मला काही सांगाचंय.... - ३८ - २ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय.... - ३८ - २

३८. बहर - निसटून गेलेले क्षण - 2

पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला , नवरात्र उत्सव आला होता .. दसऱ्याच्या दिवशीची गोष्ट , मी सायकल धुवून पायदळ तिच्या घरासमोरून जात होतो , ती समोर आली , आज काहीतरी वेगळपण तिच्यात दिसत होतं मला सेकंदाचाही वेळ लागला नसावा तिने दोन लांबलचक वेण्या घातल्या होत्या आणि तिला खरंच खूप छान दिसत होत्या म्हणून ती आवाज देण्याची वाट न पाहता मी स्वतःहून तिथं थांबलो , तिने अंगणात रांगोळी काढली होती आणि रांगोळीचं ताट हातात घेऊन ती काढलेल्या कलाकृतीला पाहत होती , मी तिला आवाज दिला अन तिला मला वळून पाहिलं ..

" कुमार , कधी आलास आणि कुठून ? "

" मी आताच सायकल धुऊन येत होतो तर तु दिसली म्हणून थांबलो ... "

" हो का ? "

" छान दिसते आहे ... "

" खरंच , खूप वेळ लागला हं रांगोळी काढायला ... "

मनातच हिला कळलं नाही मी हिच्याबद्दल बोललो ... लगेच तिला म्हणालो " रांगोळी पण छान दिसते आहे ... "

" रांगोळीपण म्हणजे ??? " तिने विचारायला नको होतं ..

तिने विचारलं म्हणून मीही न कचरता " तु आज दोन वेण्या घातल्या ना ,खूप छान दिसते आहे ... "

" थँक्स , पण तु थट्टा तर करत नाही ना ? "

" नाही , मी थट्टा करत नाही , का बरं ? "

" आईने सकाळपासून कितीदा म्हटलं की काय लहान मुलीसारख्या दोन वेण्या घातल्या ... म्हणून "

" खरं सांगतोय तू छान दिसत आहे ... बरं येतो मी .." म्हणत मी सायकल घेऊन घरी जायला निघालो पण जोपर्यंत ती दिसेनाशी झाली नाही मी तिला मागे वळून पाहत राहिलो आणि ती जागीच उभी राहिली होती ...

त्याचदिवशी सायंकाळी घरी सर्व वडील मंडळींना आपट्याची पान सोनं वाहून मी आशीर्वाद घेतला , इतर नातेवाईकांना , शेजाऱ्यांना , मित्रांना सोनं भेट करून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या ... सर्वांना भेटून झालं होतं आणि बराच वेळ झाला होता पण तिला भेटून सोनं आणि शुभेच्छा द्यायच्या राहिल्या होत्या . हो नाही करत तिच्या घरी गेलो , तिच्या घरी जाऊन सर्वांना सोनं दिलं पण ती घरी नव्हती .. मी जरा निराश होऊन परतनार होतो इतक्यात ती आली , " कुमार ,happy Dasara " म्हणत तिने सोनं म्हणून द्यायचं ते आपट्याची पण माझ्या हातात देत हातात हात मिळवला .. मी तिच्या हसऱ्या आणि मनमोहक चेहऱ्याकडे पाहतच राहिलो , नवीन कपडे परिधान करून तिने पूर्ण साजशृंगार केला होता फक्त सकाळी घातलेल्या दोन वेण्या जशाच्या तश्या होत्या . तिने हात हवेत उंच करून माझ्या नजरेसमोरून हलविला " कुमार , कुमार " मी भानावर आलो , तो तिच्या आवाजाने नाही तर तिच्या नजरेसमोर हात हलवून बांगड्यांचा आवाज झाला म्हणून असं मला अजूनही वाटतंय ... तेच मी जरा ओशाळलो होतो , स्वतःला कसतरी सावरून मी तिला शुभेच्छा दिल्या , पण तिच्याशी गप्पा मारायचा मोह मला आवरता आला नव्हता मी चक्क रात्रीचे जेवण करायचा होतो तरी १० वाजेपर्यंत गच्चीवर बोलत बसलो होतो ...

रात्री उशिरा घरी जाऊन जेवण केलं होतं आणि झोपायला सुध्दा वेळ झाला होता पण झोप येत नव्हती , तिचा तो हसरा आणि सुंदर , दोन वेण्या घातलेला चेहरा नजरेसमोर येत होता . तिच्याशी बऱ्याच दिवसांनी इतकं मनमोकळं आणि हवंहवंसं बोलणं झालं , बऱ्याच उशिरा झोप लागली पण बंद डोळ्यासमोर आज तिचं दिसत होती , स्वप्नात तिचं येणं हे माझ्यासाठी नवीन होतं .. सकाळी उठून लवकर तयारी करून कॉलेजला गेलो होतो , आयुष्य अजून आनंदाने न्हाहले कि काय असं वाटलं होतं , परत आल्यावर कबीरला रोज भेटायचो पण आज त्याला भेटण्यामागे विशेष कारण होतं , कितीतरी दिवसांनी तिच्याशी बोललो हे कबीरला जाऊन सांगायचं होतं आणि तिचं काल पाहिलेलं सुंदर रूप वास्तवात आणि स्वप्नातही ... कबीरला जाऊन मी जवळ जवळ मिठी मारली आणि त्याला सगळं सांगून टाकलं मला मन आणखी आनंदी झाल्याचं जाणवलं ...

दसरा झाला पाठोपाठ दिवाळी सण आला आणि कॉलेजला दिवाळीच्या सुट्या सुरू झाल्या होत्या . घरी साफसफाई आणि रंगरंगोटी केली होती , मी बाकी घरच्या कामात मदत करत होतो . असंच एक सायंकाळी ... मी सुजितला भेटून घरी येत होतो आणि ती मला दिसली , तिच्याकडे नजर फिरवली तर तिने हसतच मला हात वर करून थांबवलं .. मी थांबलो , तिने गर्द गुलाबी आणि निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता ज्यावर पूर्ण गर्द निळ्या रंगाची ओढणी असा तिचा पेहराव होता ...

" किर्तीप्रिया , काय झालं ? का थांबवलं ? "

" कुमार , तु या सुट्टीत काय करत आहे ? "

" घरची काम , बाकी विशेष अस काही नाही .. का बरं ? "

" मला तुझी मदत हवी आहे ... "

" बोल ना , काय मदत हवी आहे ? "

" दिवाळीच्या सुट्या संपल्या कि लगेच आमची सराव परीक्षा घेतली जाईल म्हणून जरा वेळ काढून मला अभ्यासात मदत करशील का ? "

" ठीक आहे ना , त्यात काय एवढं ? "

" बरं तुला वेळ मिळेल तेव्हा १ ते २ तास घरीच येत जा ... "

" चल , भेटू नंतर , येतो मी ... " म्हणत मी सायकल घेऊन घरी आलो .

मग काय रोज दुपारी नाहीतर सायंकाळी तिला अभ्यासात मदत करायची म्हणून तिच्या घरी जाणं व्हायचं , कधी परत यायला वेळ पण व्हायचा ... इतक्यात माझ्यात एक बदल झाला होता , तिने कोणता ड्रेस घातला , तिने केसांची वळण कशी केली , रोजच्यापेक्षा जरा लहान किंवा मोठी टिकली जरी तिने लावली कि माझ्या सहज लक्षात यायचं किंवा मी तिचं बोलणं , वागणं , हसणं , सजणं सगळं कधी केव्हा मनात जपायला लागलो मला कळलं नाही , तिच्यात होणारा बदल मी जणूं एक नजरेत समजायला लागलो होतो ... तिचा प्रत्येक पेहराव मनात फोटो काढून जतन करावा अस वाटून जायचं , तिच्या सहवासात असतांना वेळ अशीच थांबून रहावी असंही वाटायचं ... पण का ? हे काहीकेल्या उमजत नव्हतं ...

दिवाळीचा दिवस उगवला , मी सकाळीच कबीरला भेटून आलो होतो , प्रत्येक गोष्ट फक्त आणि फक्त त्यालाच ठाऊक होती .. माझा जिवलग मित्र " कबीर " दिवाळी निमित्त मी त्याच्या आजूबाजूचं सर्व गवत काडी साफ केलं होतं ... आमचं मैत्रीचं नातं जरा वेगळंच होतं .

कॉलेजच्या सुट्या संपल्या आणि परत एकदा जसाच्या तास दिनक्रम सुरु झाला , माझं सकाळी आणि तिचं दुपारी कॉलेज ... कधी कधी आठ दहा दिवसांनी तिची भेट व्हायची , थोडसच बोलणं व्हायचं . तिचं बारावीचं वर्ष होतं म्हणून ती मन लावून अभ्यास करत होती , सायंकाळी तिच्या घरासमोरून माझी चक्कर व्हायची पण ती नजरेस येत नव्हती ... मन जरावेळ नाराज व्हायचं ... का ? या प्रश्नाचं उत्तर शोधायचा मी प्रयत्न केला नव्हता . ...

continue... ... ...