माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 12 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 12

१२

स्वप्न सुंदरी!

ती गेली नि मी पण माझ्या खोलीत आलो. वै म्हणाली, मी म्हणतोय म्हणून जाते.. असे का म्हणाली ती? म्हणजे काय? आधी तीच खूप झोप येते म्हणालेली.. मी तिला आग्रहाने 'झोपतेस कसली? जागी रहा नि गप्पा मार' म्हणायला हवे होते? की अजून काही? आधीच माझी बोलण्याची गडबड, त्यात हा अजून गोंधळात गोंधळ! म्हणजे कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन आणि काय! यात माझी चूक होती.. बोलण्यात की समजण्यात? उद्या परत ही म्हणेल का.. व्हाय वेअर यू अव्हाॅयडिंग मी? काही असो. झोप तर मलाही येत होतीच. आणि आज काही ती आता येणार नाही तेव्हा झोपायला हरकत नाही. कालचा माझाच पुन्हा कधीच न झोपण्याचा पण मोडत मी झोपायला आलो.

खोलीत आलो तर आई माझी जणू वाट पाहातच बसल्यासारखी बसलेली. मला पाहताच म्हणाली,

“आलास.. काय म्हणत होती ती?”

“कोण गं?”

आवाजात जमेल तितका साळसूदपणा आणत मी म्हणालो. तसा मी बरा ॲक्टर असणार म्हणजे. आता येतानाच वाटलेले मला.. फॉरेनची ही पाटलीण आई स्वीकारेल का.. कदाचित तिच्या मामाकडून कनेक्शन आहे म्हटल्यावर स्वीकारेल ही.. की शेवटी संघर्ष हमारा नारा है?

“तीच..”

“कोण?”

“ती बागेत.. संध्याकाळी.. वैदेही..”

“हां.. ती होय.. काही नाही.. असेच इकड तिकडचे.."

"म्हणजे?"

"काॅलेजच्या गप्पा. रेडिओलाॅजीवाली आहे ती."

"हुं. आणि काही?"

"आणि काय?"

"कसंय तिकडे अमेरिकेत?"

"मला काय ठाऊक? अगं, तिचे इंग्लिश कळतानाच किती वेळ जातो..”

हे शेवटचे वाक्य माझी जित्याची खोड न गेल्याचा पुरावा म्हणून म्हटल्यासारखे मी म्हणालो. त्यात आईच्या माहेरची लिंक असल्याचे विसरलो मी.. आणि आई तिची बाजू घेत म्हणाली, “अरे ते इतकी वर्षे तिकडे राहून.. तरी ती मराठी शिकायचा प्रयत्न करतेय..”

हे माझ्या फायद्याचे होते. आईच्या मनातला हा साॅफ्ट काॅर्नर ती जगातील कुठल्याही काॅर्नरातून असली तरी पुढच्या दृष्टीने फायद्याचाच होता! तरीही मी म्हणालो,

“हो ना.. मराथी!”

मी म्हणालो काय.. खरेतर पचकलो. माझे मलाच काय झाले ते कळेना. इकडे तिची स्वप्ने पाहतोय आणि आई समोर उगाच काहीबाही बोलतोय.

"तसं नाही रे, तिकडे नेहमी जी भाषा बोलत असतील तर भाषेला तो टोन येतो. पण तिची बोलायची इच्छा आहे ना? ती जास्त महत्त्वाची. हो की नाही मोदका?"

"हुं. असेलही." बोलण्यात बेपर्वाई वाटावी असा बोललो मी. म्हटले ना मी तसा बरा ॲक्टर आहे ते!

"मोदका, बाग मात्र छान आहे हां काकाची. पाणी घालायला मजा आली असेल. आपल्या शहरात अशी बाग कुठली मिळायला .. हो की नाही?"

"हो ना.."

"बरं झालं आलास नाही इकडे? म्हणजे आपल्याकडे असली फुलझाडं नाहीत. छान आहे ना?"

"हो ना."

"आवडली तुला?"

"कशाबद्दल बोलतेस गं?"

"बाग रे.. तुला काय वाटलं?"

“काही नाही गं.. झोप आलीय चांगलीच..”

विषय वाढू नये म्हणून मी म्हणालो.

आई माझ्याकडे पाहात होती.. आणि मी झटकन डोळे मिटून घेतले.

स्वप्नसुंदरीची स्वप्ने पहायची तर स्वप्न पडायला हवे आणि स्वप्नासाठी झोपायलाही हवेच! मी डोळे मिटून पडून राहिलो. आई बाजूलाच होती. मी किलकिल्या डोळ्यांनी पाहात होतो. ती उगाच गालातल्या गालात हसल्याचा भास झाला मला. वै च्या विचारात मी परत रंगून गेलो. संध्याकाळी आमचे झालेले संभाषण .. कानात जणू रेकॉर्ड झाले असावे नि परत रिवाईंड करावे तसे आठवत होतो. मध्येच कदाचित मी हसलो असेन. कदाचित खुदकन ही. कारण आई म्हणाली, "काय झाले रे, स्वप्न पडले की काय..? हसतोयस तो झोपेत?"

मी हळूच डोळे उघडून पाहिले नि गाढ झोपेचे बेअरिंग घेत परत मिटून घेतले ते. संभाषणाची रिवांयडेड रेकॉर्ड संपली असावी नंतर. कारण मला खरोखरीच झोप लागली.

माणूस का झोपतो? आमच्या मेडिकलच्या अभ्यासात झोपेचीही चिरफाड होती. झोपेच्या वेगवेगळ्या स्टेजेस नि त्यात घडणाऱ्या घडामोडी.. झोपेतल्या मेंदूच्या वेगवेगळ्या लहरी असतात. त्यात मग कधी स्वप्ने पडतात. स्वप्न पडल्यापडल्या काही सेकंदांत डोळे उघडले तर ती लक्षात राहतात म्हणे. मनी वसे तेच स्वप्नी दिसते.. मग मला स्वप्नात ध्यानीमनी वसणारी वै दिसली नसती तरच नवल.

तर कधीतरी झोप लागली. स्वप्न ही पडले..

त्यात वैदेहीही सदेह आली.. माझ्या मागे धावत धावत. ती बोलत होती. खूप काही. इकडतिकडचं नाही. काहीतरी महत्वाचे. मी मान हलवतोय..तिच्या बोलण्याकडे माझे लक्ष आहे.. मी तिच्याकडे पाहातोय.. पाहातच राहतोय .. एकाएकी ती म्हणते, तू काहीच बोलत नाहीस तो? मग मी बोलायला सुरूवात करणार तर जीभ उचललीच जात नाही .. मोठया कष्टाने ती उचलली जाते.. एखादे शिवधनुष्य उचलल्यासारखी.. मग आवाज फुटतो माझा.. नि मी एकाएकी बोलू लागतो.. काहीतरी. आणि माझे ते बावचळत बोलणे ऐकून ती हसत सुटते.. हसताना ती छानच दिसते पण म्हणून तिने माझ्यावरच हसावे?

स्वप्नातून घाम फुटून मी जागा झालो.. पहाट झाली नव्हती अजून.. म्हणजे हे काही स्वप्न खरे होत नाही! मी नि:श्वास टाकला नि परत झोपी गेलो!