Vishwaas books and stories free download online pdf in Marathi

विश्वास

कथा -
विश्वास
-------------------
बेल वाजली, रात्रीचे अकरा , कोण आलं असेल या वेळी ?
मी स्वतःच दरवाजा उघडला ,
बाहेर तो उभा होता
डोळे तारवटलेले, जुल्फे बिखरलेले, अजागळ दिसणारा ,,पण तो माझा जिवलग मित्र होता,

मी त्याच्या अवताराकडे पाहिले, याला यावेळी घरात घ्यावे कि नाही ?
प्रश्न पडला होता मला,
असे न विचारले प्रश्न " विचारायच्या आधीच त्याला कळत असत,
तो म्हणाला-
मी घरात येत नाही, तूच चल माझ्या सोबत ,खूप बोलायचं आहे अर्जंट.


त्याच्या अशा अवेळी- आणि काही न सांगता अचानक येण्याने ,मी तसा मनातून घाबरून गेलो होतो
त्यात मी त्याच्या सोबत न येण्याचे -" मी सांगितलेले कोणतेही कारण, त्याला पटले नसते
त्या पेक्षा, आहे तसे,"त्याच्या सोबत जाणे हा एकच उपाय योग्य होता.
आत जाऊन घरातल्या लोकांना कल्पना देऊन मी बाहेर आलो,
त्याची बाईक माझ्या पार्किंगमध्ये लावली,आणि त्याला माझ्या बाईकवर बसवले,नि आम्ही निघालो.


सिटीमध्ये फेमस असलेल्या बारमध्ये जाऊन बसणे सोपे होते, तिथे जाऊन या महाशयानी काही गोंधळ घातला असता तरी काळजी नव्हती,
त्याला आवरण्यासाठी, सावरण्यासाठी बारमधील माणसांची मला मदतच होणार होती.
या हॉटेलचा तो घरच्या सारखा कस्टमर होता . त्याचे सगळे नखरे ,सगळ्या सवयी इथे सगळ्यांना माहितीच्या होत्या .
खुर्चीत बसल्यावर अख्खी बाटली तोंडाला लावण्याची त्याची घाई सर्वांना माहितीची होती,

आमचा नेहमीचा वेटर ऑर्डर घेण्यास वाट पाहत उभा राहिला,
पण आज तो ऑर्डर देत नाहीये हे पाहून वेटर आणि मी दोघे त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिलो,.जरा वेळाने वेटरकडे पाहत तो म्हणाला-
दोन लिंबू सरबत लावो, एक संपल्यावर लगेच पुन्हा दोन लिंबू शरबत समोर आणून ठेवायचे .
त्याची ही ऑर्डर ऐकून मी स्वतःलाच एक चिमटा काढून पाहिला , हा आणि लिंबू -शरबत ची ऑर्डर ?
विश्वासच बसत नव्हता , माझाच नाही ,तिथे असलेल्या सर्वांचा
हे नवीन आक्रीत होते ...


त्याचे लालभडक डोळे, त्यातली बेफिकीर नि मस्स्तवाल नजर, आवाजातली बेमुर्वत मग्रुरी,यातल एकही लक्षण आज दिसत नव्हते की जाणवत नव्हते.
माझ्या नजरेत नजर रोखत तो बोलू लागला ,
आज आणि या पुढे तुला माझ्या सोबत असतांना हे असे कधीच काही दिसणार नाहीये ..सोडून दिल्या या सगळ्या गोष्टी.आत्ता या क्षणापासून .
तुला तर माहिते आहे..अपना झटका ..एकदा नाही ,म्हणजे नाही ..जिंदगीभर ती गोष्ट पुन्हा करणार नाही मी.
हे मात्र अगदी शंभर टक्के खरी गोष्ट होती ,
या माणसाचा झटका आणि त्यामुळे बसणारा फटका , माझ्यासहित अनेकजण वर्षानुवर्षे अनुभवत आलेलो होतो .


मैत्रीचे नाते जडणे -हा एक आगळा वेगळा योग -प्रत्येकाच्या जीवनात येत असतो ,आणि मैत्री होणे हा एक चमत्कार असेल तर या माणसाशी माझी मैत्री
एक चमत्कारच म्हणावा लागेल .पण आम्ही खूप जवळचे आणि आंतरिक मित्र आहोत "ही गोष्ट आमच्या सगळ्या दुनियेला माहिती होते.
त्याचा आजचा हा मूड मला देखील अनपेक्षित होता ..त्याच धक्यात होतो मी ..त्याने टेबलावरचा ग्लास जोरात आपटला ,
शांत आणि संथ आवाजात तो म्हणाला,


मी कधी दुनियेची पर्वा केली नाही ,माझ्याच मस्तीत जगात आलोय पण ,
जगाला तुच्छतेने लाथाडणाऱ्या माझ्या सारख्याला कसा काय तूच एकाने जीव लावला,?

माझ्या सोबतच्या सगळ्यांनी कायम लुटले, लुबाडले मला,
तू मात्र तुझ्या प्रेमाची उब देत राहिलास,
कोण होतो मी तुझा ?
कुणीच नाही,


तरी माणुसकीचे नाते, त्या नात्याची गोडी तुझ्यामुळे लागली , तुझ्या घराने आपलेपणा दिला मला.
माझ्या स्वतःच्या घरातल्या माणसांनी मला दिली फक्त "सोनेरी कैद,
त्यांच्या कडून मला मिळाले ते पिढीजात शौक आणि व्यसने, मोजता येणार नाही अशी अमाप श्रीमंती,काय करू मी या पैश्याचे ?
उधळीत गेलो ,
मी दारूच्या नशेत आहे, वाया गेलेल्या मला ते मूर्ख समजत ,सोयीने हे लोक मला लुबाडीत गेले ..
मी या लोकांचा भ्रम कधी दूर होऊ दिला नाही ,कारण त्या वेळी तरी मला माझ्या भवताली ..खुशमस्करे हवे असायचे , माझी थुंकी
झेलणारे चमचे हवे असायचे . त्यांची सोय झाली आणि माझी पण सोय झाली त्यावेळी .


आता वाटते - याला काही म्हण तू , मागच्या जन्मीचे माझे काही तरी चांगले कर्म नक्कीच असेल , मग तुझी भेट झाली , आपली ओळख झाली ,
हळू हळू आपली मैत्री झाली.
आणि माझ्या मनाच्या घरावर प्रेम, मैत्री, स्नेह, जिव्हाळा" हे रंग चढले, जे मला अगदीच अनोळखी होते
तुझ्या सहवासात आल्या पासून माझ्या मनाचे दोन भाग झालेत ..एक ..त्याच त्या नरकात रमणारे ऐय्याश मन ,आणि एक दुसरे या सगळ्या
गोष्टींना विटून गेलेले सामन्य माणसाचे एक मन ..माझ्या या मनाची मलाच अलीकडच्या काही दिवसात ओळख होते आहे .
खरं सांगतो विस्वास् ठेव माझ्यावर,


हे माझे मन -"गेल्या काही दिवसांपासून या सगळ्यातून सोडवं "असे सारखं सांगते आहे मला,
त्याच्या या सततच्या भूणभुणीला मी कंटाळून गेलोय, विचार करतो तेंव्हा वाटतंय, किती व्यर्थ आहे या पुढचे जगणे,
दूर जावे या सगळ्या पासून, पुरे करावे हे सर्व, विरक्ती आलीय रे खूप आतून,
तूच मदत कर मला नेहमी सारखी,मी काही न देता, तूच नेहमी देत आला आहेस, आता ही तूच दाता नि मी याचक",
माझ्या अफाट श्रीमंतीच्या पैशातील एक रुपयाचाही मिंधा नसलेले तू एकमेव आहेस मित्रा .


मी काय म्हणतो ते नीट ऐक-
उद्या सकाळी एक गृहस्थ तुला भेटायला येतील
त्यांना कोणत्याही परिस्थितीत विन्मुख पाठवू नको
असे समज की, सर्वात मोठा भिकारी"
तुझ्या समोर उभा राहून भीक मागतोय".
बस हे एवढेच कर, बाकी काही नाही.


चल निघूया आता.
माझ्या पार्किंग मधली त्याची बाईक आणि त्यावरचा तो ",सरळपणे घरी परत आलो हे पाहणे

माझ्यापेक्षा ड्युटीवर असलेल्या आमच्या सोसायटीच्या
वाचमन साठी जास्त धक्कादायक होते.


सकाळ झाली , घाई गर्दीचा नवा दिवस सुरु झाला होता.
ऑफिसला निघायच्या तयारीत होतो मी,
आणि गेटवरून वाचमनने फोनवर विचारले,
साहेब, गेस्ट आलेत, तुमच्याकडे काम आहे, भेटायचे म्हणतात, कुणी नवीनच आहेत गेस्ट.


मी साफ विसरून गेलो होतो ही गोष्ट,
"तो" रात्री म्हणाला होता - उद्या तुझ्याकडे एक गृहस्थ येतील, त्यांना भेट, बोल,
रिकाम्या हाताने परत पाठवू नको",त्यांना येउद्या वर, मी वाचमनला सांगितले.तसे थोड्या वेळात बेल वाजली .बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला मी आत घेतले .
खुर्चीवर बसत ते म्हणाले,...
मला तुमच्या मित्रांने पाठवले आहे, त्या प्रमाणे मी आलोय तुमच्याशी बोलायला .थोडा वेळ काढावा लागेल तुम्हाला .मी त्यांना म्हणालो ..
हो, एक जण येईल , भेटेल बोलेल .असेच तो रात्री म्हणाला हे खरे आहे, पण ,येण्याचे कारण काय आहे हे मात्र त्याने सांगितले नाही ,
त्यामुळे माझा गोंधळ अधिकच वाढलेला आहे ते गृहस्थ मला म्हणाले ..अहो तुमचा गोंधळ तर माझ्या मनातल्या गोंधळापुढे काहीच नाही...
तुम्हा दोघांची मैत्री कशी आणि का झाली असावी ? याचेच कारण मी रात्रीपासून शोधतो आहे पण याचे उत्तर मला अजून सापडले नाहीये.


यावर मी त्यांना म्हणालो .मला आठवते ..आमची पहिली भेट ..
एका कार्यक्रमात तो होता ,त्याचे नेहमीचे पार्टी -बहाद्दर मित्रांचे टोळके होते , या सर्वांचा आमच्या सारख्या सामन्य लोकांशी काही संबंध असण्याचे
काही कारण नव्हते , आलेल्या शेकडो लोकात जसे ते होते ,तसे अनेक इतर लोक होते ..त्यातला एक मी होतो.
कार्यक्रमानंतर उपस्थित लोकांच्यासाठी भोजन आयोजित केले होते , या अगोदरच ..या मोठ्या लोकांचे "पिणे सुरु झालेले "आम्ही पाहत होतो .
अचानक काय झाले कुणास ठाऊक त्यांच्या वाद सुरु झाले, नंतर भांडण सुरु झाले .मग चक्क मारामारी सुरु झाली . तर्र झालेल्या या मंडळी पासून
सारे दूर उभे राहून मजा पाहत होते .


तशातच एकाने रिकामी बाटली याच्या डोक्यावर जोराने मारली ..हा खाली पडला , डोक्याला जखम झाली ,त्यातून रक्त वाहू लागले , हे पाहून
त्याचे नेहमीचे पियक्कड दोस्त पळून गेले . त्या हॉलमध्ये काही लोकच उरले , मदतीला आम्ही दोनचारजण पुढे झालो . त्याला हॉस्पिटल मध्ये नेले.
पोलीस केस होणार "याचीच भीती आम्हाला वाटत होती .

पण तसे काही झाले नाही .कारण ..त्याच्या घरच्या माणसांनी "म्यानेज केल्या सर्व गोष्टी.
तो दुरुस्त होई पर्यंत ..मी रोज त्याच्या सोबत थांबलो होतो , आमच्यात काहीच समान धागे नव्हते , आवडीच्या सारख्या गोष्टी नव्हत्या .
माणुसकीच्या भावनेतून ",मी त्याला सोबत केली .


तो बरा झाला , नंतर तो त्याच्या जगात , मी माझ्या जगात . त्याला आठवणीत ठेवावे असा काही तो खास मित्र वगेरे नव्हता .
त्याने मात्र माझी आठवण ठेवली .
त्याच्या नेहमीच्या हॉटेल्स मध्ये बैठक जमली की त्याचे निरोप यायचे , पण मी कधीच त्याच्या निरोपप्रमाणे गेलो नाही .


एकदा त्याने फोन करून सांगितले .
.मी आज तुझ्या घरी येणार आहे ,काळजी करू नकोस ,दारू न पिता , अगदी सभ्य अवतारात मी येईन .तू फक्त हो " म्हण
.तुला जर वावगे वाटले तर
मी तुला पुन्हा कधीच माझे थोबाड दाखवणार नाही.
त्याच्या शब्दवर विस्वास ठेवून मी त्याला माझ्या घरी येऊ दिले . माझ्या घरातील माणसांना या माणसाच्या गावभर असलेला लौकिक माहिती होता ,
त्यांनी नाराजी व्यक्त केली , मी त्यांना म्हणालो .. ही त्याची पहिली आणि शेवटची संधी असेल ..एक सभ्य माणूस होण्यासाठीची .


आणि अगदी तसेच झाले ..त्याने ही संधी ..शेवटची होऊ दिली नाही ..
अगदी सहजतेने तो आला , बोलला ,वागला , त्याचे बघणे , त्याची नजर , कुणाला बोचली नाही, टोचली नाही " हे सर्वांना जाणवले आहे ,हे मी पाहत होतो
एक दिवस तो म्हणाला ..मित्रा , घर, घरातील माणसे , त्यांचा सहवास ,
हे सगळ मानसिक सुख जिवंतपणी मी अनुभवल ते तुझ्या घरात आल्यामुळे
.बोल, तुला काय हवे आहे ? तू फक्त सांग ,मी दिले तुला.
त्याचा हात हातात घेत मी म्हणालो..दोस्त ..तू आता जसा आहेस ,तसाच रहा नेहमी माझ्या साठी ,आमच्या साठी.
या दिवसानंतर अगदी सहजपणे आम्ही भेटलो ,भेटत राहिलो ..तो अधिक जवळ येत गेला ,मैत्री गहिरी होत गेली.


-मी आमच्या मैत्रीची सारी हकीकत त्या आलेल्या व्यक्तीला सांगितली . त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित उमटले .
ते म्हणाले - तुमच्या मित्राची नजर पारखी नजर ..आहे . त्यांनी जे ठरवले आहे ..ते कधी चुकले आहे .असे मला आठवत नाही .
मी म्हणालो -
ते सगळ ठीक आहे हो..पण, तुम्ही अजून तुमच्या येण्याचे प्रयोजन ,कारण सांगितले नाहीये..ते सांगा ..
त्यावर ते म्हणू लागले -


तुम्ही काही काळजी करू नका..मी काय सांगतो ते ऐका फक्त..
तुम्हाला तुमच्या मित्रांने काय सांगितले ते पुन्हा आठवा -
मला विरक्ती आलीय रे या सगळ्या जगण्याची .नको वाटतय हे सगळ ,लबाडीच्या संगतीमध्ये आयुष्य जगणे नकोसे झाले आहे .
या नकोशा झालेल्या मनाच्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी ..तुमचे मित्र या सगळ्या पासून खूप दूर गेले आहेत ,
घाबरू नका ..त्यांनी त्यांचे जीवन संपविले आहे ",असे समजू नका , ते येतील पुन्हा परत ..


पण तो पर्यंत ..त्यांच्या सगळ्या व्यवसायाचे , धन-संपत्तीचे ..व्यवहाराचे .सर्वाधिकारी ..विश्वस्त म्हणून तुम्ही काम पाहावे
अशी इच्छा व्यक्त केली आहे . त्यांच्या परिवारातील सर्वांना या पुढे सगळ्या गोष्टीसाठी तुमची परवानगी घेतल्याविना काहीही करता येणार नाही.
हे घ्या त्यांचे हे कागद-पत्र ..तुम्ही यावर सही करायची आहे. त्यांनी त्यांची सही अगोदरच करून ठेवली आहे.बघा .


तुम्ही कोण हे आहात हे तर सांगा मला - माझा प्रश्न ऐकून ते म्हणाले ..
हे पहा हे सर्व करायची आयडिया तुमच्या मित्राला खूप दिवसापासून सुचली आहे. त्यांनी ती प्रत्यक्षात मात्र आता आणायचे ठरवले आहे.
मी त्यांचा वकील आहे. त्यांच्या इतर अनेक बिझिनेस फर्मचा सल्लागार पण आहे मी.तुम्हाला भेटण्या अगोदर मी तुमच्या बद्दल सगळी माहिती
मिळवली , तुमचा अभ्यास केला आणि मगच ..तुमच्या मित्रांने आणि आम्ही मिळून ही जबाबदारी पार पाडणारा योग्य माणूस म्हणून तुमची निवड केली .


हे कागद पत्र ..करा तुमच्या सह्या ...
मी त्या वकीलसाहेबाकडे पाहत म्हणालो - हे काय लचांड बांधताय तुम्ही माझ्या गळ्यात , ?
वकीलसाहेब म्हणाले -- ही तुमची नौकरी समजा. याबद्दल तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे. कारण तुम्ही तुमच्या मित्राकडून पैसे घेणार नाहीत .
याची खात्री सगळ्यांना आहे. यापद्धतीने तर तुम्हाला हे करण्यास काही कमीपणा आहे "असे वाटण्याचे काही कारण नाहीये.
चला करा सह्या लवकर ..
तुमचे मित्र वाट पाहत असतील ..उद्या त्यांच्या पर्यंत हे संमतीपत्र पोंचले पाहिजे.


म्हणजे ..तो आता इथे नाहीये का ? मी आश्चर्याने विचारले


वकीलसाहेब सांगू लागले ..
नाही ,आता ते या गावात नाहीत .
तुमची भेट झाली .आणि ते शहर सोडून निघून गेले ..आता तुमची सही झालेले कागदपत्र कधी येतात "याची ते उत्सुकतेने वाट पाहत असतील.
एक गोष्ट सांगावीशी वाटते ..तुम्हाला पाहिल्यापासून ..


मी कागदावर सह्या करून ते देत म्हणालो..काय सागावे वाटते मला पाहिल्यापासून ? जरूर सांगा वकीलसाहेब.


माझ्या पाठीवर हात ठेवीत वकीलसाहेब मला धन्यवाद देत म्हणाले -
काय सांगावे तुम्हाला -
लबाडी ,अविश्वास , फसवणूक ,स्वार्थ ,ओरबाडून घेणे ..हे सगळ पाहण्याची सवय माझ्या डोळ्यांना आहे, पण ,तुमच्या मित्रांने तुमच्या मैत्रीवर
विश्वास ,.तुमच्यावर विश्वास ठेवलाय ..हे मला खरेच वाटत नाहीये .

अगदी खराखुरा आगळा वेगळा विश्वास "अनुभवला आज मी.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कथा - विश्वास
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
985077342
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED