माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 11 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 11

११

वै चे गुडनाइट!

मी घरात परत आलो.. संध्याकाळ सगळी बागेत फुलांमध्ये गेलेली. शेवटी सगळे विचार संपवून नि ती कविता करून घरात शिरलो तर रात्र झालेली. घर भरलेले. सारी जेवायला बसली मंडळी. उद्याचा एक दिवस. मग हळदीचा समारंभ.. मग लग्न सोहळा.. हे अमेरिकन टूरिस्ट कधी जाणार परत ठाऊक नाही पण त्याच्या आत काही तरी केले पाहिजे.. पण करावे तर काय करावे?

मला आमच्या लास्ट इयरच्या परिक्षेसारखे टेन्शन आले एकाएकी. दोन चार दिवसात एवढा सारा पोर्शन पूर्ण करायचा? तशा परीक्षा दिल्यात खूप. अभ्यास करूनही नि कित्येकदा अभ्यास न करता ही. मेडिकलचा अभ्यास म्हणजे हनुमानाचे शेपूट. संपता संपतोय थोडीच तो. 'तरीही जगायचं कुणी थांबतं का?' च्या चालीवर परीक्षा द्यायचे कधी कुणी थांबतं का? तशा मी ही दिल्या. पण त्या साऱ्या परीक्षांना एक ठरवलेला अभ्यासक्रम होता. काहीतरी मार्गदर्शन होते. पण ही नवीन परीक्षा .. ना तिचा अभ्यासक्रम ना काही माहिती. सारे आपणच बनवावे नि आपणच पेपर काढावा .. त्यात उत्तीर्ण होणार की अनुत्तीर्ण? यावर पुढचे आयुष्य अवलंबून असावे? बाकी परीक्षेत पुन्हा बसता येते. पन्नास टक्के पासिंग असते.. इथे मात्र तसे नाही काही. पुन्हा प्रयत्न नाही नि शंभर टक्क्यांहून कमी मार्क्स चालायचे नाहीत. वेळ थोडा.. सोंगे फार.. काय करावे की पुढे सरकेल गाडी?

आजचा दिवस तर संपला. रात्री बसलो परत गच्चीवर जाऊन. कदाचित आज येईल परत ती गच्चीवर म्हणत. मग अंगावर शाल टाकेल ती. दो घडी वो जो पास आ बैठे.. इफ ओन्ली! म्हणजे मग पुढे थोडे घोडे दामटता येईल. बात बढाने के लिए बात शुरू तो हो.. कालचेच ते तारे पाहात बसलो. का? तर ती यावी म्हणून .. पण नाही! माझ्या मागोमाग कुणी यावे? ती तर नाहीच, तर मामा नि काकाच्या ओळखीचे दोन चार जण आले गच्चीवर. मी डॉक्टर आहे म्हटल्यावर प्रत्येकाने आपापली तक्रार सुरू केली. कुणाला बीपी तर कुणाला डायबिटीस.. कुणाला काही. माझ्या मनात तिचा विचार आणि बोलतोय मी ते या सगळ्यांच्या प्रकृतीबद्दल. जमेल तसे मोफत मत वाटप करत बसलो. असले सल्ले हे घेण्यासाठी असतातच असे नाही. ते असतात आपापल्या डाॅक्टरनी सांगितलेले किती योग्य वा अयोग्य ते तपासून बघावे यासाठी किंवा बघूया या नवीन डाॅक्टरला काही येते की नाही हे पहायला.. तर हे चुकलेय थोडीच नवशिक्या डाॅक्टरला? मी एक डोळा जिन्याकडे लावून ती येतेय का बघत होतो. नि दुसऱ्याने इतरांकडे पाहात सल्ला वाटप करत बसलो होतो. चकण्या डोळ्याने का होईना तेवढेच पुण्यकर्म! मागे कुणी बाबा की स्वामी सांगून गेलेत ना .. पुण्यका फल मीठा होता है. मला वाटते सब्र का फल गोड म्हणाले ते स्वामी .. पण सब्र काय की पुण्य काय सब का फल पण मीठाच असणार, नाही का? तर म्हटले यापैकी कुणाचा तरी शुभाशिर्वाद मिळावा नि गाडी सरकावी पुढे. पण वै चे यायचे लक्षण काही दिसेना. सल्ला सत्र सुरूच होते. कदाचित पुण्यकर्मात या सगळ्याची नोंद करतही असेल चित्रगुप्त गुप्तपणे. पण तरीही एकाक्षणी संयम संपला माझा. शेवटी मी खोट्या जांभया द्यायला लागलो नि झोप येते खूप म्हणून खाली निघून आलो.

रात्र बरीच झाली होती. मंडळी आपापल्या ठिकाणी विसावली असावीत. किंवा कुठेतरी बसून गप्पा मारत असावीत. त्यामुळे सगळीकडे सामसूम होती. वै कुठे असेल? तिला भेटून काहीच तास झाले होते, पण खूप वेळ झाल्यासारखे वाटत होते. कुठे तरी वाचलेली 'एक अनामिक हुरहूर' तशी ती हुरहूर वाटत होती. तासनतास बोलत बसावे .. तिने, नि मी बघत बसावे.. तिला.. तासनतास.. रात्र झाली तरी ती झोपण्याआधी किमान एकदा तरी दिसावी.. दिसली तर बघून हसावी.. गुडनाईट तरी म्हणावे .. खरेतर दोन शब्द तरी बोलावे माझ्याशी.. असले ये दिल मांगे मोअर एवढेच विचार होते मनी. पण हे होणार तरी कसे?

तिच्या रूमकडे नजर टाकली मी. दरवाजा बंद होता. आवाजही नाही काहीच. त्या बंद दरवाज्याकडे पाहात मान वळवून जिन्यावरून उतरताना पाठून आवाज आला, “मोडक..”

माझ्या हृदयाचे ठोके चुकले.. वै होती..

“गोईंग टू स्लीप.. गुडनाईट..”

"आली नाहीस आज गच्चीवर?"

"नो.. टायर्ड यार. थोड्या गप्पा मारली सगल्याबरोबर. आताच गेले सगळे ज्होपायला. तू कुटे होता?"

"इथेच. गच्चीवर. आय वाॅज डुईंग मेडिकल कन्सलटेशन यू सी!"

"ओह! आय नो. डाॅक्टर लाइक यू इज आॅलवेज मोस्ट वाँटेड देन!"

मी तिला 'बाय हूम?' विचारणार होतो .. पण नाही विचारले.

"चल मी झोपटे.. तुला काय बोलायचा होतं?"

"अगं नाही. असंच.. तू झोप. दमली असशील."

"ओके. तू म्हणतो तर जाते.."

मी भांबावलो.. ही बोलत बसेल तर मी रात्रभर जागायला तयार होतो. आणि वै मला डायरेक्ट गुडनाईट करतेय? मीच मग संभाषणाची गाडी पुढे ढकलावी म्हणून म्हटले, “गॉट ओव्हर विथ हॅंग ओव्हर?”

मला हे असले शब्दजुळवणीचे तंत्र चटकन जमते. ती संध्याकाळी भेटली तेव्हा विचारायचे मला आता झोपायच्या वेळी सुचले! पण असे काही जमले म्हणून मी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली ..

“काइंडॉफ.. बट फीलिंग अ बीट स्लीपी. झोफ.. नाई झोप येटे..”

“ओह! स्लीप देन.. स्वीट ड्रीम्स.. गुड नाईट..”

स्वीट ड्रीम्स! तिच्या स्वप्नात मी येईन का? खरेतर जाईन का? किंवा ती येऊ देईल का?

“उद्या बेटू.. गुडनाईट..”

ती म्हणाली आणि आपल्या खोलीत निघून गेली. मी पाठमोऱ्या तिच्याकडे पाहात राहिलो ती रूममध्ये दिसेनाशी होईपर्यंत. नंतर मग मला तिकडून परत फिरण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय होता? मी माझ्या खोलीकडे निघालो.