e sunder asmaani pari collection of love poems books and stories free download online pdf in Marathi

ए- सुंदर अस्मानी परी ...(प्रेम-कविता संग्रह )

ए –सुंदर अस्मानी परी

(प्रेम-कविता –संग्रह )

कवी-अरुण वि.देशपांडे –पुणे.

-------------------------------------------------------------

१.

ए सुंदर अस्मानी परी

----------------------------------------------

दिसतेस गोड तू किती
ए सुंदर अस्मानी परी ।।

भेटला जो एकदा तुला
तो त्याचाच ना राहिला
खोल डोहात डोळ्यांच्या
आकंठ तो सहज बुडाला
ही गोष्ट तू मान ग खरी
ए सुंदर अस्मानी परी ।।

किती छान योग आहे हा
दे जागा मज मनात तुझ्या
नाही फार मोठी ही गोष्ट जरी
मज वाटेल ती अप्रूप भेट खरी
ए सुंदर अस्मानी परी ।।

दिसतेस गोड किती तू
ए सुंदर अस्मानी परी ।।
------------------------ -----------------------

२.

श्रावण सुख हे ...

-----------------------------------

हिरवाई सारी

धरती सजली

नयनरम्य सारे

श्रावण सुख हे ..

सखी यावीस तू

सोबतीला अशी

पाहू या मिळूनी

श्रावण सुख हे ..

डोंगर दरी हे

बघ बहरले

नजरेत भरे

श्रावण सुख हे ...

श्रावण हा आला

आले सारे सण

झुल्यात झुलते

श्रावण सुख हे ...

श्रावण मासात

दिसे हिरवाई

आनंदे मन घेई

श्रावण सुख हे

-------------------------------------------

३.

सखी

---------------------------------

गाली तुझ्या खळी

खुले माझी कळी

सखी , चतुर खेळी

तुझी दरवेळी...

फुलं-गजरे

केसांत माळले

बघ कसे खुलले

रूप तुझे साजरे ....

क्षण भारलेले

मनी साठलेले

मी अनुभवलेले

सखी ,सोबतीत तुझ्या ...

-------------------------------------------------

४.

सोबती
--------------------------------
आपलेपणाने छान हे
चार शब्द तुझे बोलणे
मनाच्या अंगणात पडे
टिपूरसे शीतल चांदणे

किती साधे किती सरळ
संवादभेटी आपल्या या
भावना गोड भावूक त्या
मनास भिडती थेट सरळ

आठवण तुजला येते माझी
मजला आठवण येते तुझी
असू दे अंतर ते मैलोगणती
हवी कशाला त्याची गिणती

चालणेच आहे खूप दूर दूर
जीवा लागे अनामिक हुरहूर
असावीस तू आधारसोबती
चालेल सारे असो अंतर किती
----------------------------------------

५.

सांज उदास ती

---------------------------------

सांज उदास ती

पुन्हा आज आली

तुझ्या आठवणींचा

साज लेवून आली.......

सखे विरहात तुझ्या

मन आले बघ दाटुनी

थेंब डोळ्यात आले

जड झाली ही पापणी......

ज्या वाटेने प्रिया तू

तेव्हा निघून गेली

ती वाट हळूहळू

धूसर होत गेली......

सांज उदास ती

पुन्हा आज आली...

----------------------------------

६.

स्वप्नात जे पाहिले ...

-----------------------------------------

स्वप्नात जे पाहिले सारे

सत्यात येऊ दे ते सारे

सोबत आहेस तू सदा

मन पाही हेच कितीदा

स्वप्नात भेटशी रोजला

सत्यात येऊदे हे सारे

स्वप्नात जे पाहिले सारे

आणाभाका शपथा दोन्ही

घेतल्या सोबत आपण

शब्दातून करू व्यक्त रे

सत्यात येऊ दे ते सारे

स्वप्नात जे पाहिले सारे

चंद्र, चांदण्या, तारे ,वारे

स्वप्नात हे पाहिले सारे

वास्तवात नसेल ना रे

समजून घे सार सारे

-----------------------------------

७.

-आठवण तुझी

----------------------------------

आठवतो तुजला सखे मी

दिवसाच्या साऱ्याच प्रहरी

पहाट जाते आठवण्यात

रात्र सरते अशीच सारी ...।।

सकाळी पाहता तू दिसते

उमलत्या सुंदर फुलापरी

वावरतेस भोवती माझ्या

भासतेस जशी स्वप्नपरी ....।।

रंग गुलाबी गाली तुझिया

भाव ख्त्य्याळ दिसती डोळा

भान हरपुनी बघत राही

रंग साडीचा हा मस्त निळा .......।।

---------------------------------------------

.८.

चांदणी
-----------------------------
आकाशीच्या अंगणी
चंद्रा सवे चांदणी
चंद्रप्रकाश दीप मी
तू अनामिका चांदणी..

दीप तुझ्या मनातला
ज्योत तुझी भावना
प्रीतभाव उजळता
प्रकशु दे तव भावना

जन शब्दांचे ओरखडे
तू पुसुनी ते सारे टाक
लक्ष देऊन जरा ऎक
तुझ्या अंतर्मनाची हाक
---------------------------------

९.


तू ओळख पाहू
----------------------
तू बोलता ठेव
कर प्रेम गोष्टी
माझ्या मनीचे ते
तू ओळख पाहू

सखे तू प्रेमाचा
दे मला आधार
घे हात हातात
आधार दे पाहू

चल सखे दोघे
नदी किनारी जाऊ
निळ्याशार जलात
प्रतिबिंब ते पाहू

नसे कधी होत
मना सारखे ते
अधिर होणे नको
दोघे वाट पाहू
----------------------------------

१०.

तुझे-माझे

-----------------------------

तू जप मन माझे

आता झाले जे तुझे

तुझ्या मना जपेन

ते आहे आता माझे......

तू जपशील नाते

मनाशी मनाचे

घेऊ सखे वेचूनी

क्षण सारे सुखाचे......

उबदार मिठीत घ्यावे

ओठ तुझे ओठी असावे

चुंबने मधुर मधुर घे

स्वर्गसुख अनुभवावे......

------------------------------------

११.

श्रावणातला पाऊस

--------------------------------------
श्रावणातला पाऊस पडे घनघोर
दूर देशी साजण जीवास लागे घोर ।।

झरझरती न थांबती श्रावण धारा
डोळ्यातूनी विरहाच्या या तशाच धारा ।।

पावसा रे का लावली ही श्रावणझड
येणारे साजणा जरा हळू हळू पड ।।

दिस नाही रात नाही झड ही थांबना
आठवणी सख्याच्या डोळा ही लागना ।।

चिठ्ठी नाही आली त्याची मन लागना
येइल कधी सखा तगमग थांबना ।।

दारी उभी रहाते पावसाळी सांजेला
मनी याद सख्याची तिन्ही सांजेला ।।

श्रावण पाऊस जसा जिवलगावाणी
दोन प्रेमी जीवांना जवळ हा आणी

श्रावणातल्या पावसा तुला साकडे
घेऊन ये साजणास माझ्या इकडे ।।
------------------- ------------- --- --- --

१२.

आता तुझ्या असण्याने
---------------------------------
सखी तुज सांगतो
काय घडले नवे
जग भासते हे नवे
आता तुझ्या असण्याने

एकटा होतो कधीचा
नाही आता असे काही
गेला एकांत दूर दूर तो
आता तुझ्या असण्याने

रस्ते समोर होते सारे
निर्जन शांत शांत ते
किती गजबजले ते
आता तुझ्या असण्याने

भरकटे मन उगीचच
असेच कितीदा तरी
असते स्थिर हे बेटे
आता तुझ्या असण्याने
-------------------------------------------

१३.

रंग श्रावणाचे
-------------------------------------
रंग श्रावणाचे
हिरव्या रंगांचे
हिरवाईत या
रूप खुले सखीचे

रंग श्रावणाचे
पाहण्यास जाऊ
चले सखे दोघे
डोंगर दरी पाहू

रंग श्रावणाचे
रूप विलोभनीय
चराचर सृष्टीचे
सुख हे दृष्टीचे

रंग श्रावणाचे
लेऊनी सखी
आज दिसतेस
सुरेख सावनी

सख्याची सखी
सुख देई भरून
गेले मिसळुन
रंग श्रावणाचे
----------------------------------

१४.

फिके वाटे तुझ्याविना
-------------------------------
मन कशात लागेना
काही काही सुचेना
मैफिल भवतीची
फिकी वाटे तुझ्याविना

मन झुरते तुझ्यासाठी
काही केल्या ते ऐकेना
ये ना सखे भेट त्यास
फिके वाटे तुझ्याविना

फुले जरी आहेत बागेत
एक ही त्यातले भावेना
सखी गुलाब फुल माझे
फिके वाटे तुझ्या विना

नजर जाई जिकडे
नजरेस काही पडेना
काही कसे पाहू सखे
फिके वाटे तुझ्या विना

फिके वाटे तुझ्याविना
का दूर दूर असे तू
ये लवकरी इकडे
सख्यास तुझ्या भेट ना
---------------------------------------------

१५.

तू आहेस म्हणून..
-----------------------------------------------
कंटाळा आला होता
रोज सारखाच दिवस
ना दिवसांत बदल
ना माझ्यात बदल....

आला दिवस गेला दिवस
चालू होत निरस जगणे
तू भेटलीस,
भेटत राहिलो आपण...

लक्षात यायला लागलं
छान वाटायला लागलंय
तू आहेस म्हणून......

कळली नसती प्रेमातली गोडी
जमली नसती तुझ्याशी जोडी
उमजले हळू हळू
तू आहेस म्हणून....

रंगदार झालंय जगणं
सुरम्य आहे हे सारं
सखे, सार स्वप्न खरं
तू आहेस म्हणून..
---------------------------------------------

१६.

स्वप्नांच्या गावात

----------------------------------------------

स्वप्नाचे गाव आपले दोघांचे
वसविले एका संध्याकाळी
स्वप्न होऊनी स्वप्नात रोज
भेटूया आपण संध्याकाळी

मस्त चांदण्यात या फिरावे
हातात हात तुझे असावे
नजरेत नजर मिसळूनी
मिठीत हळुवार तू यावे

सलज्जास्मित अस्फुटसे
पाहुदे मज मन भरूनी
नजरेतली शराब तुझ्या ती
पिऊ दे सखे मन भरूनी

ये निकट अजुनी साजणी
धुंदसे स्पर्श तुझे होऊ दे
रसदार ओठास चुंबूनी
अधर रसपान घेऊ दे

प्रणयआतुर चतुर सखी
रसिकतेने रस रंग भरे
खेळ रंगवूया मिलनाचा
सत्य स्वप्नातच करू खरे
----------------------------------

१७.

सखी
----------------------
तू भेटली सखे
काय सांगू तुला
नव्याने मीच ग
भेटलो मी मला

तू भेटली आणि
सखे मी ठरवले
शोध घेणे बस
हवे ते सापडले

तू भेटली आणि
कळले मज सखी
अधुराच होतो मी
तुजवीण हे सखी

तू भेटलीस मजला
एक कळाले ज्याला
प्रेम नाही मिळाले
काही नाही मिळाले

तू भेटली आणि
सखे दिवस ते
बदलले माझे सारे
नवे भासे मज सारे
-----------------------------------

१८. तू एक

----------------------------

छान वाटले

भेटता तू एक

दूर जाऊ नको

वेगळी तू एक.....

भावना छान ही

आवडते कुणी

मनात घर एक

करे नवे कुणी......

अंतर आहेच

खूप गोष्टींचे

नात्यात नको

यामुळे अंतर.....

कवितेने दिली

भेट अचानक

कविता सुरेख

आहे तूच एक.....

-----------------------------

१९.

तुझ्यामुळे
-----------------------------
कंटाळा आला होता
रोज सारखाच दिवस
ना दिवसांत बदल
ना माझ्यात बदल....

आला दिवस गेला दिवस
चालू होत निरस जगणे
तू भेटलीस,
भेटत राहिलो आपण...

कळली नसती गोडी
जमली नसती जोडी
उमजले हे झाले ते
सारे तुझ्यामुळे ...

रंगदार झालंय जगणं
सुरम्य आहे हे सारं
सखे, स्वप्न हे खरं
ते तुझ्यामुळे .
-----------------------------

२०.

लाघवी रूप हे..

--------------------------------

किती हे लाघवी हसणे
टपोऱ्या नजरेने पहाणे
रेशीम केसांच्या सावलीत
माझ्या मनाचे आता ठिकाणे...

सुंदर आहेस तू सखे
रंग सारेच छान शोभती
हिरव्या रंगाची खुमारी
खुलवी तव सुवर्ण कांती..

किती गोड स्मित तुझे
शुभ्रतम या दंत कळ्या
गालावरी अस्फुट दिसती
नाजूकशा गोल खळ्या..

अशीच होऊ दे दर्शनभेट
मना माझ्या सुखावणारी
देखणे रूप तुझे दिसावे ही
गोष्ट असे मज आनंद देणारी
-----------------------------------------

२१.

कळूनी आले

------------------------------------------

दोन वेगळ्या मनांचे जुळणे

सहज सोपे साधे मुळीच नसते

एकमेकास घ्याचे समजुनी हे

आपोआप सारे कळूनी आले ...

मुग्ध चांदण्यात सोबती ते

मंद वाऱ्यासंगे डोलत होते

मन उधाण कशाने झाले ?

आपोपाप हे कळूनी आले ...

उमटले वाळूत किनारी या

तव पावलांचे नाजूक ठसे

गोड स्मित का खुलले गाली ?

आपोआप हे कळूनी आले

आपले घर तू सजवावे

स्वप्न सुरेखसे सत्यात यावे

माझे मन तू वाचले सखे अन

आपोआप हे कळूनी आले ..

---------------------------------------------------

२२.

पर्व प्रीतीचे

---------------------------------------

तुझ्यामुळे आले हे सुख

वसंत हा पुन्हा ग आला

सहवासात तुझ्या सखे

अक्षर सोहोळा बघ रंगला ..

लिहुत मिळूनी अक्षरे आता

दोघे आपण या प्रेमाची

शिकव तूच धडे नव्याने

मी लिहीन कविता प्रेमाची ...

मधुर -छान प्रीत-पर्व हे

आहे तुझ्या-माझ्यातले

म्हणावेस एक प्रेम गीत तू

सुरेख ,सुरेल आवाजातले ...

------------------------------------

२३.

स्वप्न एक-
-----------------------------
स्वप्न एक आवडे
ज्यात तू असते
तू बोलत रहावे
मी ऐकत रहावे ...

स्वप्न हेच पहावे
किती छान न हे
पाहुत स्वप्ने अशीच
जी मनास आवडे...

आवाज यावा तुझा
आहेस रे तू कुठे ?
उत्तर माझे ठरलेले
तुझ्याविना कसा कुठे..

सांगेन मी तुज जे
करीत जा तू तसे
आपल्या माणसास
आनंद देणे सुख असे..
----------------------------------------

२४.

कविता- मी वाट पाहुनी थकलो
---------------------------------------------
मी वाट पाहुनी थकलो
येणार म्हणुनी मी बसलो

तू दिलेस वचन मला
येशील भेटण्यासी मला
आलीस ना तू परतुनी
येणार म्हणून मी बसलो
मी वाट पाहुनी थकलो....

गेलीस सोडुन तू मजला
मजवरी जणू देव रुसला
जिंदगी झाली विराणी सारी
मी सारेच गमावून बसलो
मी वाट पाहुनी थकलो..

गेली तू खरेच विसरूनी
काही कसे तुज ना वाटले
खंत वाटते माझ्या ग मनी
दोष नशिबा लावीत बसलो
मी वाट पाहुनी थकलो...
-------------------------------------------

****************************************************************

ए -सुंदर अस्मानी परी

(कविता –संग्रह )

कवी- अरुण वि.देशपांडे –पुणे.

मो-९८५०१७७३४२

*************************************************************************

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED