MAZYA LOVEMARRIAGECHI GOSHT - 6 books and stories free download online pdf in Marathi

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 6

'ती'चे मराथी!

रात्री खूप विचार करता करता डोळा लागला असणार माझा. कालचा पहिलाच दिवस इकडचा. तसा तो संमिश्र गेला. खरेतर संध्याकाळपर्यंत वायाच गेलेला तो. संध्याकाळ नंतर मात्र अचानक जीव आला जणू त्यात.. 'वो कौन थी?' चा विचार करत डोळा लागलेला माझा. आणि सकाळी उठलो तर माझ्या अंगावर कुणी शाल पांघरून टाकलेली.

मी शाल बाजूला सारली.. नि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. चक्क एक मुलगी माझ्या समोर बसली होती. माझ्या आजूबाजूला अजून कुणी नव्हते. माझ्या छातीत धडधडू लागले.. ही कोण? ही ती नक्षत्रा नव्हती. मग ही कोण असेल? वैदेही की कृत्तिका? त्यापैकीच असणार कुणी. कारण अजून कुणी पाहुणे पोहोचले तर नव्हते. कुणीही असो, हिला त्या दुसरीबद्दल विचारले तर चालेल? मी गोंधळून गेलो. बावचळणे यालाच म्हणत असावेत.

“काय मग.. झोप? अगदी छान? थेट नीले नीले अंबर के नीचे..”

“हो ना.. तुम्ही?”

“तुम्ही काय.. तू म्हण.. मी कृत्तिका.. वैदेहीची सख्खी मैत्रीण!”

“वा!” जणू वैदेही कोण हे मला माहितीच होते! या 'वा' ला काही अर्थ नव्हता, पण मी अजून काय बोलणार होतो?

“काल आम्हाला यायला वेळ लागला. तू ढाराढूर झोपून गेलेलास.. वैदेही आलेली वर बघायला.”

माझ्या छातीत धडधडू लागले. हृदयाचे ठोके वाढण्याची अनेक कारणे वाचलेली आमच्या डेव्हिडसनच्या मेडिसीनच्या टेक्स्टबुकात पण त्यात थिंकींग ऑफ अ गर्ल किंवा गर्लफ्रेंड हे कुठेच नव्हते! एवीतेवी पुस्तकीच ज्ञान ते. म्हणजे काल मी झोपलो तेव्हा ती स्वप्नसुंदरी माझ्याजवळ प्रत्यक्षात येऊन गेली? याचि देही बंद डोळा मला नाही दिसली ती? या झोपेबद्दल मला अत्यंत वाईट वाटले. ही निद्रा अशीच. आणि ही शाल.. डोन्ट टेल मी.. वैदेहीने आणून.. माझा खयाली पतंग उंच उडू लागला. कृत्तिका काही बोलत होती त्याकडे माझे लक्ष नव्हते. मला खरेतर विचारायचे होते.. वैदेही कुठेय.. पण म्हणालो, "वैदेही म्हणजे?"

"वैदेही म्हणजे? कोण ती हे विचारतोस की शब्दार्थ?"

ही कृत्तिका जरा जास्तच स्मार्ट दिसतेय..

"सांगेन मग.. लवकर ये खाली." म्हणत कृत्तिका निघून गेली.

मी थोडावेळ तसाच बसून राहिलो. रात्री काही घडले ते पचवत बसलो. मी झोपलेलो इथे आणि वैदेही जवळ बसलेली.. काय ती झोप.. यापुढे कधी झोपायचेच नाही.. मी तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला!

खाली आलो. आज संध्याकाळी गावचे कुणी पाहुणे यायचे होते. रात्री अजून कुणी. घर भरून जाणार होते. भरलेले घर बरे की रिकामे? म्हणजे वैदेही भरल्या घरात भेटली तर कुणाच्या ध्यानात येणार नाही.. पण रिकाम्या घरात ती भेटण्याच्या संधी वाढतील.. अशा विचारात असताना समोर कृत्तिका आणि बुरकुले बाई बसलेल्या दिसल्या. मिसेस बुरकुले म्हणजे वैदेहीची आई म्हणून सांगण्याची गरज पडू नये अशा. गोऱ्यापान आणि सुंदर. म्हटले उगाच नाही वैदेही अशी! अर्थात सुंदर असण्यासाठी गोरेपणा हवा हे मला तेव्हाही नव्हते वाटत नि पटत नि आता ही. पण त्या दोघी तशा होत्या हे मात्र खरे.

मी झटपट तयार होऊन यावे म्हणून निघालो.. तो नाईट ड्रेसमध्ये.. घाईघाईत जाताना समोर ती! म्हणजे वैदेही! फर्स्ट काय, सेकंड इंप्रेशन पण असे! माझ्या छातीत धडधडू लागले परत. पण तरीही मी लक्ष नसल्याचे दाखवत झटक्यात पुढे गेलो.. म्हटले तयार होऊनच येऊ. पोटात बाकबुक होत होती. इकडे मी तयार होत होतो आणि सगळे ध्यान खाली काय चालू असेल याकडे होते.

तयार होऊन आलो तर वैदेही समोरच बसलेली. बाजूला तिची आई. कृत्तिका नव्हती. रमाकाकू माझ्या आईने बनवलेले पोहे वाढत होती. आई पोहे मस्त बनवते.

“अरे हा आला बघ मोदक.. येरे..”

काकू बोलली. मी पुढे आलो. अगदी वैदेहीसमोर. काकूने तिच्या समोर तरी मला मोदक म्हटले नसते तर चालले असते.

“अरे तुझी ओळख करून द्यायची राहिली.”

त्या बुरकुले कुटुंबातल्या बाकी सदस्यांबद्दल काकू काय बोलली कुणास ठाऊक.. अर्जुनाला पक्ष्याचा डोळा दिसावा तसे माझे लक्ष्य एकच होते.. ती म्हणजे वैदेही! वैदेहीची ओळख करून देताना काकू बोलत होती. माझ्या कानात शिरणारे शब्द मेंदूत मात्र शिरत नव्हते..

माझी ओळख करून देताना काकू म्हणाली, “हा डॉक्टर मोदक.. म्हणजे आमोद. लाडाने मोदक म्हणतो आम्ही..”

यावर ती खुदुखुदू हसली. का कोण जाणे तिला ते माहिती असावे असे वाटले मला.

“हाय.. सॉ यू यस्टरडे..” ती म्हणाली.

म्हणजे काल लुंगीतल्या अवताराबद्दल म्हणतेय ही की रात्री शाल पांघरायला आली त्याबद्दल?

रमाकाकू म्हणाली, “अरे हिला मराठी थोडेफारच येते..”

“बॉर्न ॲंड ब्रॉट अप देअर.. बट आय लाईक मराथी.. इन फॅक्ट आय वॉन्ना लर्न मराथी..”

मराठीतल्या ठी चा थी केला हिने. पण ते बोलताना पण तिची मोहक मुद्रा मी बघत होतो. काल आईशी इंग्लिशमध्ये काय बोलली असेल ही?

“आय अंडरस्टॅंड फुल्ली.. पन बोल्ता नाही येते..”

ती तोडक्यामोडक्या भाषेत बोल्ली! ते शब्दही कानाला गोड वाटले. वा! किती गुलाबजाम सारखे पाकात घोळलेले शब्द.. गोडवा शब्दाशब्दात भरून उरलेला. पाकच म्हणायचा तर तशी जिलबीची पण उपमा देता आली असती. पण आधीच गुलाबजाम म्हटल्याने नाईलाज आहे. तर मी त्या गोड शब्दांमुळे संमोहित झालो हे खरे. पुढे काय काय झाले.. गॉड नोज! आम्ही बराच वेळ तिथे बसून होतो. वैदेहीपण आपल्या तोडक्या मोडक्या मराठीत बोलत होती. आणि गंमत म्हणजे अमेरिका रिटर्न्ड असल्याने असावे पण तिच्या त्या मराथीचे साऱ्यांनाच कौतुक वाटत होते. मी तर तिला मराठी शिकवून तिच्या मराथीपणातून बाहेर काढायला एका पायावर तयार होतो. अगदी रीतसर मराठीचे क्लासेस घेईन हवेतर!

शी लाईक्स मराथी.. अँड आय लाईक हर! शिकवून टाकेन की! आहे काय नि नाही काय! नाहीतरी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी .. नाही का?

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED