Chitti asu ghave books and stories free download online pdf in Marathi

चित्ती असू द्यावे

*चित्ती असू द्यावे...!*
लक्ष्मीबाईंनी दरवाजा उघडताच विष्णूपंतांनी तणतणत घरात प्रवेश केला. खांद्यावर अडकवलेली शबनम सोफ्यावर फेकून स्वतःचे शरीरही सोफ्यावर दाणकन आदळले. त्यांच्या तशा वागण्यावरून लक्ष्मीबाईंनी ओळखले की, स्वारीचे काही तरी बिघडले आहे. पतीसाठी पाणी आणण्यासाठी आत जाताना त्या मनातल्या मनात पुटपुटल्या, 'कधी यांचा स्वभाव बदलेल काही समजत नाही. वयाची साठी ओलांडली आहे पण स्वभाव लग्न झाल्यावर होता तसाच आहे. वाढत्या वयानुसार स्वभाव बदलतो म्हणतात पण आमच्या रावांचे तसे नाही. कुठे एखादी गोष्ट पटली नाही की ह्यांच्या तळपायाची आग मस्तकात शिरते. जमाना बदलतोय पण बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे यांना जमले नाही, जमत नाही, जमणार नाही...' पाण्याचा प्याला पतीच्या हातात देत त्या म्हणाल्या,
"घ्या. पाणी प्या. काय झाले ते शांतपणे सांगा..."
"काय शांतपणे सांगू? ताळतंत्र सोडले सर्वांनी. अरे, एकांतात नंगा नाच करा ना. कुणी पाहायला, अडवायला येणार नाही. निर्लज्ज कुठले..."
"काय झाले? एवढा का त्रागा करताय? छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत जा. 'कालाय तस्मैय नमः" लक्ष्मीबाई समजुतीच्या स्वरात म्हणाल्या तसे विष्णूपंत अधिकच चिडून म्हणाले,
"कालाय तस्मैय नमः असे समजून वागू? चार चौघात, एखाद्या कार्यक्रमात तुला मिठी मारु..."
"इश्श! तुमचे आपले काही तरीच..." लक्ष्मीबाई लाजून म्हणाल्या.
"हे.. हे.. ही लज्जा आजकाल कुठे दिसत नाही. कोळून प्यायलेय ही आजची तरुण पिढी. ही लज्जा, चेहऱ्यावरील हा लालसरपणा कुठे दिसत नाही. चेहरा सजवण्याच्या नावाखाली तो नैसर्गिक चेहरा, त्यावरचे भाव सारे काही लपवून टाकतात आणि मग ती विकतची, दिखाऊ लाली गालावर फासून घेतात. अरे, चेहरा काळा असला तरीही त्यावर पसरलेली लाजेची लाली कशी दिलखेच असते.लज्जा हा स्त्रीला मिळालेला नैसर्गिक दागिना आहे. तो बाईचे सौंदर्य फुलवतो, खुलवतो, सजवतो आणि त्याचबरोबरपुरुषांना भुलवतो. पण आजकाल या फसव्या सौंदर्याकडे घंटाभर पाहिले तरीही शरीरात रोमांच पसरत नाहीत ग. हे चेहऱ्यावर फासतात ना ते तर काही वेळा एवढे बेढब दिसते ना की, त्या चेहऱ्याकडे पाहावे वाटत नाही ग. दुसरे सांगू का, घामाने म्हणा किंवा मी म्हणतो तसा धुडगूस घालताना त्या मेकअपने चेहऱ्याची साथ सोडली ना तर तो चेहरा असा विद्रूप, घाणेरडा दिसतो ना की, त्या चेहऱ्याकडे बघावेसे वाटत नाही. "
" असे झाले का? म्हणून तणतणत आलात ग..." लक्ष्मीबाई विचारत असताना विष्णूपंत म्हणाले,
"ते जाऊ दे ग. आजकाल फॅशनच्या नावाखाली काहीही सावळा गोंधळ घालायला लागलेत. हे..हे कोणत्याही कार्यक्रमात फोटो काढण्याचे वेड एवढे वाढलय ना की, चांगल्या कार्यक्रमाचे वाट्टोळे होऊ लागले आहे..."
"होऊ देत ना. आपल्याला आवडत नाही त्या गोष्टींकडे कानाडोळा करावा..."
"कसा कानाडोळा करू? अरे, तुम्हाला संस्कृतीचे असे धिंडवडे उडवायचे असतील तर मग आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना बोलावूच नका ना. काय करायचे ते ..."
"अहो, असे झाले तरी काय?"
"काय होणार? फोटो काढताना मिठ्या मारणे काय, चुंबा..." विष्णूपंत तावातावाने बोलत असताना बाहेरून आवाज आला,
"काय चालले आहे पंत? आहात काय घरात?" तो आवाज ऐकून लक्ष्मीबाई म्हणाल्या,
"घ्या. आला तुमचा रामबाण इलाज..." लक्ष्मीबाई हसतहसत बोलत दिवाणखान्यात रामभाऊंचे आगमन झाले. रामभाऊ आणि विष्णूपंत हे दोघे अनेक वर्षांपासून शेजारी राहत होते. त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीची घट्ट वीण कधी गुंफल्या गेली हे दोघांनाही कळले नाही. किराणा, भाजी अशा वस्तू आणण्यासाठी दोघे एकत्रच जात असत. एखाद्याला काहीही घ्यायचे नसले तरीही दुसरा सोबत जात असे."
"या. या. रामभाऊ. या."
"तुम्ही साखरपुड्याहून परत आला की नाही ते पाहावे म्हटलं. काय झाले? तब्येत बरोबर नाही का? चेहरा कसा ..." रामभाऊ बोलत असताना लक्ष्मीबाई मध्येच म्हणाल्या,
"रागाने तमतमलाय. आता तुम्हीच काय ते सांगा." असे म्हणत लक्ष्मीबाई स्वयंपाक घरात गेल्या.
"पंत, काय झाले? कार्यक्रमात काही गडबड झाली का? काही वेगळे घडले का? दोन्ही पाहुण्यात काही बाचाबाची झाली का?"
"नाही हो रामभाऊ, तसे काही झाले नाही. पण हे फोटोग्राफीचे वेड चांगल्या कार्यक्रमाचा बिघाड करते बघा..."
"आबाबा! पंत ते विचारुच नका. 'कार्यक्रम नको पण फोटोग्राफी आवरा' अशी परिस्थिती होतेय बघा. दोन दोन, तीन तीन तास त्या फोटोग्राफीत जातात. आपल्यासारख्याची इच्छा नसली तरीही ओढून नेतात. पंत, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गतवर्षी आमच्या म्हटलं तर जवळचे, म्हटलं तर दूरचे अशा एका पाहुण्याकडे लग्न झाले. आम्ही दोघेही गेलो होतो. लग्न लागले. फोटो सेशन सुरू झाले. आम्हाला वाटले आम्हाला कोण विचारणार? पण कसचे काय? यजमानाच्या नजरेत आमची उपस्थिती भरली. त्याने आम्हा पतीपत्नीला ओढून व्यासपीठावर नेले. नवरीशी ओळख करून देऊन आमचे फोटो काढले. त्यानंतर एक महिन्यानंतर महत्त्वाच्या कामासाठी मी त्यांच्या घरी गेलो. मोठ्या कौतुकाने, उत्साहाने त्यांनी लग्नाचा अल्बम माझ्यासमोर ठेवला. मी तो अल्बम दोन-तीन वेळा बघितला. ते करताना माझा हेतू हा की,आग्रहाने, बळेबळे ओढत नेऊन काढलेले आमचे नवराबायकोचे छायाचित्र कुठे तरी असेल असा होता पण आमचा फोटो कुठेही दिसत नव्हता. मी अल्बम वारंवार पाहतोय म्हणून यजमान म्हणाले की, खरेच किती छान झालाय ना अल्बम. अगदी नवीन प्रकार वापरला आहे त्याने. कितीही पाहिला तरीही हातातून खाली ठेवावाच वाटत नाही. कसे आहे, गेले चाळीस हजार रुपये गेले पण फोटो आणि अल्बमची रचना किती सुंदर, नाविन्यपूर्ण , कलात्मक आहे ना. तुमचाही फोटो किती मस्त आलाय ना. तुम्ही तर काय बुवा एकदम तरुण दिसताय. ते असे म्हटल्यावर मी पुन्हा अल्बम चाळला पण शपथ आमचे छायाचित्र कुठे दिसले असेल तर..."
"डिलीट केले असेल हो. आपल्या काळात कसे होते, एकदा फ्लॅश मारला की, कसा का असेना फोटो येणार म्हणजे येणार. आजकाल या नवीन पद्धतीने काढलेले फोटो पुन्हा बघायला मिळतीलच याची शाश्वती नाही. दूरवरच्या नात्यातील लोकांचे, काही प्रमाणात अपरिचित असणारे लोक यांचे आग्रहाने काढलेले फोटो चक्क उडवून टाकतात हो. मला तर अनेक ठिकाणी हा अनुभव आलाय. मी काय म्हणतोय, तुम्हाला फोटो डिलीट करायचे असतील तर मग कशाला खेचत नेऊन फोटो खिचता हो. फोटो नंतर काढून टाकणे हा अपमानच आहे हो."
"अगदी बरोबर आहे! बरे, आज काय घडले?"
"काय घडणार? एक-एक नवीन प्रकार या उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहेत. मुलाने खाली गुडघ्यावर बसून मुलीला प्रपोज करणे काय, मुलीने स्वतःचा पाय त्याच्या गुडघ्यावर ठेवून त्याचा स्विकार करणे काय? नंतर त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी फोटोच्या नावाखाली, स्वातंत्र्याच्या नावाखाली धुडगूस घालणे काय? हे सारे याच देही, याच डोळी पाहणे काय..."
"पंत, आपल्याला हे पटत नाही म्हणून आपण रुढीसंरक्षक ठरतोय आणि कदाचित मागे..."
"पडलो तर पडलो. रुढींचे हे असे भक्षक होण्यापेक्षा संरक्षक होणे केव्हाही परवडले. तुम्हाला सांगू का तिथले प्रकार पाहण्यापेक्षा निघून यावेसे वाटले. तुम्ही ऐकू नये मी सांगू नये. नाविन्याची चाड, कास धरताना तुम्ही त्या पवित्र, मंगलमय व्यासपीठावर, जिथे काही क्षणांपूर्वी विधिवत गणपतीची, कुलदेवतेची पूजा केली तिथेच तुम्ही एकमेकांना मिठ्या मारता, फोटो काढताना नको तिथे एकमेकांच्या शरीराला स्पर्श करता हा कुठला नाविन्याचा ध्यास? असा धुडगूस घालायचा असेल तर मग सारे मंगलमय विधी करुच नका ना. सरळ सरळ असे प्रकार ज्यांना आवडतात, जे मिटक्या मारत पाहतात त्यांनाच बोलवा. म्हातारे, वृद्ध अशा लोकांना बोलावूच नका ना..."
"पंत, आपल्यासारखी म्हातारी माणसेही असा धुडगूस घालतात हो. ते स्वतःला प्रगत म्हणवून घेतात. कोणताही प्रसंग इन्जॉय करणे हा आजकाल नवीन प्रघात सुरू झालाय. परवाच आम्ही एका बारशाच्या कार्यक्रमात गेलो होतो. तिथे तरुणाईच्या बरोबरीने म्हाताऱ्यांनी मजा केली. नवीन नातवाच्या दोन्ही आजोबा आजींनी केलेली धमाल अवर्णनीय. सून सासऱ्याच्या हातात हात घालून तर जावाई सासूच्या कमरेत हात घालून नाचत होते. दुसरा एक प्रसंग सांगतो, मागच्या आठवड्यात आम्ही एका साखरपुड्याला गेलो होतो. तुम्ही म्हणता तसे मुलाने गुडघ्यात बसून मुलीला मागणी घातली.मुलीनेही त्याच्या गुडघ्यावर पाय ठेवून त्याची मागणी स्विकारली आणि मग तो प्रसंग पाहून नवरीच्या बापाच्या अंगात तारुण्याचे काय वारे शिरले बघा त्यानेही चक्क गुडघ्यावर बसून आपल्या पन्नाशी गाठलेल्या बायकोला गुलाबाचे फुल देऊन विनवणी केली. "
"हेच ते. नात्याच्या काही मर्यादा असतात, काही संकेत असतात ते असे पायदळी तुडवून काय मिळवायचे असते तेच कळत नाही."
"पंत, ही सारी पाश्चात्य संस्कृती आहे हो.."
"रामभाऊ, इथेच आपण चुकतोय. पाश्चात्त्यांना, त्यांच्या संस्कृतीला दोष देऊन आपण आपल्या चुकांवर पांघरुण घालू पाहतो. मला एक सांगा, त्यांच्या संस्कृतीत का सारे असेच घाणेरडे आहे? चांगले काहीच नाही का हो? ते लोक आपल्या भारतीय संस्कृतीतले चांगले तेवढे घेतात. आपली भगद्वगीता ते मुखपाठ करतात. त्याचे आणि आपल्या इतर धर्मग्रंथांचे वाचन करतात. आपले सण ते साजरे करतात. विदेशात जाऊन राहिलेली आपली भारतीय मुले, नागरिक तिथे गणेशोत्सव, महालक्ष्मी असे सण मोठ्या आनंदाने साजरे करतात. असे काही चांगले असलेले त्यांच्याकडून शिका ना पण नाही आपल्याला नाना थेरं करायची असतात आणि मग दोष त्यांना द्यायचा. आपल्यात दोष आहे हे आपण केव्हा लक्षात घेणार? रामभाऊ, धूळ आरशावर नसते. असलीच तर ती साफ करता येते पण धूळ आपल्या चेहऱ्यावर असते, आपल्या नजरेत असते. ती कोण साफ करणार?"
"पंत, मान्य आहे तुमचे. पण काय करणार आपले काही चालत नाही हो. आपल्या विचारांना बुरसटलेले, मागास असा शिक्का बसतो हो."
" रामभाऊ, आज तर कहर झाला हो, कहर झाला. नात्यातील इतर म्हातारी माणसे सोडा पण नियोजित वधूवरांचे वृद्ध आजोबा-आजी तिथे असताना, त्यांच्या डोळ्यादेखत वधूवर चक्क एकमेकांच्या गालावर गाल..."
"पंत, गालावर गाल टेकवणे ही आजची संस्कृती आहे..."
"जाळायला हवी अशी संस्कृती..." विष्णूपंत अचानक उसळून पुढे म्हणाले, "रामभाऊ, तुम्ही म्हणताय ती संस्कृती ठीक आहे हो पण इथे तर गालावर गाल नाही तर गालावर ओठ..."
"काय? पंत, तुम्ही हे काय सांगता? भर मंडपात?"
"होय! रामभाऊ, होय! वधूवर एकमेकांच्या भाळी ओठ टेकवत टेकवत गालावर आणि नंतर तर चक्क एकमेकांच्या ओठांवर ओठ टेकवण्यापर्यंत त्यांची मजल गेली हो. आश्चर्य म्हणजे ते सिनेमात रिटेक करतात ना त्याप्रमाणे फोटोग्राफर आणि इतर भ्रमणध्वनीधारक 'एक-एक मिनिट हं...' 'वन्समोअर..' म्हणत पुन्हा पुन्हा त्यांना तसे करायला भाग पाडत होते. वेगवेगळ्या अँगलने फोटो काढत होते आणि ती जोडीही त्याच उत्साहाने, तशाच आवेगाने तो प्रकार वारंवार करत होते. मला सांगा रामभाऊ, तिथे हौशी मंडळी भरपूर असते. ते फोटो अनेकांनी एकदा नव्हे अनेकदा स्वतःच्या भ्रमणध्वनीवर टिपले असणार. कुणी त्या फोटोंचा गैरवापर केला म्हणजे कोणत्या भावात पडेल? उपस्थित असलेल्या आमच्यासारख्या म्हाताऱ्यांच्या अगदी त्या आजोबा-आजीच्याही माना शरमेने खाली जात होत्या."
"कुणी थांबवत नव्हते त्यांना?"
"कोण थांबवणार? कोण ऐकणार? उलट कुणी थांबवायला गेले तर अपमानित होण्याची वेळ आली असती. 'रंग मे भंग डाला', आमच्या आनंदावर विरजन टाकले म्हणून त्यांचीच षष्टी केली असती आणि आजन्म त्यांच्या नावाने बोटं मोडली असती, त्यांच्यावर खापर फोडले असते. त्यामुळे काही म्हातारे शांतपणे बघत होते, काही जण असहाय्यपणे पाहात होते तर काही म्हातारे माणसं त्या प्रसंगाचाही आनंद लुटत होते..."
"पंत, आपणही अशाच कोणत्यातरी एका भुमिकेतून तिकडे बघायचे आणि चलती का नाम गाडी असे म्हणून शांत बसायचे झाले."
"रामभाऊ, ते तर जमत नाही ना. उघड्या डोळ्यांनी कोणतेही थेरं बघवत नाहीत हो. तुम्हाला खात्रीने सांगतो भाऊ, हे प्रकार असेच चालू राहिले ना, चालू दिले ना तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी त्या पवित्र लग्नमंडपात... त्या बोहल्यावर सर्वांसमक्ष 'पहिली रात्र'...मधूचंद्र साजरा करायला ही मंडळी मागेपुढे पाहणार नाही."
"जाऊ द्या ना पंत, कशाला त्रास करुन घेता. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे..."
"चित्ती असू द्यावे समाधान..." असे म्हणत पंतांनी रामभाऊच्या दिशेने टाळी देण्यासाठी हात पुढे केला आणि टाळी देताच दोघेही हसत सुटले...
नागेश सू. शेवाळकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED