श्यामची पत्रावळ !  Nagesh S Shewalkar द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्यामची पत्रावळ ! 

श्यामची पत्रावळ !
दुपारचे तीन वाजत होते. श्याम नुकताच शाळेतून परतला होता. आल्याबरोबर त्याने शाळेचे दप्तर टेबलवर ठेवले. आईकडे हसून बघत त्याने दप्तर उघडून एक पुस्तक काढले. ते पुस्तक आईच्या हातात देत श्याम म्हणाला,
"आई, हे बघ मला हे पुस्तक बक्षीस मिळाले आहे."
श्यामच्या हातातले पुस्तक घेऊन श्यामकडे कौतुकाने बघत आई म्हणाली,
"अरे, व्वा! बक्षीस मिळाले. तेही सानेगुरुजींचे पुस्तक. अभिनंदन! पण बक्षीस कशासाठी मिळाले ते नाही सांगितले?"
"आई,आज आमच्या शाळेत सानेगुरुजी वाचनमाला या संस्थेची माणसं आली होती. त्यांनी की नाही आमच्या शाळेत तिसरी ते नववी या वर्गातील मुलांची हस्ताक्षर स्पर्धा घेतली. "
"तू काय लिहिलेस मग?"
"तसे नव्हते. प्रत्येक वर्गात त्यांचा एक एक माणूस आला होता. आम्ही त्याला 'सर' म्हणत होतो. त्या सरांनी याच पुस्तकातील पंधरा ओळी लिहायला सांगितल्या म्हणजे ते सर एक- एक शब्द सांगत होते. ते सांगत असताना आम्ही एका कागदावर लिहित गेलो. पंधरा ओळी लिहून झाल्यानंतर त्यांनी प्रत्येकाचा कागद घेतला आणि ते सर निघून गेले."
"मग पुढे काय झाले?"
"ऐक ना. थोड्यावेळाने बक्षीस समारंभ शाळेच्या मैदानात झाला. मला माझ्या वर्गातून सुंदर हस्ताक्षराचे पहिले आणि शाळेतून दुसरे बक्षीस मिळाले आहे."
"कित्ती छान! आज पप्पा आले की, तुला मी पण छानपैकी बक्षीस देणार आहे. आपण आईस्क्रीम खायला जाऊया. बरे,आधी हातपाय तोंड धुऊन ये.मस्तपैकी जेवण कर. मी तुला जेवायला वाढते."
असे म्हणत श्यामची आई स्वयंपाक घरात गेली आणि श्याम हातपाय-तोंड धुवायला गेला.
थोड्याच वेळात दोघेही जेवायच्या टेबलाजवळ आले. श्यामच्या आईने हातातले ताट टेबलवर ठेवले. तितक्यात टॉवेलला तोंड पुसत आलेल्या श्यामने आईच्या कमरेला मिठी मारली. तशी त्याची आई म्हणाली,
"आता हे काय? लाडलाड कशासाठी? संध्याकाळी आईस्क्रीम खायचे आहे..."
"त्यासाठी नाही ग. पण आई, थँक्स हं."
"अग बाई, बराच मोठा झालास की. पण हे थँक्स कशासाठी?"
"आज मला मिळालेल्या बक्षीसासाठी. तू दररोज माझ्याकडून पंधरा ओळी शुद्ध लेखन लिहून घेतेस ना त्यामुळे माझे अक्षर सुंदर झाले. आई, मी शाळेच्या बसमधून येताना मला मिळालेल्या 'श्यामच्या छान छान गोष्टी' या पुस्तकातील काही गोष्टी वाचून काढल्या. त्यामध्ये एका गोष्टीत ना श्याम रोजच स्वतःची पत्रावळ स्वतः लावून जेवत होता. श्यामच्या घरातील प्रत्येकाला तशीच सवय होती. जो कुणी पत्रावळ लावत नसे त्याला श्यामची आई जेवायला देत नसे."
"बरोबर आहे. प्रत्येकाला स्वतःचे काम स्वतः करताच आले पाहिजे. शिक्षा करण्यामागेही चांगल्या सवयी लागाव्यात हा आईचा हेतू होता."
"माझे अक्षर चांगले व्हावे म्हणून तू सारखी माझ्या मागे लागतेस. तुझा चांगला हेतू आज मला समजला. आई, बक्षीस देताना त्या पाहुण्यांनी मला विचारले की, चौथ्या वर्गाच्या मानाने तुझे अक्षर चांगले आहे. कुठे शिकलास सुंदर, वळणदार अक्षर लिहायला."
"मग तू काय म्हणालास?" श्यामच्या आईने विचारले.
"मी सरळ तुझे नाव सांगितले. आणि म्हणालो की, माझी आई दररोज माझ्याकडून पंधरा ओळी चांगल्या अक्षरात लिहून घेते. त्यांनी मग तुझे अभिनंदन केले आणि सर्वांना तुझ्यासाठी टाळ्या वाजवायला लावल्या."
"अरे, व्वा! छानच आहे की."
"आई, पत्रावळ म्हणजे काय ग? मला पत्रावळ पाहायची आहे. पत्रावळ लावून जेवायचे आहे."
"श्याम, अरे, आता तर आपल्या घरी पत्रावळ नाही. आपण बाजारातून आणूया."
"एक काम कर ना, बाबांना येताना पत्रावळ आणायला सांग ना. आई, प्लीज सांग ना ग."
श्यामचा प्रेमळ हट्ट आणि त्याचा आनंद पाहून श्यामच्या आईने त्याच्या बाबांना फोन करून पत्रावळ आणायला सांगितले......
बाबांची येण्याची वेळ झाली तसा श्याम बेचैन दिसू लागला. सारख्या घरात-बाहेर चकरा मारत होता. त्याला शंका येत की बाबा पत्रावळ आणायला विसरणार तर नाहीत ना? बरोबर रोजच्या वेळी श्यामच्या बाबांचे आगमन झाले. त्यांना पाहिल्याबरोबर श्यामने विचारले,
"बाबा, मिळाली का हो पत्रावळ?"
"होय. मिळाली. ही घे. आधी तुझे अभिनंदन!" असे म्हणत त्यांनी बॅगमधून पत्रावळ काढली. पत्रावळ हातात घेऊन तिला खालीवर पाहून श्याम नाराज होत म्हणाला,
"ही नाही हो बाबा. ही तर थर्माकोलची आहे. मला पानांची लावलेली पत्रावळ हवी होती. ही बघा अशी....." असे म्हणत श्यामने बक्षीस मिळालेले पुस्तक काढले. त्यातली पत्रावळीची गोष्ट काढली. गोष्टीच्या बाजूला एक छान रंगीत चित्र होते. त्यात गोष्टीतला श्याम एक-एक पान जोडून पत्रावळ तयार करत होता.
"अरे, श्याम आता या अशा पानांच्या पत्रावळ नाही मिळत बेटा. आता ह्याच थर्माकोलच्या पत्रावळी मिळतात."
"नाही. ते काही नाही. मला पानांची पत्रावळ पाहिजे म्हणजे पाहिजे..."
"अरे, पण......." त्याचे बाबा काही बोलणार तितक्यात श्यामची आई म्हणाली,
"तुम्ही हातपाय धुवून या. चहा ठेवलाय तो घ्या. मग आपण श्यामला आईस्क्रीम खायला नेऊया. आणि श्याम, आपण बाहेर गेलो की, मग कोणत्या दुकानात तू म्हणतो तशी पत्रावळ मिळाली तर घेऊन येऊया. खुश?"
"येस आई!" श्याम आनंदाने म्हणाला आणि तयार होण्यासाठी गेला.
पंधरा-वीस मिनिटात ते तिघे आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा श्यामने बक्षीस मिळालेले पुस्तक सोबत घेतल्याचे पाहून आईने विचारले, "पुस्तक कशाला घेतो?"
"दुकानदार काकांना दाखवायला. नाही तर ते बाबांनी आणली तशीच पत्रावळ द्यायचे."
काही वेळातच तिघेही आईस्क्रीमच्या दुकानात पोहोचले. श्यामने त्याचे आवडते आईस्क्रीम सांगितले. पण त्याचे लक्ष आईस्क्रीम खाण्यात नव्हते. कसेबसे आईस्क्रीम संपवून श्याम त्याच्या आईबाबांसह बाहेर पडला. समोरच एक किराणा दुकान होते. श्यामला घेऊन ते त्या दुकानात शिरले. बाबांनी दुकानदाराला पत्रावळ पाहिजे असे सांगताच दुकानदाराने नोकरास पत्रावळ आणायला सांगितले. श्यामचे लक्ष त्या नोकराकडेच होते. त्या नोकराने थर्माकोलच्या पत्रावळीच्या गठ्ठ्याला हात लावताच श्याम म्हणाला,
"काका, ती थर्माकोलची नको. पानांची पत्रावळ द्या." ते ऐकून दुकानदार म्हणाला,
"अरे, ती दुसरी हिरवी हिरवी पत्रावळ आण."
काही क्षणातच तो माणूस हिरवीगार पत्रावळ घेऊन आला. ती पत्रावळ हातात घेऊन तिला खालीवर बघून जवळचे पुस्तक उघडून श्याम म्हणाला,
"ही पत्रावळ तर पुठ्ठ्याची आहे. मला अशी पानांपासून तयार केलेली पत्रावळ पाहिजे."
ती चित्रातली पत्रावळ पाहून दुकानदार म्हणाला,
"बाळा, अशी पत्रावळ आपल्या शहरात मिळणार नाही. कुणी वापरतच नाही तर आणणार कशाला ना? गावाकडे कुठे कुठे एखाद्या दुकानात अशी पत्रावळ मिळेल."
ते तिघे त्या दुकानातून बाहेर पडले. श्याम उदास दिसत असताना त्याला जवळ असलेला एक मॉल दिसला. त्याच्या इच्छेखातर ते सारे त्या मॉलमध्ये गेले. तिथेही श्यामच्या पदरी निराशा पडली. त्या मॉलमधला माणूसही पहिल्या दुकानदाराप्रमाणेच म्हणाला. घरी परतत असतानाही श्यामने दोन-तीन दुकानांपुढे कार उभी करून चौकशी करायला लावली पण काही फायदा झाला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी श्याम उठला पण तो नाराज असल्याचे पाहून आई म्हणाली,
"श्याम, असे का करतोस? आता तशा पत्रावळ कुणी वापरत नाहीत म्हणून कुणी आणत नाहीत. मिळत नाहीत तर त्याला काय करावे?"
"काही झाले तरी मला लावलेली पत्रावळ पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही तर मी शाळेतच नाही जाणार."
"आपण दुकानात असलेली हिरवीगार पत्रावळ आणूया."
" जमणार नाही. मला पुस्तकातल्या सारखीच पत्रावळ पाहिजे."
"बरे. तू शाळेत जा. तू येईपर्यंत मी कुठे मिळाली तर आणून ठेवते."
"नक्की आणली पाहिजे. नाही आणली तर मी जेवणारच नाही बघ." असे ठामपणे सांगून श्याम शाळेत गेला पण त्याची आई काळजीत पडली. कारण श्यामने कोणती गोष्ट मनावर घेतली म्हणजे ती मिळेपर्यंत तो शांत बसत नसे. सगळी कामे आटोपून श्यामची आई चाळीत असलेल्या दोन-तीन दुकानात चौकशी करून आली पण पानांची पत्रावळ कुठेही मिळाली नाही. श्यामची आई थोडे दूरपर्यंत जाऊन आली पण तिथल्या दुकानातही तिला पत्रावळ मिळाली नाही. श्यामची येण्याची वेळ होत होती. थकलेली आई इमारतीत परतली. तिथे भरपूर बदामाची झाडे होती. ती त्या झाडांकडे पाहत असताना इमारतीच्या सुरक्षारक्षकाने विचारले,
"काय झाले ताई? काळजीत दिसता. श्यामबाबा तर ठीक आहे ना?"
"तो ठीक आहे. पण...." असे म्हणत तिने त्याला सारी हकिकत सांगितली. ते ऐकून तो म्हणाला,
"अशी गोष्ट आहे का? ताई, एक काम करा, आपल्या बाबाला पानांची लावलेली पत्रावळ पाहिजे ना, तुम्ही ही बदामाची सहा-सात पाने घेऊन जा आणि बाबाला पत्रावळ लावून द्या..."
"पण जमेल का? शिवाय पानांना जोडायला काड्या...."
"असे काय करता ताई, तुम्ही देवासमोर उदबत्ती लावत असणार की. नाही तर घरी आईस्क्रीम आणता ना, मग झाले. थांबा..... " असे म्हणत सुरक्षारक्षकाने बदामाच्या झाडाची चांगली कोवळी कोवळी सात-आठ पाने तोडून दिली. तितक्यात श्याम शाळेच्या बसमधून उतरला. त्याने पाहिले की, वॉचमन झाडांची पाने तोडत आहेत. तो जवळ येताच म्हणाला,
"काका, हे काय करता? आजच आमच्या सरांनी सांगितले की, झाडाची हिरवी पाने तोडू नयेत. झाड सजीव असते त्याला जखम होते. आपल्याला जखम झाली की, कसे रक्त वाहते तसेच झाडांची पाने तोडली की, तिथून चिक वाहतो. हा चिक म्हणजेच झाडाचे रक्त असते. काका, सर, म्हणाले की, आपल्याला जे जोडता येत नाही ते कधीही तोडू नये."
"व्वा! व्वा! श्यामबाबा, शंभरातली एक गोष्ट सांगितली की. मी यापुढे झाडांची पाने तोडणार नाही आणि कुणाला तोडूही देणार नाही." वॉचमन म्हणाला.
"श्याम, अरे, काका तुझ्यासाठी पत्रावळ बनवायची आहे ना म्हणून पाने तोडत आहेत..."
"म्हणजे सजीव असलेल्या झाडाच्या पानांची पत्रावळ बनवतात का? म्हणूनच ती चित्रातली पत्रावळ हिरवी असते का? झाडाला जखम होत असेल तर मग मला पत्रावळ नको. काका, तुम्ही माझ्यासाठी पाने तोडलीच आहे तर मी घेऊन जातो. पत्रावळ लावून जेवण करतो. पण पुन्हा पानांची पत्रावळ वापरणार नाही. दुकानातील ती पुठ्ठ्याची पत्रावळ घेत जाईन. काका, थँक्स हं! आई,चल." म्हणत श्याम आईचा हात धरून निघाला. वॉचमन श्यामकडे कौतुकाने बघत राहिला......
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर, लेन०२,
हॉटेल जय मल्हारच्या समोर,
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१