ष्मी हा शब्दच पावित्र्य व मांगल्याशी जोडला गेला आहे.

पुराण काळात लक्ष्मी शब्दाचा ‘भाग्य’ असाच अर्थ होता .

लक्ष्मी ही कृषीदेवता आणि त्याचबरोबर नागरी सुबत्तेची प्रतिमा आहे.
ती देवसखा कुबेर तसेच त्याचे यक्ष कीर्ती आणि मणिभद्र यांच्याशी संबंधित आहे.
तिच्याकडून सोने, गायी, दास, घोडे आणि प्रजा मिळवण्याची ऋषींची आशा आहे.
‘श्रीहरी ’ ही देवता प्रचंड गुणवत्ता, अनेक शक्ती आणि सौभाग्याचे आलय असल्याचे म्हटले गेले आहे. अनेक देवता तिच्या प्रसादाने उच्च अधिकार प्राप्त करतात असे वर्णन आहे.

लक्ष्मी ही देवता विष्णूची अर्धागी म्हणून अधिक प्रचलित झाली.
असे म्हटले जाते की समुद्र मंथनातून ती प्रकट झाली आणि तिने देवांमध्ये श्रेष्ठ अशा श्रीहरीच्या गळ्यात वरमाला घातली
विष्णू श्रीपती झाला. जगाच्या पालनासाठी कार्यरत असणाऱ्या विष्णूला लक्ष्मी साहाय्य करू लागली. जगाचे व्यवहार धन आणि धन्याशिवाय चालू शकणार नाहीत. म्हणून जगाच्या पालनकर्त्यांला लक्ष्मीचे साहाय्य अनिवार्यपणे घ्यावेच लागले.
लक्ष्मीचे रूप असे आहे ..
ही कमलासना आहे.
तिच्या हातात कमळे आहेत.
हत्ती तिला अभिषेक करतात.
ती धनाचा वर्षांव करीत असते .
श्री, पद्म, कमला अशी तिची अनेक नावे आहेत.
लक्ष्मी ही उपमा अनेक महत्त्वाच्या स्त्री देवतांना दिली गेली. उदाहरणार्थ महागणपतीच्या अंकावर सिद्धलक्ष्मी असते. तसेच नरसिंहाच्या आख्यायिकांमध्ये भूतलावरील त्याची एक पत्नी चेंचू या वन्य जमातीतली असल्याने तिला चेंचूलक्ष्मी म्हणतात.
दुर्गा सप्तशतीत महिषासुरमर्दिनीलासुद्धा महालक्ष्मी म्हटले आहे.

महालक्ष्मीचा उदय –

अंदाजे तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत रचल्या गेलेल्या पुराणात देवी माहात्म्य म्हणते-
विश्वाचे आदिकारण महालक्ष्मी असून ती प्रकट आणि अप्रकट रूपाने हे विश्व व्यापून राहिली आहे.
तिचे स्वरूप असे आहे ..
ती एका हातात महाळुंग (एक विशिष्ट फळ),
एका हातात गदा,
एका हातात ढाल
आणि एका हातात पानपात्र (वाडगा किंवा तत्सम पात्र) घेतलेली असून नाग, शिवलिंग आणि योनी (इत्यादी प्रतिमा) तिने शिरावर धारण केल्या आहेत .
तिची कांती तापलेल्या सोन्यासारखी तेजस्वी आहे.
आणि स्वत:च्या तेजाने ती सर्व अवकाश भरून टाकत असते .

या लक्ष्मीने आपल्याशिवाय अवकाशात कोणीच नाही असे पाहून तिच्या तमोगुणापासून एक काळीकुट्ट भयावह स्त्री निर्माण केली आणि तिचे नाव महाकाली ठेवले.
महामाया, महामारी, क्षुधा, तृषा, निद्रा, तृष्णा एकवीरा, कालरात्री आणि दुरत्यया अशी तिची आणखी नावे ठेवली.
नंतर स्वत:च्या सत्त्वगुणांतून तिने चंद्राच्या कांतीसारख्या शीतल तेजाने युक्त स्त्री निर्माण करून तिला महासरस्वती म्हटले.
तिला महाविद्या, महावणी, भारती, वाक्, आर्या, ब्राह्मी, कामधेनु, वेदगर्भा आणि धीश्वरी अशी नावे ठेवली.
ही सारीच महालक्ष्मीची रूपे म्हणून ओळखली जातात .

सृष्टीक्रम चालावा यासाठी महालक्ष्मीने महाकाली आणि महासरस्वतीला आज्ञा केली की तुम्ही एक एक स्त्री-पुरुष निर्माण करा. असे म्हणून तिने स्वत: एक जोडपे निर्माण केले.
महालक्ष्मीपासून ब्रह्मा आणि कमलालक्ष्मी, महाकालीपासून शिव आणि सरस्वती तसेच महासरस्वतीपासून विष्णू आणि गौरी निर्माण झाले. मग त्यांच्या जोडय़ा बनवल्या.
ब्रह्मासोबत सरस्वती, विष्णूसोबत कमलालक्ष्मी आणि शिवासोबत गौरी. या जोडप्यांना अनुक्रमे ब्रह्मांडाचे सृष्टीस्थिती आणि लय यांचे कार्य सोपवले गेले.

कोल्हापूरच्या मंदिरात मूर्त रूपाने जी अंबाबाई आज नांदते आहे, ती ही आदिशक्ती महालक्ष्मी आहे.
महिषासुराचा वध करणाऱ्या अठरा हातांच्या दुर्गादेवीलासुद्धा महालक्ष्मी असे म्हटले आहे.
कोल्हापूरच्या महालक्ष्मीला अनेक राजकुलातील भक्त लाभले. कोल्हापुरात तिचे मंदिर प्रथम सहाव्या, सातव्या शतकात चालुक्य राजवंशाने बांधले.
पुढे एका भूकंपात ते देऊळ नष्टप्राय झाले.
दहाव्या शतकात जेव्हा शिलाहार राजा पहिला जतिग याने राष्ट्रकुटांकडून कोल्हापूर जिंकले तेव्हा त्याला असे वाटले की देवीच्या प्रसादाने ही सत्ता त्याला मिळाली आणि त्याने देवीचे मंदिर पुन: बांधले. सध्या जी देवीची मूर्ती आहे ती त्याच काळातली आहे.

मूर्ती काळ्या पाषाणाची असून चतुर्भुज आहे.
उजवीकडील हातात मातुलिंग (महाळुंग) आणि गदा तसेच डावीकडे ढाल आणि पानपात्र असे तिचे रूप आहे.
मस्तकावर अस्पष्ट शिवलिंग नागफणा आहेत. देवीच्या गाभाऱ्याच्या वरच्या मजल्यावर मात्र शिवलिंग स्थापित केलेले असून त्यासमोर नंदी आहे. याला लोक मातुलिंग म्हणतात!!

गोव्यामध्ये महालक्ष्मी देवस्थान (बांदिवडे) हे महालक्ष्मी देवस्थानसुद्धा अत्यंत जुने आहे. तेथील महालक्ष्मीचे स्वरूपसुद्धा करवीर निवासिनीसारखे आहे. विशेष म्हणजे नागेश, मंगेश, शांतादुर्गा आणि म्हाळसा कुलदैवत असणाऱ्या काही यजमानांची महालक्ष्मी ही उपदेवता आहे.

करवीर महालक्ष्मीचा लौकिक सर्वदूर पसरला होता. देवी भागवतातील ५१ शक्तीपीठांत कोल्हापूर येते.
सतीचा मृतदेह घेऊन शिव त्रिभुवनात फिरत असताना तिचे अवयव जिथे पडले तिथे शक्तीपीठे निर्माण झाली.
करवीरास सतीचे नेत्र पडले असे म्हणतात. म्हणजे पुन: शिव आणि शक्ती संप्रदायांशी महालक्ष्मीचा संबंध जोडला गेला.