मला काही सांगाचंय...- १९-२ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय...- १९-२

१९. स्मृति remaining - 1

तिच्याशी दुसऱ्यांदा भेट झाली तो दिवस ... मी आणि माझ्या मित्रांनी ऍडमिशन बद्दल आज माहिती मिळवून लगेच कॉलेज निवडायचं ठरवलं होतं , सर्व मित्र एकाच कॉलेजला आणि एकाच वर्गात प्रवेश घेऊ अस ठरवून होतो . मी कॉलेजला ऍडमिशन करायची म्हणून शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्कशीट आणायची करिता गडबडीने निघालो होतो , आधीच उशीर झालेला ... मग काय घरूनच सायकल जोरात चालवत निघालो . तर ती तिच्या घराच्या अंगणात समोरच हजर , मी येत असल्याचे दिसून तिने हसत मला पाहिले . मग काय मी सायकल हळू चालवत समोर जात होतो . मनात वाटलं कोणत्या वेळेला हि दिसते आहे ? थांबून हिच्याशी आज बोलावं का कि मला तुझ्याशी मैत्री करायची आहे ?


मनात काय चाललं होतं काही उमजत नव्हतं , अन तिने आवाज दिला ...

" कुमार ... "


मी जरा गोंधळून तिच्याकडे पाहिलं " काय म्हणतेस ? "


" जरा थांबशील , तुला घाई नसेल तर "


सायकल थांबवून मी एक पाय खाली टेकवून ... " काय झालं ? "


" तुझ्याशी जरा बोलायचं होतं ... "


मनाला विश्वास बसत नव्हता कि ती बोलत आहे ..

" काय ? काय बोलायचं आहे तुला ? "


" तुझे पुस्तक आणि नोट्स असतील ना ? कि तू दिले कुणाला ? "


" नाही अजून कुणाला दिले नाहीत . का बरं ? "


" मला हवे होते , मी दहावीला आहे ना यावर्षी "


" हे बोलायचं होत तुला , मी आत्ता शाळेत जात आहे , परत आल्यावर मी तुला आणून देतो , ठीक आहे ..."


त्यावर हसू ओठावर आणत तिने " चालेल " असं म्हटलं आणि मी शाळेत जायला निघालो .... मन अगदी काठोकाठ तलाव भरावा तसं आनंदाने भरलं होत . मी दिवसभर खूप आनंदात होतो की तिला आज सकाळी तर भेटलोच आणि पुस्तक द्यायला जायचं आहे तेव्हा पुन्हा एकदा भेटता येईल . दोन भेटीतच ती मनमिळाऊ असल्याचं समजलं आणि मी कितीतरी दिवस तिच्याशी बोलु शकलो नाही याच मला नवल वाटलं , तिने मात्र किती सहजपणे तिचं मनातलं बोलून दाखवलं ... शाळेतून परत यायला उशीर झाला होता पण घरी आल्यावर पटकन हातपाय धुवून मी सर्व पुस्तक आणि नोट्स एकदा नीट आहे की नाही ते पाहिलं . ते सोबत घेऊन तिच्या दाराजवळ पोहोचलो , तिच्या घरी जायची माझी पहिलीच वेळ होती ... दार उघडच होत , मी दारावर थाप मारणार इतक्यात ती समोर हजर झाली आणि मी हात मागे घेऊन तिच्याकडे पाहत ...


" किर्तीप्रिया , मी पुस्तक घेऊन आलो ..."


" अरे उद्या सकाळी आणले असते तरी चाललं असतं ..."


" मला वाटलं आताच देऊन यावं म्हणून मी घेऊन आलो .."


" बरं , ठीक आहे आणले आहेस तर दे , तू ये ना आत , असा बाहेर का उभा आहेस ...? "


मनात होतं की तिच्याशी जरावेळ बोलत बसावं पण अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि तिच्या घरी यावेळी बसून गप्पा मारत बसणं ठीक नाही असं वाटलं म्हणून ....


" नाही आज नको , हे पुस्तक घे आधी हवं तर उद्या भेटू "


" अरे ये ना आत , जाशील थोड्या वेळाने घरी ..."


" नाही राहू दे आज , येतो मी " म्हणत मी परत जायला लागलो


" बरं ठीक आहे , भेटू उद्या " ती म्हणाली


" ठीक आहे " म्हणत मी तिथून निघालो .... घरी आलो पण मनात ती अजून तशीच जणू माझ्याशी बोलत होती असं राहून राहून वाटत होतं ... रात्री जेवण झाल्यावर मी बाहेर अंगणात बिछान्यावर आडवा झालो , उन्हाळ्यात रात्री गार वारा असल्याने आम्ही सर्व बाहेरच झोपायचो ... एरवी अंग टाकताच झोप लागत होती पण आज मात्र बराच वेळ झाला तरी डोळा लागत नव्हता तिचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता ... ती आज सकाळी जे काय बोलली ते सार आठवत होत , पुस्तक दिले त्यावेळी ती जशी हावभाव आणून माझ्याशी बोलली तेव्हाची ती ' किर्तीप्रिया ' मला जणू समोर उभी आहे असं भासत होत ... कितीतरी वेळ मी तशाच पडून आकाशातील चंद्र , चांदण्या पाहत राहिलो , एक वेळ अशी आली कि डोळे जड व्हायला लागले आणि मला केव्हा झोप लागली मला कळलं नाही ....


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तयार झालो . अकरावी ला प्रवेश करायचा म्हणून घरून लवकर निघालो , तिच्याशी मैत्री झाली होती आणि एक नवीन उत्साह मी अनुभवत होतो . घरातून बाहेर पडलो तेव्हा वाटलं की वाटेत ती दिसायला पाहिजे , का ? हे काही मला कळलं नाही ... पण जातेवेळी ती दिसली नाही , जरा निराश झालो ... कॉलेजला पोहेचेपर्यंत .... तिथे गेल्यानंतर प्रवेशपत्र जमा करून माझा प्रवेश निश्चित होईपर्यंत मी जरा काळजीत होतो , दिवसभर लांबच लांब रांगेत उभं राहून अखेर मी अकरावीला प्रवेश मिळवला त्या आनंदात मी सायकल चालवत घरी जायला निघालो .... दिवसभर कॉलेजमध्ये असताना मनात बऱ्याच गोष्टी सुरु होत्या , नवीन वातावरण आणि प्रवेश घ्यायची गडबड सुरु असल्याने दिवसभर तिचा विचार मनात आला नाही ... सायकल चालवत मी गावात पोहोचलो , माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असता अचानक ती समोर दिसली ... मी सायकलचा वेग कमी केला , तिच्याशी जरा बोलावं अस वाटलं म्हणून मीच स्वतःहून सायकल बाजूला घेत तिच्या अंगणात थांबलो... ती तिच्या घराच्या पायरीवर , दोन पाय खालच्या पायरीवर ठेवून , एक हात चेहऱ्याला लावून , तर दुसरा हात दोन्ही पायांच्या गुडघ्यावर आडवा ठेवून बसलेली होती , मी तिथं थांबल्याचं तिच्या लक्षात आलं नाही असं मला वाटलं म्हणून मीच तिला आवाज दिला ....


" किर्तीप्रिया ..."


बहुदा कसलातरी विचार ती करत होती , मी आवाज दिला तेव्हा तिने माझ्याकडे नजर फिरवली ...


" कुमार ... माझं लक्ष नव्हतं , कधी आलास ? "


" आत्ताच , पण तू कशाचा इतका विचार करत होती ? "


" अरे काही नाही ... कुठे गेला होता ? "


" कॉलेजला , अकरावीला प्रवेश घेतला आज .."


" छान , वेळेला मानतो बाकी तू .. हे आहे तुझ्या यशाचं रहस्य ... "


" नाही तसं काही नाही , मला आवडत वेळेत काम करायला ... "


त्यावर हलकेच हसत तिने सहमत असल्याच दाखवलं ...


" आणि मला तुझ्या नोट्स खूप आवडल्या , अक्षर सुध्दा छान आहे हं तुझं ... "


त्यावर " धन्यवाद ! " इतकंच मी बोलू शकलो , तिच्याकडे पाहत असता काय बोलाव ते सुचत नव्हतं पण तिच्या स्तुतीने खरंच मन प्रसन्न झालं ....


" तुझ्या पुस्तक आणि नोट्स पाहून तु खूप मेहनती आहे अस वाटलं .."


" बस आता जरा जास्त होत आहे .."


" मी काही गंमत म्हणून नाही म्हणत आहे मला जे वाटलं ते मी तुला बोलून दाखवल बस्स ... "


" पुन्हा धन्यवाद , आता निघतो मी .."


" ठीक आहे पण मी मस्करी म्हणून नाही बोलले ..... "


त्यावर नुसतंच तिच्याकडे एक नजर पाहून मी मानेनेच होकार देत सायकल काढली आणि घरी जायला निघालो ... पण का कुणास ठाऊक मला मागे वळून पाहावंस वाटलं तर ती अजून मला बघत असल्याचं दिसून आलं .... मी तिच्याकडे बघतच राहिलो आणि रस्ताच्या बाजूला जाऊन एका खांबाला धडकलो ..... मी उठून उभा झालो , आजूबाजूला कुणीही नव्हतं तेवढं बरं झालं नाहीतर माझा चांगलाच हशा झाला असता ... मी कपडे झटकून सायकल उचलणार तोच ती माझ्या बाजूला उभी राहून ...


" कुमार .. कसा काय पडला ? तुला लागलं तर नाही ना ? "


" नाही , मी ठीक आहे .."

अस म्हणत मी सायकल उचलून जायला लागलो तर पायाला लागलेलं तिच्या लक्षात आलं ...


" अरे नाही काय म्हणतोस हे बघ रक्त चाललं आहे पायातून आणि हाताला पण खरचटलं .. "


" काही नाही होत , तू जा घरी .. मी घरी जाऊन करतो मलमपट्टी त्यावर .."


" बरं नीट जा ... "


मी पायी चालत घरी जायला लागलो पण ती अजून तिथेच थांबलेली होती ... मी घरी आल्यावर जखम कपड्याने पुसून त्यावर हळदीचा लेप लावला ... जरावेळ आराम करावा म्हणून अंग टाकलं , तर तिचा चेहरा नजरेसमोर येत होता .. नेमकं काय चाललं होतं ते मला काहीएक कळत नव्हतं ... ती जेव्हा मला लागलं त्यावेळी माझ्यासोबत बोलत होती तेव्हा जणूं तिच्या बोलण्यात एक आपुलकी मला जाणवली ... तिचं मनमोकळं बोलणं मला खूप आवडलं होत , ती बोलत असताना तिच्याकडे बघत राहावंसं वाटायचं , तिचा सहवास हवाहवासा वाटत होता पण का ?? याच उत्तर मला मिळत नव्हतं ... हात आणि पायाच्या वेदना आता जाणवत होत्या . मी तसाच पडून होतो ....