माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 7 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 7

रूम फॉर द इंडियन ग्रूम!

दिवसाची सुरूवात तर छानच झाली. चक्क तिच्यासमोर बसून आणि काही बोलणेही झालेले. अर्थात माझा वेंधळेपणा काही कमी झाला नव्हता.. पोहे खाताना मी ते थोडेफार सांडलेच. पण नेहमीच्या वेंधळेपणापेक्षा हा वेंधळेपणा वेगळा होता! एरव्ही वेंधळेपणा करत असे मी पण त्याला अंगभूत वेंधळेपणाच कारणीभूत होता. पण आताच्या या वेंधळेपणाला काही कारण होते.. खरेतर कार्यकारण भाव होता! कारण प्रत्यक्ष ती समोर बसून पाहात होती माझ्याकडे! पोहे सांडले खरे पण फक्त ते सांडताना वैदेहीचे लक्ष नसावे याचेच समाधान तेव्हा वाटले. तेव्हा म्हटले मी कारण पुढे तिने या पोहे सांडण्याचाही उल्लेख केव्हातरी केलाच. तिचे असे लक्ष होते बारकाईने माझ्याकडे तर!

गप्पा झाल्या आमच्या. खाणे झाले. मी आधीच तयार होऊन आलेला होतो. काकूला म्हणालो, “कुठे जायचे असेल तर मी मोकळाच आहे!”

या अमेरिकी पाहुण्यांना फिरायला घेऊन जाण्याबद्दल मी विचारत होतो पण काकूने धोबीपछाड घातला.. म्हणाली, “अहो.. याला घेऊन जा. केळीची पानं नि विड्यावी पानं आणायला. पत्रावळ्या नि द्रोण पण आणा.. नीट बघून.”

आता आली पंचाईत. कुठे ही सुहास्यवदना सुकांत चंद्रानना आणि कुठे त्या सुक्या पत्रावळ्या. कुठून मी माझ्या पायावर धोंडा टाकला असे वाटले. पण काकाच म्हणाला, “त्यासाठी त्याचे काय काम. मी जाता जाता मठात जातो. मग आणतो.. स्वामींच्या पायावर पत्रिका वाहायची बाकी आहे. याला दर्शन घ्यायचे असेल त्या स्वामींचे तर येऊ देत..”

मी मान हलवून लगेच 'नको नको' म्हणालो.. मग हात हलवून 'नाही' म्हणालो.. त्यानंतर तोंडाने 'च्यक' आवाज करता करतानाच वैदेही म्हणाली, “क्यानाय कमलॉंग अंकल?”

मी पस्तावलो. स्वाभाविकच होते ते. एका सेकंदात माझ्या तीन तीन नकारघंटा होकारात कशा बदलणार होतो मी? काकाचे काम शिस्तीचे. दहाच्या ठोक्याला निघणार तो. फक्त दोन मिनिटे बाकी होती.. म्हणाला, “ऑफकोर्स.. शुअर.. चल बरोबर..”

पुढच्या दोन मिनिटांत दोघे शिस्तीत निघून गेले. हात चोळण्याव्यतिरिक्त माझ्या हाती आता काय होते? काका आता तासा दोन तासाशिवाय येत नाही.

वैतागून मी बागेतील झोपाळ्यावर जाऊन बसलो.

माझे आडाखे असे चुकत होते. तरी बरे आज दुसराच दिवस. अजून चार पाच दिवस बाकी होते.. कंटाळून मी मुक्काम दुसऱ्या घरातल्या व्हरांड्यात हलवला. मला अध्यात्माची थोडी जरी गोडी असती तर आज अख्खे दोन तास तिच्याबरोबर काढता आले असते. पण आता वेळ निघून गेलेली. स्वामी म्हणतात ते सत्य.. उगाच गेलेल्या वेळाबद्दल पश्चात्ताप करण्यात काय हशील? हे स्वामी कोण? कोण जाणे. पण कुठल्याशा स्वामींनी म्हटलेच असणार हे. तेवढ्यात कृत्तिका वर आली. म्हणाली, “इथे काय करतोयस?”

उगाच इंप्रेशन पडावे म्हणून म्हणालो, “विचार, मनन आणि चिंतन..”

मी कसले.. खरेतर कोणाचे.. मनन नि चिंतन करत होतो हे मलाच ठाऊक होते.

“वा! भारीच तत्वचिंतक आहेस.. तू नाही गेलास वैदूबरोबर?”

माझ्या जखमेवर मीठ चोळत ती म्हणाली.

“नाही.. स्वामी लोकांचे मला वावडे आहे..”

“मला देखील.. पण वैदू आहे ना तिला इकडचे भारी आकर्षण! म्हणते इंडिया इज इंडिया.. जमले तर तिला परत यायचेय इथे.”

“हुं..”

माझ्या एका 'हुं' मध्ये माझा आनंद व्यक्त होत होता.. मला अमेरिकेचे आकर्षण कधी नव्हतेच.. वै बरोबर मला ही जावे लागले असते की नाही? हाच विचार ही कृत्तिका येण्याआधी माझ्या मनात होता. कशाचा कशाला पत्ता नाही पण हा विचार मात्र होता मनात आणि त्याचे अगदी रेडीमेड उत्तर मिळाले मला.. त्या स्वामींच्या कृपेनेच असेल.. बाय द वे.. चांगल्या डॉक्टर झालेल्या वैदेहीला ही कृत्तिका 'वैदू' काय म्हणतेय? मी तिला वै हे एकेरी एकाक्षरी संबोधन ठरवून टाकले.

"आणि तिला इंडियनच 'ग्रूम' हवा आहे.." कृत्तिका म्हणाली.. मला परत स्वामींच्या कृपेचा भास झाला.

"ओह! छान!"

माझ्या मनातल्या फुटणाऱ्या लाडवांचा आवाज बाहेर कृत्तिकाला ऐकू येऊ नये याची काळजी घेत मी म्हणालो. पुढे तिला कसा मुलगा हवा आहे वगैरे माहिती काढणे या स्टेजला जरा कठीण होते. कदाचित मी तिला ते विचारलेही असते पण खालून वै च्या आईचे बोलावणे आले आणि कृत्तिका निघून गेली..

मी परत बसून राहिलो विचार करत नि कवितांचे शब्द जुळवत..

झिप झॅप झूम

झिप झॅप झूम

वॉव.. सम इंडियन ग्रूम!

धिस गर्ल जस वॉंट्स इंडियन ग्रूम..

वॉव वॉव! आय कॅन सी द रूम..

झिप झॅप झूम

झिप झॅप झूम..

शूss

झिप झॅप झूम

ओ फूल, डोन्ट टॉक लाऊडली..

पाठीवर पडेल बुरकुल्यांचा ब्रूम..

मग ठोकावी लागेल

धूम धूम धूम!

असल्या काहीतरी ओळी जुळवीत बसलो.. मनाशीच! माझी पहिलीच कविता म्हणावी ही! प्रेम माणसाला कवी बनवते म्हणे. पण कवितेत असले ब्रूम नि झाडू अलाऊड असतात? असतील किंवा नसतील .. पण उत्स्फूर्त आतून येते तीच कविता म्हणे. मग त्यातले शब्द कसेही असोत. सच्चे शब्दच ते. मग माझ्या आतून हे असले झाडू वगैरे यावेत? नाही, काहीतरी नाजूक नि हळवे शब्द हवेत.. येणार कुठून? तरीही जमेल तितका शब्दजुळार करायलाच हवा.. केला मी.. शाब्दिक हातोडीने शब्दास शब्द जोडले मी!

ताक धूम धूम

ताक धूम धूम

शी विल बी माईन

लेट मी नाॅट ॲझुम

हवा इंडियन तिला

तर दिसेन मी

न करताच झूम

वाॅव सम इंडियन ग्रूम!

गोड किती ती

जणू श्रीखंड जिलबी

गुलाब जामुन

प्यार है फिरभी

गोड गोडातही मजला

आवडते मशरूम

वाॅव सम इंडियन ग्रूम!

मोस्ट एलिजिबल

मीच तर बॅचलर

प्रेम युनिव्हर्सिटीचा

मी व्हाइस चॅन्सलर

मी नसेन तर कोण असेल?

होईल सगळीकडे सामसूम

वाॅव सम इंडियन ग्रूम!

ताक धूम धूम

ताक धूम धूम

वा! काय आशावादी प्रेमकविता लिहिली मी! मीच माझ्यावर खूष झालो. आणि मी इंडियन, स्वप्नात रंगलो इंडियन ग्रूमच्या!