तोच चंद्रमा.. - 14 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोच चंद्रमा.. - 14

१४

नॅचरल गार्डन

मध्ये दोनचार दिवस गेले असावेत. मध्ये वाटले की ब्रुनी येईल कधी, तर नाही आली ती. तिचे आॅफिस कुठेय ठाऊक नव्हते मला. नि असते तरी मी गेलो असतो की नाही कुणास ठाऊक. अशा बाबतीत पुढाकार घ्यायचा स्वभावच नाही माझा. त्यामुळे मी बदललो कितीही तरी किती बदलणार होतो? आॅफिसच्या कामांना अंत नव्हता हे खरे. बिल्डरचे आॅफिस, त्यात बिझी प्रोजेक्ट्स. हिशेब असणारच मोठमोठे. त्यात ब्रुनीची आठवण आली तरी वेळ कुठला मिळायला. असाच कंटाळून बसलेला असताना अशातच मला रघुवीरचा फोन आला..

"कसं काय? अॅडजस्टिंग वेल?"

"हुं."

"काय गप्प एकदम .."

"गप्प नाही, थोडा कामात बिझी.."

"ओके शुड आय काॅल अगेन .."

हा फोन त्या नॅचरल पार्कच्या पिकनिकसाठी असणार. मी झटकन विचार केला .. ब्रुनीने प्राॅमिस दिलेय येण्याचे .. म्हणजे ही संधी महत्त्वाची.

"अरे नाही, नाही. आता बोल. ही फाइल क्लोज करत होतो.." मी समोरच्या रिकाम्या टेबलाकडे पाहात म्हणालो. बरंय, व्हिडिओ काॅल नाही केला याने..

"अरे त्या पिकनिक टू नॅचरल पार्कचे डिटेल्स द्यायचे होते.."

"वा! आयॅम एक्सायटेड. कधी आहे?"

"कमिंग सॅटर्डे.."

"पण माझे आॅफिस?"

"यू डोन्ट वरी."

"नो यार, सॅटर्डे इज इम्पाॅर्टंट."

"ठीक. पण कृष्णन इज माय फ्रेंड."

"पण तरीही .."

"आणि ब्रुनी फक्त शनिवारीच असते मोकळी."

"ओह! मग तर शनिवारीच जायला हवे! नाही म्हणजे तीच लकी विनर होती ना.."

"खरंय. कमिंग सॅटर्डे. आणि यू कॅन गेट युवर राॅबिन."

"तू कसा ओळखतोस राॅबिनला?"

"त्या दिवशी भेटलो ना आम्ही. मध्ये भेटत असतो कधी. हल्लीच भेटलेला. सांगत असतो रिसेंट डेव्हलपमेंट्स.."

"म्हणजे .."

"म्हणजे इकडतिकडच्या बातम्या! एनी वे मेलिंग यू द डिटेल्स. शनिवारी भेटू. तू तर येशीलच.. बीकाॅज.. नाही.. अँड ब्रुनी हॅज प्राॅमिस्ड, शी इज कमिंग!"

हा शेवटचा इनपुट राॅबिनची करामत तर नाही? राॅबिन्या तसा चांगला आहे. मनाने चांगला म्हणावे तर त्याला मनच नाही. पण हल्ली अजून इव्हाॅल्व झाल्यासारखा वागतो. डू दे रियली इव्हाॅल्व? पण नक्कीच याने रघुवीरला ब्रुनीबद्दल सांगितले असणार. कळलाव्या म्हणावे तर राॅबिन त्यातला नाही. कुठेतरी विषय निघाला असावा. तसाच विषय आईकडे निघाला तर?

पिकनिकचा दिवस म्हणजे मोठी तयारी जणू. नॅचरल पार्क. चंद्रावर कृत्रिम सारे अाहे. म्हणजे झाडे नि गवत, फुले नि पाखरे, छोटे छोटे प्राणी.. पण या पार्कात फक्त नैसर्गिक सारे. त्यात बघण्यासारखे काय असावे? चंद्र म्हणजे मोठमोठाली विवरं नि उंच सखल भाग. सगळीकडे धूळ. नि समुद्र म्हणवणारी लाव्हारसाची थिजलेली लांबलचक पठारे. दिवसा अति उष्ण नि रात्री अति शीत तापमानात चंद्र दररोज वितळत नि गोठत असावा अशी हवा. उगाच नाही या चंद्राला डेड सॅटेलाईट का असे काही म्हणतात. टायटनवरची हवा कशी ठाऊक नाही मला पण ब्रुनी नॅचरल पार्कात यायला तशी उत्सुक नसावी कारण हेच असणार. त्याच दगड धोंड्यांना काय पहायचे. पण म्हणजे मी येणार हे अट्रॅक्शन तिच्यासाठी? मी मनोमन खूश झालो. ब्रुनीबरोबरच जायचेय तर तो चंद्राचा इतिहास नि भूगोल कशाला हवा? आणि त्या असोसिएशनच्या कृपेने आपोआप होतेय पिकनिक! याहून जास्त काय हवे?

पण मूळ पिकनिक मात्र नैसर्गिक ठिकाणी असली तरी इंटरेस्टिंग होती. म्हणजे दगड धोंडे नि धूळ असली तरी पार्कमध्ये छोटेछोटे तंबू होते ज्याच्यात जाऊन बसू शकत होते लोक. एक दोन छोटेखानी डोंगर होते ज्यावर गिर्यारोहण करण्यासाठी मुद्दाम पायऱ्या केलेल्या होत्या. लाव्हाच्या समुद्रात मनसोक्त फिरण्याच्या पायवाटा होत्या.. आम्ही सारे खूप भटकलो. साधारण दहा पंधरा जण. त्यात मी नि ब्रुनी दोघे. वर्षा नि रघुवीर. बाकी सारे सदस्य त्या असोसिएशनचे. राॅबिन नि दोन त्याचे मित्र आलेले.. केविन आणि आर्टेमिज. त्या तंबूंत जाऊन फोटो काढून घेतले आम्ही. वर्षा नि रघुवीरला जणू ब्रुनी नि माझी जोडी जमावी असे वाटावे असे वागणे होते त्यांचे. नक्कीच ही राॅबिनची करामत असणार.. कारण संधी दिसताच ते आम्हा दोघांना एकटे सोडत होते.. आमचे फोटोही दोघांनी काढले खूप.. ते डोंगर छोटे असले तरी धुळीच्या साम्राज्यातून त्यावर चढणे अवघड होते. मला वर चढायला मदत करायला ब्रुनी होतीच.. पण त्या अवजड स्पेससूटाला सांभाळून ते करणे जरा कठीण होते.. त्यात लक्षात इतके आले की टायटनवरच्या लोकांनी बनवलेले सूट्स कित्येक पटींनी कमी जड होते. त्यामुळे तिला ते लीलया जमत होते. जाता येता ब्रुनी आपल्या ग्रहावरच्या गोष्टी सांगत होती. 'ग्रह' म्हणजे प्लॅनेट नाही खरा पण टायटनवरचे सांगताना तिचे डोळे सुटातूनही चकाकताना दिसत होते. आपल्या घराला सोडून इकडे कशी आली ती? तर तिचे वडील मूळ शास्त्रज्ञ. त्यात तिकडचे सरकारी अधिकारी, त्यामुळे राजनैतिक अधिकारही त्यांना. जगातील इतर सिव्हिलायशेन्सशी परिचय व्हावा म्हणून टायटनने खास मोहीम आखलेली. त्यात पृथ्वीवर येण्यास पृथ्वीवरच्या विविध सरकारांनी नकार दिलेला. चांद्रभारत सरकार मात्र राजी झाले नि त्याबरोबर एक युरोपा म्हणून गुरूग्रहाचा चंद्र आणि शुक्रावरील मानवी वस्ती यांवर पोहोचले ते. त्यात ब्रुनी आपल्याकडे राजदूत असतात तशी शुभेच्छादूत म्हणून टायटनहून येऊन इथे राहणारी. तिने इकडच्या फूड इंडस्ट्रीची सूत्रे हाती घेतलेली. अजूनही तिचा आवाज आपल्या घरच्या आठवणी सांगताना कातर होताना जाणवला मला. एकूण टायटनवरची संस्कृती बरीच पुढारलेली असल्याचे जाणवत होते.. आम्ही अशा खूप गप्पा मारल्या. तिला पृथ्वीवरच्या गोष्टी म्हणजे माझ्या लहानपणच्या नि काॅलेजच्या आठवणी सांगितल्या. पिकनिकपेक्षा तिच्या बरोबर असण्यानेच दिवस असा सुंदर गेला हे मला जाणवले. तिला ही तसे वाटले असावे, निघताना म्हणाली,

"आय हॅड कम हिअर बिफोर. पण इतके आवडले नव्हते तेव्हा हे पार्क.."

"पण मला आवडले पहिल्याच फटक्यात.."

"आहे छान. नॅचरल .."

"आणि नॅचरली तू बरोबर असल्याने आवडले असणार मला.."

मी बोललो तशी ती लाजली असल्यासारखे वाटले मला. तिच्या त्या सुटातून चेहरा स्पष्ट दिसत होता.. फक्त बाकी देहबोली म्हणजे बाॅडी लँग्वेज कळायला मार्ग नव्हता.

"खरंय यार अंबर. आय थिंक कंपनी मॅटर्स! खूपच मजा आली पिकनिकला. वुई शुड थ्यंक कांदळगावकर्स .."

हे म्हणतोवर वर्षा समोर आली..

"थ्यांक्स वर्षा.. पिकनिक वाॅज टू एंजाॅयेबल.."

"हो ना. छानच. रघुवीर कुठेय?"

"तो? सगळी अरेंजमेंट पाहात असणार. ही इज टू मेटिक्युलस.. त्याच्या अरेंजमेंटमध्ये चुकीला वाव नाही .. बिझी असणार तो. काय ब्रुनी हाऊ वाॅज द डे?"

"आॅफकोर्स एंजाॅइड वर्षा. ग्लॅड आय केम. मी येणार नव्हते आधी. पण आले."

"आणि हा गिटारिस्ट?"

"अगं हो.. वर्षा.. ती गिटार हवी आहे एकदा .. त्या फंक्शनला होतो ती.." मी म्हणालो.

"का रे?"

"असेच!"

मी ब्रुनीने बोललेले विसरलो नव्हतो.. ती, मी आणि गिटार !

"असेच? नाही म्हणजे तू वाजवणार असशील तर आम्हीपण येऊ ना!"

"चालेल.. पण प्रॅक्टिस साठी थोडा वेळ हवा ना मला .."

"ओ के. पाठवते. पण आम्हाला बोलवायला विसरू नकोस हां.. ब्रुनी."

वर्षाने ब्रुनीला हे सांगावे? आमचे वागणे जास्त आॅब्व्हियस तर होत नाहीय ना? कुणी तरी म्हटलेय ना.. प्रेमी जीवांची अवस्था म्हणजे डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी. तिला वाटते कुणी बघत नाही तसे? असेलही. ब्रुनी आता माझ्या विचार प्रक्रियेचा भाग झालीय.. म्हणजे थाॅट प्रोसेसचा.

घरी आलो ते मंतरलेले क्षण आठवत. राॅबिनला म्हणालो, "काय कशी झाली पिकनिक?"

राॅबिन म्हणाला, "आम्हाला काय.. नॅचरल पार्क म्हणजे दगड आणि धोंडे.. तुझ्यासाठी तेच अगदी मऊ मुलायम गालिचे अंथरल्यासारखे असणार .. कंपनी मॅटर्स यार.."

"तू ब्रुनी बोलली ते ऐकत होतास?"

"नो.. पण ब्रुनीपण म्हणाली असे? वा! म्हणजे आग दोन्ही बाजूंनी लागलीय दिसते .."

"राॅब, तू बिघडत चाललायस.. टीव्ही जास्त बघू नकोस.."

"ब्रो, आयॅम ओन्ली टाॅकिंग.. खरा बिघडला तू आहेस. एवढी पिकनिक झाली.. दोन चार वाक्ये सोडून ब्रुनी शिवाय कुणाशी बोललास तरी का? आय वाॅज आॅब्झर्विंग डियर!"

हे असे झाले असणार. ब्रुनी समोर असताना मला इतर काहीच सुचत नसणार, मग इतरांशी काय बोलणार मी. हे असे सगळ्यांचेच होते की काय? असेल .. असणारच!

घरी आलो तर बाबा खूप दिवसांनी घरी आलेले. इमर्जन्सी म्हणे! यावेळेस भांडण नाही कुठल्या देशाचे पण टायटनशी राजनैतिक काहीतरी देवाणघेवाण होती म्हणे! शिष्टमंडळे नि मिटिंग्स.. टायटन! लवकरच राजनैतिक असो की नसो, तरी वैयक्तिक देवाणघेवाण होण्याची शक्यता आहे टायटनशी याचा त्यांना कुठे पत्ता होता!