मला काही सांगाचंय..... - ३३ - १ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय..... - ३३ - १

३३. आशा , निराशा


कितीतरी वेळ ती तशीच खुर्चीत बसून होती ... मनात येणारे प्रश्न तिला आणखी जास्त त्रास देत होते ... डोकं शरीरापेक्षा जड झालं की काय असं तिला वाटून गेलं , तिच्या मनात सतत एकापाठोपाठ एक विचार येत होते ... असं स्वप्न का पडलं ? त्याचा नेमका काय अर्थ असावा ? कुमार ठीक तर असेल ना ? मला असं स्वप्न पडले नियतीचा काही संकेत तर नसावा...?


अनेक प्रश्न तिच्या मनात घर करत होते , ती बेचैन झाली , शेवटी विचारांचं ते वादळ दूर करत ती बेडरुममध्ये गेली ... आत प्रवेश केला , तिची नजर डायरीवर स्थिरावली ... पण यावेळी पुढे काय लिहिलं आहे ते वाचण्याचा मोह आवरत तिने मोबाईल हाती घेतला आणि कॉल लावला ... तर फोन व्यस्त असल्याचं तिला समजलं तरीही तिने फोन सुरूच ठेवला आणि रिंग जात असल्याचा आवाज तिने ऐकला , काही सेकंदातच तिला पलीकडून प्रतिसाद मिळाला ... " हॅलो ... "


लगेच तिने बोलायला सुरुवात केली ... " हॅलो सुजित ... तु कुमार जवळ आहेस ना , तो कसा आहे ? ठीक आहे ना ? "


" हो ... आता तो ठीक आहे , डॉक्टरांनी थोड्यावेळा पूर्वी त्याला तपासलं , लवकर पूर्णपणे बरा होईल म्हणाले ... "


" ऐकून बरं वाटलं ... "


" तु येणार आहे की नाही ? "


" होय .. मी येत आहे , पण तू अस का विचारलं ? "


" तू इतक्या तातडीने त्याची विचारपूस केली , तर मला वाटलं तुला काही काम आलं असेल आणि बहुतेक तुला इकडे यायला जमणार नाही ..."


" काही काम नाही , मी लवकरच निघते ... मी फोन ठेवते .."


" एक मिनिट थांब ... " हिला डायरी सोबत घेऊन ये , अस एकदा आठवण म्हणून सांगू का ? तो मनातच स्वतःला विचारू लागला ...


" हॅलो ... हॅलो .... सुजित काय म्हणतोस ? "


" बस स्थानकला आल्यावर मला कॉल करशील म्हणजे मी तुला घ्यायला येईल ... " तो मनातलं मनातच ठेवून तिला म्हणाला .. परत परत डायरी बद्दल विचारल्याने तिला काही संशय येऊ शकतो ... त्याने स्वतःला समजावलं ...


" मी येईल ऑटोने , तुला उगाच त्रास होईल ..."


" काही त्रास होत नाही , उलट तुलाच उन्हात ऑटो शोधायला त्रास होईल ... "


" बरं , ठीक आहे , मी तिथे आल्यानंतर तुला कॉल करते , ठेवते ... "


सुजित सोबत फोनवर बोलून तिला बरं वाटलं ... मनात विचारांचं सुरु असलेलं द्वंद्व थांबलं , डोक्यावरचा ताण कमी झाला तसं तिला ते सकाळचं स्वप्न जसे पक्षी उंच भरारी घेऊन नाहीसे होतात तसे झाले ... तिने राहिलेली काम पटापट उरकून तयारी केली आणि ती बस स्थानकाच्या दिशेने निघाली ... आजचा दिवस काल सारखाच , रोज उजाळतो तसाच उजाळला ... तेच रस्ते , तीच परिचित - अपरिचित लोकांची सोबतच वाहनांची गर्दी , भाजी मंडई , नियमित उघडणारी दुकान , रस्त्यावर कच्च्या पिकल्या आंब्याच्या हातगाड्या , सुगंधित ताज्या फुलांच्या माळा लटकवलेली हारांची दुकान , अन तिच्या आवडीचं गुलमोहोराचं झाडं ... हे सर्व काल जसं होत तसंच काहीसं आजही ... पण काल तिला हे सर्व काही काळासाठी नजरेआड झालं की काय असं वाटलं होतं तर आज तिला हे आजूबाजूचं वातावरण हवंहवंसं आणि प्रसन्नतेची अनुभूती देणार वाटलं ... काहीवेळ तिला वाटलं की हे कधी बदलायला नको ... तिच्या या विचारांचं तिला जरा हसू आलं , कोणताच बदल नाही ती सृष्टी कसली ? नाविन्य नाही ते आयुष्य कसले ? अश्या मंद विचारांच्या सोबतीने , ती जास्त लगबग न करता , अति हळू न चालता , मध्यम चालीने बस स्थानकात पोहोचली ...


बस वर लावलेली पाटी पाहून ती आत चढली , सुदैवाने तिला खिडकीजवळ रिकामी सीट मिळाली ... ती पटकन सीटवर बसली , काही वेळातच बस पूर्ण भरली , बसमध्ये खूप गर्दी झाली असे तिला जाणवलं खरं तर काल इतकीच गर्दी आज होती पण आज ती स्थिर मनाने सर्व गोष्टी न्याहाळत होती ... इतक्यात बस सुरु झाली आणि तिचा कालचा प्रवास सुद्धा ! आज परत नव्याने ... ... ...


उन्हाळ्याचे दिवस , एप्रिल महिना म्हणजे लग्न समारंभ ! काही विद्यार्थ्यांना सुट्टी लागलेली असते , नातेवाईकांच्या भेटीगाठी करिता राखीव वेळ म्हणावा लागेल , सर्व प्रकारच्या वाहतुकीची गर्दी ..! मनात असे काही विचार करत तिने इकडे तिकडे नजर फिरवली ... बसमधली ती गर्दीने दाटलेली माणसं तिला जास्त वेळ बघवली नाही , ती एक हात खिडकीत ठेवून बाहेर पाहू लागली ... घामाने ओल्या झालेल्या चेहऱ्याला हवाहवासा वाटणाऱ्या गार वाऱ्याच्या सुखानुभवाने तिने किंचित डोळे मिटले ... मन प्रसन्न होऊन झालं ...


तिच्या मनात पहाटेच ते स्वप्न जरावेळ घोळलं , तिला चार वर्ष्यापूर्वी शेवटी जेव्हा कुमारला बघितलं तो क्षण आठवला , काहीवेळ ते चित्र तिच्या डोळ्यासमोर तरळत राहिलं ... मग काल त्याला ज्या अवस्थेत तिने पाहिलं ते हि तिच्या नजरेसमोर साकार झालं आणि पुढच्या क्षणी डायरीत वाचलेलं कुमारचं लिखाण ती आठवायला लागली ... तिचा आठवणींच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु झाला ... कुमार आणि त्याची डायरी या वेगळ्याच दुनियेत ती हरवली , त्या आठवणीत विलीन झालेल्या क्षणांशी एकरूप होऊन झोपी गेली ...

continue....