MAZYA LOVEMARRIAGECHI STORY - 1 books and stories free download online pdf in Marathi

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 1

सुरुवात!

कुठल्यातरी हिंदी सिनेमात एकदा पाहिले, म्हणजे ऐकले होते.. दुसऱ्या कुणाच्या लग्नात अजून कुणाची लग्नं जमत असतात म्हणे!

.. म्हणजे तिकडे बोहल्यावर पद्धतशीर लग्न सुरू असते.. नवरानवरी बोहोल्यावर हाती माळा घेऊन सलज्ज वगैरे उभे असतात. भटजीबुवा पुढच्या आयुष्यातील तारांबळ कळावी म्हणून चंद्रबलं आणि ताराबलं वगैरे घसा फोडून गात असतात.. नि इकडे कुणी होतकरू आयुष्यातले ते एकमेव ध्येय असल्यासारखा आपली लाइन जमवण्याच्या मागे लागलेला असतो. त्यात किती चूक की किती बरोबर हे नाही करायचे, पण एक आपले जनरल आॅब्झर्वेशन माझे. अजून एक निरीक्षण आहे माझे.. म्हणजे बघा हां.. आपल्याकडच्या लग्नांची ही एक गंमत असते. आपण मारे लगीनघाई वगैरे म्हणत असतो.. पुलंनी नारायणाला उभे केले त्या समारंभात. तिथे पायाला भिंगरी लावून सारे पळा पळा कोण पुढे पळे तो सुरू असते. विशेषत: वधूकडील सारे, मारे अगदी धावपळीत असतात. धावपळ म्हणजे काय काय.. अगदी हॉल, त्यातली टेबलं नि खुर्च्या, स्टेज नि डेकोरेशन असल्या निर्जीवांपासून भटजी नि वाजंत्रीवाले, फुलवाले नि जेवणवाले असल्या सजीवांपर्यंत.. एक जिवंतपणा असतो लग्नस्थळी. त्यात मग पाहुण्यांचे मानपान किंवा खरेतर मानापमान.. हा तर अगदी खराखुरा जीव जाई तोवर जिवंत मामला. लग्नस्थळी सारे प्रवासी असतील घडीचे पण सस्त्यातल्या साडीवर बोळवण करता काय म्हणत विहिणबाई साडीची घडी नाही मोडत. मुहूर्ताची वेळ टळली तरी बेहत्तर, पण वेळ साधून टोमणेटामणे मारणे चुकत नाहीत कुणाचे. म्हणजे लगीनघाई कितीही असो, वेळ नाही नि घाई आहे म्हणून कोणी अडून बसत वेळ साधणे सोडत नाही. वेळात वेळ काढून हे विषय नि त्यातून येणारे उपविषय नि त्याला लागून येणारे उपद्व्यापांचे उपक्रम पुढे येत असतात. थोडक्यात सारे कसे 'वेळच्या वेळी' व्हावे म्हणून धडपड सारी! आणि त्यातच आपल्या आयुष्यात तेच सारे वेळच्या वेळी व्हावे म्हणून इकडे कुणा तरूणाचे प्लॅनिंग सुरू असते.. अर्थात तरूणींचे पण असावे.. कारण याबाबतीत टाळी एका हाताने थोडीच वाजते?

माझे असेच झाले..

म्हणजे आता सांगतो.. कारण सारे होऊन अगदी यथासांग पार पडले. यथासांगच म्हणावे.. कारण लग्न म्हणा की पूजा.. आपल्याकडे यथासांगच होत असतात.. त्याशिवाय अजून कुठल्या पध्दतीने त्या झाल्याचे ऐकलेय का कुणी? तर सगळ्या प्रेमकथा ह्या अशा सुरू होऊन त्यांच्या लाॅजिकल म्हणजे तार्किक शेवटालाच पोहोचायच्या! म्हणजे आपले अबलख वारू गंगेत यथासांग अंघोळ करते झाले की द एंड! किंवा खरेतर द न्यू बिगिनिंग!

तर सांगायची गोष्ट आहे ती काही वर्षांपूर्वीची. माझीच. माझ्याच प्रेमकहाणीची स्टोरी आहे ही. आणि मला ठाऊक आहे, तुम्हा सगळ्यांना ह्या कुणाकुणाच्या लव्हस्टोऱ्या ऐकण्यात फारच इंटरेस्ट असतो. माझं तसं जनरल आॅब्झर्वेशन हे ही आहे.. प्रेमकथा कशी घडते? एखाद्याची लव्हस्टोरी सुरू होताना लफडं म्हणून सुरू होते.. मग त्याचे प्रकरण बनते.. मग त्या प्रेमीजीवांस प्रमोशन मिळून ते बी. एफ. नि जी. एफ. मधून प्रियकर नि प्रेयसी बनतात. सिनेमातले असले तर 'दो जिस्म मगर एक जान हैं हम' असले शरीरशास्त्रास अमान्य होईल अशा कविकल्पनांचे गाणे गातात.. भावी आयुष्याची स्वप्ने पाहात पाहात 'दो पंछी दो तिनके लेके चले हैं कहां' पर्यंत पोहोचतात. कहाणी पुढे सरकली की त्यात मग अटळ असे ट्विस्टस आणि टर्नस .. म्हणजे वळणे आणि आडवळणे.. ती हवीतच. मग त्यातून तावून सुलाखून म्हणजे 'दुनियाकी कोई भी ताकत हमें रोक नहीं शकती' (हा मराठी उच्चार खास) वगैरे होते. नि प्रेमी युगुलाची प्रेमकथा पुढे इंच इंचभर सरकते.. सरकत सरकत किंवा खरेतर प्रेमाच्या लाटांवर तरंगत तरंगत प्रेमकथेची नय्या हळूहळू किनाऱ्याला येऊन लागते. पुढे एकदा किंवा एकदाचे घोडे गंगेत नाहाते. घोडे करेलही ती अंघोळ पण तोवर इकडे हिरोला घाम फुटलेला असतो! आधी तिच्या दिलमें उतरायचे, त्यात जागा बनवायची.. मग 'तिने लाजून हो म्हटले' की पुढे इतर दुनियादारी झेलायची! एकट्या मजनूने लैलेसाठी काय काय करावे? हीर रांझा नि सोहनी महिवालाच्या गोष्टी झाल्या.. लैला मजनूच्या झाल्या ऐकून.. कोणी कोणी काय काय केले प्रेमासाठी हे सारे माहिती आहे, पण मजनूंची हौस काही फिटत नाही नि प्रेमकथा घडायच्या काही टळत नाहीत.

अशीच माझ्या ही प्रेमकहाणीची कहाणी ही. कुणी म्हणेल ती सांगावीच का? तर सांगायला हवीच .. तेवढेच होतकरूंना म्हणजे भावी पिढ्यांना मार्गदर्शन! आणि खरे सांगू तर या 'क्षेत्रात' तसे ऑथेंटिक म्हणावे असे मार्गदर्शन मिळते कुठे? आज अभिमानाने सांगतो मी, आमच्या पिढीने स्वबळावर घडवून आणल्या आपापल्या प्रेमकहाण्या.. आम्हाला गाईड करायला कुणी नव्हते. खरेतर मी असे म्हणू नये.. पण तसेच काही होतेच ना तेव्हा. अडखळत अडखळत प्रेमाची पाऊले टाकली मी त्याची ही स्टोरी. आता ती इतरांनी एखाद्या पोथीचे श्रवण करावे तशी ऐकावी का? अर्थातच. कारण आपल्या शिक्षणपद्धतीत हे असले 'जीवनावश्यक' विषय कुणी शिकवतच नाहीत. तेव्हा माझ्यासारख्या स्वमेहनतीवर पुढे आलेल्याने इतरांना पुढे जाण्यास असे दिशादर्शन केलेच तर पाहिजे की नाही? म्हणजे पथदर्शन म्हणा.. मार्गदर्शन म्हणा किंवा काही म्हणा!

थोडक्यात हे मी सांगितलेच पाहिजे. त्याला मग तुम्ही गोष्ट म्हणा की हकीकत..!

पण हे असे झाले हे खरे!

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED