मला काही सांगाचंय... - २३ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय... - २३

२३. आठवण

एकांतात असल्याने त्या अनावर प्रश्नांनी तिच्या मनावर ताबा मिळवला ... पण तिचा नाईलाज होता कारण गतकाळ आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी एकाकी असतांना जास्त तीव्र होऊन आपला हेतू साध्य करतात ... कधी विसर पडलेला भूतकाळ नजरेसमोर जुन्या आठवणी जाग्या करून मनाची समाधी लावतात ... मनं बिचारं त्या आठवणींचा पाठलाग करत कितीतरी दूर प्रवास करत परत त्या क्षणी जे काय झालं , घडून गेलं , इतिहासात जमा झालं तिथं जाऊन धूळ खात बसलेल्या आपल्याच प्रतिमा , मूर्ती , सुख दुःखाचे जुने सोहळे दाखवतं अन पाहत राहतं .... जणू काही पहिल्यांदाच हे सारं घडत आहे असं समजून पुन्हा ते सारं जगायला पाहत , अन आपण आपल्या मनाला भुरळ घालून त्या क्षणाच्या डोहात पुन्हा पुन्हा उडी घ्यायला लावतो ... तो आपला स्वभावविशेष आहे ... काही क्षण कितीही काळ लोटला , कितीही वेळा विसरणाचा प्रयत्न केला , मन कितीही घट्ट करून परत आठवण काढायची नाही असं स्वतःच स्वतःलाच बजावलं तरी आपण भूतकाळात रमायला सवड असो वा नसो ... भूतकाळाच्या दिशेने वाटचाल करत त्या आठवणींचा शोध घेत नकळत जातो आणि सुख दुःख जे काय गतकाळातील आठवणींशी जुळलं असेल ते नव्याने अनुभवतो ....


असंच काहीसं तिच्याशी घडतं होतं ... इतरांप्रमाणे तिलासुद्धा अस का होतं आहे असा प्रश्न पडला नाही कारण ती गतकाळाशी एकरूप होऊन गेल्याने ती कुमार आणि त्यानं डायरीत लिहून ठेवलेलं आठवणींचं रहस्य यांतच मग्न होती .... म्हणूनच असं अचानक एकांत असतांना आपण आठवणीत का रमतो ? का भूतकाळाचा पाठलाग करतो ? का काही क्षण पुन्हा जगावेसे वाटतात ? एकाकी असतानाच आठवण का बरं येते ? सर्वात महत्वाचं म्हणजे वर्तमानात वाटेला आलेलं दुःख जुन्या आठवणींना उजाळा का देतं ?


असे प्रश्न हि तिच्या मनात येत नव्हते ...


इतक्यात तिचा मोबाईल वाजला आणि ती गतकाळाचा निरोप घेऊन वास्तवात परतली ... तिच्या समोरच्या टेबलवर ठेवलेला मोबाईल तिने हातात घेऊन पाहिलं तर कस्टमर केयर कडून काही नवीन ऑफर बद्दल मॅसेज आल्याचं तिला समजलं ... तेव्हाच ' किती वाजले बरं ? ' स्वतःलाच विचारत तिने वेळ पाहिला तर जवळ जवळ 6:30 वाजत असल्याचे दिसून आले ... मग पुन्हा डायरीत मोबाईल ठेवून तिने डायरी टेबलवर ठेवली आणि ती गच्चीवर जाऊन वाळायला टाकलेले कपडे काढून हॉलमध्ये आली ... बेडरूम मध्ये जाऊन तिने भराभर कपडे कसेतरी कपाटात कोंबले परत त्या खुर्चीवर येऊन बसली ... तिने डायरी हाती घेतली , निशाणी म्हणून ठेवलेला मोबाईल तसाच टेबलवर ठेवला आणि स्वतःलाच प्रश्न विचारत -


' समोर आणखी काय लिहून ठेवलं , कुणास ठाऊक ? '


ती पानावर बोट फिरवत वाचलेल्या ओळी पुन्हा चाळू लागली ... मनातच ' हे वाचून झालं होतं ... ' स्वतःलाच सांगत पुढे वाचायला लागली ...


तिला MSCIT क्लास लावून जवळपास दोन तीन आठवडे झाले होते ... पण त्याचा परिणाम असा झाला की सकाळी कॉलेजला सोबत जाण्याचा योग मी हरवून बसलो होतो ... जातेवेळी भेट तर होत नव्हतीच पण परत येतांना सुध्दा काही दिवसांत भेट व्हायची बंद झाली होती ... ती अकरावीत असल्याने तिला लवकर सुटी व्हायची तर बारावीची सराव परीक्षा जवळ आली म्हणून माझे एक्स्ट्रा चे लेक्चर्स सुरु झाले होते ...


त्यादिवशी कबीर सोबत बोलतांना -

" कबीर ... या काही दिवसात मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली , तिच्याशी भेट होत नव्हती म्हणून काय करावं कि बोलणं होईल असा विचार करत असता मला एक मार्ग सुचला आणि नकळत मी तसा वागलो ... मी आजवर अस काही केलं नव्हतं पण फक्त तिची भेट व्हावी म्हणून पहिल्यांदा लेक्चर्स बुडवले ... तिला सुटी झाली तेव्हाच मी पण क्लास मधून बाहेर पडलो आणि सोबतच घरी आलो ... "


तेव्हा जसा एक जिवलग मित्र आपल्या दोस्ताला सांभाळून घेतो तसंच काहीसं मला जाणवलं म्हणूनच मी चूक झाल्याचं कबूल केलं ...


" कबीर ... खरं तर या एकाच आठवड्यात मी चार दिवस सारखे लेक्चर्स बुडवले ... तुझ्यापासून मला लपवून ठेवणं बरोबर वाटतं नव्हतं आणि मनातच फार मोठी चूक झाली असे वाटूनआज मन मलाच खात होतं पण मी तुला वचन देतो पुन्हा माझ्याहातून असं होणार नाही ..."


एक दोन दिवस गेले की नवीन वर्ष्याला सुरुवात होणार होती ... मी मागच्या वर्षी तिच्या घरी जाऊन तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या ... मनात असं आलं न जाणे का ? पण मला वाटलं तिला आठवण असेल का ? मी तिला शुभेच्छा दिल्या ते .... कदाचित नसेल ...


मला कल्पना सुचली , यावेळी नुसतं हॅपी न्यू इयर अस नाही म्हणायचं तर मस्तपैकी छानसं ग्रिटींग कार्ड बनवून तिला विश करायचं ठरवलं होतं ... दुसऱ्या दिवशी दुपारी तीन तास खर्च करून ग्रिटींग कार्ड तयार केलं ... अस पहिल्यांदा ग्रिटींग बनवलं नव्हतं पण इतका वेळ घेऊन आतापर्यंत बनवलेल्या ग्रिटींग कार्ड पैकी सर्वांत सुंदर , आकर्षक अस प्रथमच तयार झालं होतं ....


ते ग्रिटींग कार्ड पुन्हा पुन्हा पाहण्यात तास न तास निघून गेले ... पण अजून एक दिवस नवीन वर्ष सुरु व्हायला बाकी होता ...


मी हि नवीन वर्ष्याची , नवीन ग्रिटींग ची आणि नवीन कल्पनेची नवीन बातमी कबीरला सांगितली होती .... " कबीर ... बस उद्याचा दिवस गेला की पर्वा नवीन वर्ष ... मी कॉलेजला जातांनी तिला ते देणार .. "


मी जरा जास्तच आनंदी होतो ...


नवीन वर्षाच्या आधीचा दिवस उगवला आणि मावळला ...


1 जानेवारी । नवीन वर्ष्याची नवी पहाट उगवली ... मी तयार होऊन लवकर म्हणजे तिच्या क्लासच्या वेळेला घरून निघालो होतो ... वाटेतच तिला भेटलो ...


" गुड मॉर्निंग , किर्तीप्रिया "


" गुड मॉर्निंग , कुमार .."


मी तिला शुभेच्छा देणार तोच ...


" हॅपी न्यू इयर ... " तीच म्हणाली


" हॅपी न्यू इयर टू यू ... "


" किर्तीप्रिया , दोन मिनिटं थांब जरा .. "


" काय झालं ? कुमार ... "


" थोडं कामं आहे .. " मला तिला ग्रिटींग कार्ड द्यायचं होतं जे मी माझ्या बॅगमध्ये एक नोटबुकच्या आत कार्ड ला घडी पडणार नाही म्हणून एका जाड कवर लावून ठेवलं होतं ..


दोघेही थांबलो ... मी बॅग उघडून ग्रिटींग कार्ड ठेवलेलं नोटबुक शोधत होतो पण ते नोटबुक काहीकेल्या मिळतच नव्हतं ... अन माझी इच्छा तशीच राहिली , निराशा झाली ...


" काय झालं ? कुमार ... काय शोधत होता ..? "


मला कळेना आता तिला काय सांगावं आणि कसं ?


" काही नाही . चल आपण जाऊया .. "


" अच्छा नवीन वर्ष्याची सुरुवातच मस्करी करत करायचा विचार होता तर .. "

नाईलाजाने हसतच तिचं म्हणणं मान्य करावं लागलं होतं पण त्यापेक्षा जास्त वाईट वाटतं होतं की इतकी उठाठेव करून ग्रिटींग कार्ड बनवलं ... तिला देताच आलं नाही ... व्यर्थ सारं व्यर्थ !


नवीन वर्षाच्या पहिलाच दिवशी असं झालं होतं ... ग्रिटींग कार्ड होत कुठे तर कोण्या एक मित्राने नोट्स करिता आदल्या दिवशी नोटबुक मागितलं होतं आणि मी बावळट , ग्रिटींग कार्ड त्यात असल्याचं विसरून लगेच त्याला नोटबुक देऊन टाकलं होतं ... मला नोटबुक त्याचदिवशी परत मिळालं पण तिच्याशी पुन्हा परत येतेवेळी भेट झाली नाही कारण मी कबीरला वचन दिलं होतं की आता कधीच लेक्चर्स बुडवणार नाही ... परत आल्यावर तिच्या घरी जाऊन तिला ग्रिटींग द्यायचं म्हटलं तर संपूर्ण दिवस निघून गेला होता ... असं सायंकाळी घरी जाऊन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून ग्रिटींग कार्ड देणं हश्याच निमित्त झालं असतं ... कदाचित ?


कबीरला आजची फजिती झाल्याचं सांगितलं आणि ग्रिटींग कार्ड तसंच ठेवून द्यावं लागलं ... नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी असं झाल्याची आठवण म्हणून .... !


तिने हळूच डायरी बंद केली , तशीच हाती धरून डायरी मांडीवर ठेवून ती जरा मागे खुर्चीत सरकून बसली ... एकमेकांचा सतत पाठलाग करणाऱ्या त्या पंख्याच्या पात्यांकडे पाहून नकळत मनात नसतांना तिला हसू आलं ... कुमार एका झाडाला ह्या साऱ्या गोष्टी सांगायचा ... अन नवीन वर्ष्याची अशी काही वेगळीच सुरुवात झाली होती .... तिला एव्हाना समजलं की कुमार इतरांपेक्षा कितीतरी पटीने भिन्न असून जर तो झाडाला मित्र बनवू शकतो तर त्याच्याकरिता अशक्य काय होतं ? ? ?


इतक्यात नेहमीचा आवाज असून त्यावेळी वाजलेले दाराची बेल तिला जास्त कर्कश वाटली बहुदा आतापर्यंत शांततेने डायरी वाचत असताना , विचार करत असताना तिला इतर सर्व गोष्टीचा विसर पडला असेल ...


पटकन भानावर येऊन ती उठून उभी झाली , घाईघाईत डायरी तशीच टेबलवर ठेवून ती दाराजवळ गेली आणि तिने दार उघडलं ...


" हॅलो माय ब्युटिफुल वाईफ ... "


तिने त्याच्या हातातील बॅग आणि टिफिन तिच्या हातात घेतला ...


" घरात तर या आधी "


बॅग आणि टिफिन घेऊन ती बेडरूमकडे जायला लागली ... तिने चालत असता टेबलवर ठेवलेली डायरी उचलली , टिफिन तिथंच ठेवून ती बेडरूम मध्ये गेली आणि डायरी नाईट लॅम्प जवळ ठेवली ... बॅग रोजच्या जागेवर म्हणजे बेडजवळच्या एका कपाटात ठेवली ... ती हॉलमध्ये परत आली ...


" तुम्ही आल्या आल्या सोफ्यावर का बसलात ? बरं नाही वाटतं का ? "


" सहज बसलो , मी ठीक आहे ... "


" चला तर हातपाय धुवून घ्या ... मी मस्तपैकी चहा बनवते ... "


त्याने हातपाय धुवून घेतले , टॉवेलने पुसून तो परत सोफ्यावर येऊन बसला ... तिने दोन कप चहा आणि पाणी आणले ... मग दोघे सोबत चहा घेत असता गप्पा गोष्टींना सुरुवात झाली ....