माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 2 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 2



योगायोगाची सुरुवात योगायोगाने!

देव आपल्याला नातेवाईक का देतो? कुणी काहीबाही उत्तरे देईल याची. पण माझे उत्तर मात्र ठरले आहे. त्या लग्नगाठी विधात्याने ठरवल्याप्रमाणे
बांधल्या जायला हव्या असतील तर अशा नातेवाईकांना पर्याय नसावा! अर्थात हे माझे फक्त स्वानुभवातून आलेले बोल आहेत. नातेवाईक, मग त्यांची मुलं, तुमचे भाऊ नि बहिण, त्यांची लग्नं, नि त्यातून निर्माण होणाऱ्या संधी .. म्हणजे माझ्या बाबतीत तरी झाले ते असे झाले. नाहीतर मी एकुलता. ना सख्खा भाऊ ना बहीण मला. पण चुलत नि मामे दोन्ही प्रकारच्या बहिणी मात्र आहेत मला. आणि माझ्याच या स्टोरीसाठी त्यांची योजना आहे की काय असा संशय तुम्हाला ही येईल माझी गोष्ट ऐकल्यावर.

तर माझ्या चुलत बहिणीची .. म्हणजे रागिणीची लग्नघटिका जवळ येत चालली तशी आमच्या घरी पण गडबड उडाली. मला तर लग्न घटिका जवळ येतेय याच्या ऐवजी घटिका भरत आली असेच म्हणावे वाटते.. म्हणजे अगदी 'घटिका गेली, पळे गेली.. राम का रे म्हणा ना!' पण ती हल्लीची गोष्ट. तेव्हाची नाही. तेव्हा शादी का बुंदीचा लड्डू खायचा बाकी होता आणि तो किती गोड असावा याची स्वप्ने पहायचे दिवस होते ते. आणि याबाबतीत कुणी पुढच्यास ठेच लागली म्हणून शहाणा व्हायचा प्रयत्नही करीत नाही. सगळ्यांनाच आपापली ठेच खायची हौस..

तर तेव्हा मी नुकताच कॉलेजातून बाहेर पडलेला एक होनहार तरूण होतो. होनहार.. आणि होतकरू हे असे शब्द आहेत ना की त्यातून इतके आणि इतकेच कळते.. की हा बेटा हल्लीच परीक्षा पास झालाय.. ज्या काही बऱ्यावाईट मार्कांनी असेल.. आणि आता नोकरीच्या शोधात आहे! म्हणजे थोडक्यात सुशिक्षित बेकार म्हणा! पण कसाही खात असला तरी वाघालाही वाघोबा म्हणणारे आम्ही लोक.. बेकार तरूणांना बेकार म्हणत नाही आम्ही नि त्यांच्या नाजूक मनास ठेच पोहोचवत नाही. तोंडभरून होतकरू म्हणून कौतुक करतो त्यांचे. तसे त्यांना नोकरी मिळावी याच्याबद्दल आम्ही काही करू न करू पण त्यांचे मन दुखावले जाऊ नये म्हणून आम्ही त्यांना अत्यंत होनहारपणे होनहार नाहीतर होतकरू म्हणू. तर मी तसा होतकरू होतो. माझी चुलत बहीण, रागिणी, तशी तिशीत आलेली. म्हणजे एकाएकी नाही तशी.. चांगली जन्मानंतर तीस वर्षांनंतर तशी झालेली. वाक्य काहीतरी विचित्र वाटतेय ना? पण त्यात खरेतर खोटे काहीच नाही! फक्त थोडेसे विचित्र लिहिले की वाचणारे पुन्हा वाचतात .. काय आहे बुवा या वाक्याचा अर्थ! हे म्हणजे माझे एक जनरल आॅब्झर्व्हेशन नेहमी प्रमाणे. तर तिचे लग्न जमवता जमवता एवढी वर्षे उलटून तिशीत आलेली रागिणी. आता तिसाचा भोज्या गाठणार होती ती. तिचे लग्न ठरले आणि त्यांच्या घरी आनंदीआनंद झाला. तिचे लग्न ठरले म्हणजे नक्की काय काय झाले नि ठरत नव्हते तेव्हा ते का ठरत नव्हते याची मला कल्पना नव्हती. पण तसे होत होते हे खरे. नाहीतर ती अशी तिशीत कशी पोहोचली असती? विशेषत: माझ्या काका काकूंची करडी नजर असताना? तर ते एक राहू देत .. म्हणजे मी काका काकू बद्दल सांगायला कांकू करतोय कारण माझे काका नि काकू म्हणजे एक स्वतंत्र विषय आहेत!
आमचे एक फॅमिली ज्योतिषी आहेत.. लोकांचे कसे फॅमिली डॉक्टर असतात तसे.. ते म्हणतात.. 'कुठल्याही गोष्टीचा योग यावा लागतो. आणि त्या जगन्नियंत्याच्या इच्छेवाचून.. इव्हन अ लीफ डझ नॉट मूव्ह!' शेवटचा इंग्रजी भाग आमच्या ज्योतिषांच्याच तोंडचा. त्यांना तशी सवय आहे. मध्येच मराठी इंटू इंग्रजी करायची. म्हणजे बोलता बोलता म्हणायचे, 'व्हॉट हॅपन्स टुमॉरो.. नो वन नोज.. बट आय टेल्यू..' वगैरे. तर सांगायचे इतकेच की तसा योग येत नसावा आजवर आणि आता आला असावा जुळून आणि काय! नि चढल्या रागिणीबाई बोहल्यावर!
पण गंमत पहा.. तिच्या लग्नात माझा योग जुळून यावा.. म्हणजे अगदी लग्नबिग्न नाही पण त्यादिशेने पहिली चिमणी पाऊले पडावीत.. हा पण योगायोग? आता चिमणी वगैरे पाऊले या तारूण्यसुलभ विषयात खरेतर बसत नाहीत.. पण लिहिताना छान वाटते ना म्हणून लिहिलेय इतकेच! नाहीतर काय कावळ्यासारखी पावले लिहिणार मी? तर ज्योतिषी आमचे खरेच सांगत असावेत! योग आणि योगायोग यांचे योगदान मानवी जीवनात योग्य प्रमाणात समजून घ्यायला हवे हेच योग्य आणि काय.. आपल्याला योगायोगाने चुलत बहीण मिळावी, तिचा लग्न सोहळा असावा.. आणि त्यात योगायोगाने सारे घडून यावे.. योगायोगच सारा.. पण हे समजून घेण्याचा योग कुंडलीत हवा इतकेच!