मित्र my friend - भाग १५ Vinit Rajaram Dhanawade द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मित्र my friend - भाग १५


सकाळी उशिराने जाग आली त्याला.. २ दिवस अपूर्ण झोपेमुळे असावं कदाचित... घड्याळात पाहिलं तर सकाळचे ९.३० वाजत होते. डोकं अजूनही जड होते. पहिला विचार आला तो प्रियाचा.. काय झालं असेल तिथे.. तसाच बेडवर बसून होता. पोटात भुकेची जाणीव झाली. आपण आता मुंबईत आहोत, घरी आईने बनवून दिला नास्ता, जेवण... इथे सर्व स्वतः करावं लागते.. हे लक्षात आलं त्याच्या... अंघोळ करून.. काहीतरी नास्ता आणि साधंसं जेवण सुद्धा बनवलं. बॅगेतलं सामान काढून व्यवस्थित लावू लागला. काही पैसे सापडले बॅग मध्ये..... किती खर्च झाला काय माहित.... खर्चावरून आठवलं.. नोकरी शोधावी लागेल आता... प्रियाने तिथे जो तमाशा केला, त्यावरून वाटतं नाही.. बॉस मला परत ठेवेल तिथे... तरी जाऊन बघायला काय हरकत आहे... बघूया सॉरी बोलून.... विवेकने लगेच नास्ता करून कपडे चढवले , तडक त्याच्या ऑफिसमध्ये गेला.

बॉस होता, विवेकने विनवणी केली जराशी... जराशे आढेवेढे घेत बॉसने विवेकला पुन्हा ठेवून घेतलं, उद्यापासून पुन्हा ये कामाला, सांगून बॉस निघून गेला. विवेक खुशीतच घरी आला. दुपारचे जेवण आटपून , मुंबईतली काही कामे करून टाकली त्याने. दुसऱ्या दिवसापासून, पुन्हा तेच " routine life " सुरु झालं विवेकचं. चार -पाच दिवस उलटूनही गेले. रोजचा दिनक्रम सुरु झाला.... सकाळी लवकर उठणे, नास्ता करणे... दुपारचा डब्बा बनवणे... सकाळपासून संध्याकाळ पर्यंत काम... घरी येऊन रात्रीच जेवण.. सगळं झालं कि झोपणे... तेच जुनं जगणं... बदललं होतं ते फक्त एक... आलेल्या प्रत्येक दिवसात प्रियाचा विचार यायचा त्याला... कुठे असेल ती ... दिल्लीला केशव सोबत कि साताराला घरी...

आज एक पूर्ण आठवडा झाला , विवेकला मुंबईत येऊन. प्रियाची काहीच खबरबात नाही.. विवेक ऑफिसला गेला. साधारण सकाळचे १० वाजत असतील. विवेकच्या बाजूचा फोन वाजला. reception वरून कॉल आलेला... विवेक आला.

" पोलिस स्टेशनमधून फोन आहे. " ,

" माझ्यासाठी ? ",

" हो... " विवेकने फोन कानाला लावला.

" विवेक साहेब !! ",

" हो.. बोलतो आहे ... ",

"ओळखलात का आवाज.... तुमची मैत्रीण आली आहे... परत जीव देयाला... येता का जरा... "

प्रिया ?? ... प्रिया मुंबईत आहे... ?? विवेक बुचकळ्यात पडला.. लागलीच निघाला. पोलिस स्टेशनमध्ये आला. प्रिया होती बसून. विवेक आलेला बघून inspector बोलले.

" या विवेक सर... तुमचीच वाट बघत होतो.. पुन्हा उभी होती तुमची मैत्रीण... जीव देयाला... आमच्या एका हवालदाराने पकडून आणलं... एक काम करा, आमच्याकडे एक दोरखंड आहे... घरात बांधून ठेव... मग घराबाहेर सुद्धा पडणार नाही.. " विवेक ओशाळला.. प्रिया त्याच्याकडे बघून हसत होती.

" तू कधी आलीस ... आणि हे काय परत आत्महत्या वगैरे.. " विवेक प्रियाजवळ येत म्हणाला.

" ते असंच रे.. तुझ्या ऑफिसचा फोन नंबर नव्हता ना माझ्याकडे... मग हि आयडिया आली डोकयात.. म्हणून समुद्राच्या कठड्यावर उभी होते. पोलिसांकडे असा नंबर मागितला असता तर दिला नसता.. म्हणून हे केलं.. उडी मारायला काय वेड लागला आहे का मला... बघ लगेच तुला फोन करून बोलावलं ... धावत आलास माझ्यासाठी... " विवेकला मिठी मारली प्रियाने...

" मिठी वगैरे अजिबात नको... दूर रहा.. केशवला काय वाटेल... तू दूर रहा.... आणि जा घरी तुझ्या परत... " विवेक प्रियाला दूर करत बोलला.

" सॉरी ना रे... केशव जाऊ दे उडत..... प्लिज... प्लिज .. माफ कर... आपण एकत्र राहू.. तुझी साथ कधीच सोडणार नाही मी.. " प्रिया विवेकच्या पाया पडू लागली. हे सगळं पोलिस स्टेशन मध्ये असलेले सगळे बघत होते.

" ओ... ते सात - आठ घरी... पोलिस स्टेशन आहे हे... सिनेमा हॉल नाही... निघा इथून.... " inspector ओरडले तसे दोघे बाहेर आले..

" कुठे थांबली आहेस.. आणि कधी आलीस मुंबईत... " विवेकचा पहिला प्रश्न..

" सकाळीच आले.... आणि इथे कोण ओळखते मला... तुझ्याच घरी थांबणार ना... " विवेकने डोक्याला हात लावला. ऑफिस अर्धवट सोडून आलो. तिथे घेऊन गेलो तर बॉस तापेल... घरीच घेऊन जावं लागेल.

त्याच्या रूमवर पोहोचला तर बाहेर संदीप, "त्या " काकांसोबत उभा... गप्पा-गोष्टी रंगलेल्या... जसे काही जुने मित्रच... " समाजलाव काय !! " विवेकला बघून संदीप बोलला. हा पण... !! म्हणजे याच्या बरोबर आली प्रिया..

" तू काय करतो इथे ? " ,

" you have to.... ",

" काय ? ",

" the room of चावी... is you... ",

" काय बोलतो आहेस तू... ? ", विवेकला काहीच कळलं नाही.

" या रूमची चावी तुझ्याकडे आहे ना.. म्हणून बाहेर उभा आहे .... समजालाव काय... " ,

" अरे मूर्ख माणसा... मुंबईत का आलास ते विचारलं... ",

" you have to... " यावर विवेक सोडून बाकी सगळी मंडळी हसली.

" विवेक... आत जाऊया का.. आणि या काकांनाही घे आत.. " प्रिया बोलली.

" राहू दे... राहू दे... " म्हणत काका पळून गेले. विवेकने दरवाजा उघडला. संदीप,प्रिया आत आले.

" मी सांगतो सगळं.. " संदीप. " तू गेलास.. त्यानंतर तिथे खूप वादावादी झाली केशवसोबत.. मीही भांडलो... प्रिया सुद्धा... केशवने खरं सांगून टाकलं... तिथे थांबण्यात काही अर्थ नव्हता... कारण केशवने त्याच्या घरी सुद्धा सांगितलं नव्हतं, तो अशी कामे करतो ते.. त्याच्या आईनेच प्रियाची समजूत काढली. केशवला स्वतःहून पोलिसांच्या हवाली केलं त्याच्या वडिलांनी.... आम्ही दोघे , तू निघालास त्याचदिवशी निघणार होतो. पण केशवच्या वडिलांनी थांबवून ठेवलं. दोन दिवस त्यात गेले. नंतर किती पाऊस सुरु झाला, ३ दिवस निघता आले नाही. केशवच्या आई-वडिलांना साताऱ्याला यायचे होते पुन्हा.. तर त्यांना मदत केली. मगच आम्ही निघालो. आणि ट्रेनने आलो बरं का... तुझे पैसे वाचवले.. हे घे... उरलेले पैसे.. " संदीपने एक पाकीट दिलं, पैसे होते त्यात.

" सॉरी विवेक... " प्रियाने बोलणे सुरु केले." मला माहीत नव्हतं इतकं केशवबद्दल.. शिवाय माझीही चूक झाली... आंधळ्या सारखं प्रेम केलं.. तू सांगत असतानाही.. खरंतर , मी अन्याय केला तुझ्यावर.. लहानपणापासून सोबत आहेस माझ्या.. काका -काकीने वाढवलं, पण तू.... तुझ्यामुळे मी माणसात राहू शकले.. प्रत्येक वेळेला माझ्यासोबत राहायचा तू... वेळोवेळी हट्ट पुरवले माझे... मी काय दिलं... फक्त त्रास... ",

" पण आता का आठवते आहे तुला हे सगळं. ? " ,

" केशव फक्त मैत्रीण मानायचा मला... खरं प्रेम तर तू केलं माझ्यावर.. बरोबर ना... " प्रियाच्या या वाक्याने विवेक गांगरून गेला.

" क... कोणी सांगितलं, माझं प्रेम आहे ते... ",

" एवढी काळजी करणार.. फक्त मित्र कसा असणार ना... मी ओळखू शकले नाही तुला... so sorry विवेक... " पुन्हा मिठी मारायला प्रिया पुढे आली.

" अजिबात नाही हा, मिठी वगैरे... जा ना.. त्या केशवला मिठी मार... एवढं सांगून पण ऐकलं नाही माझं कधी.. हट्टीपणा नुसता... तुझ्यामुळे झोप तरी लागते का.. उगाच ते प्रेम वगैरे... त्रास नुसता.. " विवेक एका बाजूला जाऊन उभा राहिला.

" प्रेम तर करतोस ना माझ्यावर अजून... ",

" मैत्रीखातर... प्रेमाखातर केलं ना एवढं तुझ्यासाठी... किती वर्ष, तुला कधीच कळलं नाही. " विवेकचे डोळे भरून आले. प्रियाचेही डोळे पाणावले. प्रिया तिच्या गुढघ्यावर बसली.

" खरंच माफ कर.. यापुढे तुला कधीच असा त्रास देणार नाही, अजिबात हट्ट करणार नाही. फक्त मला सोडून जाऊ नकोस कधी. तुझ्याशिवाय कोण आहे माझं. करशील माझ्याशी लग्न... ? " विवेक अवाक होऊन बघत राहिला.

" सांग ना... करशील का माझ्याशी लग्न... कि जाऊ पुन्हा जीव देयाला.. जातेच मी.. " प्रिया जाण्यासाठी उभी राहिली. पट्कन विवेकने तिला मिठी मारली.

" ये वेडाबाई.. करिन गं... करिन लग्न....फक्त एक अट आहे... तुझा हट्टीपणा कधी सोडायचा नाही ... प्रॉमिस का.. ",

" हो रे बाळा... प्रॉमिस !! प्रॉमिस !! " दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. संदीप टाळ्या वाजवू लागला.

" प्रॉमिस आमच्या वेळेला असायची... " म्हणत त्याने दोघांना मिठी मारली.

" चला....... झालं सगळं नीट... मी निघतो मग माझ्या घरी.. काय ना.. तिथे दुकान आहे माझं. तुमच्या या भानगडीत किती नुकसान झालं माझं काय माहित... समजालाव काय !! " संदीप हसत म्हणाला.

" आम्ही सुद्धा येतो आहे... तिथेच लग्न करायचं आहे ना... " प्रिया...

" अगं पण लगेच कसं... मुंबईत कामे... " विवेक बोलत होता काहीतरी. प्रियाने त्याचे वाक्य मधेच तोडलं.

" मला आताच निघायचे आहे... आत्ता म्हणजे आत्ताच... ",

" हो गं माझी आई... हो.. निघूया. सामान तरी आवरू दे. " प्रिया आनंदाने उडया मारू लागली.

" तुमच्या नावाचे पोस्टर बनवायला लागेल ना... Priya weds Vivek... इंग्लिशमध्ये बनवायला पाहिजे बरं का ...नवरा मुंबईचा आहे ना... " संदीप मस्करी करत होता. विवेकला हसायला आले.

" इंग्लिशमध्ये बनवायचा पण वेगळ्या नावाने. " प्रिया बोलली. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. विवेकचा हात तिने स्वतःच्या हातात घेतला.

" Priya weds Vivek नाही... Priya weds Friend... Best Friend... सखा... मित्र !! ... my friend ... "

------------------------------------- The End ---------------------------