३८. बहर - निसटून गेलेले क्षण - 4
सूर्यास्त होऊन चांगलाच अंधार पडला होता मग मी घरी आलो , मनात कितीतरी गोष्टी एकामागून एक येत राहिल्या ... तिने जाण्याआधी एकदा जर मला सांगितलं असत तर कालच एक दिवस आधी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असत्या , कमीत कमी पुन्हा माझ्यावर हि वेळ आली नसती , तिने मला शब्दानेही न सांगता अस अचानक जाणं बरोबर नव्हतं , तिने खरंच चूक केली आणि मन मात्र माझं दुखावलं , यावेळी तिचा खरंतर खूप राग आला होता , समोर असती तर तो राग कदाचित व्यक्त झाला असता पण तीच सुदैव ती नजरेसमोर नव्हती आणि आता तर तिच्याशी बोलायचं नाही असंही एक दोनदा मनात येऊन गेलं ... ती रात्र विचारात गढून गेली , दुसरा दिवस उगवला , मग तिसरा ... चौथा ... अन संपूर्ण आठवडा भर्रकन निघून गेला पण ती अजूनही परत आली नव्हती एव्हाना तिच्यावरचा राग केव्हाच उडून गेला होता आणि कधी एकदा ती नजरेस येते असे होऊन गेलं होतं .. इतक्या दिवसात अस कधीच झालं नव्हतं प्रत्येक क्षणाला मन तिला आठवत होतं , तिच्यासोबत असतांना जे क्षण जगलो ते एकांतात पुन्हा पुन्हा मनात येत असत ... मी डोळे मिटून हरवून जायचो , कधी घरी तर कधी कबीरच्या सहवासात ...!
मनात असलेली शंका पूर्णपणे दूर झाली होती आणि मैत्रीचं नातं प्रितीत बदललं या वास्तवाशी ओळख पटली होती ... हि नवी जाणीव खरंच खूप छान , हवीहवीशी , प्रेरणा देणारी अन प्रत्येक वेळी उत्साही ठेवणारी मला वाटली होती ... असाच सायकल घेऊन सहज बाहेर पडलो होतो आणि मला चाहूल लागली की ती समोर आहे , माझ्यापासून ती बरेच लांब होती , अंगण झाडतांना , तिचा चेहरा मला दिसला नव्हता पण मला जाणवलं की ती " किर्तीप्रिया " आहे ... मी पटकन तिच्या जवळ जाऊन थांबलो , " किर्तीप्रिया ... " मी तिला आवाज दिला तिने वळून मला पाहिलं " कुमार , बोल कसा आहेस ..? " मी कित्येक दिवस झाले तिला पाहिलं नव्हतं म्हणून मी तिला बघतच राहिलो , तिच्या आवाजाने मी भानावर आलो , " कुमार ... कुमार .. कुठे हरवला ? "
" नाही , कुठे नाही ... तु सांग बरेच दिवस झाले दिसली नाही ... "
" आम्ही सर्व गावी गेलो होतो , मावशीच्या लग्नाला ... "
" अच्छा , अस होय ... सहज विचारलं जवळपास एक आठवडा उलटून गेला तरी दाराला कुलूप होतं ... "
" हो , बरेच दिवस झाले आम्ही गावी गेलो नव्हतो , लग्नाच्या निमित्याने सर्वांच्या भेटी झाल्या आणि माझी परीक्षा झाली होती म्हणून मुक्काम लांबला ... "
" छान झालं ... मला वाटलं होतं की तुम्ही येथून दुसरीकडे राहायला गेले की काय ? "
" काय , तु पण ना कुमार , इथे कसला त्रास आहे ? दुसरीकडे जायला कश्याला हवं ? "
" आपलं सहज विचारलं ... बाकी काय म्हणतेस अजून ? "
" लग्नात खूप मज्जा आली , सर्व खूप छान आणि व्यवस्थित पार पडलं ... "
" मला सांगायचं होत , मी पण सोबत आलो असतो ... "
" आल्याबरोबर तुझी थट्टा सुरु झाली का ..? "
" थट्टा मुळीच नाही , खरंच मी आलो असतो पण तु मला विचारलं नाही ..."
" असू दे , तु इतके दिवस आमच्यासोबत थोडीच हं राहिला असतास ... "
" नक्कीच राहिलो असतो , तु असल्यावर आणखी काय हवं होतं ? "
" हो का ? मी आठवडाभर नव्हते तेव्हा काय केलं ? "
' तुला खूप आठवण केलं ..' हळूच म्हणालो होतो तिला ऐकायला जाणार नाही असं ..
" काय म्हणाला ? कळलं नाही .. "
" काही नाही , तु नव्हती ना तर बोलायला कुणी नव्हतं , आठवडाभर खूप कंटाळा आला होता ... "
" तुला मीच सापडते का रे थट्टा करायला ? "
" दुसरं नाहीच ना कुणी तुझ्याविना , तुच एकमेव ... ... ... ... "
" म्हणजे काय ? वाक्य तर पूर्ण कर ... "
" काही नाही ... "
" ठीक आहे , बरीच काम करायची आहे , नंतर बोलू .. " ती हसतच बोलली मन प्रसन्न झालं होतं ...
मध्येच अचानक फरशीवर ग्लास पडल्याचा आणि पाठोपाठ म्याऊ म्याऊ असा आवाज तिला ऐकू आला , कुमारची डायरी वाचण्यात लागलेली तिची समाधी भंग पावली ... ' मांजरीने किचनमध्ये काय लग्न लावलं कुणास ठाऊक ? ' स्वतःलाच विचारत तिने हातातील डायरी तिथेच बेडवर ठेवली , ती किचनकडे जायला बेडरूम मधून बाहेर पडली ...