मला काही सांगाचंय...- २४-१ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय...- २४-१

२४. अनपेक्षित

इकडे या शहरात -


जेथे कुमार , त्याचे कुटुंब आणि मित्र परिवार सर्व जण असलेल्या ठिकाणी डॉ . वैद्य यांच्या दवाखान्यात -


ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा बंद झाला पण आत कुमार कसा असेल ? ऑपरेशन ठीक होईल ना ? आणखी किती वेळ आहे ? असे प्रश्न सर्वांच्या मनात मागे पुढे येत होते म्हणून तो लाल दिवा बंद झाला आणि त्याचबरोबर ऑपरेशन पार पडलं याची कल्पना कुणालाच नव्हती ... जेव्हा ऑपरेशन थिएटरचे दार उघडून त्याला बाहेर आणले , त्याचे आई वडील , प्रशांत इतर सर्व जण त्या बेडच्या दिशेने जायला लागले ... त्याचे आई वडील जवळच उभे होते म्हणून दोन तीन पाऊल पुढे जाऊन ते लगेच त्याच्या जवळ पोहोचले ... कुमार बेडवर निपचित पडलेला , डोक्याला पांढऱ्या पट्ट्या बांधलेल्या , हाताला सलाईन अजूनही तशीच लावलेली ... नर्स त्याला बेडवरून त्याच्या रूमच्या दिशेने घेऊन निघाल्या ...


ती माऊली मागे मागे जाऊन त्याला हाक देऊ लागली .. "कुमार ... कुमार .... "


त्याचे वडील , प्रशांत , सुजित ,अनिरुध्द , आर्यन , आकाश , ऋतुराज हा देखावा तसाच उभं राहून पाहण्याशिवाय काहीही करू शकत नव्हते ... त्याला रूम मध्ये पोहोचून नर्स परतून आल्या आणि काही वेळातच डॉ . वैद्य तिथे आले ... आणि जवळ जवळ सर्वांनी त्यांना घेरले ... ती माऊली " माझा कुमार कसा आहे ? त्याने अजून डोळे उघडले नाही , मला हाक दिली नाही .... "


" यांना जरा सावरा ... " इशारा करत डॉ. वैद्य म्हणाले ...


" काकू , स्वतःला सांभाळा .."


" कुमार आता कसा आहे ? " त्याचे वडील ....


डॉ . वैद्य ऑपरेशन करते वेळी घातलेला हिरवा पेहराव अंगावरून काढीत एक दुसरी नजर वर करून त्यांना पाहू लागले ... तो हिरवा पेहराव बाजूला उभ्या एका नर्सला त्यांनी दिला ... त्यावर लागलेले लाल ठिपके इतरांना दिसले नाहीत पण त्याच्या आई वडिलांच्या नजरेतून सुटले नाही ... सर्वजण डॉ . वैद्य काय म्हणतात याची वाट पाहत होते ...


काहीसा नाकावर आलेला चष्मा हळूच मागे सारत - " अभिनंदन ! ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं , कुमारला काही वेळ विश्रांतीची आवश्यकता आहे आणि चार पाच तास झाले की त्याला जाग येईल ... "


असं बोलणं ऐकून सर्वांना खूप आनंद झाला ... त्याचे आई वडील डोळ्यात नकळत आलेले पाणी तसेच ओघळत जाऊ देत --- " धन्यवाद डॉक्टर साहेब , आपले उपकार कसे फेडावे ... आज तुमच्या हातून कुमारचा दुसरा जन्म झाला ... "

आणि मन भरून आल्याने मनात बरंचसं बोलायचं असून त्यांना बोलायला जमत नव्हतं , त्यांच्याशी बोलून आभार मानावे अस वाटलं तरी त्यांना शब्द गोठल्यागत जाणवू लागले ... अन भरल्या डोळ्यांनी मनोमन आभार मानून कधीचेच जोडलेले हात अजून तसेच होते ... डॉ . वैद्य यांनी समोर येऊन त्यांचे हात हातात घेतले- " लवकरच कुमार आधीसारखा पूर्णपणे बरा होईल ... त्याला जाग आली की मी एकदा त्याला तपासून घेतो आणि मग तुम्ही त्याला भेटू शकता ... "


सर्वांनी मनापासून डॉक्टरांचे आभार मानले ... प्रशांत , आकाश , सुजित , आर्यन , अनिरुध्द , ऋतुराज एकमेकांना हसऱ्या चेहऱ्याने पाहू लागले ... आता लवकरच कुमार ठीक होईल आणि त्याच्याशी आज काही वेळातच बोलणं होईल असे विचार मनात एखाद्या फुलाच्या कळीने उमलायला सुरुवात करावी तसे मंद गतीने यायला लागले ...


हातात हात घेऊन सुजितचे वडील - " धन्यवाद डॉक्टर वैद्य ... "


" बस बस , ठीक आहे आणि रुग्णाला वाचवणं हेच माझं कर्तव्य आहे .. त्यात आभार कसले ? आता मुळीच काळजी करू नका .. " इतके बोलून डॉक्टर केबिनकडे निघाले .


खरं तर प्रत्येकाच्याच खांद्यावर कोणती ना कोणती जबाबदारी आहे ... काही न काही कर्तव्य आहे पण जीवनात अश्यावेळी कुणाच्या प्रामाणिकपणे जबाबदारी , कर्तव्य पार पाडल्याने जो आनंद आपण उपभोगतो त्याची परतफेड म्हणून नाही तर आपणांस झालेल्या आनंदाची भावना व्यक्त करताना आपण समोरच्या व्यक्तीला आभार , धन्यवाद असं बोलतो ... पण सर्व भावना शब्दांत पूर्णपणे व्यक्त होतात का ? अन व्यक्त केलेल्या भावना जशाच्या तश्या त्या व्यक्तीला कळतात कि नाही ? कुणास ठाऊक ... ?


कदाचित सर्व भावना शब्दांत पूर्णपणे व्यक्त होत नाही कारण जर असे झाले असते तर मनात असलेले भाव शब्दांत सांगितल्यावर कुणालाच नकार , निराशा , विरह , तिने किंवा त्याने मला समजून घेतलं नाही याचं दुःख , त्याच दुःखाच्या सोबत एकटेपण मिळालं नसतं ....


यातूनच एक हाही प्रश्न समोर येतो


" महत्वाचं काय ? शब्द कि भावना ... "


या लहान सहान गोष्टी कधी कधी विचार करायला लावतात ,असो ...


आता कुठे कुमारच्या आई वडील , भाऊ , मित्र यांना जीव जीवात आला अस वाटू लागले ... डॉक्टरांचे ते शब्द त्यांना कितीतरी सुखदायक वाटले ... शब्दांत सांगता येणार नाही इतकं समाधान त्यांचा चेहऱ्यावर आले ... त्याचे आई वडील ,सुजितचे वडील आता बरेच सावरले ...


ती माऊली कधी एकदा कुमारला जाग येते आणि त्याला जवळ घेऊन ' कसा आहेस ? ' असं विचारते अस तिला वाटू लागलं ...


तर एक बापाचं मन जे इतरांना खचल्याचं न दाखवून धीराने वादळाचा सामना करून समुद्रात नौका घेऊन गेलेला मुलगा परतून येतो तसं काहीसं अनुभवत होतं ...


तेथून काही अंतरावर -


" ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं ... बस आता कुमार लवकरच आपल्या सोबत पूर्वी सारखा असेल ... " अनिरुध्द


" हो , डॉक्टरांच्या यशाने आपल्याला पुन्हा एकदा कुमार परत मिळाला.. " आर्यन


" नक्कीच , अन सोबतच त्याची इच्छाशक्ती जबरदस्त आहे , नाहीतर... " सुजित


त्याला पुढे बोलवत नव्हतं ...


" दोस्तहो , खरं आहे ... आपला कुमार खूप हिम्मतवान आहे , आता कधी त्याला जाग येते असं होऊन गेलं... " ऋतुराज


त्यांचा असा संवाद ऐकून प्रशांतच्या डोळ्यात आसवं आले , मनात विचार आल्यावाचून राहिला नाही... खरंच दादा खूप नशीबवान आहे की त्याला असे जीव लावणारे दोस्त लाभले ...


" अरे , प्रशांत असा रडतोस काय ? डॉक्टरांनी सांगितलं ना कुमार दादा लवकरच ठीक होईल ... " आकाश


" हो , पण मी रडत नाही तर यांचं मित्रप्रेम पाहून न राहवून पापण्या ओल्या झाल्या ... " प्रशांत


" हो , हे बाकी मानावं लागेल ... " आकाश

सर्व आता कुमार कधी एकदा जागा होईल आणि त्याच्याशी बोलता येईल याचीच वाट पाहू लागले ... तर काही वेळापूर्वी सर्व , कुमारची डायरी नेमकी आहे तरी कुठे ? म्हणून त्रासून गेले होते पण हा क्षण जो काही नव्याने आनंद लपेटून आजची दुपार घेऊन आला आणि त्यांना त्या डायरीचा विसर पडला ... बराच वेळ गोष्टी करतांना निघून गेला मग भूकेची जाणीव झाल्याने -


" सुजित , चल आपण जरा बाहेरून फिरून येऊ आणि काहीतरी खायला पण आणू ... " आर्यन


हाताच्या घड्याळाकडे पाहून " अरे हो , २ तर केव्हाच वाजून गेले ... " अनिरुध्द


चावी बोटाने फिरवून " ठीक आहे ... चला तर जाऊया " ऋतुराज


" यांनी डबे सोबत आणले पण अजून तसेच आहेत ... येतेवेळी त्यांच्यासाठी बाहेरून काहीतरी आणू म्हणजे तेही थोडंफार जेवण करतील ... " सुजित


" चला तर मग लवकर जाऊ आणि लवकर परत येऊ ... " ऋतुराज


चारही जण सोबतच बाहेर पडले , थोडं पुढे गेल्यावर त्यांना बाहेरच्या तापत्या उन्हाची जाणीव झाली ... दवाखान्याच्या पलीकडे काही हॉटेल आणि कँटीन होते , इतक्या भर उन्हातही रस्त्यावर वाहनांची गर्दी होती ... रस्त्याच्या कडेला उभे राहून ते रस्ता ओलांडता येईल या क्षणाची वाट पाहू लागले पण तो क्षण तर नाही ती वेळ सुध्दा आली नाही ... रस्ता ओलांडण्याची हि काही त्यांची पहिली वेळ नव्हती आणि यापूर्वी कधीच असं बाजूला उभं राहून रस्ता काही प्रमाणात मोकळा मिळेल याची वाट त्यांनी पाहिली नव्हती पण कुमारला अपघात झाला .... त्याला या परिस्थितीचा सामना करतांना पाहून आज भर्रकन या कडेहून त्या कडेला जायचा धीर होत नव्हता आणि याची काळजी घ्यावी लागते इतकं समजलं होत ... 10 - 15 मिनिटांनी त्यांना रस्ता काहीवेळ मोकळा दिसला आणि ते पलीकडे पोहोचले ... हॉटेल मध्ये जाऊन बसले ...

continue...