माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 10 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 10

१०

माझी होशील का?

वै निघून गेली नि मी तसाच बसून राहिलो.. फुलांकडे पाहात. जवळ कुणी असते तर चिमटा काढून कन्फर्म केले असते.. हे सत्य आहे की भास.. आभास, माझ्या फुकाच्या वल्गना की मनीच्या कल्पना! कल्पना वरून आठवले.. काॅलेजात माझा मित्र होता दोडक्या.. म्हणजे दिनेश दोडके.. त्याला दोडक्या म्हणत असू आम्ही सारे. त्याची लाईन होती एक कल्पना नावाची. एकदा असाच संध्याकाळी कट्ट्यावर बसलेला काॅलेजच्या. तिकडून कल्पना आली. याच्याशी बोलली काहीतरी. दोडक्या आपला आ वासून बसलाय ती निघून गेल्यावर. थोड्यावेळाने आम्ही पोहोचलो. दोडक्या म्हणतोय, अरे कुणी चिमटा काढा, हे स्वप्न आहे की सत्य! अर्थात ही चिमटे काढण्याची संधी आम्ही वाया नाही घालवली. पण आज त्या कल्पनाची नि त्या चिमट्याची आठवण आली. माझीही गत तशीच झालेली आज.

पण गेल्या दीड दिवसाचा आढावा घेतला तर माझ्या एकूण वेगाच्या मानाने माझ्या प्रेमकहाणीची गाडी जरा जास्तच जलद चालली होती. नुसती भेट नाही, तर ओळख नि बातचीत .. सारे काही जलदगती.. एक्सप्रेस! अर्थात हे सारे अमेरिकन एक्सप्रेसवाले लवकरच परत जायचेत, तर हा वेग पण तसा मुंगीचाच म्हणायला हवा. पण थोडक्यात समाधान मानावे हा कुठल्याशा स्वामींचा उपदेश आठवून चित्ती समाधान ठेवत ठेविले अनंते तैसेच राहण्याचे ठरवले मी. गंमत म्हणजे मि. बुरकुल्यांचे नाव अनंत होते! आणि पुढे याच अनंत बुरकुल्यांनी मला जावई

म्हणून ठेविले!

.. तर आजवरची प्रगती पाहता हे ही नसे थोडके म्हणून मी विचार करायला लागलो!

त्या मंतरलेल्या अर्ध्या तासात खरे तर माझी तंतरली होती. मनी वसणारी स्वप्न सुंदरी समोर उभी. ती मनमोकळी बोलायला तयार आहे नि मी शब्द शब्द जपून कसले, लपवून ठेवल्यासारखा ते शोधत बसलोय.. किती छान संधी होती इंप्रेशन पाडायची. पण कसले काय नि कसले काय. माझ्या मनात आलेली वाक्ये मनातून जिभेवर यायलाच तयार नसतील तर काय करणार? पण काही असो वै स्वतःहून आली हे ही नसे थोडके.

आणि माझ्यासारख्याला हेच अल्पसंतुष्टतावादी धोरण परवडते. परवडते म्हणण्यापेक्षा तेच एक धोरण जमते.. त्याला काय करणार? म्हणजे

कॉलेजमध्येही माझ्या मैत्रिणी होत्या, नव्हत्या असे नाही. पण कधी कुठल्या गंभीर विषयावर गंभीर चर्चा मी केलीच नाही. उगाच गमतीदार बोलणारा एक विदूषक म्हणून माझी प्रसिद्धी होती. विदूषकाच्या टोपीखालचा गंभीर मेंदू कुणी पाहिला नसेल! कोणी म्हणेल विदूषक वगैरे म्हणणे काही कौतुकाने असेल, पण तसे नाही. कॉलेजच्या साऱ्या कन्यका एक एक करून बुक झाल्या.. संपल्या.. पण माझ्या वाटेस कौतुक करणारी कुणी कौतुकसुंदरी कन्यका आली नाही काॅलेज सुटेपर्यंत. विदूषक रडतो तरीही लोक हसतात म्हणे! अर्थात मी काही रडत बिडत नव्हतो नि नाही ही. आणि जे झाले ते बरेच झाले, नाहीतर ही वै.. तिचे काय? अर्थात अजून ती माझी झाली नाहीए .. फक्त एक लेटर ऑफ इंटेंट टाइप करायला घेतले होते.. एमओयू म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅंडिंग बाकी होता.. पुढे डील वगैरे तर पुढची बात! माझ्या या बिझिनेस भाषेबद्दल आश्चर्य वाटेल तुम्हाला. पण माझे हे असेच होते.. नको तेव्हा नको ती भाषा वापरली जाते नि..

संध्याकाळ अशी छान गेली. एक पाऊल पुढे पडले. सफलता की ओर एक कदम! माझ्या अल्पसंतुष्टतेसाठी आज इतके पुरे.. वै ला तिच्या आईने बोलावले तशी ती 'गाॅट्टू गो.. कमिंग.. आली आली ग' म्हणून धावत गेली निघून. मी उगाच पाठमोऱ्या तिच्याकडे पाहात राहिलो नि नंतर उगाचच बागेत भटकत राहिलो. आज इतके.. उद्या काय.. संध्याकाळची कातर वेळ.. वै तू माझी होशील का? होशील का? आजही एक कविता होऊन जाऊ देत.. मनात शब्द जुळवत बसलो. कविता आणि प्रेमाचे असे नाते असते का? कशीही असो आजवर कधीच सुचली नाही मला कविता. आणि आता दोन दिवसांत कवितांचे शब्द आपोआप मनात यायला लागावेत? रस्त्यावर भांडण होत असताना बघ्यांची गर्दी जमावी किंवा मुंबईच्या लोकलमध्ये गर्दी जमावी तसे? ह्या उपमा चुकल्या असतीलही, पण मला सुचल्या त्या ह्याच! शब्दच नव्हे तर उपमाही अशा चुकीच्या सुचाव्यात मला! तर आकाशात काळे सावळे मेघ दाटून यावेत तसे शब्द दाटून आले.. आणि दाटीवाटीने बाहेर पडले.. थोडक्यात मी मनात जुळवलेल्या कवितेचे शब्द बाहेर पडू लागले ..

तू स्वप्न आहेस की सत्य

मी चिमटा काढून पाहिले

काढला जोरात इतका

की भान नाही राहिले

चिमट्याच्या चिमटीत अडकून

झालो रक्तबंबाळ जसा

मिरवीत फिरेन जखमा या

शूरवीर मी आहे कसा

होशील का माझी तू

एकच प्रश्न असतो मनी

कोण न दिसेल तुजविन

तूच एक ती मन्मनी

कविता म्हटले की नाजूक साजूकच शब्द कशाला? मी चांगले चिमटा नि रक्तबंबाळ सारखे वापरून घेतले शब्द.. आणि अर्थात मन्मनी सारखा मुलायम शब्दही वापरला मी!

तर हे सारे राहू दे .. लिहायला आता खूप लिहिता येईल पण ते त्यावेळचे विचार नसतील. कारण मी पूर्ण ब्लॅंक झालेलो. त्यामुळे आता त्या विचारांचे प्रत्यारोपण कशाला करा!